CNG Price Hike : सीएनजीच्या दरात 70 टक्क्यांची वाढ, CNG गाड्यांच्या वापरात घट
CNG Price Hike : नैसर्गिक वायूच्या किमतीत वाढ झाल्याने सीएनजीच्या दरातही वाढ झाली आहे. परिणाम सीएनजी गाड्यांच्याा वापरात घट झाली आहे.
CNG Car Uses Reduces : गेल्या वर्षभरात भारतात सीएनजी (CNG) गाड्यांच्या वापरात घट झाल्याचं दिसून आलं आहे. एका रिपोर्टनुसार, देशात सीएनजी गाड्यांचा (CNG Car) वापर घटला आहे. या अहवालानुसार, मागील वर्षभरात नैसर्गिक गॅसच्या (Natural Gas) किमतीत मोठा वाढ झाली आहे. त्यामुळे सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे, परिणामी सीएनजी गाड्यांचा वापर कमी झाला आहे.
सीएनजीच्या दरात 70 टक्क्यांची वाढ
रेटिंग एजेंसी इक्रा (ICRA) एजन्सीच्या रिपोर्टनुसार, नैसर्गिक वायूच्या किमती वाढल्याने चालू आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये वाहनांमधील सीएनजीचा वापर 9 वरून 10 टक्के कमी झाला आहे, तर पूर्वी हे प्रमाण 16 टक्के होते. रेटिंग एजन्सीच्या अहवालानुसार, जागतिक स्तरावर नैसर्गिक वायूच्या किमती वाढल्यामुळे गेल्या वर्षभरात सीएनजीच्या किमती 70 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे डिझेल आणि सीएनजीमधील किंमतीतील तफावत खूपच कमी झाल्याने दोन्हीचे दर सरासरी समान आहेत. त्यामुळे सीएनजी वाहनांचा पर्याय टाळत आहेत.
सीएनजीचा वापर घटला
इक्रा रेटिंग्सने एका निवेदनात म्हटले आहे की, सीएनजीच्या किमतीत वाढ झाल्यामुळे, सीएनजी वाहनांच्या वापरामुळे ग्राहकांची पेट्रोल-डिझेलच्या तुलनेन खर्चात जास्त बचत होत नाहीय. यामुळे, चालू आर्थिक वर्षात व्यावसायिक वाहनांमध्ये सीएनजीचा वापर कमी झाला आहे.
14 महिन्यांत सीएनजी 73 टक्क्यांनी महागला
सीएनजीचे दर 70 हून अधिक टक्क्यांनी वाढले आहेत. 1 ऑक्टोबर 2021 पूर्वी राजधानी दिल्लीत CNG 45.5 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध होता. मात्र आता सीएनजी 78.61 रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध आहे. म्हणजेच 14 महिन्यांत सीएनजी 33.11 रुपये प्रति किलो म्हणजेच 73 टक्क्यांनी महागला आहे. सीएनजीच्या दरात झालेल्या या वाढीमुळे सीएनजी वापरणाऱ्या वाहनधारकांचे बजेट बिघडलं आहे.
सीएनजी गाड्यांची संख्याही कमी झाली
इक्राच्या रिपोर्टनुसार, 'एकूण वाहनांमध्ये सीएनजीचा वापर आर्थिक वर्ष 2021-22 मधील 38 टक्क्यांवरून 2022-23 च्या पहिल्या आठ महिन्यांत 27 टक्क्यांवर आला आहे. पण, तरीही प्रवासी विभागात सीएनजीचा वापर सुरू आहे. दरम्यान येत्या काळात सीएनजीसह इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याची अपेक्षा असल्याचं इक्रानं म्हटले आहे.
कच्च्या तेलाच्या किमतीत घट
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने चढउतार होत आहेत. ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमतीत आज 0.05 टक्क्यांनी घसरण झाली आहे. क्रूड ऑइल प्रति बॅरल 76.10 डॉलरवर पोहोचली आहे. तर WTI कच्च्या तेलाच्या किमतीतही घसरण झाली असून त्याची किंमत प्रति बॅरल 71.02 डॉलरवर पोहोचली आहे.