Share Market : शेअर बाजारासाठी काळा दिवस; Sensex 1416 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान
Stock Markrt : शेअर बाजारात आज सर्वच क्षेत्रातल्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. मेटल आणि आयटी क्षेत्राला आज मोठा फटका बसला असून त्यांच्या शेअर्समध्ये 4 ते 5 टक्क्यांची घसरण झाली आहे.
मुंबई: मुंबई शेअर बाजारासाठी आजचा दिवस हा काळा दिवस ठरला आहे. जवळपास सर्वच शेअर्समध्ये आज मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 1416 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 430 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 2.61 टक्क्यांची घसरण होऊन तो 52,792 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 2.65 टक्क्यांची घसरण होऊन तो 15,809 वर पोहोचला आहे.
निफ्टी बॅंक निर्देशांक 884 अंकांनी घसरला तर निफ्टी आयटी निर्देशांक मागील दोन वर्षातली सर्वात मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. बीएसईची मार्केट कॅप 6 लाख कोटींनी घसरल्याने गुंतवणूकदारांना जोरदार फटका बसल्याचं चित्र आहे.
आज 838 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 2413 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 122 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.
आज बाजार बंद होताना जवळपास सर्वच शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. मेटल आणि आयटी क्षेत्राला आज मोठा फटका बसला असून त्यांच्या शेअर्समध्ये 4 ते 5 टक्क्यांची घसरण झाली आहे. BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही दोन टक्क्यांची घसरण झाली आहे.
गुरुवारी शेअर बाजारात Wipro, HCL Technologies, TCS, Tech Mahindra आणि Infosys या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली असून ITC, Dr Reddy's Laboratories आणि Power Grid Corporation या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.
जागतिक शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात समभागांची विक्री, गुंतवणूकदारांकडून शेअर बाजारातून पैसे काढून घेण्याचा सपाटा आणि भारतीय शेअर बाजारात झालेली समभागांची मोठ्या प्रमाणात विक्री यामुळे आज शेअर बाजार कोसळला आहे.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
- ITC- 3.32 टक्के
- Dr Reddys Labs-0.61 टक्के
- Power Grid Corp-0.18 टक्के
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
- Wipro- 6.25 टक्के
- HCL Tech- 5.99 टक्के
- Infosys- 5.44 टक्के
- Tech Mahindra- 5.43 टक्के
- TCS- 5.42 टक्के