Ashneer Grover : 'शार्क टँक इंडिया' फेम अश्नीर ग्रोवरला 'ती' चूक महागात, न्यायालयाने ठोठावला लाखोंचा दंड
Delhi High Court to Ashneer Grover : न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करत अश्नीर ग्रोवर यांनी सोशल मीडियावर भारत पे विरोधात पोस्ट केली, त्यामुळे न्यायालयाने दंड ठोठावला आहे.
Ashneer Grover Latest News : 'शार्क टँक इंडिया' फेम अश्नीर ग्रोवरच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. भारत पे (Bharat Pe) चे सह-संस्थापक (Co-Founder) आणि माजी व्यवस्थापकीय संचालक (Ex Managing Director) अश्नीर ग्रोव्हर यांना दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. सोशल मीडियावर भारत पेच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याबद्दल अश्नीर ग्रोवर यांना दिल्ली हायकोर्टाने हा दंड ठोठावला आहे. दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने भारत पेची एक याचिका फेटाळली आहे, या याचिकेमध्ये कंपनीने अश्नीर ग्रोव्हरला भारत पे विरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट करण्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती.
'शार्क टँक इंडिया' फेम अश्नीर ग्रोवरच्या अडचणीत पुन्हा वाढ
भारतपेचे माजी व्यवस्थापकीय संचालक अश्नीर ग्रोव्हर यांनी मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयासमोर कंपनीच्या विरोधात बदनामीकारक सोशल मीडिया पोस्ट केल्याबद्दल माफी मागितली. यानंतर न्यायालयाने त्यांना 2 लाख रुपये दंड भरण्याचे निर्देश दिले आहेत. एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने सोशल मीडियावर कंपनीबद्दल बदनामीकारक पोस्ट प्रकाशित करण्यापासून रोखण्याबद्दलच्या भारतपे ॲपचे निर्मात्यांच्या अर्जावर सुनावणी केली. यावेळी न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
न्यायालयाने ठोठावला दोन लाखांचा दंड
दिल्ली उच्च न्यायालयाने अश्नीर ग्रोवरला सोशल मीडियावर भारत पे विरोधात कोणतीही पोस्ट न लिहिण्याचे आदेश दिले होते. असे असतानाही न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करत अश्नीर ग्रोवर यांनी सोशल मीडियावर भारत पे विरोधात पोस्ट केली, त्यामुळे न्यायालयाने दंड ठोठावला आहे. अश्नीर ग्रोव्हर यांनी या पोस्टबाबत न्यायालयासमोर बिनशर्त माफी मागितली, जी कोर्टाने मान्य केली. पण, न्यायालयाने अश्नीर ग्रोव्हर यांना दिल्ली उच्च न्यायालय लिपिक संघटनेकडे दंडाची रक्कम भरण्यास सांगितलं आहे. अश्नीर ग्रोव्हर यांच्या वकिलाने न्यायालयाला सांगितलं की, ते बिनशर्त माफी मागतो. यापुढे ते न्यायालयाच्या आदेशाचे पालन करतील. भारत पे विरोधात कोणतीही असंसदीय भाषा वापरणार नाही, अशी हमीही त्यांनी न्यायालयाला दिली आहे.
Bharat Pe बद्दल आक्षेपार्ह पोस्टमुळे लाखोंचा दंड
अश्नीर ग्रोव्हरने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली असून हे थेट न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन आहे, अशी याचिका भारत पे कंपनीने न्यायालयात दाखल केली होती. मे 2023 मध्ये, न्यायलयाने अश्नीर ग्रोव्हर आणि भारत पे दोघांनाही सांगितले होते की, ते एकमेकांविरुद्ध असंसदीय भाषा वापरणार नाहीत. दिल्ली पोलिसांनी अश्नीर ग्रोवर आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध एफआयआर नोंदवल्यानंतर, भारत पेने न्यायालयात सांगितलं की, अश्नीर ग्रोव्हर ट्विटरवर भारत पे विरोधात सतत पोस्ट लिहित आहेत.
न्यायमूर्ती रेखा पल्ली यांच्या एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने सोशल मीडियावर कंपनीबद्दल बदनाम करणारी पोस्ट प्रकाशित करण्यापासून रोखल्याबद्दल खाजगी स्टार्टअप रेझिलिएंट इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच भारतपे ॲपचे निर्मात्यांच्या अर्जावर सुनावणी केली. फिनटेक कंपनीच्या प्रलंबित खटल्यामध्ये अश्नीपर ग्रोव्हर आणि त्यांच्या कुटुंबाला कंपनी, तिचे संचालक, कर्मचारी यांच्याविरुद्ध बदनामीकारक विधाने करण्यापासून किंवा कोणत्याही माध्यमात किंवा स्वरूपात ते छापण्यापासून प्रतिबंधित करणारा कायमचा मनाई करण्याची मागणी करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती, ती मात्र न्यायालयाने फेटाळली आहे.