Nationwide Bank Strike : बॅंकाचा उद्या देशव्यापी संप, बँकेतील कामे आजच उरकून घ्या!
Bank Strike : तुमचं बँकेत किंवा बँकेशी संबंधित काही काम असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. उद्या म्हणजेच 19 नोव्हेंबर रोजी बँकांनी देशव्यापी संप पुकारला आहे.
Bank Strike : तुमचं बँकेत किंवा बँकेशी संबंधित काही काम असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. उद्या म्हणजेच 19 नोव्हेंबर रोजी बँकांनी देशव्यापी संप (Nationwide Bank Strike) पुकारला आहे. या देशव्यापी संपामुळे बँकेच्या ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या दरम्यान देशभरात बँकिंग सेवा ठप्प होऊ शकतात, त्यामुळे ग्राहकांनी आपली सर्व महत्त्वाची कामे आजच आटोपून घ्यावी, जेणेकरुन त्यांना कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवणार नाही.
19 नोव्हेंबर रोजी बँकांचा संप
ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) ने कॅथोलिक सीरियन बँक आणि डीबीएस बँकेच्या कर्मचार्यांना 11 व्या द्विपक्षीय वेतन सुधारणा नाकारण्यासह कायमस्वरुपी नोकऱ्यांचे आऊटसोर्सिंग (कॅश मूव्हमेंट जॉब आणि हाऊसकीपिंग जॉब) आणि काही बँकांमधील नोकरीच्या सुरक्षिततेला धोका यासह अनेक मुद्द्यांच्या निषेधार्थ 19 नोव्हेंबर रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे.
कर्मचारी संघटना आणि इंडियन बँक्स असोसिएशनच्या बैठकीत तोडगा नाही
कर्मचारी संघटना आणि इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) यांच्यात बुधवारी झालेल्या चर्चेत कोणताही सकारात्मक किंवा समाधानकारक तोडगा न निघाल्यामुळे बँक युनियन्सने 19 नोव्हेंबरचा नियोजित देशव्यापी संप करण्याचा निर्णय घेतला आहे. "आयबीए आणि बँक व्यवस्थापनाशी झालेल्या चर्चेनंतर कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे 19 नोव्हेंबर नियोजित संप सुरुच ठेवू असं आम्ही त्यांना सांगितलं. तसंच मुख्य कामगार आयुक्तांनाही कळवलं आहे, असं एआयबीईएचे सरचिटणीस व्यंकटचलम यांनी सांगितलं.
"बायपार्टाइट सेटलमेंट (BPS) च्या तरतुदींमध्ये कोणताही बदल किंवा जोडणी परस्पर केली जाऊ शकते अशी आमची सूचना असूनही, आऊटसोर्सिंग, कर्मचार्यांची फिरती बदली, शिस्तभंगाच्या कृती प्रक्रियेचे पालन, ट्रेड युनियन प्रतिनिधित्व, नोकरी सुरक्षा यावर त्यांचे निर्णय मागे घेतील, असे कोणतेही स्पष्ट आश्वासन ते देऊ शकले नाहीत, असंही व्यंकटचलम पुढे म्हणाले.
तोडगा काढण्याचे सरकारचे निर्देश, परंतु..
केंद्र सरकारने IBA आणि बँक युनियनला 16 नोव्हेंबर रोजी चर्चा सुरु करुन संप टाळण्यासाठी तोडगा काढण्याचे निर्देश दिले होते. दिल्लीत सीएलसी रामिस थिरु यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सलोखा बैठकीत हे निर्देश देण्यात आले होते. परंतु कोणताही तोडगा न निघाल्याने उद्या बँकांचा देशव्यापी संप होणार आहे. आले.
बँक ऑफ बडोदा, पंजाब अँड सिंध बँकेने ग्राहकांना काय माहिती दिली?
19 नोव्हेंबर रोजी देशव्यापी संप पुकारला जाणार आहे. यासोबतच महिन्यातील तिसरा शनिवार असल्याने ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो, अशी माहिती AIBEA ने दिली. तर संपाबाबत नोटीस पाठवून माहिती दिल्याचं बँक ऑफ बडोदाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. बँक ऑफ बडोदा आणि पंजाब अँड सिंध बँकेने ग्राहकांना संपाबाबत आधीच माहिती दिली आहे. तसंच संप झाल्यास सेवा प्रभावित होऊ शकतात, याची कल्पनाही बँकेने ग्राहकांना दिली होती. देशातील अनेक कर्मचारी संपात सहभागी होऊ शकतात. या स्थितीत बँकेच्या अनेक शाखांच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे, असं पंजाब आणि सिंध बँकेने आपल्या निवेदनात नमूद केलं होतं.
ऑनलाईन बँकिंग सुरु राहणार
बँकेची कामे सुरळीत चालवण्यासाठी आवश्यक पावलं उचलावी लागतील. यासोबतच ग्राहक ऑनलाईन सेवांचा लाभ घेऊ शकतात. त्यामुळे ग्राहकांना काळजी करण्याचं कारण नाही. संप काळात ग्राहक नेट बँकिंगसह सर्व प्रकारच्या ऑनलाईन बँकिंग सुविधांचा लाभ घेऊ शकता, असं बँक ऑफ बडोदाने म्हटलं आहे.