Adani Wilmar Share Price : खाद्य तेलाचे दर घटले, अदानी विल्मरचा शेअर पडला; जाणून घ्या काय झालं
Adani Wilmar Share Price : अदानी विल्मरने खाद्य तेलाची किंमत घटवल्यानंतर आज कंपनीच्या शेअर दरात घसरण झाली आहे.
Adani Wilmar Share Price : गुंतणूकदारांना बंपर कमाई करून देणाऱ्या अदानी विल्मरच्या शेअर दरात आज घसरण झाली. अदानी विल्मरने खाद्य तेलाच्या किंमती कपात करण्याचा निर्णय घेतल्याने ही घसरण झाली असल्याचे म्हटले जात आहे. आज सकाली अदानी विल्मरचा शेअर पाच टक्के घसरला होता. अदानी विल्मरचा शेअर 578 रुपयांवर खुला झाला होता. त्यानंतर पाच टक्क्यांची घट होऊन 555.50 रुपयापर्यंत घसरला.
सामान्य ग्राहकांना दिलासा देण्यासाठी अदानी विल्मर कंपनीने खाद्यतेलांच्या किंमतीत 10 रुपयांती कपात केली. अदानी विल्मरने फॉर्च्युन सनफ्लॉवर तेलाच्या एक लिटरची किंमत 220 रुपयांहून 210 रुपये इतकी केली आहे. सोयाबीन आणि कच्च्या घानेच्या तेलाच्या किंमतीतही 10 रुपयांनी घट केली आहे. मात्र, कंपनीचा हा निर्णय गुंतवणूकदारांना फारसा आवडला नसल्याचे म्हटले जात आहे. या दर कपातीच्या निर्णयानंतर आता अदानी विल्मरच्या शेअर दरात घसरण झाली आहे.
मागील काही महिन्यांपासून अदानी विल्मरच्या शेअर दरात घसरण होत आहे. याआधी इंडोनेशियातून पुन्हा पाम तेलाची निर्यात सुरू झाल्याच्या वृत्तानंतर काही प्रमाणात घसरण झाली होती. त्यानंतर आता किंमतीत कपात केल्याने घसरण होत असल्याचे म्हटले जात आहे.
मल्टीबॅगर स्टॉक झाला अदानी विल्मर
अदानी समूहाची एफएमसीजी कंपनी अदानी विल्मरच्या आयपीओने गुंतवणूकदारांना चांगली कमाई करून दिली. अदानी विल्मरचा शेअर 230 रुपये प्रति शेअर दराने फेब्रुवारी 2022 मध्ये आयपीओ आणला होता. त्यानंतर या शेअर दरात मोठी वाढ झाली. या शेअर दराने गुंतवणूकदारांना आयपीओ किंमतीपेक्षा 142 टक्के अधिक परतावा दिला आहे. अदानी विल्मरच्या शेअरने 878 रुपयांचा उच्चांक गाठला आहे.
(Disclaimer : ही बातमी केवळ माहिती देण्याच्या उद्देश्याने देण्यात आली आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. गुंतवणूक करण्याआधी नेहमी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. ABPLive.com च्यावतीने आम्ही गुंतवणूक करण्याबाबत सल्ला देत नाही. तुमच्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी आमची नाही. )