आधार जगातील सर्वात विश्वासार्ह डिजिटल आयडी; मूडीजचा दावा निराधार; केंद्र सरकारनं थेट फटकारलं
Moody Investors Service: आधार बायोमेट्रिक्सच्या विश्वासार्हतेवर मूडीजनं उपस्थित केलेले प्रश्न केंद्र सरकारनं फेटाळून लावलेत. सरकारनं सांगितलं की, हा जगातील सर्वात विश्वासार्ह डिजिटल आयडी आहे.
Aadhaar Biometric: मूडीजनं (Moody's Investors Service) आधार कार्डावर (Aadhar Card) उपस्थित केलेला प्रश्न केंद्र सरकारनं फेटाळून लावला आहे. सरकार म्हणतं की, आधार जगातील सर्वात विश्वासार्ह डिजिटल आयडी (Digital ID) आहे, ज्याला गेल्या दशकात एक अब्जाहून अधिक भारतीयांनी प्रमाणित केलं आहे, 100 अब्जाहून अधिक भारतीयांनी त्यावर विश्वास दाखवला असून बहुतेक भारतीय त्याचा स्वतःचं ओळखपत्र म्हणून वापर करत आहेत.
रेटिंग एजन्सी मूडीज इन्वेस्टर्सनी आधारच्या बायोमेट्रिक्सच्या विश्वासार्हतेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मूडीजनं आपल्या अहवालात दावा केला आहे की, आधार प्रणालीतील त्रुटींमुळे, हवामान अति उष्ण असलेल्या ठिकाणी आधार बायोमेट्रिक्स काम करत नाहीत. आता केंद्र सरकारच्या आयटी मंत्रालयानं मूडीजनं हा अहवाल निराधार असल्याचं म्हटलं आहे.
केंद्र सरकारनं निवेदनात काय म्हटलंय?
केंद्र सरकारनं निवेदनात म्हटलं आहे की, एका अहवालात जगातील सर्वात विश्वासार्ह डिजिटल आयडी आधारच्या विरोधात अनेक दावे करण्यात आले आहेत. सादर केलेल्या अहवालात डेटा किंवा संशोधनाचा उल्लेख केलेला नाही. याशिवाय वस्तुस्थिती जाणून घेण्याचा कोणताही प्रयत्न करण्यात आलेला नाही.
मूडीजनं जारी केलेल्या या निवेदनात आधार क्रमांकाची माहितीही चुकीची देण्यात आल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. निवेदनानुसार, अहवालातील एकमेव संदर्भ भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या (UIDAI) वेबसाइटचा आहे. दरम्यान, अहवालातून चुकीच्या पद्धतीनं जारी केलेल्या आधारची संख्या 1.2 अब्ज आहे. दरम्यान, वेबसाईटवर आधारची एकूण संख्या अगदी सहजपणे मिळणं शक्य आहे.
मनरेगाबाबतचाही दावा चुकीचा
बायोमेट्रिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे भारतातील उष्ण, दमट हवामानातील कामगारांना सेवा नाकारल्या जातात किंवा त्यांचा लाभ घेता येत नाही, असा दावा मूडीज अहवालात करण्यात आला आहे. यासाठी भारताच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा (MGNREGS) संदर्भ देण्यात आला आहे. या दावा फेटाळत सरकारनं निवेदनात म्हटलं आहे की, कामगारांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी त्यांची बायोमेट्रिक माहिती प्रमाणीकरण करण्याची गरज नाही. हे पैसे थेट कामगारांच्या खात्यात जमा होतात, याबाबत मूडीजला संपूर्ण माहिती नसून हे तथ्यहीन आहे.
आधार प्रणालीमध्ये सुरक्षा आणि गोपनीयतेशी संबंधित असुरक्षा असल्याचं मूडीज अहवालात म्हटलं आहे. आधार प्रणालीमध्ये सुरक्षा आणि गोपनीयता या संदर्भातील वस्तुस्थिती संसदेच्या प्रश्नोत्तरात वारंवार समोर आली आहे. आजपर्यंत आधार डेटाबेसची सुरक्षा भंग झाल्याचं समोर आलेलं नाही. सरकारने आधार डेटाबेससाठी एक मजबूत गोपनीयता प्रणाली तयार केली आहे.