गेल्या तीन दिवसांत शेअर बाजारात 10 लाख कोटी गुंतवणूक, गुंतवणुकीसाठी सकारात्मक संकेत?
Stock Market: सातत्याने शेअर बाजारात सध्या अस्थिरतेचे वातावरण आहे. गेल्या तीन दिवसांत मध्ये गुंतवणुकदारांनी 10 लाख कोटी गुंतवले.
Stock Market: सातत्याने शेअर बाजारात सध्या अस्थिरतेचे वातावरण आहे. गेल्या तीन दिवसांत मध्ये गुंतवणुकदारांनी 10 लाख कोटी गुंतवले. यामुळे हे सकारात्मक संकेत असल्याचं जाणकाराचं म्हणणं आहे. कारण आज मुंबई शेअर बाजार भांडवल तब्बल 257 लाख कोटी रुपयांच्या घरात गेलं आहे. गेल्या तीन दिवसांच्या सत्राच्या आधी बाजार भांडवल हे 248 लाख कोटी रुपये होतं. परंतू आज बाजाराने उसळी घेतली आणि बाजारात बाजार भांडवल थेट 258 लाख कोटीच्या घरात गेलं.
याचं मुख्य कारण म्हणजे जागतिक शेअर बाजारात गुरुवार, शुक्रवारी सकारात्मक वातावरण होतं आणि आशियाई बाजारसुद्धा सकारात्मक होता. यासर्वात मुख्य म्हणजे अमेरिकेतला शेअर बाजार स्थिर पाहायला मिळाला. परिणामी याचे जागतिक परिणाम दिसून आले आणि शेअर बाजारातलं भांडवलं वाढून शेअर बाजाराने उसळी घ्यायला सुरुवात केली. खरंतर या मे महिन्यात बाजार प्रचंड अस्थिर होता. 13 मे रोजी या महिन्यातलं बाजार भांडवल सर्वात कमी म्हणजे 241 लाख कोटी होतं आणि आज हेच बाजार भांडवल 258 लाख कोटीच्या घरात गेलं
रशिया-युक्रेन युद्धाचे परिणाम हे सार्वत्रिक बघायला मिळाले. ज्यामुळे सर्वासामान्यांना महागाईला सामोरं जावं लागत आहे. आयात होणाऱ्या कच्च्या तेलावर परिणाम झाला असून आजही तेलाचा दर 120 डॉलर प्रति बॅरल आहे. यामुळे वाहतुकीसह जीवनावश्यक वस्तू, आयटी कंपन्यांसह सगळ्यावर याचा परिणाम झालेला जावणतो आहे. यामुळे युद्ध सुरु असे पर्यंत बाजार अस्थिर राहील असा जाणकारांचा दावा आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अस्थिर असलेला शेअर बाजार आज चांगलाच वधारला आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात मोठी उसळण पाहायला मिळाली आहे. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 1041 अंकांनी वधारला तर निफ्टीही 308 अंकानी वधारला. सेन्सेक्समध्ये 1.90 टक्क्यांची वाढ होऊन तो 55,925 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 1.89 टक्क्यांची वाढ होऊन तो 16,661 वर पोहोचला आहे. आगामी काळात आता मान्सूनची वर्दी आणि अमेरिकेतील स्थिर वातावरण यामुळे भारतीय शेअर बाजारातील भांडवल आता 10 लाख कोटींच्या पुढे किती जातं हे पाहणं महत्त्वाचं असेल.