एक्स्प्लोर
चालू वर्तमानकाळ : आमचा काय संबंध!
शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या संवेदनाशून्य भडक बातम्या, माहितीचा अभाव, विचारशून्य विधानं, शासकीय निलाजरेपणा आणि 'आमचा काय संबंध' म्हणणारे शहरी लोक... ज्यांना एकवेळचा नाश्ता मिळाला नाही तरी सोसवत नाही, ते म्हणतात, “अन्नधान्य पिकवणार्यांचा आणि आमचा काय संबंध.......”

काही गोष्टी त्या-त्या वेळी लिहिल्या नाहीत तर लिहायच्या राहूनच जातात.
विदर्भात शेतकरी आत्महत्यांबाबतचा एक अभ्यास करण्यासाठी फिरत होते, तेव्हाचे काही अनुभव भंजाळून टाकणारे होते. या विषयावर अनेकांनी लिहिलंय, पण ती वर्तुळाच्या 'आतली' माणसं आहेत. 'बाहेर'ची माणसं कशी पाहतात, हे यात आलंय पण त्यात नकारात्मक अनुभवच प्रामुख्याने आहेत. त्यामुळे बाहेरून, बर्ड आय व्ह्यूने या प्रश्नाकडे पाहिलंच गेलेलं नाहीये. श्रीनिवास खांदेवाले यांचा अपवाद, पण बाकी कुणी तटस्थपणे या समस्येचा 'विचार'देखील नीट केलेला दिसत नाही. त्यामुळे भोंगळ विधानांचे ओघळ मुबलक पसरलेले आहेत, आजही ते दिसतातच कुठेकुठे. योग्य विचारांचा अभाव शासकीय कर्मचार्यांच्या व प्रसारमाध्यमात कामं करणार्यांच्या कार्यक्षमतांवर किती विपरित परिणाम करतो, हे मी हे काम करताना पहिल्यांदाच पाहिलं होतं.
इथली उजाड घरं, उद्ध्वस्त कुटुंबं, विधवा बायका आणि बापाच्या आत्महत्येच्या आठवणीनं घाबरून नखं खात उभी असलेली थरथरणारी मुलं, योजनांचा फायदा घेणारे भलतेच लोक, गारपिटीनं काल उभ्या असलेल्या बागेत आज एकही फळ झाडावर न राहता खाली पडलेल्या संत्र्यांचा हिरवा-केशरी चिखल, अत्यंत कार्यक्षम व आदर्श काम करणारा खोब्रागडेंसारखा जिल्हाधिकारी व अजून काही सरकारी अधिकारी, या बोटावरची थुंकी त्या बोटावर करणारे व विधवा बायकांकडे पाहताना डोळ्यांतून लाळ गाळणारे - खरंतर त्यांना नजरेनंच भोगणारे शेणाचा पो असलेले हलकट सरकारी नोकरदार, एका मोठ्या टीव्हीचॅनलच्या लोकांच्या चर्चा ऐकून मनात उफाळलेला उपरोध, पुढार्यांचं अर्वाच्य बोलणं, गुडघा-गुडघा धुळीत पाय रोवून चालत या गावातून त्या गावात केलेली वणवण, चालताना अनेकदा काही मैलांवरही एखादी साधी चहाची वा पानाची टपरीही लागायची नाही तेव्हा पडलेला शोष, आरार पाटलांचा 'सावकरांना कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढा' हा डायलॉग खरा मानून विद्रोह केलेल्यांना कायदाच बाजूचा नसल्याने घडलेल्या तुरुंगाच्या वार्या..... शेकडो गोष्टी.
एका स्थानिक कार्यकर्त्याला भेटले. कामाच्या वेळी मी माझी लेखिका इत्यादी ओळख पूर्ण बाजूला ठेवत असते. तसं त्यांच्याशी बोलण्यास सुरुवात केली. ते अत्यंत उद्धटपणे, मग्रुरीने बोलत होते. मी शांत राहण्याचा प्रयत्न करत त्यांना माझी अडचण सांगितली. काही जुन्या केसेस होत्या. त्यात विधवा बायका माहेरी निघून गेल्या, या गावात राहत नाहीत, कुठे गेल्या माहीत नाही, अशी उत्तरं मिळत. क्वचित कुणा तरुण मुलीचा पुनर्विवाह झाला असल्याचंही समजे. सात आठ तास पायपीट करून त्या गावातून परत यावं लागायचं. त्यामुळे अशी माहिती आधीच स्थानिक कार्यकर्त्यांकडून मिळाली असती तर वेळ आणि पायपीट दोन्ही वाचली असती.
ते म्हणाले, “यादी आमच्याकडेही आहे. कोणत्या बायकांना भेटता येईल हे मी तुम्हाला सांगू शकतो. फक्त आता तुम्हाला कोणत्या कॅटॅगिरीतल्या बायका पाहिजेत तेवढं सांगा.”
मी भांबावून म्हटलं, “कॅटॅगिरी अशी काही नाही. फक्त चार-पाच वर्षांपूर्वीची केस असेल तर सहसा त्या बाईची काही ना काही व्यवस्था झालेली असते. मला या एक-दोन वर्षांतल्या केसेस सांगा, ज्यांना लहान मुलं आहेत आणि परिस्थिती अधिक विपरीत असल्याने तातडीने मदत करण्याची गरज आहे... अशा केसेस.”
ते मोठ्यानं हसत हसत म्हणाले, “म्हणजे तुम्हाला ‘ताज्या विधवा’ पाहिजेत तर!”
माझा चेहरा एकदम कसनुसा झाला. स्त्रीत्वाचा हा अपमान जाणवून डोळ्यांत पाणी आलं.
मी लेखनात अनेकदा पात्रांच्या तोंडून का असेना, पण शिव्यांचा, अपशब्दांचा प्रासंगिक वापर करते; त्यामुळे लेखन अश्लील बनतं, असा अनेक वाचकांचा आक्षेप असतो. पण जेव्हा घटनाच अशा आणि इतक्या अश्लील असतात, तेव्हा अपशब्द देखील तोकडे ठरतात.
असे असंख्य अनुभव घेत माझा प्रवास सुरु होता.
एकदा गारपिटीनंतरचा दुसरा दिवस. काम आटोपून संध्याकाळी परतताना वाहनही मिळालं नाही व चिखलात कुठं बसणंही मुश्किल झालं तेव्हा रात्रभर चालत राहिले आणि पहाटे साडेपाच वाजता मुक्कामाला पोहोचले. सरळ रस्ता होता, उखडलेला, दोन-तीन दिवस इथून वाहनाने येत-जात होते म्हणून ओळखीचा बनलेला. सपाट जमीन, चढ नाही - डोंगर नाही. खूप पुढे कुठेतरी जंगल सुरू होत होतं. त्यामुळे संपणारच नाही असा समुद्र क्षितिजाला टेकलेला दिसतो तसा एक लांबलचक रस्ता. आजूबाजूला रिकामी निर्मनुष्य शेतं. राखणीची कुत्रीही नाही. कुठं एखादा पक्षीही नाही. मोबाईलची रेंज नव्हती त्या भागात, म्हणून तो बॅगेतच ठेवून दिला होता. हातात टॉर्च नाही. काही वेळ त्या दिवसातल्या घटना, भेटी उगाळल्या. मग गेल्या दोन-तीन महिन्यांपासून फिरत होते, त्या 'केसेस' आठवत राहिल्या. चेहरे, वाक्यं, आवाज, रडू, बधिरपणा, आक्रोश, आरोप... खूप काही. मग तोही टप्पा ओलांडून अजून मागे गेले. स्वतःचं आयुष्य समोर आलं. त्यातल्या काही आठवणी आल्या आणि विरघळून गेल्या. मग मन मोकळं झालं. शब्द अपुरे होत नाहीसे झाले. इतकी नि:शब्द, निरव मनःस्थिती मी कधी त्याआधी अनुभवली नव्हती, ना कधी नंतर अनुभवली. मग पुन्हा थोडे शब्द आले. वाटलं, गाणं यायला हवं होतं. गाणं म्हणजे बिनशब्दांचं गाणं. नुसते सूर. वरवर नव्हे, अगदी आतून गाता आलं पाहिजे होतं. म्हणजे या रात्री सोबत झाली असती. इतकंच.
या रात्री चांगलं वा वाईट प्रत्यक्ष काहीच घडलं नाही, पण मनात खूप - खूपच काही घडून गेलं. भीतीला थारा नव्हताच माझ्याकडे, अजूनही नसतो. आली, डोकावली, तरी विचारपूस करून निघून जाते बिचारी जुनी ओळख सांगून.
- हा अनुभव तेव्हाच समग्र लिहायला हवा होता.
पण नुकतंच 'भिन्न' लिहून पूर्ण केलं होतं, त्याचा थकवा होता. सतत भयं, मृत्यू, आत्महत्या असे विषय लिहिणं नको... असं डॉक्टर सुचवत होते. 'उतारा' म्हणून मी 'कुहू' लिहिलं.
तेव्हा माझे प्रकाशक मित्र दिलीप माजगावकर यांनी सुचवलं होतं की, "निदान पत्रं तरी लिहून कळवत चला हे सगळं."
मी त्रासून म्हटलं होतं की,"म्हणजे मग नंतर तुम्ही ती पत्रं छापणार... काहीतरी काम केलं पाहिजे, ते गरजेचं आहे. लिहून काय होणार?"
त्यांचं ऐकलं तरी प्रॉब्लेम असतो आणि नाही ऐकलं तरी प्रॉब्लेम. पण पत्रं नाही तरी निदान डायरी वा फॉर्मलेस असं काहीतरी तर लिहायला हवं होतं तेव्हा असं आज राहून राहून वाटतंय...
कारण? कारण तर स्पष्ट दिसतं आहेच... शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या संवेदनाशून्य भडक बातम्या, माहितीचा अभाव, विचारशून्य विधानं, शासकीय निलाजरेपणा आणि 'आमचा काय संबंध' म्हणणारे शहरी लोक... ज्यांना एकवेळचा नाश्ता मिळाला नाही तरी सोसवत नाही, ते म्हणतात, “अन्नधान्य पिकवणार्यांचा आणि आमचा काय संबंध.......”
‘चालू वर्तमानकाळ’मधील याआधीचे ब्लॉग -
चालू वर्तमानकाळ (31) : शेवटचा दिस गोड व्हावा
चालू वर्तमानकाळ (30) : बाई, आई, स्तनपान, चर्चा... वगैरे चालू वर्तमानकाळ (29) : बरी या (अकलेच्या) दुष्काळे पीडा केली! चालू वर्तमानकाळ (28) : सुंदर, सजलेल्या, तरुण बाहुल्या चालू वर्तमानकाळ (27) : दुसरी बाजू… तिसरी, चौथी, पाचवी बाजू वगैरे चालू वर्तमानकाळ (26) : द आदिवासी विल नॉट डान्स चालू वर्तमानकाळ : 25 : कौमार्य चाचणीचा खेळ व पुरुषार्थ चाचणीचं दिव्य चालू वर्तमानकाळ (24) : पॅनिक बटण आणि इ–संवाद वगैरे चालू वर्तमानकाळ (23) : पितात सारे गोड हिवाळा? चालू वर्तमानकाळ २२. लहानग्या सेक्स डॉल हव्यात की नकोत? चालू वर्तमानकाळ (21) : आनंदाची गोष्ट चालू वर्तमानकाळ (20) : एका वर्षात अनेक वर्षं चालू वर्तमानकाळ (19) : रोशनी रोशनाई में डूबी न हो… चालू वर्तमानकाळ (18) : मुखवटे घातलेल्या बातम्या चालू वर्तमानकाळ (17) : पशुपक्ष्यांत ऐसे नाही… चालू वर्तमानकाळ (16) : असं क्रौर्य कुणाच्याही वाट्याला येऊ नये! चालू वर्तमानकाळ (15) : दीपिकाचं नाक, रणवीरचे पाय आणि भन्साळीचं डोकं चालू वर्तमानकाळ (१४) : दुटप्पीपणाचं ‘न्यूड’ दर्शन चालू वर्तमानकाळ (13) : ‘रामायण’ आणि ‘सुहागरात’ व ‘रमणी रहस्य’ चालू वर्तमानकाळ (१२). लोभस : एक गाव – काही माणसं चालू वर्तमानकाळ (11) : सूट घातलेली बाई आणि वस्तुरुप नग्न नर चालू वर्तमानकाळ (10) दंशकाल : गूढ, विज्ञान आणि तत्त्वज्ञानाची सांगड चालू वर्तमानकाळ (९) : बाईच्या थंडगार मांसाचे अजून काही तुकडे चालू वर्तमानकाळ (8) : बिनमहत्त्वाचे (?) प्रश्न आणि त्यांची हिंस्र उत्तरं चालू वर्तमानकाळ (7) : अरुण साधू : आपुलकीच्या उबदार अस्तराचं नातं चालू वर्तमानकाळ : 6. उद्ध्वस्त अंगणवाड्या चालू वर्तमानकाळ (5) : अनेक ‘कुत्र्या’ आहेत या देशात… चालू वर्तमानकाळ (4) : जन पळभर म्हणतील… चालू वर्तमानकाळ (3) : आईचा घो आणि बापाची पत चालू वर्तमानकाळ (२) – अब्रू : बाईची, गायीची आणि पृथ्वीची! चालू वर्तमानकाळ (1) : स्वातंत्र्याचं सावळं प्रतिबिंब
View More
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
राजकारण
क्राईम

























