BLOG | ॲनिमा - ॲनिमस (उत्तरार्ध)
Blog : 'मन सुद्ध तुझं' या मालिकेत बाराव्या भागाच्या पूर्वार्धात आपण पाहिले की, मानसतज्ज्ञ डाॅ. उदय देशपांडे यांचा मित्र शशांक भाले स्वतःचा घटस्फोट टळावा म्हणून डाॅक्टरांकडे सल्ला घेण्यासाठी येतो. शशांक हा सौम्यहृदयी गृहस्थ आणि नीला ही त्याची हिंमतवान पत्नी अशी ही जोडी असते. शशांकच्या वडिलांनी आयुष्यभर त्याच्याशी दुजाभाव केला आणि घराच्या वाटणीतही अन्याय केला. तरीही तो घरच्यांशी किंवा कुणाशीही कधीच भांडत नाही हे पाहून टाळके सटकलेली नीला माहेरी निघून जाते. तिला घटस्फोट हवा असतो. त्यांची मुलगी साजिरी अकरावीला तर मोठा मुलगा विराज काॅलेजला असतो. मुलगी बापाकडे तर मुलगा होस्टेलमध्ये. मागील भागात शशांक व नीलाशी डाॅक्टर बोलतात. आता त्यांना मुलांशी बोलायचे असते. या मालिकेचे तेरा भाग एबीपी माझा या वृत्तवाहिनीवरून प्रसारित झाले आहेत.
या तेराव्या भागात डॉ. उदय देशपांडे मुलांशी बोलतात. साजिरी आणि विराजशी बोलताना डाॅक्टरांच्या लक्षात येते की, दोन्ही मुले आपल्या आई-वडिलांवर सारखेच प्रेम करतात. आई आणि बाबामधील कोणकोणते गुण आवडतात याची एक यादी साजिरीने बनवलेली असते. ती यादी चुकून शशांकच्या हाती पडते तेव्हा त्यात नीलाच्या अनेक गुणांची भर घालून तो दोघांची गुणसंख्या समान करतो. हे पाहून साजिरीच्या मनातील बाबाची प्रतिमा खूपच उंचावते. त्यामुळे वेगळे राहण्याची वेळ येते तेव्हा ती बाबाची निवड करते.
आता आई एकटी पडू नये म्हणून विराज नाईलाजाने आईची निवड करतो. परंतु तिला दुसरे लग्न करता यावे म्हणून स्वतः होस्टेलवर राहत असतो. पण दोघांनाही आई-बाबा एकत्रच हवे असतात, हे लक्षात आल्यानंतर डॉक्टर पुन्हा शशांक व नीलाला बोलावून घेतात. तेव्हा शशांक म्हणतो की, "साजिरी वयात आली आहे. तिला आईची गरज आहे. माझा स्वभाव पडखाऊ आहे. मला कुणाशी भांडता येत नाही. म्हणून नीलाने साजिरीचा बाप व्हावे. मी मुलांची आई होतो. प्रत्येक ग्रहाला जशी आपल्या कक्षेची मर्यादा असते तशी प्रत्येक माणसालाही आपल्या स्वभावाची मर्यादा असते."
यावर नीला परतण्याचा निर्णय घेते. घरी जाण्यासाठी शशांकने स्कूटर आणलेली असते. शशांकला ती मागच्या सीटवर बसायला सांगते आणि स्कूटरसह घराची सूत्रे हाती घेते. येथे हा तेरावा भाग संपतो. पण तो प्रत्यक्ष पाहतानाच त्यातली खरी उष्णता तुम्हाला जाणवेल.
शशांकमधले स्त्रीतत्त्व आणि नीलामधील पुरुषतत्त्व यांना मनोविज्ञानाच्या भाषेत 'ॲनिमा व ॲनिमस' म्हणतात. कार्ल युंग नावाच्या मनोविकार तज्ज्ञाने हे लिहून ठेवले आहे. युंगच्या मते 'मानवी मनाचा शोध' हेच उद्याचे खरे विज्ञान आहे आणि या विज्ञानाची आपल्याला अतिशय गरज आहे. कोविडनंतरच्या काळात तर असे जाणवत आहे की, माणसाला सगळ्यात जास्त धोका जीवाणू, विषाणू, दुष्काळ किंवा रोगराईपासून नाही, तर तो स्वतःपासूनच आहे. त्यामुळे अजूनही ही मालिका आपण पाहिली नसेल तर या मालिकेचे सर्व भाग यूट्यूबवर उपलब्ध आहेत.
मालिकेच्या तेराव्या भागात शशांक भालेच्या भूमिकेत पुष्कर श्रोत्री आणि डॉक्टरच्या भूमिकेतील स्वप्नील जोशी या दोन दिग्गज नटांची जुगलबंदी खासच रंगते. मानसी कुलकर्णी यांनी टॉमबॉय नीलाचे धैर्य आणि हतबलता यांचे मिश्रण कौशल्याने सादर केले. साजिरी जोशी आणि राजस सुळे या बहीणभावांच्या बोलण्यातून घरातील ताणाचे ओझे स्पष्ट दिसत राहते. तशी तर मालिकेच्या सर्व भागांमधील सर्वच कलावंतांची कामे अतिशय चोख आहेत.
डॉ. नंदकुमार मुलमुले यांच्या कथांसाठी प्रशांत दळवी यांचे तोलून मापून लिहिलेले आकर्षक संवाद, अवचेतन मनापर्यंत झिरपणारे दासू वैद्य यांचे शीर्षक गीत, अशोक पत्की यांचे सुखावणारे संगीत आणि चंद्रकांत कुलकर्णी यांचे काटेकोर, अनुभवी दिग्दर्शन यांच्या संयोगातून मनाचा तळ शोधणारी ही उपयुक्त मालिका साकार झाली आहे.
तेरा भागांचा पहिला सीझन संपलाय. प्रेक्षक पुढील पर्वाची नक्कीच वाट पाहत आहेत.