एक्स्प्लोर
Advertisement
टीम इंडियातला कॉमन मॅनचा चेहरा
त्या सामन्यात केदारच्याही पाठीवर त्या सामन्यात त्याच्या जन्मदात्रीचं मंदाकिनी हे नाव झळकत होतं. त्या सामन्याची आठवणही केदारच्या आईला भावूक करणारी ठरते.
केदार जाधव... भारतीय क्रिकेटमधला खरं तर तुमचा आमचाच म्हणजे कॉमन मॅनचा चेहरा. पण गेल्या नऊ महिन्यांमधल्या कामगिरीनं त्या चेहऱ्याला एक नवं ग्लॅमर मिळवून दिलंय. महाराष्ट्राचा केदार जाधव बनलाय वन डे सामन्यांमधला टीम इंडियाचा स्टार.
वास्तविक केदार जाधवनं वन डे सामन्यांच्या कारकीर्दीतलं पहिलं शतक 2015 सालच्या झिम्बाब्वे दौऱ्यातच झळकावलं होतं, पण ते शतक झळकावूनही, तो भारताच्या वन डे संघाचा अविभाज्य घटक बनला नव्हता. पण 2016 या वर्षानं वन डेच्या दुनियेला दिला नवा केदार जाधव. जास्त कॉन्फिडन्ट आणि जास्त नीडर. त्यामुळंच फलंदाजी असो वा, गोलंदाजी... न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे सामन्यांच्या मालिकेत कर्णधाराच्या हाकेला धावून जाणारा केदार वारंवार दिसला. 2016 सालची दिवाळी आपण न्यूझीलंडविरुद्धच्या त्याच्याच यशानं साजरी केली. भारताला पाच वन डे सामन्यांची ती मालिका 3-2 अशी जिंकली, त्यात केदारच्याच 90 धावा आणि सहा विकेट्स या अष्टपैलू कामगिरीचा प्रमुख वाटा होता. मग इंग्लंडविरुद्धच्या पुण्याच्या वन डेतलं केदारचं शतक तर केवळ लाजवाब. साक्षात विराट कोहलीशी फटक्यांची जुगलबंदी खेळून त्यानं भारताला साडेतीनशेहून अधिक धावांचा एव्हरेस्ट गाठून दिला. पुण्याच्या एमसीए स्टेडियमवरच्या त्या सामन्यात केदारनं इंग्लिश गोलंदाजांना अक्षरश: बुकलून काढलं. त्यानं 76 चेंडूंमधली 120 धावांची आपली खेळी ही 12 चौकार आणि चार षटकारांनी सजवली. कोलकात्याच्या तिसऱ्या वन डेतही केदार इंग्लिश आक्रमणावर तुटून पडला होता. पण 75 चेंडूंमधल्या 90 धावांच्या त्याच्या खेळीला विजयाचं सुख लाभलं नाही. अर्थात टीम इंडियानं ती मालिका 2-1 अशी जिंकली, त्यात मोलाची भूमिका केदार जाधवनंच बजावली होती. त्यानं तीन सामन्यांमध्ये 232 धावा फटकावून ‘मॅन ऑफ द सीरिज’ किताबावर आपलं नाव कोरलं.
टीम इंडियाकडून लागोपाठच्या दोन मालिकांमध्ये बजावलेल्या वैयक्तिक कामगिरीनं केदार जाधवच्या आयुष्याला मोठी कलाटणी दिली. भारतीय क्रिकेटरसिकांनी त्याला इतकं डोक्यावर घेतलं की, पुण्यातला एक सर्वसामान्य तरुण अवघ्या तीन महिन्यांमध्ये देशातला एक बडा सेलिब्रिटी बनला. पुण्यातला वैशाली-रुपालीचा कट्टा म्हणजे तरुणांचं हक्काचं ठिकाण. पुण्यात मुक्काम असला की, केदारचंही तिथं वरचेवर येणंजाणं असायचं. पण गेल्या नऊ महिन्यांपासून केदारला वैशाली-रुपालीचा कट्टा बंद झाला आहे. सोबतीला सुरक्षारक्षक घेतल्याशिवाय त्याला आज पुण्यात फिरता येत नाही. इतकंच काय पण कोथरुडमधल्या त्याच्या घराखालीही सुरक्षारक्षक ठेवण्याची वेळ आली आहे. केदार म्हणतो की, लोकांकडून मिळणारं प्रेम हे मी माझं भाग्यच समजतो. पण एक माणूस म्हणून मलाही मर्यादा येतात. मी सतत चाहत्यांना भेटू शकत नाही. अर्थात हे सांगतानाही केदारच्या चेहऱ्यावर त्याला चाहत्यांपासून दूर राहावं लागत असल्याच्या वेदना स्पष्ट दिसत होत्या.
केदार जाधव हा पुण्यातल्या कोथरुड परिसरात लहानाचा मोठा झाला असला तरी जाधव कुटुंब हे काही मूळचं पुण्याचं नाही. केदारचे वडील सांगतात की, आम्ही जाधव मूळचे सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातल्या जाधववाडीचे. एमएसईबीतल्या नोकरीच्या निमित्तानं त्यांना 1979 साली गाव सोडून कोथरुडमध्ये स्थायिक व्हावं लागलं होतं. महादेवराव आता नोकरीतून निवृत्त झाले आहेत. ते आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी, दोघंही आपल्या लेकाचं यश छान एन्जॉय करत आहेत. टीम इंडियाच्या शिलेदारांनी गेल्या वर्षीच्या एका वन डे सामन्यात आपापल्या आईचं नाव लिहिलेली जर्सी परिधान केली होती. त्या सामन्यात केदारच्याही पाठीवर त्या सामन्यात त्याच्या जन्मदात्रीचं मंदाकिनी हे नाव झळकत होतं. त्या सामन्याची आठवणही केदारच्या आईला भावूक करणारी ठरते.
केदार हा लहानपणापासूनच क्रिकेटचा वेडा होता, अशी आठवण त्याचे वडील महादेवराव सांगतात. त्या वयात महादेवरावांनीच गोलंदाजाची भूमिका बजावून केदारची फलंदाजीची भूक भागवली. त्यानंतरही केदारला शाळेत असताना कधी लेदरबॉल क्रिकेट खेळायला मिळालं नाही. कारण पौड फाट्यावरच्या त्याच्या एमआयटी शाळेत क्रिकेटच नव्हतं. त्यामुळं केदारनं दहाव्या इयत्तेपर्यंत क्रिकेटचे धडे हे टेनिस बॉलनंच गिरवले आहेत. केदार म्हणतो की, त्या वयात मोठ्या मुलांसबोत क्रिकेट खेळण्याचा त्याला फायदा झाला. वयानं मोठ्या मुलांसोबत खेळताना त्याची ताकद कमी पडायची. सतत नवी आव्हानं समोर उभी राहायची. मग त्याला विचार करायला लागायचा की, या मुलांसोबत खेळताना स्वत:ची चमक दाखवायची कशी? त्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळं करायला लागणार. काहीतरी वेगळं करायचं या विचारातून केदार फलंदाजीसोबत गोलंदाजी आणि यष्टिरक्षणही करू लागला. तेच अष्टपैलुत्व आजच्या जमान्याच्या वन डे आणि ट्वेन्टी20 क्रिकेटमध्ये केदारची ओळख बनलं आहे. आजवरच्या कारकीर्दीतल्या एकावन्नपैकी 23 आयपीएल सामन्यांमध्ये तो चक्क यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून खेळला आहे. वन डे आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये तर सहाव्या क्रमांकावरचा फलंदाज आणि पर्यायी ऑफ स्पिनर अशा दुहेरी भूमिकेत केदार मैदानात उतरतो.
केदारनं त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत पहिल्यांदा गोलंदाजी केली ती चक्क आठव्या वन डे सामन्यात. तोवर तो केवळ नेटमध्येच गोलंदाजी करायचा. महेंद्रसिंग धोनी नावाच्या रत्नपारखी कर्णधारानं केदारमधली ही गुणवत्ता हेरली आणि न्यूझीलंडसमोर धर्मशालाच्या वन डेत त्याच्या हाती चेंडू सोपवला. केदारनं तीन षटकांत केवळ सहा धावा मोजून नीशाम आणि सॅन्टनरला माघारी धाडलं आणि धोनीचा निर्णय योग्य ठरवला. या कामगिरीनं केदारला इतका मोठा आत्मविश्वास दिला की, त्या मालिकेत त्यानं सहा विकेट्स काढल्या. त्यापैकी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनची विकेट आपल्यासाठी खास असल्याचं तो सांगतो.
केदारचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत ऑफ स्पिनर म्हणून मिळालेल्या अनपेक्षित यशानं तो हुरळून गेला नाही. आपल्याकडून असलेल्या अपेक्षा आता आणखी वाढल्या आहेत आणि त्यामुळं आपल्याला जास्त मेहनतीची गरज आहे, हे त्यानं जाणलं आणि गोलंदाजीवर अधिक मेहनत घ्यायलाही सुरुवात केली. इंग्लंडमधल्या चॅम्पियन्स ट्रॉफीतही केदार जाधवमधल्या अभ्यासू वृत्तीच्या गोलंदाजाची चुणूक दिसली. लसिथ मलिंगाच्या शैलीत घोटलेला त्याचा चेंडू प्रतिस्पर्धी फलंदाजासमोरचं आव्हान वाढवू लागला आहे.
केदार जाधवच्या या प्रयत्नांना आणि त्याच्या कामगिरीला कर्णधार या नात्यानं आता विराट कोहलीचाही उत्तम पाठिंबा मिळत आहे. पुण्याच्या वन डेत केदारनं थेट विराटशीच फटक्यांची जुगलबंदी केली, त्याचं भारतीय कर्णधारानं हातचं न राखता कौतुक केलं आहे. केदारनं आदिल रशीदला कव्हर्सच्या डोक्यावरून ठोकलेल्या षटकाराला आणि मोईन अलीला बॅकफूटवर जात मिडॉफच्या डोक्यावरून मारलेल्या चौकाराला विराटनं एखाद्या दर्दी रसिकासारखी पसंतीची दाद दिली.
वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहाव्या क्रमांकावर यश मिळवण्यासाठी एका फलंदाजासमोर काय आव्हानं असतात, याची जगातला एक सर्वोत्तम फलंदाज म्हणून विराट कोहलीला चांगलीच कल्पना आहे. सहाव्या क्रमांकाचा फलंदाज हा त्याच्या संघातला कदाचित अखेरचाच अस्सल फलंदाज असतो. त्याचंच कायम भान ठेवून त्याला खेळावं लागतं. सहाव्या क्रमांकाच्या फलंदाजाला सेट व्हायला थोडा वेळ घेऊया अशी चैनही त्याला करता येत नाही. त्याला आल्या पावली खेळपट्टीची नाडी ओळखून, मग कोणते फटके खेळायचे... कोणत्या गोलंदाजाला खेळायचे याचा हिशेब करायला लागतो. गेली 12-13 वर्षे धोनीनं ही जबाबदारी यशस्वीरित्या पेलली. तो चौथ्या-पाचव्या क्रमांकावर खेळायला लागला आणि ही जबाबदारी केदारच्या खांद्यावर आली. धोनीच्या खांद्यावरची ती जबाबदारी सांभाळण्यास आपण समर्थ असल्याचं केदारनं इंग्लंडविरुद्धच्या पुण्याच्या वन डेत उत्तम पद्धतीनं दाखवून दिलं. पुण्याच्या त्या वन डेत इंग्लंडनं भारताला विजयासाठी थोडथोडकं नाही, तर 50 षटकांत 351 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या सामन्यात विराटच्या साथीला केदार आला, त्या वेळी टीम इंडियाची अवस्था 4 बाद 63 अशी केविलवाणी होती. त्या परिस्थितीत त्या दोघांनी वेगवान द्विशतकी भागीदारी रचलीच, पण विराट बाद झाल्यावरही केदारनं दुसरी खिंड लढवून झटपट धावा वसूल केल्या त्यामुळंच भारताला 351 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करता आला.
केदार जाधवच्या पुण्याच्या वन डेतल्या कामगिरीची देशभरात वाहव्वा झाली. पण त्याच वेळी या कामगिरीनं त्याच्यावर अपेक्षाचं नवं ओझंही लादलं आहे. भारतीय क्रिकेटरसिकांच्या अपेक्षांचं ते ओझं आगामी काळात केदार जाधव कसा पेलतो, हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement