एक्स्प्लोर
Advertisement
रामाची जीभ घसरते तेव्हा...!
आता हा ब्लॉग लिहायचं नेमकं कारण काय? तर हे राम त्यादिवशी कसे काय भरकटले? बोलण्यात कधी न चुकणारे आणि भल्याभल्यांना शांत करणारे कुठे तोंडघशी पडले हे तुम्ही पाहिलं. पण त्या दिवशीचा नेमका माहोल काय होता याची पार्श्वभूमी या लेखातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
दहीहंडी खरंतर रंगते 'ती किती थर लावले गेले ?' 'कोणी किती थर रचून बक्षीस जिंकले ?’ आणि 'कोणत्या राजकीय नेत्याच्या दहीहंडीत कोण कोण सेलिब्रिटी आले ?' यासाठी. मात्र, यंदाची दहीहंडी जर कोणाची खऱ्या अर्थाने फुटली असेल आणि ज्याची चर्चा गल्ली पासून दिल्ली पर्यंत झाली असेल तर ती भाजप आमदार राम कदम यांच्या 'देशातल्या सर्वात उंच दहीहंडी'ची.
राम कदम हे किती बोलतात हे राजकीय नेत्यांना आणि पत्रकार म्हणून अनेकांना माहिती असेलच. चर्चेत सडेतोड भाष्य करायचं आणि आपल्या बोलण्यात लोकांना मोहून टाकायचं हे राम कदम यांना चांगलंच जमतं. पण अशा रामाची जीभ घसरते तेंव्हा ? तेंव्हा मात्र हाहाकार उठतो आणि माफी मागायची वेळ येते. आता हा ब्लॉग लिहायचं नेमकं कारण काय? तर हे राम त्यादिवशी कसे काय भरकटले? बोलण्यात कधी न चुकणारे आणि भल्याभल्यांना शांत करणारे कुठे तोंडघशी पडले हे तुम्ही पाहिलं. पण त्या दिवशीचा नेमका माहोल काय होता याची पार्श्वभूमी या लेखातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
मुंबईतील, ठाण्यातील काही महत्वाच्या दहीहंडीची नाव विचारात घेतली पहिल्या पाचमध्ये तर राम कदम यांच्या दहीहंडीचा नाव आधी येतं. विविध वृत्तपत्र, वृत्तवाहिनीचे प्रतिनिधीसुद्धा या ठिकाणी अगदी 10 ते 12 तास दहीहंडी कव्हर करण्यासाठी आलेली असतात. कारण दहीहंडीच्या थरारापेक्षा येथे महत्व आहे ते सिलेब्रिटींच्या उपस्थितीचं. राम कदम यांना सिलेब्रिटींना दहीहंडीला बोलावणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं वाटतं आणि सकाळपासून ते रात्री दहीहंडी फोडेपर्यंत हे ते कमीतकमी शंभरवेळा बोलून दाखवतात.
अगदी शाहरुख खानपासून जितेंद्र, राजेश खन्नापासून रणवीर सिंग पर्यंत सगळे या दहीहंडीला उपस्थिती लावतात. आपलं ब्रँडिंग वाढविण्याची ही संधी समजून आमदार राम कदम हे दरवर्षी हा चान्स अजिबात सोडत नाहीत.
आता ह्या दहीहंडीमध्ये तुम्ही म्हणत असाल की इथे दहीहंडीच्या थरारापेक्षा सेलिब्रिटींची उपस्थिती महत्वाची असते का? तर त्याचं असं आहे , की इथे थर लावले जातात,वेगवेगळे गोविंदा पथक येथे येऊन रात्री 10 पर्यंत सलामी देऊन बक्षीस घेऊन जातात. मात्र रात्री 10 वाजेपर्यंत ही दहीहंडी आमदार राम कदम यांचा आदेश जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत फोडली जात नाही. मग सकाळपासून रात्री दहापर्यंत जमलेले लोक तिथे काय करतात ? तर प्रत्येक तासाला सर्कस सुरु असल्यासारखे वेगवेगळे अभिनेता, अभिनेत्री या कार्यक्रमाला हजेरी लावतात. त्यांच्यासमोर आमदार राम कदम हे काही ठरलेली वाक्ये त्यांच्या वेगवेगळ्या शैलीत मांडतात. तिथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाला मग ती वाक्ये पाठ होतात आणि तीच ती वाक्ये नंतर कानाला नकोशी वाटतात. यात स्व-कौतुकाची कोणतीही जागा हे आमदार साहेब सोडत नाहीत.
यंदाच्या दहीहंडीच्या दिवशी सुद्धा हेच झालं. वाक्य पहिलं जे येणाऱ्या प्रत्येक सिलेब्रिटीला राम कदम वेगवेगळ्या पद्धतीने मांडत होते. वाक्य नंबर 1) ‘मेरी 60 हजार बहने है, मेरे यहां रक्षाबंधन अभी भी शुरु है, मैं दोपहर 1 से शाम 4 बजे यह रक्षाबंधन का कार्यक्रम करता हूं’. त्यानंतर यंदाची ही दहीहंडी प्रत्येकाच्या आई वडिलांना समर्पित केली होती. त्यामुळे वाक्य नंबर 2 ) ‘प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे, जो आई वडिलांना दुःखवतो तो कधीच आयुष्यात सुखी होणार नाही’. ही दोन मुख्य वाक्ये सोडली तर अक्षरश: मी किती जणांना अन्नदान करतो, मी किती डॅशिंग, दयावान आहे. मी किती जणांचे ऑपरेशनचा खर्च केला ? किती जणांचे पैसे दवाखान्यात भरले ? ते अगदी मी किती मदत तुम्हाला करु शकतो, हे सगळं तुम्हाला या दहीहंडीमध्ये ऐकावं लागतं.
अगदी त्या दिवशी हे स्व-कौतुक राम कदम यांना महागात पडलं. ‘मला मित्र समजा, मी आमदार असलो तरी आधी तुमचा मित्र आहे. त्यामुळे माझा मोबाईल नंबर घ्या. मला तुमचा प्रत्येक प्रॉब्लेम शेअर करा, हा घ्या माझा नंबर' असं त्यांनी सांगितलं. हे बोलता बोलता विनोदीबुद्धी घातक ठरली, जीभ घसरली आणि राम कदम पुढे बोलले, ' आता मला उद्या फोन येतील. मी प्रपोज केलं! ती नाही म्हणाली. मग तुम्ही तुमच्या आई वडिलांना आणा. मग आपण त्या मुलीला पळवून आणू' बस्स ! विषय येथेच संपला. त्यांनी अनावधानाने केलेलं हे वक्तव्य किती महागात पडेल हे तिथे कळलं नाही. कारण अभिनेत्री प्राची देसाई तिथे आली आणि पुन्हा राम कदम स्व-कौतुकाकडे वळले.
अखेर दहीहंडी रात्री 10 च्या दरम्यान फोडली गेली. आता दहीहंडी फोडली असली तरी दहीहंडी उत्सवाचा रंग रात्री दहानंतर चढला जेंव्हा ‘मुलगी पळून आणतो’ हा व्हिडिओ वायरल झाला. हा व्हिडिओ कदाचित वायरल झालासुद्धा नसता. मात्र, आपलं मोठेपण दाखविण्यासाठी या महाशयांनी फेसबुक लाईव्हद्वारे हा प्रोग्राम सुरु ठेवला होता. शिवाय यू ट्यूबवर सुद्धा या कार्यक्रमाच्या व्हिडीओ मिनीटाला अपलोड केला जात होता. विरोधकांना आयतं कोलीत मिळालं आणि हा व्हिडिओ काही मिनिटात वायरल झाला.
पत्रकार म्हणून दहीहंडीचा कार्यक्रम झाल्यानंतर मी याबाबत प्रतिक्रिया घ्यायला गेल्यावर 'मी कोणाला भीत नाही, कोणाला हा व्हिडीओ वायरल करायचा असेल तर करावा, मी भीत नाही...मी विनोदीअंगाने हे बोललो आहे, लोकांना ते कळलं आहे. मी मुलांच्या आई वडिलांची संमती असेल तर पळवून आणू असं बोललो आहे. मी कोणाला भीक घालत नाही' असं उत्तर त्यांनी मला दिलं. विषय संपला असं त्यांना वाटलं. पण दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ विरोधीपक्षाच्या हाती लागला आणि 'रामाचा रावण झाला'
हा रावण मग प्रत्येकाने आपल्याला वाटेल तसा रंगवला. प्रत्येक राजकीय पक्षाचा निषेध, आंदोलनं झाली, अनेकांनी राग, द्वेष व्यक्त केला. मग बळजबरीची दिलगिरी व्यक्त करून अखेर बळजबरीची माफी पण राम कदम यांनी मागितली. पण आमदार राम कदम यांना वाटलं हा खेळ येथे माफीनाम्याने संपला, येथे या वादाला पूर्णविराम लागला. पण हा पूर्ण विराम नाही तर स्वल्पविराम आहे. कारण पिक्चर अभी बाकी है ! त्यामुळे आपल्या बोलीतून अनेकांना गुंगवणारे आमदार राम कदम यांची जीभ घसरल्यावर काय काय झालं आणि कसं कसं झालं हे पाहिलं. यापुढे तरी यातून धडा घेऊन पुढारी बोलताना भान ठेवतील, नाहीतर पुन्हा असा रामाचा रावण व्हायला वेळ लागणार नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement