BLOG: भारत जोडोत 'प्रेमाची भाषा'!
भारत जोडो यात्रा महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. राहुल गांधींनी कन्याकुमारीतून सुरु केलेल्या या पदयात्रेने आजपर्यंत दीड हजाराच्यावर अंतर कापले आहे. दोन महिने झाले हा अविरत असा प्रवास सुरु आहे. तेलंगणा राज्यात यात्रा जवळपास दोन आठवड्यापासून फिरत आहे, उद्या ही यात्रा महाराष्ट्रात येईल. सामान्य मजूर, मध्यमवर्गीय, शेतकरी, विद्यार्थी, विविध सामाजिक संघटनांची लोकं येऊन राहुल गांधींना भेटत आहेत; आपल्या समस्या मांडत आहेत. हक्काचा कोणीतरी आमचा माणूस आमचं ऐकायला इथं आलाय अशी त्यांची भावना यातून जाणवते.
अभिनेत्री पूजा भट्ट यांच्या यात्रेतील एन्ट्रीने गेल्या आठवड्यात ही यात्रा ठळकपणे चर्चेत आली, या यात्रेत त्या 10 किलोमीटर राहुल गांधी यांच्यासोबत चालल्या. पूजा भट्ट म्हणतात कि 'वादळं येतात तेव्हा एकमेकांचे हात धरावे लागतात, त्याच्याशी सामना करण्यासाठी मी इथे आलेली आहे. आता वेळ आलेली आहे सोबत चालायची अन् बोलायची. मी इथं आलेय माझ्या स्वतःसाठी, त्या भारतासाठी, जिथे मी जन्मले, ज्यात मला विश्वास आहे आणि जो फक्त एकरंगी रंगवता येत नाही. मला आता असं वाटतंय की आपण जे बोलून दाखवतो ते करून दाखवले पाहिजे, जर मी स्वतः माझ्या सुरक्षित कवचातून बाहेर पडून इथे आले नसते तर मी स्वतःला आरश्यात तोंड दाखवत जगू शकले नसते. कारण भारत जोडो यात्रा जो संदेश देत आहे तो नाकारुच शकत नाही. माझ्या मते तर अशा तणाव आणि द्वेषपूर्ण वातावरणात एकत्र येण्याची, प्रेमाची भाषा करणे हेच क्रांतिकारक आहे. तेव्हा या द्वेषाच्या काळात प्रेमाची भाषा बोला आणि क्रांतिकारी बना"
हैद्राबाद येथे यात्रा आलेली असताना, हैद्राबादला गेलेल्या मराठी असणाऱ्या जयश्री पाटील ह्या त्यांच्या मुली अन नातीला सोबत घेऊन यात्रेत गेल्या. त्यांची नातं या यात्रेत जाण्याबद्दल त्यांच्याशी हट्ट धरत होती. तिच्या शाळेत परिपाठात रोज बातम्या वाचल्या जातात तर या बातम्यातून तिला समजलं कि राहुल गांधींची यात्रा आपल्या जवळून जाणार आहे. याबद्दल सांगताना जयश्री पाटील म्हणतात कि आम्ही ज्यावेळेस यात्रेत गेलो त्यावेळीस तिथे हैद्राबादचे फेमस बँड मरफाच्या धुनीने राहुल गांधी यांचे स्वागत झाले. त्या पहिल्यांदा राजकीय रॅलीत सहभागी झालेल्या. त्यांनी आजूबाजूच्या लोकांना विचारलं तर सगळे स्वतःहून आलेले लोकं आहेत असं त्या सांगत होत्या. सोबत आलेल्या छोट्या नातीने जेव्हा राहुल गांधी यांना पाहिले तर तेंव्हा त्या चिमुकलीच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. अगदी नऊ वर्षाच्या असणाऱ्या नातीच्या तोंडून अचानक वाक्य बाहेर पडले कि 'इतिहासात ही यात्रा गोल्डन नव्हे तर डायमंड शब्दाने लिहिली जाईल' जयश्री पाटील ह्या सांगत होत्या कि अद्भुत असं वातावरण त्यांनी अनुभवले. राहुल हा एक प्रामाणिक मुलगा आहे असं त्यांचे मत होते. त्यांना यात्रेत एवढी आपुलकी वाटली कि पुन्हा एकदा त्या महाराष्ट्रात यात्रेत सहभागी होणार आहेत असं त्यांनी कळवले.
भारत जोडो यात्रेतून TRS अलिप्त
मोदी अन् भाजपसोबतची आपली मैत्री तोडून तेलंगणा मुख्यमंत्री KCR हे काही महिन्यापासून मोदी अन भाजप विरोधात टोकाची भूमिका मांडत आहेत, नुकताच त्यांनी राष्ट्रीय पक्ष स्थापनेचा सोहळा केला. KCR हे विरोधी पक्षातील काही नेत्यांना भेटले. KCR यांना या यात्रेत जोडून मोदी विरोधातल्या त्यांच्या ताज्या भूमिकेशी कायम राहण्याची ही संधी होती. पण ते या यात्रेपासून दूर राहिले. दुसरीकडे राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात 'TRS अन भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, जेव्हा जेव्हा संसदेत काही बिलं पास करायला भाजपला इतर पक्षाची गरज पडते, तेव्हा तेव्हा TRS त्यांना उघड-छुपी मदत करते. या पेक्षा दुसरा मोठा पुरावा काय असू शकेल? असा जोरदार हल्ला ते आपल्या प्रत्येक सभेतून TRS वर करत आहेत. भविष्यात TRS ला सोबत घेण्यास काँग्रेस ही उत्सुक आहे असं दिसत नाही.
वैभव कोकाट यांचे अन्य ब्लॉग