2005 साली संजय राऊत यांची फोडली होती गाडी, राज ठाकरे समर्थकांनी करून दिली आठवण; काय झालं होतं नेमकं?
संजय राऊत आणि राज ठाकरे हा वाद नवा नाही पण गेले काही दिवस यांच्यातील धुसफूस उफाळून आली आहे. मराठीच्या मुद्द्यावर अनेक वर्ष कूच करणारं मनसेचं इंजिन आता हिंदुद्त्वाच्या ट्रकवर पळतंय. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात आवाज उठवला आणि सरकारला हे भोंगे उतरवण्याचं आव्हान केलं. त्यानंतर लगेचच राज ठाकरे यांची पुन्हा ठाण्यात सभा झाली आणि पुन्हा त्यांनी तोच हिंदुत्त्वाचा सूर लावला.
राज ठाकरे यांच्या या हिंदुत्ववादी भूमिकेवर संजय राऊत यांनी हल्लाबोल करत जोरदार टीका केली व राज ठाकरे यांची तुलना Owaisi यांच्यासोबत केली. यावर आक्रमक झालेल्या मनसैनिकांनी सामानाच्या ऑफिस बाहेर संजय राऊत यांच्याबाबत एक पोस्टर लावत पलटवार केला. त्या ‘पोस्टर’वर एक पलटी केलेली गाडी आहे तर “याची पुनरावृत्ती हवी का” असा प्रश्न देखील विचारलाय. नक्की काय आहे त्या पोस्टरवरील फोटो मागची कहाणी? कुणाची आहे ती गाडी?
खरं तर गाडी हा आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न. गाडीवरून पडलो तर स्वतः कडे पाहण्याआधी आपण आपली गाडी चेक करतो. राजकारणी आणि त्यांच्या गाड्यांचा नातं ही असंच निराळं आहे. सामान्य जनतेला सुद्धा कोणता नेता कोणत्या गाडीतून फिरतोय याची फार उत्सुकता असते.
दोन नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झालं त्यांच्या गाड्यांचा BP वाढत असावा, कारण राजकारणात वाद पेटला ही की सर्वात पहिली फुटते ती गाडी. काही पक्षांचे कार्यकर्ते तर तयारच असतात, साहेबांचा आदेश आला की फुटलीच समजा गाडी.
कहाणीची पार्श्वभुमी
संजय राऊत यांची गाडी फोडण्याइतकी हिंम्मत आज कोणी करेल का हा प्रश्नच आहे, परंतु अनेक वर्षांआधी ते घडलंय. नोव्हेंबर 2005 ची गोष्ट आहे पण त्या आधी 1996 साली जाऊ, पार्श्वभूमी जाणून घेऊ आणि पुन्हा 2005 पर्यंत येऊ.
1995 साली युतीची सत्ता आली परंतु राज ठाकरे मात्र त्यानंतर राजकारणापसून अलिप्त होते. हळू हळू त्यांची स्पेस उद्धव ठाकरे यांनी भरून काढली आणि 2003 साली शिवसेनेच्या महाबळेश्वर अधिवेशनात खुद्द राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष करण्याचा प्रस्ताव मांडला आणि तो मान्य सुद्धा झाला. 2004 साली शिवसेनेचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आणि राज यांनी पहिल्यांदाच उघडपणे उद्धव ठाकरे यांच्यावर नेतृत्वावर टीका केली.
2004 पूढे सरसावलं आणि 2005 साल उजाडलं. शिवसेनेला पहिला धक्का बसला तो म्हणजे नारायण राणेंच्या बंडखोरीचा. बाळासाहेब ठाकरे यांनी आजवर अनेक धक्के पचवले होते. त्यात हा सुद्धा एक पचवला, पण पुढे येणारा धक्का पाचवणं कठीण होतं.
25 नोव्हेंबरला महाराष्ट्र टाईम्स ने राज ठाकरे शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार असल्याचं वृत्त दिलं होतं. शिवसैनिकांनी मताविरोधात निदर्शनं केली आणि पेपरच्या प्रति सुद्धा जाळल्या होत्या. आता संपूर्ण देशाचं लक्ष मातोश्रीकडे लागून होतं, परंतु दिवाळी नंतरचे राजकीय फटाके फुटले ते कृष्णकुंज बाहेर.
27 नोव्हेंबर, 2005, रविवार...
तारीख होती 27 नोव्हेंबर, 2005, दिवस होता रविवार. दुपारची वेळ होती. कृष्ण कुंज बाहेर अचानक गर्दी वाढली आणि मुख्य प्रवेश दारातून राज ठाकरे बाहेर आले. पुढे येऊन त्यांनी भाषण सुरु केलं. कार्यकर्ते आणि मीडियाशी बोलताना त्यांनी शिवसेनेच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. मातोश्री सकट संपूर्ण राज्याचा ठोकाच चुकला.
संजय राऊत कृष्णकुंजवर
हे वृत्त वार्यासारख मातोश्रीवरून दोन बड्या नेत्यांना कृष्णकुंजवर धाडलं गेलं. हे दोन नेते म्हणजे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि संजय राजाराम राऊत. दोन्ही नेते राज यांनी मनधरणी करण्यासाठी कृष्णकुंजवर आले होते. परंतु राज यांनी त्यांच्या भाषणात शिवसेनेच्या काही नेत्यांवर नाव न घेता टीका केलेली होती आणि असं म्हणतात की त्यातलं एक नाव म्हणजे संजय राऊत.
कृष्णकुंज बाहेर राज समर्थकांची गर्दी तशीच कायम होती, घोषणाबाजी सुरु होती, त्यांचा राग अनावर होत होता. त्यावेळी त्यांच्या नजरेस पडली स्कोडाची Octavia गाडी. ती गाडी होती संजय राऊत यांची. २००३ ले २००५ पर्यंतचा सगळा राग राज ठाकरे यांच्या समर्थकांनी संजय राऊत यांच्या गाडीवर काढला. सगळे कार्यकर्ते गाडीवर धाऊन गेले आणि नासधूस केली. गाडी फोडीली ती फोडली रस्त्यावर पलटवून सुद्धा टाकली. त्या नंतर संजय राऊत कसे बसे तिथून निघाले पण गाडी मात्र तशीच पडून होती.
संजय राऊत यांनी त्यानंतर अनेक गाड्या घेतल्या ही असतील परंतु त्यांच्या स्कोडाने मात्र महाराष्ट्राच्या राजकारणातला एक विलक्षणीय बदल अनुभवला.