BLOG: प्रतिभाताई...पवारांची सावली
महाराष्ट्रासोबतच देशाचंही राजकारण ज्या नावांभोवती फिरतं, त्यातलं एक नाव शरद पवार. त्याच शरद पवारांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला आणि राज्याच्या राजकारणात खळबळ माजली. ज्या सभागृहात पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या वेळी शरद पवारांनी हा निर्णय जाहीर केला, तेव्हा नेते, कार्यकर्ते अवाक झाले. अनेकांच्या डोळ्यांनी पवारांवरच्या प्रेमाला, आदराला वाट करुन दिली. जयंत पाटलांसारखा मुरलेला राजकारणी गदगदून रडत होता. तर, जितेंद्र आव्हाडांसारखा त्यांच्या तुलनेत युवा असलेल्या नेत्यालाही बोलताना हुंदका आवरत नव्हता. अनेक कार्यकर्ते भावनिक झाले होते. काहींना नेत्यांप्रमाणेच रडूही कोसळलेलं. भावनेचा असा कल्लोळ बाजूला सुरु असताना, एक व्यक्ती चेहऱ्यावर अत्यंत संयमीपणे हे सारं अनुभवत होती. जणू हे सारं त्रयस्थपणे पाहत होती. त्या म्हणजे प्रतिभाताई पवार.
प्रतिभाताई पवार शरद पवारांच्या बाजूलाच त्या बसल्या होत्या. धनंजय मुंडे, अनिल देशमुख, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड हे सारेच आपल्या साहेबांबद्दल भरभरून व्यक्त होत असताना प्रतिभाताई अत्यंत शांतपणे हे सारं पाहत होत्या, अनुभवत होत्या. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातला ठेहराव तेव्हा मनाला प्रचंड स्पर्शून गेला. भावनेने इतक्या ओथंबून वाहणाऱ्या प्रतिक्रिया ऐकून टीव्हीवर त्या पाहतानाही गलबलून येत होतं. त्यावेळी प्रतिभाताईंचं इतकं संतुलित राहणं खरंच थक्क करणारं होतं. इतकी मोठी राजकीय कारकीर्द राहिलेल्या दिग्गज नेत्याची अर्धांगिनी असलेल्या प्रतिभाताई नेहमीच राजकीय पडद्यामागे राहिल्यात. म्हणजे अनेक कार्यक्रमांना त्या पवारांसोबत गेल्या तरी त्यांनी कायमच ‘बिहाईंड द सीन्स’ राहण्याची भूमिका घेतली.
आजचा दिवसही तसाच. म्हणजे त्या पुस्तक प्रकाशनालाही मंचावर होत्या, तसंच नंतर नेते, कार्यकर्ते पवारांची मनधरणी करत असतानाही त्यांच्या सोबत होत्या. एकदा तर, सुप्रिया सुळेंना कोणीतरी बोलण्याची विनंती केली असता त्यांनी चेहऱ्यानेच सुप्रिया सुळेंना न बोलण्याबद्दल खुणावलं, भावनेचा परमोच्च बिंदू गाठलेल्या कालच्या दिवशीही त्यांची स्थितप्रज्ञता स्तब्ध करुन टाकणारी होती.
खरं तर जसंजसं वय होत जातं. तसा माणूस हळवा होत जात असतो, असं म्हणतात. साहजिकच एखाद्या आनंदाच्या वेदनेच्या, भावोत्कट क्षणी टचकन डोळ्यात पाणी येत असतं. त्यात आजूबाजूच्यांच्या डोळ्यांचं धरण फुटलेलं असताना आपल्या भावनेला संयमाचा, निश्चलतेचा बांध घालणं यासाठी प्रचंड ध्यानस्थ वृत्ती लागते. प्रतिभाताईंनी त्याचंच दर्शन घडवलं. एकदा तर त्या उठून जायला निघाल्या होत्या. तेव्हा त्यांना थांबवून बाजूलाच बसून राहण्यास सांगण्यात आलं. प्रसिद्धीचा आणि माध्यमांचा मोह त्यांनी जसा नेहमी टाळला तसा आजही. गेली सहा दशकाहून अधिक काळ प्रचंड राजकीय नाट्याने भरलेले अनुभव शरद पवारांनी घेतलेत, साहित्य, कला, क्रीडा, सामाजिक क्षेत्रातला त्यांचा वावरही चकित करणारा.
अशा व्यक्तिमत्त्वासोबत सावलीसारख्या उभ्या राहणाऱ्या प्रतिभाताई आज काहीही न बोलता बरंच शिकवून गेल्या. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात संयम दिसला, समर्पणही पाहायला मिळालं आणि सावलीची शीतलताही.