एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मराठा क्रांती मोर्चा... धास्तावलेल्या दलितांना कसं सावरणार?
दुरावलेला मराठा मतदार पुन्हा राष्ट्रवादीच्या बाजुने वळण्यासाठी शरद पवारांनी मराठा मोर्चांची खेळी खेळली खरी.. पण आज पवारांची ही ब्रिटिशनिती त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता आहे. कारण ज्या कोपर्डी बलात्काराच्या निषेधार्थ मराठा मोर्चांना सुरुवात झाली, तो मुद्दा आज प्रचंड संख्येच्या या मोर्चांमध्ये गौण ठरताना दिसतो आहे.. त्याऐवजी या मोर्चांमधून अॅट्रॉसिटीचा विरोध प्रकर्षानं समोर येतो आहे. खरं तर अॅट्रॉसिटीचा मुद्दाही पवारांनीच उचलला होता.. पण वाढता विरोध बघता त्यांनी वेळोवेळी यावर सारवासारवही करण्याचा प्रयत्न केला. पण, पवारांनी मुहुर्तमेढ रोवलेले मराठा समाजाचे मोर्चे आता विविध संघटना आणि राजकीय ओळख नसलेल्या छोट्या-मोठ्या नेत्यांनी हायजॅक केले आहे. ज्यामुळे या मोर्चांची दशा आणि दिशाही बदलली आहे. ज्यावर नियंत्रण मिळवणं आता पवारांच्याही हातात राहिलेलं नाही. पण, अॅट्रॉसिटीच्या पवारांच्या पहिल्या वक्तव्यानं दलित समाजामध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. ज्याचे पडसाद येत्या काळातील निवडणुकांमध्ये उमटण्याची शक्यता. दुसरीकडे आताच्या मराठा मोर्चांमध्ये सहभागी होणारी तरुणाईही प्रस्थापित राजकीय नेतृत्वच नाकारत असल्याने या मोर्चेकरी मराठ्यांना राष्ट्रवादीचे मतदार म्हणून कॅच करण्यात पवार किती यशस्वी होतील हाही एक प्रश्नच आहे.
खरे तर कोपर्डी प्रकरणाला जातीय रंग देणं साफ चुकीचं असताना, आपल्यातीलच काहींनी तो केलाच. मुळात कोपर्डीचे नीच कृत्य करणाऱ्यांना फासावर लटकवण्याला कुणाचाही विरोध नव्हता, ना आता आहे. पण त्यात गरज नसताना जातीय राजकारण घातले गेले आणि काहींनी तर जाती-जाती तेढ निर्माण करण्याच्या हेतूने थेट अॅट्रॉसिटी कायदाच रद्द करण्यापर्यंतची मागणी करुन टाकली. ही मागणी करताना मुळात कोपर्डी प्रकरणात अॅट्रॉसिटीचा खरंच गैरवापर झाला का? अॅट्रोसिटीमुळे त्या नीचकर्म्या बलात्काऱ्यांची सुटका होणार आहे का? याचा साधा अभ्यासही करण्याची तसदी कुणीच घेतली नाही, हे दुर्दैवच म्हणावं लागेल. आपल्या न्याय मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलने करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. कोपर्डीतील दोषींच्या शिक्षेसाठी निघालेले मराठा मोर्चेही योग्य आहेत.. पण, काही आगाऊ नेत्यांच्या वक्तक्यांमुळे कोपर्डी बलात्काऱ्यांना शिक्षेची मागणी करत निघालेल्या या मोर्चांचे सूर कालांतराने बदलत गेले. आणि आज मराठा मोर्चांच्या हेतूविषयीच मराठेतर समाजाकडून शंका उपस्थित होऊ लागली आहे.
ही सर्व आतापर्यंतची परिस्थिती, आजवर झालेल्या चुका. पण खरा धोका आता यापुढच्या काळात उद्भवण्याची भीती आहे.. जो महाराष्ट्रातील जातीय सलोख्यासाठी अत्यंत धोकादायक असेल. नेत्यांच्या अजाणतेपणामुळे म्हणा किंवा कळ लावणाऱ्या नारदांमुळे, पण मराठा मोर्चांमधून अॅट्रॉसिटीचाच मुद्दाच जास्त हायलाईट झाला. ज्यामुळे आता या मोर्चांना दलितविरोधी रंग मिळू लागला आहे, नव्हे तो हेतूपुरस्सरपणे दिला जातो आहे. परिणामी याचे पडसाद म्हणून आता दलित समाजही रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. मराठा समाजाचे मोर्चे आणि त्याला विरोध म्हणून दलितांचे प्रतिमोर्चे.. सर्वत्र असेच चित्र जर निर्माण झाले तर ते पुरोगामी महाराष्ट्रासाठी चांगलं लक्षण नक्कीच नसेल.
सध्या मराठा समाजाच्या मोर्चांमध्ये तरुणांची संख्या मोठी आहे. या तरुणांमध्ये संताप आहे. तो सरकारविरोधात आहे, इथल्या व्यवस्थेविरोधात आहे. त्यामुळे निघणारे मोर्चे जरी मूकमोर्चे असले, तरी तरुणाईच्या मनातला तो संताप सहज उमटून दिसतो आहे. पण, हा संताप आताच का उफाळून आला? की हेतूपुरस्सरपणे काही नेतेमंडळी आपल्या राजकीय स्वार्थासाठी या तरुणाईचा वापर करुन घेत आहेत? हे येत्या काळात सर्वांना कळेल, अगदी आजच्या या मोर्चेकरी तरुणाईलाही. पण, आजच्या घडीला, फक्त या मोर्चेकरी तरुणांच्या मनात इतर जातींबद्दल द्वेषाची बीजे रुजवली जाऊ नयेत, हीच सर्वांची अपेक्षा आहे.
शरद पवार जाणते नेते आहेत. ते महाराष्ट्राची नस ओळखतात. त्यामुळे कोणते हत्यार, कोणत्या वेळी बाहेर काढायचे हेही त्यांना माहित आहे. पण, यावेळी त्यांची खेळी त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता जास्त आहे. कारण अॅट्रॉसिटीचा वादंग उठवून पवारांनी दलितांचा रोष ओढवून घेतला आहे. आणि त्याचवेळी सध्याचे मराठा मोर्चेही पवारांच्या नियंत्रणाबाहेर गेल्याचे चित्र आहे. त्यामुळेच आजचा मोर्चेकरी मराठा समाजही आजवरच्या अविकासासाठी आपल्याच प्रस्थापित नेत्यांना दोष देताना दिसतो आहे. गेल्या 30-40 वर्षातील प्रभावी मराठी नेत्यांचा विचार करायचा झाल्यास, त्यात नक्कीच शरद पवारांचा क्रमांक वरचा असेल..त्यामुळे मराठा समाजाचा हाच रोष थेट पवारांच्या राष्ट्रवादीलाच झोंबण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवा मराठा मतदार तर जोडलाच नाही, त्याउलट हक्काचे दलित मतदारही दुरावले अशी स्थिती राष्ट्रवादी काँग्रेसची झाली आहे. परिणामी, मराठा मोर्चांची ही खेळी पवारांच्या अंगलटच येण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे पवार साहेब, तुम्ही चुकलातच! असेच म्हणावे लागेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्रिकेट
धाराशिव
राजकारण
Advertisement