रक्तदानाचं महत्त्व आपल्या सगळ्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. रक्तदान करण्यात महाराष्ट्र तसा अग्रेसर ही असतो. मात्र, विशेष करून या आरोग्याच्या आणीबाणीच्या काळात रक्त मिळविण्याच्या बाबतीत मोठ्या अडचणी निर्माण झाल्याचे चित्र संपूर्ण राज्यात दिसत आहे. जागतिक आरोग्य परिषदेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एकूण लोकसंख्येच्या 1% रक्त संकलन होणे अपेक्षित आहे. त्यापेक्षा जास्त रक्तदान आपल्या राज्यात होत आले आहे. गेल्यावर्षी रक्तसंकलनात संपूर्ण देशात राज्याचा पहिला क्रमांक होता. राज्यातील बहुतांश रक्तपेढ्याना रक्त मिळविण्यासाठी रक्तदान शिबिरांवर अवलंबून राहावे लागते. यंदाच्या या कोरोना काळात मात्र जे रक्तदात्यांकडून रक्त मिळविण्याचे मुख्य स्रोत होते तेच आटले आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थी, रेल्वे प्लॅटफॉर्मवरील प्रवासी, कॉर्पोरेट ऑफिसेस या काळात बंद असल्याने सगळी मदार फक्त सामाजिक संस्थांवर अवलंबून आहे. त्यामुळे आपल्या राज्याची गरज पाहता येत्या काळात नियमित शस्त्रक्रिया सुरु झाल्या असल्यामुळे रक्ताची नितांत गरज भासणार आहे. त्यामुळे आता फक्त रक्तदान करा असे बोलण्यापेक्षा गृहसंकुलात रक्तदानाची शिबिरे आयोजित करण्यावर भर देण्याची गरज आहे. कारण रक्ताची टंचाई महाराष्ट्र सारख्या राज्याला परवडणारी नाही. कुशल डॉक्टर्स आणि आधुनिक वैद्यकीय यंत्रणा असलेल्या आपल्या राज्यात रुग्णालये मोठ्या प्रमाणात असून बाहेरच्या राज्यातूनही रुग्ण आपल्या राज्यात वैद्यकीय सेवा घेण्यासाठी येत असतात.


गेल्यावर्षी, 2019 मध्ये राज्यात 17 लाख 23 हजार युनिट रक्त संकलन करण्यात आले होते. रक्त संकलन करण्यात महाराष्ट्राचा भारतात पहिला क्रमांक घोषित करण्यात आला होता. ज्या पद्धतीने रक्त संकलित होते त्या प्रमाणावर ते वापरलेही जाते. रक्ताचा वापर शस्त्रक्रिया, कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराचे रुग्ण, थॅलेसेमिया बाधित रुग्ण, त्यानंतर काही नैसर्गिक आपत्ती, मोठ्या दुर्घटना - अपघात यावेळी रक्ताची गरज मोठ्या प्रमाणात लागत असते. तसेच काही शस्त्रक्रिया असतात, त्यावेळी अचानपकपणे रक्तस्त्राव झाल्यामुळे रक्ताची मोठी मागणी निर्माण होत असते. अनेक वैद्यकीय उपचारात परिस्थितीनुसार रक्ताची गरज भासत असते. अनेक रुग्णालये नातेवाईकांना रक्त देण्यास सांगतअसतात, जर नातेवाईकाकडे कुणी ओळखींमध्ये दाता उपलब्ध असेल तर ठीक नाही तर त्या रुग्णाच्या कुटुंबियांना धावपळ करावी लागते. हल्लीच्या काळात सोशल मीडियामुळे एक फायदा झाला आहे कि कुणाला रक्ताची तात्काळ गरज पडली तर त्या सोशल मीडियाद्वारे अनेकवेळा आवाहन आपण पाहत असतोच अमुक एका रुग्णाला अमुक एक गटाचे रक्त हवे आहे. त्यामुळे कुणी जर उपलब्ध असेल तर रक्त मिळतेही पण प्रत्येक वेळी मिळेलच असं नाही. काही तरुणांनी तर चक्क व्हाट्स ग्रुप तयार करून ठेवले आहेत, कुणालाही काही गरज लागली तर ह्या व्हाट्स अॅप वर जाऊन त्या रुग्णाची गरज ओळखून आवाहन केले जाते.


मुंबईमध्ये थिंक फौंडेशन ही सामाजिक संस्था मोठ्या प्रमाणात रक्तदान विषयी जनजागृती करत असते, त्या संस्थेचे प्रमुख विनय शेट्टी सांगतात कि, "रक्तदानाची मोठी गरज आहे. माझ्या ओळखींमध्ये अशी काही उदाहरणे आहेत कि थॅलेसेमियाच्या मुलांना नियमितपणे रक्त लागत असते. मात्र, ज्या रुग्णालयात ते रक्त घेत असतात त्यांना सांगितलेल्या तारखेला बोलाविले जाते, मात्र, रक्त नसल्यामुळे त्यांना परत जावे लागत असल्याच्या घटना घडल्या आहेत. कोरोनाचा फटका मोठ्या प्रमाणात शिबिरांना बसला आहे. स्वयंसेवकांनी रक्तदान शिबिराची वाट न बघता थेट रुग्णालयातील रक्तदान पेढयांमध्ये किंवा काही रक्त पेढ्या आहेत तेथे जाऊन रक्तदान करावे. शिवाय शक्य असल्यास रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबिरे आयोजित करावी हीच सध्या काळाची गरज आहे."


यावर्षी 2020 मध्ये आतापर्यंत झालेलं रक्तदान अशाप्रमाणे आहे, जानेवारी - 1 लाख 68 हजार 144, फेब्रुवारी - 1 लाख 45 हजार 289, मार्च - 1 लाख 10 हजार 437, एप्रिल - 53 हजार 630, मे - 91 हजार 137, जुन - 99 हजार 658, जुलै - 60 हजार 750, ऑगस्ट - 62 हजार 001, सप्टेंबर - 63 हजार 888 इतके आहे. कोरोना काळाचा विचार करता ही परिस्तिथी चांगली असली तरी आपली गरज मोठी आहे. राज्यात एकूण 344 खासगी आणि शासकीय रक्तपेढ्या आहेत. त्यापैकी 76 रक्तपेढ्या या शासकीय असून बाकिच्या या खासगी आहेत. या कोरोना काळात काही रक्तपेढ्यांमध्ये कर्मचारी कमतरता असल्यामुळे 70-80 रक्तपेढ्यानी किती रक्त संकलन झाले याची आकडेवारी शासनाकडे पाठविलेली नाही.


ताडदेव येथील गोपाळ कृष्ण क्रीडा मंडळ गेली अनेक वर्षे रक्तदान शिबीर आयोजित करत आहेत. त्यांनी नवरात्रीनिमित्त एक आठवडा अगोदर रक्तदान शिबीर आयोजित केले होते. या मंडळाचे अध्यक्ष अंकुर सावंत यांनी सांगितले कि, "सध्याच्या परिस्थितीत रक्तदानाची मोठी आवश्यकता आहे. आम्हालाही भीती होती कि किती नागरिक रक्तदान करतील, मात्र तरीही 47 युनिट आमच्या मंडळातर्फे आम्ही जे जे महानगर रक्तपेढीला दिले. हे शिबीर आमच्या गृहसंकुलातच आयोजित केले होते. त्याचप्रमाणे आमच्या मंडळाळतील काही कार्यकर्ते वर्षभर अनेकवेळा रुग्णालयात जाऊन गरज लागेल तसे रक्त दान करत असतात.


राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मध्यंतरी रक्तदान करण्याचे आवाहन राज्यातील जनतेला केलं होते, त्याला सकारात्मक प्रतिसाद देत अनेक दात्यांनी रक्त दान केले होते. विशेष म्हणजे गणेशोउत्सवात अनेक मंडळांनी तर रक्त दान शिबिरे मोठ्या प्रमाणात आयोजित केली होती. मात्र, एकंदरच या कोरोनाच्या वातावरणात काही दातेही रक्तदान करताना दोनदा विचार करत असल्याचे दिसत आहे. गृह विभागाने सावर्जनिक नवरात्र उत्सवानिमित्त ज्या काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये, त्यांनी रबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नयेत, त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/ शिबिरे (उदा. रक्तदान) राबविण्यास प्राधान्य द्यावे असे सूचित करण्यात आले आहे. त्याशिवाय राज्यातील या सर्व रक्त पेढ्याचे कामकाज व्यवस्थितपणे पार पडावे याकरिता देखरेख करण्याकरिता जी राज्य रक्त संक्रमण परिषद आहे त्यांनी सर्व रक्तकेंद्र प्रमुखाना पत्र पाठवून नवरात्र उत्सव काळात रक्तदान शिबिरे आयोजित करण्याबाबत सूचना दिल्या आहेत .


याप्रकरणी, महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषद सहसंचालक, डॉ. अरुण थोरात यांनी ए बी पी डिजिटल शी बोलताना सांगितले कि, "रक्त संकलन मोठ्या प्रमाणात व्हावे याकरीता आपण काम करीत आहोत. मात्र, कोरोनाचा हा काळ पाहता यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेपेक्षा रक्त संकलन कमी आहे. परंतु त्याची कारणे सगळ्यांनाच माहिती आहे, बराच काळ लॉक डाउन, तसेच नागरिकामध्ये थोडयाफार प्रमाणातअसलेली भीती, महाविद्यालयीन विद्यार्थी, रेल्वे प्लॅटफॉर्मवरील प्रवासी, कॉर्पोरेट ऑफिसेस या काळात बंद असणे अशी विविध कारणे आहेत. मात्र तरीही राज्यातील सामाजिक संस्थानी मोठ्या प्रमाणात या भीतीच्या वातावरणात पुढाकार घेऊन शिबिरे आयोजित केली आहे या करीत त्याचे खरे तर त्याचे आभार मानायला हवेत. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोउत्सव मंडळ आणि सिद्धिविनायक मंदिर यांनी कामात भरीव कामगिरी केली आहे. तसेच आपल्या राज्यात जागतिक आरोग्य परिषदेच्या मानांकनानुसार पुरेश्या प्रमाणात रक्तदान होत असते. या वर्षी आता आपण मोठ्या प्रमाणात जनजागृती करून रक्तदात्यांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. नागरिकांना आमचे आवाहन आहे ज्यांना शिबिरात रक्तदान करता येत नसेल त्यांनी जवळच्या रक्तपेढीत जाऊन रक्तदान करावे. गृहनिर्माण सोसायटयांनी संकुलात रक्तदान शिबिरे शिबीर घेऊ शकतात. या वर्षी संपूर्ण देशात रक्तदान मोहिमेला कोरोनामुळे फटका बसला आहे. मात्र त्यातून सावरण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत."

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे हे सगळ्यांना माहित आहे. या दानाची राज्याला सध्या मोठ्या प्रमाणात गरज आहे. विशेष म्हणजे आता अनेक गोष्टी सुरु झाल्या आहेत. रक्तदान करताना रुग्णालयात आणि शिबिरांमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने व्यवस्थित काळजी घेतली जाते. त्यामुळे खरं तर घाबरण्याची काहीच गरज नाही. रक्तदानामुळे एखाद्या रुग्णाचा जीव वाचू शकतो. त्यामुळे अशा कार्यासाठी तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेण्याची गरज आहे.


संतोष आंधळे यांचे आणखी काही महत्वाचे ब्लॉग