एक्स्प्लोर
गणेशोत्सवातल्या आम्ही...
थोडा फार गव्हाळ रंग असणारी, मध्यम बांध्याची, आकर्षक चेहऱ्याची पल्लवी विशीतली आहे. ती मात्र गणेशभक्त आहे. गणेशोत्सवात गुरुवारी आणि रविवारी ती कोणाला अंगाला हात लावू देत नाही. त्या दिवशी ती ‘कोरडी’ राहते.
![गणेशोत्सवातल्या आम्ही... Sameer Gaikwad Blog On Ganeshotsav In Red Light Area Latest Updates गणेशोत्सवातल्या आम्ही...](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/28075131/Blgo.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
फोटो सौजन्य - समीर गायकवाड
“गणेशोत्सव जवळ आला की आमच्या मनात नानाविध तऱ्हेचे काहूर उठते..” पुण्याच्या बुधवार पेठेलगत असलेल्या शुक्रवार पेठ पोलिस चौकी नजीकच्या रेड लाईट एरियाच्या तोंडावर असणाऱ्या चांदणी बिल्डींगमधली वंदना डोळे विस्फारून असंच काहीबाही सांगत राहिली. त्यातलं काही मेंदूत साचून राहिलं तर काहीचा काळानुसार निचरा झाला. दोन वर्षापूर्वीच्या गणेशोत्सवात पुण्यातील वेश्यांचा (आताच्या भाषेतील सेक्सवर्कर्सचा) या उत्सवाबद्दलचा मूड टिपून घ्यायचा होता, तेव्हा नानाविध अनुभव आले. त्याच्या मागच्या वर्षी मुंबईच्या कामाठीपुऱ्यातील स्त्रियांचे अनुभव घेतले होते. यंदा महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या विजापुरात याच कारणासाठी आलो असताना थोडया वेगळ्या जाणिवांची अनुभूती झाली. बागलकोट रोडलगत असणाऱ्या एका वसाहतीबाहेर एक दिवस आणि नजीकच्या इंडी शहरात एक दिवस भेटी गाठींचे शेड्युल होते.
दक्षिण महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यालगतच्या सीमेवर असणाऱ्या कर्नाटकच्या या भागात पूर्वी गणेशोत्सव मर्यादित स्वरुपात केले जात असत. मात्र मागील दशकापासून इथे वाढत्या प्रमाणात धडाक्यात उत्सव साजरा होतोय अन दरसाली त्याच्या भव्यतेत भर पडतेय. उत्सव साजरे होतात म्हणजे नेमके काय होतं याच्या व्याख्या व्यक्तीपरत्वे बदललेल्या दिसतात. गणेशोत्सव असो वा ईदचा सण असो वा ख्रिसमस वा नवरात्र, कोणत्याही धर्माचा कुठलाही उत्सव घ्या त्यात लोकसहभाग हा येतोच. त्यामुळे लोकांच्या आवडीनिवडी त्या उत्सवात नकळत डोकावतात. अर्थात रक्षाबंधनसारखेही काही सण घरगुती असतात पण आजकाल सार्वजनिक राखी बांधण्याचा उपक्रमही राजकीय, सामाजिक हेतू समोर ठेवून राबवला जातो. विविध ठिकाणच्या रेड लाईट एरियात देखील आता एनजीओजद्वारे रक्षाबंधनाचे नवे पायंडे पाडले जात आहेत. असो. देशभरात प्रत्येक राज्यात कुठला ना कुठला उत्सव त्या त्या राज्याची ओळख बनून गेलाय. राज्यातील जनतेच्या जातधर्माच्या बहुसंख्येच्या सत्वावर या सणांचे साजरे होण्याचे स्वरूप ठरते. समाजातील सर्व वयोगटातील, सर्व लिंगाचे, वर्णांचे, विविध विचारधारांचे लोक यात सहभागी होतात. उत्सवांच्या विरोधी मते असणारी मंडळी देखील या काळात आपलं मत हिरीरीने मांडून संधीचा ‘मौका’ साधतात ! आपल्या बहुतांशी उत्सवात सामील व्हायला कोणतीही आर्थिक प्रतवारी लागत नाही की कुठले सामाजिक निकष असत नाहीत. आपल्याकडील उत्सवांच्या या जमेच्या बाजू होत. तरीही एका शतकापूर्वीचे देशभरातील सर्वच उत्सवांचे स्वरूप आणि आताचे स्वरूप यात दोन धृवांचे अंतर आहे. या उत्सव काळात कोणाच्या मनात काय भावना असतात याचा धांडोळा अनेकविध माध्यमातून आजकाल लोकांपर्यंत पोहोचतो आहे, हे चांगलेच आहे, तरीही एक शोषित घटक पूर्णतः उपेक्षित अन दुर्लक्षित राहिलाय. त्या घटकाची या उत्सव काळात होणारी घालमेल या पोस्टमधून टिपण्याचा प्रयत्न...
तिशी पार केलेल्या विजापुरातील द्वारकाला वाटते की शहरात गणेशोत्सव नक्कीच वाढला आहे पण तिच्या धंद्यावर याचा काही फरक पडला नाही. 'एका ठराविक भागात याचं प्रस्थ जाणवतं' असं बोलकं निरीक्षणही तिनं नोंदवलं. मात्र ती याचा फारसा गांभीर्याने विचार करत नाही. तिच्या मते श्रद्धा आणि व्यवसाय यांची गल्लतही घालू नये अन त्यांचा मेळही घालू नये. जे जसे चालते तसे चालू द्यावे, त्याच्या बरकतीसाठी देवाला वेठीस धरू नये. सावळ्या रंगाची नाकी डोळी नीटस असणारी द्वारका मुळची आंध्राच्या विशाखापट्टणची. तिच्या गावी गणेशापेक्षा त्याच्या भावाला, कार्तिकेयाला जास्त पूजतात. ‘मुरुगन’ नाव आहे तिच्या अनौरस पोराचं. तो गावाकडेच असतो. आईबापाविना गावात वाढणारा तो पोर थोड्या उंडारक्या करत शाळेत जाऊन मोडकी तोडकी विद्या शिकतो. आईने विचारले की म्हणतो, नानू कलीयबेकगिदे - मला शिकायचे आहे ! मग ती त्याला इथून पैसे पाठवते. त्यावर घर चालते. चूल पेटते अन त्यांचे पोट भरते, याची शाळा चालते! त्याचं शिक्षण संपल्यावर ती देखील त्याच्याकडे जायचं म्हणते. पुन्हा मध्येच तिला भीती वाटते की, त्याचं लग्न होईपर्यंत तो आपल्याला नक्कीच सांभाळेल पण लग्न झाल्यावर त्याची बायको आल्यावर तिने आपल्याला समजून घेतलं नाही तर पुढे कसे होणार? हा प्रश्न तिच्या मेंदूत खिळे ठोकतो.
थोडा फार गव्हाळ रंग असणारी, मध्यम बांध्याची, आकर्षक चेहऱ्याची पल्लवी विशीतली आहे. ती मात्र गणेशभक्त आहे. गणेशोत्सवात गुरुवारी आणि रविवारी ती कोणाला अंगाला हात लावू देत नाही. त्या दिवशी ती ‘कोरडी’ राहते. रजनी सोळा सतरा वर्षांची असेल. तिच्या डोळ्यात अजब चमक आहे. तिचं बोलणं लाघवी आहे. तिची नेत्रपल्लवी आणि तिनं लाडानं दिलेलं आवतण समोरच्या माणसाला घायाळ करायला पुरेसं आहे. तिचा कमनीय बांधा अन नखरेल चाल अजून भाव खाऊन जातं. तिला देवदेवता वा साधू, महाराज यात बिलकुल रस नाही. कुठलाही सण हा आपल्या कमाईची पर्वणी आहे असं तिचं ठाम प्रतिपादन. ती कुठला उपवास करत नाही की कुठलं व्रतवैकल्य करत नाही, अपवाद सौंदत्तीच्या यल्लमा यात्रेचा! तिला लहानपणीच विकलेलं. तिच्या सगळ्या भावना मेलेल्या. सगळी नाती कोमेजून गेलेली, भावना ओसरून गेलेल्या अन काळीज चिरून गेलेलं. त्यामुळे तिला उत्सव ही पर्वणी वाटणं साहजिक आहे. "अब्बी नै कमाऊंगी तो कब कमाऊं ? उप्परवाला मेरे को यहां लाया और मैं अटक गई ...अब उनें यहां लाया तो मै उसको काहे को पुजू ? उनें क्या पेट भरनेवाला ? मेरकू बुढढी होने के बाद कोई भगवान संभलने को नै आता ...मेरकुच अबी सोना पडता !"...तिचं बोलणं आरपार. एकदम भिडणारं...
भौरम्माचं मत रजनीच्या मताच्या नेमकं विरुद्ध आहे. भौरम्मा आता चाळीशी पार करून पन्नाशीकडे झुकल्याने कदाचित तिचे विचार या टप्प्यात आले असावेत. भौरम्माच्या चेहऱ्यावर अजूनही गोडवा आहे, काळाने वयाच्या थोड्याफार खुणा तिच्या गालावर, कपाळावर रेखायला सुरुवात केलेली आहे. लंबोळक्या चेहऱ्याची, धारदार नाकाची, नाजूक जिवण्याची भौरम्मा खूपच आकर्षक. पाणीदार डोळे, विस्तीर्ण कपाळ, चापून चोपून विंचरलेले केस, जाड पेडाची वेणी आणि टिपिकल कानडी साडी पोलकं नेसून स्वच्छ नीटनेटकं आवरलेली भौरम्मा कुणाचंही लक्ष वेधून घेते. तिची धंद्याची काही तत्व होती जी तिनं अखेरपर्यंत सांभाळली. महिन्यातले 'ते' चार दिवस ती कुणाला अंगाला हात लावू दिला नाही. उत्सवात दिवसा कधीच अंथरुणाला पाठ लावली नाही. मात्र व्रत वैकल्ये करूनही तिच्या आयुष्यात उतरत्या काळात भलं मोठं प्रश्नचिन्ह वगळता हाती काहीच शिल्लक नव्हतं. ‘येणारं दशक माझी दिशा ठरवेल’ असं सांगणाऱ्या भौरम्माचे डोळे नकळत पाणावले अन आवाज घोगरा झाला तसा माझ्या अंगवार सरसरून काटा आला. ती गणेशभक्त आहे, आता मागच्या पाचेक वर्षापासून तिला या दहा दिवसात कुणासाठीही अंथरुणे सजवावी वाटत नाहीत.
नागपूरच्या गंगाजमुनात काळजाला खोल जखम झालेली एक बाई भेटली होती. मिनाज तिचं नाव. “त्यौहार कौनसा भी हो औरतकोही पिसा जाता है, किसी भी धर्म का त्यौहार क्यों न देखे, उसमे औरत के खून का पानी होता है जिससे घर की दिवार सजाई जाती है... औरत लगती है बिस्तर और चुल्हे के लिये फिर वो चाहे घरवाली हो या हम जैसी बाहरवाली... हमारी नुमाईश ही हमारी जिंदगी का चुल्हा है और हमारा नंगा बदनही मर्दोंका बिस्तर है ..” फाट फाट कानाखाली जाळ काढत जावं असं ती आपलं तत्वज्ञान सांगू लागली की समोरच्याची बोलती बंद होते. ती मध्यप्रदेशच्या देवास जवळील एका खेड्यातली. एका परधर्मीय मुलासोबत प्रेम करून घरातून पळून गेलेली. त्यानं तिच्याशी लग्न केलं. पंधरावीस दिवस उपभोग घेऊन तिला मुंबईत आणून विकलेलं. आता इथून घरी परत गेलं तर आपल्याला कोणीही परत घेणार नाही या विचाराने ती तिथंच राहिली. शेवटी तिच्या अड्ड्यातल्या बायकांशी तिची मैत्री झाली. त्यातल्याच एकीवर जास्त जीव जडला, जानकी तिचं नाव. या बायकांचा एकमेकाला फार आधार असतो. जानकी आणि मिनाज देखील याला अपवाद नव्हता. चाळीशीतील जानकीची मुलगी चित्रदुर्गजवळच्या गावातल्या घरी आजी जवळ रहायची. त्या पोरीच्या लग्नासाठी तिनं आणि मिनाजनं कमाईतले सारे पैसे दिलेले. पुढे त्या पोरीला लग्न झाल्यावर सासरच्या लोकांनी विहिरीत ढकलून मारले. या घटनेचा जानकीच्या डोक्यावर इतका परिणाम झाला की ती वेड्यागत वागू लागली. दुःख हलकं करण्यासाठी हवापालट करण्याच्या हेतूने आणि एका वैदूबाबाच्या भेटीच्या निमित्ताने या दोघी नागपूरात आल्या आणि इथल्याच होऊन गेल्या.
मिनाज सगळ्या धर्माचे देव पुजते, कोणत्याच देवाने आजवर तिच्या मनासारखे काहीही केलेलं नाही तरीही तिची देवावरची श्रद्धा अपार आहे. तर जानकीनं तिच्या जवळच्या सगळ्या मूर्ती, सगळे फोटो कधीच उकीरड्यावर नेऊन टाकलेले. गणेशोत्सवाच्या धामधुमीत मुसलमान असणारी मिनाज सीताबर्डीच्या टेकडी गणेश मंदिरात एक दिवस का होईना जाऊन यायची अन् तिथला प्रसाद आपल्या जीवाभावाच्या मैत्रिणीला आणून द्यायची. त्या भेटीत तिच्या बाकी जिंदगीवर तिला छेडलं “आता उरलेल्या आयुष्यात तुम्हा दोघींना काय करायचे आहे?” या प्रश्नावर एक दोन मिनिट विचार करून मिनाजनं उत्तर दिलं की, बाकी आयुष्यात कोणा एका अडलेल्या प्रेमी जोडप्याचं लग्न लावायला मिळालं तरी खूप आहे नाहीतर इथल्याच एखाद्या बाईच्या पोरीबाळीच्या लग्नात काही मदत करता आली तर ती करायची. मग जीव जायला मोकळं होणार! याच प्रश्नावर जानकीनं एक सेकंददेखील वेळ न घेता उत्तर दिले की, “जोवर मिनाज जिंदा है तोवर माझी सांस चालणार....तिच्या आधी मी पुढे गेली तर माझ्या काळजाची फुले तिच्यासाठी अंथरणार...” बोलता बोलता जानकीच्या डोळ्यात आलेलं पाणी आपल्या तर्जनीने अलगद पुसून मिनाज तिच्या खोलीत गेली. जाताना आपल्या डोळयांच्या ओल्या झालेल्या कडा चोरून पदराने पुसत गेली तेंव्हा पोपडे उडालेल्या भिंतीवरील तुटायला झालेल्या जीर्ण तसबिरीतल्या गणपतीच्या डोळ्यात पाणी आल्यासारखे वाटले ....
(पोस्टमधील व्यक्तींची मूळ नावे बदलली आहेत)
(पूर्वार्ध)
समीर गायकवाड लिखित याआधीचे ब्लॉग :
उतराई ऋणाची...
स्वातंत्र्यसूर्याच्या प्रतीक्षेतले अभागी जीव...
गीता दत्त - शापित स्वरागिनी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बॉलीवूड
महाराष्ट्र
शिक्षण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)