Mumbai Local Train: कर्नाक पुलाच्या गर्डर लॉचिंगचं काम लांबलं, रेल्वेच्या वाहतुकीचे तीनतेरा, मध्य रेल्वे दादरपर्यंतच
Mumbai News: मुंबईत मध्य रेल्वे, हार्बर रेल्वेच्या वाहतुकीचे तीनतेरा. कर्नाक पुलाच्या गर्डरचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. मुंबई महानगपालिकेचा भोंगळ कारभार
मुंबई: मध्य रेल्वेमार्गावरील मस्जिद बंदर स्थानकाजवळ असलेल्या कर्नाक पूलावरील गर्डर बसवण्याच काम लांबल्याने रविवारी उपनगरीय रेल्वेच्या वाहतुकीला मोठा फटका बसताना दिसत आहे. कर्नाक पूलावर गर्डर बसवण्याचे काम मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले होते. त्यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष ब्लॉक ठेवण्यात आला होता. मात्र, रविवारी सकाळीही कर्नाक पूलाचा गर्डर बसवण्याचे काम पूर्ण न झाल्याने मुंबईतील रेल्वे सेवेचा बोजवारा उडाला.
कर्नाक पुलाचा गर्डर बसवण्यासाठी रविवारी पहाटे साडेपाचपर्यंत ब्लॉक होता. मात्र, काम लांबल्याने ब्लॉकचा कालावधी वाढला. त्यामुळे मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेन भायखळ्यापर्यंत जाऊन थांबून राहिल्या. परिणामी रेल्वे ट्रॅकवर लोकल ट्रेनच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे सध्या मध्य रेल्वेची वाहतूक दादर स्थानकापर्यंच चालवली जात आहे. तर हार्बर रेल्वेची वाहतूक वडाळ्यापर्यंत चालवली जात आहे. मुंबई दिशेने येणाऱ्या अनेक मेल एक्सप्रेस पुणे, कल्याण, ठाणे, पनवेल स्थानकात अचानक रद्द केल्याने प्रवाशांचा संताप अनावर झाला आहे. या स्थानकातून पुढे लोकल देखील उशिराने असल्याने प्रवाशांच्या त्रासात आणखीन भर पडली आहे.
मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्यात समन्वय नसल्यामुळे हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. गर्डरचे काम करणाऱ्या पालिका प्रशासनाकडून रेल्वेला काम लांबत असल्याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे आता रेल्वे स्थानकांवर केवळ ट्रेन उशीरा आहेत, या घोषणांपलीकडे काहीच होताना दिसत नाही. मुंबई महानगरपालिकेने गर्डर लाँचिंगचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी किती वेळ लागेल, याबद्दल काहीही सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे संभ्रमाचे वातावरण असून याबद्दल प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
हजारो प्रवाशांना फटका
कर्नाक पूलाच्या कामाविषयी मुंबई महानगरपालिकेकडून कोणतीही माहिती दिली जात नाही. बेस्ट प्रशासनाकडून आता जादाच्या बेस्ट बसेस सोडण्यात आल्या असल्या तरी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्याचा फटका अनेक शासकीय कर्मचाऱ्यांना बसला आहे. आज होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी अनेक शासकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी नियोजित स्थळी पोहचू शकले नाहीत. त्यामुळे मुंबईकरांसाठी आजचा रविवार मनस्तापाचा ठरत आहे. त्यामुळे आता मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक पूर्ववत कधी होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. अन्यथा आज दिवसभर मुंबईकरांना या सगळ्याचा त्रास सहन करावा लागेल.
आणखी वाचा