Animal : सेल्फ सेंटर्ड 'अॅनिमल'
Animal : 'ॲनिमल' (Animal) सिनेमानं बॉक्स ऑफिस कमाईचे रेकॉर्ड मोडलेत. सिनेमातल्या अल्फा मॅनची चर्चा झाली. त्यावर टीका झाली. संदीप वांगाला मिसोजिनिस्ट म्हटलं गेलं. महिलांचा राग करणारा माणूस. स्त्रीद्वेष्टा. सिनेमा जेव्हा टार्गेट झाला तेव्हढाच जास्त चालला. कॅन्सल कल्चरचा रिव्हर्स इफेक्ट पाहायला मिळाला. ॲनिमल पाहणाऱ्यांची गर्दी वाढतेय. ती वाढतच जाईल. पुढच्या महिन्यात नेटफ्लिक्स येणारेय. कदाचित तेव्हाही थिएटरमध्ये पाहणाऱ्यांची संख्या जास्त असेल. ॲनिमल ‘माहौल’ बनवतो. थेटरात जास्त रंग आणतो.
'ॲनिमल'मधला व्हायलेन्स अंगावर येत नाही. तो नैसर्गिक आहे. हिंसेनंतर लगेच जोक्स आहेत. हिंसंक दृश्यांच्यावेळी ही जोक्स आहेत. हे फारच मनोरंजक आहे. खरंतर तुलना करु नये. पण गँग्स ऑफ वासेपूर आणि ॲनिमलमधली हिंसा असा अभ्यास केला जाऊ शकतो. गँग्समधली हिंसा अंगावर येते. ॲनिमलमधली हिंसा तशी नाही. हिंसेचं टेन्शन घालवण्यासाठी वांगानं जोक्स प्लेस केलेत. ते प्रेक्षकांना रिलॅक्स करतात. हसवतात. या सिनेमाचा स्क्रीनप्ले रायटर आणि एडिटरही वांगाच आहे. कुलोसोव इफ्केटचा उत्तम वापर त्याने केलाय. तो दोन दृश्यांमधला संबंध जोडतो. हिंसेचं टेन्शन येतेय असं वाटत असताना त्यातली हवा काढतो, पुडी सोडतो. लगेच टाळ्या वाजतात. यातूनच ॲनिमलला रिपीट ऑडियन्स मिळालाय.
संदीप वांगाचा एक इंटर्व्यू आलाय. त्यात सिनेमाचं नाव ॲनिमल का ठेवलं ? या प्रश्नाचं उत्तर तो देतोय. संदीप म्हणतो, ‘ॲनिमल’ नैसर्गिक वागतात. त्यांच्या भावभावना सेल्फ सेंटर्ड असतात. सिनेमातलं प्रत्येक पात्रं असंच आहे. सिनेमाचा हिरो रणविजय (रणबीर कपूर) जरा जास्तच सेल्फ सेंटर्ड आहे. स्वत:चा विचार करणारा. प्राण्याचा इलाका असतो. त्यात ते खूष असतात. या भागात ते कुणाला येऊ देत नाही. आला तर त्याला सोडत नाहीत. हे त्याचं बेसिक इंस्टींक्ट आहे.
संदीपच्या या आर्गुमेन्टला मानसशास्त्राची जोड आहे. अमेरिकन मानसशास्त्रज्ञ कार्ल रॅन्सम रॉजर्स यांनी थिअरी ऑफ द सेल्फ मांडली. ती मानवतावादी, वास्तववादी आणि त्याचवेळी अभूतपूर्व आहे. सांस्कृतिक जडणघडण, धार्मिकता आणि अध्यात्मिकता, सामाजिक भूमिका आणि व्यावसायिक वातावरण, पालकांकडून मिळालेले संस्कार, शालेय शिक्षण आणि वाढत्या वयाप्रमाणे होणारे शारीरिक आणि मानसिक बदल इत्यादी गोष्टी सेल्फ सेंटरनेसला जबाबदार असतात. सुखवादी तत्व (Hedonic Principle) त्यातून येणारी भावनिक प्रतिक्रिया (Affective Reactions) या सर्वांतून मिळणारा आनंद (Happiness), अनेकदा यात भावनिक चढउतार (Fluctuating Happiness) असतात. असा हा सेल्फ सेंटर्ड इफ्केट तयार होतो. ॲनिमलमधली सर्वत पात्रं या सेल्फ सेंटर्डनेस संयंत्रातून (Apparatus) जाताना दिसतात. त्यांचे इंस्टिंक्ट अर्थात अंतःप्रेरणा नैसर्गिक आहेत.
सिनेमाचा पॉलिटिकल अपॅरटसमधून विचार होऊ शकतो. जे तत्व नेपोलियनलला लागू पडतं ते रणविजयला लावण्यास हरकत नाही. सबटेक्स्ट (मतीतार्थ) आणि सिमिऑटिक्स (सांकेतिकता) या बाबतीत ॲनिमल भारी सिनेमा ठरतो.