एक्स्प्लोर
Advertisement
चीन-अमेरिकेच्या भांडणात भारतीय कापसाला 'अच्छे दिन'
कापसाच्या आयातीवर आणि निर्यातीवर कुठलंही शुल्क नसल्यानं कापूस हे खऱ्या अर्थानं जागतिक बाजाराशी जोडलं गेललं पीक आहे. सध्या जागतिक बाजारातून कापसामध्ये तेजी येण्याचे संकेत मिळत आहेत. अमेरिका आणि चीन या दोन आर्थिक महासत्तांमध्ये तणाव वाढला असून त्यांच्यात व्यापार युद्धाची (ट्रेड वॉर) ठिणगी पडली आहे.
राज्यातील कोरडवाहू शेतकरी एप्रिल-मे महिन्यात आकाशाकडं डोळे लावून असतात. मान्सूनच्या पावसावर त्यांच उत्पन्न अवलंबून असतं. कधी चांगला पाऊस पडला तर बाजारपेठ साथ देत नाही. बाजारपेठेनं साथ दिली तर दुष्काळ किंवा अति पावसानं उत्पादनात घट झालेली असते.
यावर्षी सरासरीएवढा पाऊस होण्याचा अंदाज स्कायमेट या खासगी संस्थेनं दिला आहे. त्यामुळं आता शेतकरी कुठल्या पिकाला येत्या हंगामात दर मिळेल याचा अंदाज घेत आहेत. कारण पेरणीच्या वेळी बाजारात असलेला दर काढणीच्या वेळी मिळेलच याची काही शाश्वती नसते. उदाहरण म्हणून तुरीकडं पाहता येईल. जून 2016 मध्ये तुरीची लागवड करताना दर होता 10,500 रूपये क्विंटल. शेतकऱ्यांनी तुरीची काढणी करून माल बाजारात आणला तेव्हा म्हणजे फेब्रुवारी 2017 मध्ये दर आला 3400 रूपयांवर. राज्यात खरीप हंगामात सर्वाधिक पेरा कापसाचा असतो. गुलाबी बोंडअळीनं यंदा राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जेरीस आणलं. किडीचा प्रादुर्भाव थांबावा यासाठी शेतकऱ्यांना कीटकनाशाकावर प्रचंड खर्च करावा लागला. त्यामुळं अनेकांना कापसातून नफा होण्याऐवजी तोटा झाला. त्यामुळं साहजिकच येत्या हंगामात शेतकरी कापसाची लागवड करावी अथवा नाही याबाबत संभ्रमात आहेत. परंतु जागतिक परिस्थिती पाहता येत्या हंगामात कापसाला चांगले दर मिळण्याची शक्यता बळावली आहे.
कापसाच्या आयातीवर आणि निर्यातीवर कुठलंही शुल्क नसल्यानं कापूस हे खऱ्या अर्थानं जागतिक बाजाराशी जोडलं गेललं पीक आहे. सध्या जागतिक बाजारातून कापसामध्ये तेजी येण्याचे संकेत मिळत आहेत. अमेरिका आणि चीन या दोन आर्थिक महासत्तांमध्ये तणाव वाढला असून त्यांच्यात व्यापार युद्धाची (ट्रेड वॉर) ठिणगी पडली आहे. त्याचा परिणाम म्हणून अमेरिकेने चीनमधून आयात होणाऱ्या अनेक वस्तूंवर मागच्या महिन्यात आयात कर लागून करण्याचा सपाटा लावला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून चीनने अमेरिकेतून येणाऱ्या कापूस, सोयाबीन अशा शेतमालावर 25 टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेरिका हा जगातील सर्वात मोठा कापूस निर्यातदार देश आहे, तर भारत कापसाच्या उत्पादनात अव्वल आहे. कापसाचा सर्वाधिक वापर चीनमध्ये होतो. अमेरिकेतून येणाऱ्या कापसावर 25 टक्के आयात शुल्क असल्याने चीनमधील कापड उद्योगाला इतर इतर देशांतून कापूस आयात करण्याशिवाय पर्याय नाही. आयात शुल्क जाहीर झाल्यानंतर केवळ एका आठवड्यात चीनने भारतातून दोन लाख गाठी कापूस खरेदी केला. एकंदर अमेरिका आणि चीन या देशांतील व्यापार युध्दामुळे भारतातील कापूस उत्पादकांना फायदा होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या खालोखाल भारत, ऑस्ट्रेलिया आणि ब्राझील हे देश महत्त्वाचे कापूस निर्यातदार आहेत. मात्र भारतातून चीनला कापूस निर्यात करताना वाहतूक खर्चात मोठी बचत होते. भारतातील कापूस केवळ दोन आठवड्यात चीनला पोहोचतो, तर ब्राझीलमधून चीनला कापूस पोहोचण्यास जवळपास दीड महिना लागतो. त्यामुळे चीनमधील वस्त्रोद्योगाची पहिली पसंती भारतीय कापसाला आहे.
चीनची बाजारपेठ प्रचंड मोठी आहे. चार वर्षांपूर्वीपर्यंत चीन हा जगातील सर्वात मोठा कापूस आयातदार देश होता. परंतु मागील काही वर्षांत चीनने देशातील कापसाचा साठा कमी करण्यासाठी कापसाच्या आयातीवर बंधंनं घातली. त्यामुळे चीनमधील कापसाचा साठा जवळपास निम्म्याने कमी झाला आहे. जो माल शिल्लक आहे त्यातील बराचसा साठा चांगल्या प्रतीचा नाही. त्यामुळे चीनला 2018/19 च्या हंगामात कापूस आयात वाढवण्याशिवाय पर्याय नाही. त्यातच अमेरिकेतून आयात होणाऱ्या कापसावर 25 टक्के आयात शुल्क असल्याने अमेरिकेच्या पर्यायावर फुली मारावी लागणार. याचा परिणाम म्हणून भारताची चीनला होणारी कापसाची निर्यात आठ लाख गाठींवरून पुढील वर्षी 25 लाख गाठींवर जाऊ शकते. या वर्षी देशातून 70 लाख गाठी कापूस निर्यात होण्याचा अंदाज आहे. पुढील हंगामात चीनकडून मागणी वाढल्यानं देशाची कापसाची निर्यात 90 ते 100 लाख गाठींवर जाऊ शकते.
अमेरिकेत सर्वाधिक कापूस टेक्सास या प्रांतात होतो. तिथं नेहमीपेक्षा कमी पाऊस झाल्याने त्याचा कापसाला फटका बसण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे जागतिक बाजारात कापसाचे दर आणखी वधारून भारतीय कापसाच्या मागणीत वाढ होईल.
कापसाची निर्यात पुढील वर्षी वाढण्याची शक्यता असताना दुसऱ्या बाजूला देशातील कापसाचा साठा कमी होत आहे. या हंगामाच्या शेवटी देशातील कापसाचा साठा मागील हंगामाच्या तुलनेत निम्मा होण्याची शक्यता आहे. त्यातच गुलाबी बोंड अळीमुळे मागील वर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याने कापसाच्या पेऱ्यात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील वर्षी कापसाचे मोठे उत्पादन अपेक्षित नाही. त्याचाही परिणाम कापसाच्या दरावर होईल आणि तेजीला हातभार लागेल, असे सध्याचे चित्र आहे.
कापसाला दर चांगले राहतील, असे स्पष्ट संकेत मिळत असले तरी बोंडअळीचा ही शेतकऱ्यांपुढची सगळ्यात मोठी धोंड आहे. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होईल अथवा नाही हे अनेक घटकांवर अवलंबून असतं. त्याबद्दल कोणीच अंदाज देऊ शकत नाही. ज्यांना बोंडअळीचं नियंत्रण करून कापूस उत्पादन घेणं शक्य आहे त्यांनी कापसाला प्राधान्य देण्यास हरकत नाही. जे शेतकरी कापूस आणि सोयाबीन ही दोन्ही पिकं घेतात त्यांनी मागील वर्षी सोयाबीन ची लागवड केली होती त्या क्षेत्रात येत्या हंगामात कापसाची लागवड करावी; तर कापसाची लागवड केलेल्या क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करावी, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे. त्यामुळे गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी होईल, असं त्यांचं म्हणणं आहे. बाजारपेठेत केवळ चांगला दर मिळून फायदा नाही तर त्यासोबत उत्पादनातही वाढ झाली तरच शेतकऱ्यांना खरा फायदा होईल. त्यामुळं गुलाबी बोंडअळीवर नियंत्रण मिळवता आलं तर पुढचा हंगाम कापूस उत्पादकांना दिलासा देणारा ठरेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement