एक्स्प्लोर
Advertisement
आय लव्ह यू सनी लिओनी!
जगाची पर्वा करु नये वगैरे बाता मारुन मारुन अनेकजण थकतात. इनक्लुडिंग मी. पण प्रत्यक्षात प्रसंग येतो त्यावेळी लोक काय विचार करतील, याचाच विचार करत बसतो. मग ते 'लोग क्या कहेंगे, ये भी हम सोचेंगे, तो लोग क्या सोचेंगे?' असले कधीकाळी उर बडवून हाणलेले डायलॉग विसरुन जातो आणि लोकांचाच विचार करुन पाय पुढे-मागे सरकवत बसतो. अशा प्रसंगांवेळी मला सनी लिओनी खूप उजवी वाटते.
पॉर्न स्टार म्हणून प्रसिद्धीस आलेली सनी लिओनी पुढे भारतात येऊन बॉलिवूडमध्ये नशीब अजमावते आहे. मात्र, इथेही तिला अनेकदा भेदांना सामोरं जावं लागलं. तिने तशी जाहीर खंतही व्यक्त केली होती. मात्र कुठेही न खचता, तिने आपलं करिअर सुरुच ठेवलं. एकामागोमाग एक सिनेमे येत राहिले आणि देशाच्या कानाकोपऱ्यात ती पोहोचली. आता कुठे अवॉर्ड शोमध्ये वगैरे तिला प्रस्थापित बॉलिवूडकर एखाद्या कोपर्यात जागा देऊ लागले आहेत. हेही काही बॉलिवूडचे उपकार नाहीत. तर सनी लिओनीने स्वतःला सिद्ध केल्यानंतरचे पडसाद म्हणता येईल.
भारतात सनीला पॉर्न स्टारच्याच अँगलने पाहिले गेले. अजूनही तिचा उल्लेख 'पॉर्न स्टार ते बॉलिवूड स्टार' असाच होतो. ही किचकट कट्टर भारतीय मानसिकता आहे. एखाद्या व्यक्तीला लेबल लावले की पुढच्या प्रतिक्रिया देणं त्यांना सोपं जातं. पण सनी लिओनीने याची कधीच पर्वा केली नाही.
"Only GOD will judge! Life is short, Lets make the most of it.", हे सनी लिओनीचं ट्विटरवरील स्टेटस तिच्या एकंदरीत भूमिकेकडे अधिक प्रखरतेने लक्ष केंद्रित करणारं आहे. सर्वशक्तीमान असलेला ईश्वर ठरवेल, मी चूक आहे की बरोबर. आणि फक्त तोच ठरवेल. असं तिला म्हणायचंय. याचाच दुसरा अर्थ असाय की, तुम्ही ठरवायचं नाही. मला हे खूप क्रांतिकारी वाटतं. एकीकडे पाय घसरुन पडल्यावर आपल्याला कुठं लागल़य का हे पाहण्याआधी, आपल्याला पडताना कुणी पाहिलं तर नाही ना, हे पाहणरे आपण... तर दुसरीकडे आपल्या तत्त्वांवर जगणारी सनी लिओनी. आपण जे करतो, ते आपल्यादृष्टीने योग्य आहे ना, हे ती पडताळून पाहते. जग काय विचार करतं, हे तितकं महत्त्वाचं नसतं. सनी लिऑनने हे सूत्र तिच्या आयुष्यापुरतं चांगलं अंगिकारलं आहे.
पॉर्न स्टार असणं चांगलं की वाईट किंवा ते नैतिक की अनैतिक वगैरे भानगडीत पडत नाही. ते ठरवायला आपण आहोत. विशेषत: भारतीय तर आहेतच. नैतिक-अनैतिक ठरवण्यात आपला हात धरणारा दुसरा तरबेज कुणी नसावा. असो.
भारतीय संस्कृतीला काळीमा फासणारे कृत्य वगैरे बोलून आपण तिला देशद्रोही लेबल लावून पाकिस्तानचा रस्ता दाखवला नाही, ही खूपच मोठी गोष्टय. नाहीतर हल्ली छोट्या छोट्या गोष्टींवरुन हकालपट्टीच्या गोष्टी होतात. घरावर दगडफेक वगैरे होते. तसं अजून सनीबाबत झालं नाही, हेही बरंच आहे म्हणायला हवं.
भारतीय सिनेसृष्टीत एन्ट्री केल्यानंतर सनी लिओनीने अनेक सिनेमे इंटिमेट सीन असणारे केले. ते चाललेही. जे विकतं ते तेच तिने केले. पण याचा साईड-इफेक्ट असा झला की, आधीच पॉर्न स्टार ही ओळख, त्यात बॉलिवूडमध्ये आल्यानंतरही ‘ओन्ली अॅडल्ट’ फिल्म्स करणं… यामुळे तिची इमेज पॉर्न स्टारपासून वेगळी होऊ शकली नाही. उलट ती इमेज आणखी गडद झाली. त्यात सिनेमांच्या पलिकडे जाऊन सनी लिओनी काय सामाजिक कामं करते किंवा काय तिची भवतालावर काय मतं आहेत, हे आपण कधीच पाहिले नाही. किंवा तशी आपल्याला गरज भासली नसावी. कारण सनी लिओनी म्हणजे ‘ओन्ली अॅडल्ट’. इथवरच आपण मर्यादित राहिलो. ती काय चांगलं करेल, याची अपेक्षाच मनात नसावी. पण सनी लिओनीच्या गेल्या काही वर्षातील भूमिका पाहिल्या की, तिच्यातील संवेदनशीलतेचं आणि माणुसकीचं दर्शन होतं.
गेल्या कित्येक वर्षांपासून सनी लिओनी ‘पेटा’ या प्राण्यांच्या अधिकारासाठी काम करणाऱ्या संस्थेसोबत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या जोडली गेली आहे. देशात जिथे जिथे प्राणमात्रांवर अत्याचार होतात, त्यांना मदत हवी असते, त्यासाठी ‘पेटा’मार्फत मदत करणं किंवा त्यासंदर्भातील धोरणांसाठी सोशल मीडियातून आवाज उठवणं असेल... सनी लिओनी कायम पुढाकार घेते. हे तुम्हा-आम्हाला जमण्यासारखं नाहीय. कारण त्यासाठी अस्सल माणसाचं काळीज लागतं. तरच त्यात प्रत्येक सजीवाप्रती संवेदनशीलता येते. सनीमध्ये ती आहे. फक्त आपल्या कुजकट मानसिकतेने तिला पॉर्नच्या पुढे पाहिलंच नाही. तिच्या याच संवेदनशील अंगाला आणखी दुजोरा देणारी घटना गेल्या आठवड्याभरातलीच. ती म्हणजे मुलगी दत्तक घेणं होय.
जवळपास दोन वर्षांपूर्वी सनी लिओनी आणि तिचा पतीन डॅनियल वेबरने एका अनाथ आश्रमला भेट दिली होती. त्यावेळीच त्यांनी मुलगी दत्तक घेण्याचं ठरवलं होतं. त्यानंतर महिना-दीड महिन्यापूर्वी सनी लिओनी एका कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी लातुरात येऊन गेली. तेव्हा तिच्या संवेदनशील नजरेने एका चिमुकल्या परीला हेरुन ठेवलं होतं. ती कार्यक्रम आटोपल्यानंतर पुन्हा तिच्या बिझी शेड्युलमध्ये गुंतली. त्यानंतर पुन्हा लातुरात गेली आणि त्या चिमुकल्या परीला थेट दत्तकच घेतलं.
शाहरुख, करण जोहर, तुषार कपूर वगैरे मंडळी मुलगा किंवा मुलीसाठी सरोगसी किंवा टेस्ट ट्युब बेबीचा आधार घेत असताना, जिला पॉर्न स्टार म्हणून मेन-स्ट्रीमपासून झिडकारत राहिलो, त्या सनी लिओनीने आपलं पहिलं मुल दत्तक घेतलं. तीही मुलगी. आणि त्यात आणखी एक गोष्ट म्हणजे लातूरमधील उदगीरसारख्या ग्रामीण भागातील. हेही नक्कीच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. आता इथेही खुल्या दिलाने तिचं किती स्वागत होईल, हा मुद्दा आहेच. पण तिला त्या कौतुकाची वगैरे गरज नाही. ती कौतुक आणि टीकेच्या पलिकडे जाऊन विचार करणारी आहे. जगणारी आहे, हेच तिने यातून दाखवलं आहे.
आपलं अपत्य गुटगुटीत, सोज्वल, गोरापान वगैरे असला पाहिजे, ही व्यक्त न होणारी सुप्त इच्छा प्रत्येकाच्या मनात असतेच. पण या तथाकथित सुप्त इच्छेलाही सनी लिओनीने फाटा देत, वर्णभेदाच्या पेकाडात लाथ हाणत मुलीची निवड केली. मुळात इथेही मुलीची निवड तिने केली असंही म्हणता येणार नाही. कारण तिनेच म्हटलंय की, मुलीची निवड आम्ही केली नाही, तर मुलीनेच आमची निवड केलीय. निशा असं गोड नावही ठेवलंय.
सनी, इतकं मोठं मन घेऊन आलीस भारतात. पण तुला इथल्या कोत्या मनाने कायमच तथाकथित संस्कृतीच्या फूटपट्टीवर मोजू पाहिली. ते किती निर्बुद्ध आहेत, हे तू तुझ्या कृतीतून दाखवून दिलंस.
आणि हो, सनी, जग काय म्हणेल, या गोष्टीला तू कायमच फाट्यावर मारुन जगतेस. विशेष म्हणजे जग सारं तुला तुझ्या भूतकाळानेच ओळखू पाहत असलं, तरी तुझ्या भविष्याची वाटचाल ठळकपण दाखवून दिलीयेस, हे कुणी आता पाहत नसलं.. तरी ते नक्कीच महत्त्वाचं आहे. आज ना उद्या याचे सकारात्मक पडसाद तुझ्या प्रवासावर नक्की उमटतील.
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील अनाथ चिमुकली दत्तक घेऊन तू जे पाऊल उचललं आहेस, ते नक्कीच कौतुकास्पद आहे. तुझ्यातल्या आईला सलाम!
अनेक नायिका नटापटा करुन मिरवत असतात. त्यातल्या अनेक केवळ सुंदर दिसणार्या आण चकमकीत लाईट्समध्ये झगामगा करणाऱ्या असतात. त्यांच्यापेक्षा तू किती वेगळी आहेस, या झगमगाटी दुनियेच्या पलिकडे तुझ्यातली संवेदनशीलता किती जपलीयेस, हेच तू चिमुकल्या निशाला दत्तक घेऊन दाखवलंयेस... या क्षणी अगदी मनापासून म्हणावं वाटतंय, आय लव्ह यू सनी लिओनी!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement