एक्स्प्लोर

बुकशेल्फ : आय अॅम अ ट्रोल

'ट्रोलिंग' हा एक विषय झाला. मात्र 'माणूस' आणि 'मानसिकता' या दोन परिप्रेक्षातून ट्रोलिंग या गोष्टीकडे पाहिल्यास आणखी भयंकर प्रश्न उभे राहतात - जे आपल्याला अनुत्तरीत करतात.

तशी अनेक कारण आहेत. पण त्यातली तीन अत्यंत महत्त्वाची कारणं आहेत, ज्यांमुळे हे पुस्तक आवर्जून वाचावं वाटलं. एक म्हणजे जगातील सर्वात मोठा संसदीय लोकशाही प्रणालीचा हा देश. या देशाने अनेक सरकारं पाहिली. हुकूमशाहीकडे वळू पाहणाऱ्या सरकारांचे डोके ठिकाणावर आणले. केलेल्या कामाच्या जोरावरच इथली जनता मतं देत आली आहे. काही भावनिक मुद्द्यांच्या निवडणुकाही झाल्या. नाही असे नाही. मात्र आता आता आलेल्या या सोशल मीडिया नावाच्या गोष्टीने एक पक्ष राक्षसी बहुमत मिळवत सत्तेत येऊ शकतो? अजूनही बाल्यावस्थेत असणाऱ्या एका गोष्टीत इतकं काय सामर्थ्य आहे किंवा या गोष्टीचा एखाद्या पक्षाने इतका काय आणि कसा कसा वापर केला?, याचं कुतुहल प्रचंड होतं. हे पुस्तक वाचण्याचं दुसरं कारण म्हणजे, ट्रोलसंदर्भातील वाढत्या चर्चा आणि त्याच पार्श्वभूमीवर प्रकाशित झालेलं हे पुस्तक. सात-आठ वर्षे सोशल मीडियावर आहे. त्यातील गेली तीन-एक वर्षे तर सातत्याने रोज किंवा एक दिवसाआड काही ना काही लिहितोच आहे. मात्र सत्ताधारी वर्गाविरोधात काहीही लिहिलं की, जथ्थेच्या जथ्थे कमेंटचा पाऊस पाडतात. झुंडीने येऊन आपल्याला हैराण करतात, हे पाहिलंय. त्यामुळे यांची रणनिती तरी काय, कसे एकजूट होतात, यांना पैसा मिळतो का, या शंका मनात घर करुन होत्याच. त्यातच हे पुस्तक प्रकाशित झालं आणि त्यात याचीच उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केलाय, हे कळल्यावर वाचनाची ओढ वाढली. तरीही खूपच उशिरा वाचतोय. पण त्याची कारणं वेगळीयेत. तिसरं कारण म्हणजे, मी एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या डिजिटल मीडिया टीम कार्यरत आहे. त्यामुळे त्या अर्थाने ट्रोलिंग ही ज्या प्रांतातील अपप्रवृत्ती आहे, त्याच प्रांताशी निगडित माझं काम आहे. त्यामुळे तसा बिरादरीतला प्रकार. त्यामुळे उत्सुकतेसह माहितीपोटीही हे पुस्तक नजरेखालून घालणं महत्त्वाचं वाटलं. बाकी फॅसिस्ट विचारांच्या संघटनेविरोधात मताचा वगैरे आहेच. तशी अनेक कारणं देता येतील. पण ही तीन कारणं मुख्यत्त्वाने या पुस्तकापर्यंत घेऊन आली. आणि अखेर ते वाचून काढलं. एबीपी माझाच्या डिजिटल मीडिया टीममध्ये असल्याने फेसबुक-ट्विटर हे माझे दैनंदिन आयुष्य बनलेत. त्यात मी वैयक्तिकरित्याही या दोन्ही माध्यमांचा पुरेपूर वापर करतो. त्यामुळे त्यासंदर्भात माहिती माझ्यासाठी अर्थातच नवीन नाही. किंबहुना हे पुस्तक वाचतानाही नव्हती. मात्र तरीही या पुस्तकाने जबरदस्त हादरे दिले. ट्विटरवर बऱ्यापैकी मी अॅक्टिव्ह असतो. फार नसले तरी हजार-दोन हजार फॉलोअर्सचा तोरा मिरवतो. तेही काही कमी नाहीत. सात-आठ हजार ट्वीट केल्यानंतर मिळालेली ती कमाई आहे. त्यामुळे त्या अर्थाने ट्विटरच्या व्यासपीठावरचा मी तसा जुना-जाणता आहे, असं म्हटलं तरी ती आत्मस्तुती ठरणार नाही. उलट हे पुस्तक समजण्यासाठी उपयुक्तच ठरणारं होतं. असो. तर ट्विटर वापरत असताना ट्रोलिंग हा प्रकार अनेकदा पाहिलाय. त्याला आधी मी 'टार्गेट करणं' असं म्हणायचो. पण ट्रोलिंग शब्दाचा वापर वाढल्यानंतर तोही वापरु लागलो. हा ट्रोलिंग प्रकार अनेकांबाबत स्वत: ट्विटरवर पाहिलाय. मग कधी रामचंद्र गुहांच्या एखाद्या ट्वीटखाली किंवा राजदीप सरदेसाईंच्या एखाद्या ट्वीटखाली. बरखा दत्त, ऑफिस ऑफ राहुल गांधी, अरविंद केजरीवाल यांसारख्यांच्या ट्वीटखाली अगदी झुंडीच्या झुंडी काहीच्या काही बरळत असतात. इतकं की एखाद्या संवेदनशील माणसाने हे माध्यमच सोडून द्यावं. नको त्या घाणेरड्या, गलिच्छ आणि विकृत मानसकितेच्या उपमा वाचून कुणालाही नकोसं व्हावं, इतकं भयानक, भयंकर आणि विदारक. या ट्रोलिंगवाल्यांचे कारनामे ट्विटरवर रोजचेच. ते पाहत आलोय. त्यामुळे ते माझ्यासाठी नवीन नव्हते. मात्र या ट्रोलिंगमागे जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा तोरा मिरवणाऱ्या देशाच्या सत्ताधारी पक्षाची यंत्रणाच काम करत असते, आणि त्यातही देशाचा सर्वोच्च माणूस - पंतप्रधान आणि त्यांचे सहकारी मंत्रीही या विकृत अभियानात समाविष्ट असतात, हे माझ्यासारख्या सोशल मीडियावर पडीक असणाऱ्यासाठीही हादरा देणारं होतं. इतकं काय हादरे देणारे, हे पुढे काही नावं उल्लेख केल्यावर लक्षात येईलच. या पुस्तकातून ट्रोलिंग नावाची ही विकृत गोष्ट अधिक स्पष्ट केली. आणि कोणत्या प्रकारच्या विचारसरणीकडून भारतासारख्या सांस्कृतिक इतिहास सांगणाऱ्या देशात ती गोष्ट रुजवली, हेही स्पष्टपणे कळले. किवा कळले म्हणण्यापेक्षा आधीच शंका होती, त्यावर शिक्कामोर्तब झालं. हे पुस्तक मला एखाद्या इनव्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ताजसारखं वाटतं. अर्थात ते आहेही तसंच. प्रस्तुत पुस्तकाच्या लेखिका असणाऱ्या स्वाती चतुर्वेदी यांच्यामधील शोध पत्रकाराने ट्रोलिंगच्या जगाताचा घेतलेला हा शोध आहे. आणि त्या शोधाचा हा वृत्तांत आहे, असे म्हटले तरी वावगं ठरणार नाही. यात स्वाती चतुर्वेदींनी काही गोष्टी कटाक्षाने पाळल्यात, ज्या अशा प्रकारच्या अत्यंत संवेदनशील मजकुरासाठी महत्त्वाच्या वाटतात; त्या म्हणजे, पुरावे. लेखिकेने कुठेही निराधार विधानं - ज्यांना आपण शुद्ध मराठीत 'वाऱ्यावरच्या बाता' म्हणतो - तसे केले नाही. जिथे जिथे कुणाचे नाव घेतले आहे, तिथे तिथे त्या संबंधित फोटो दिले आहेत. कुठे लिंक दिले आहेत. किंवा अनेक ठिकाणी तो तो मुद्दा पटवून दिला आहे. या सर्व गोष्टींमुळे पुस्ताकतील मजकुराला सत्याची धार मिळत गेलीय आणि सोबत काही ठिकाणी व्यक्त केलेल्या मतांनाही वजन प्राप्त झालंय. याच पुस्तकातील प्रकरण पाचमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित तंत्रज्ञ, जो पुढे भाजपच्या ट्रोलिंगच्या 'देशहिताच्या (?) महाकार्यात' सहभागी झाला, त्याचे विधान उद्धृत करावे वाटते. तो म्हणतो- "तंत्रज्ञानाला तत्त्वज्ञानाशी काहीही देणंघेणं नसतं." मला हे वाक्य प्रचंड महत्त्वाचं वाटतं. विशेषत: भाजपने विकृतपणे केलेल्या या तंत्रज्ञानाचा वापरासंबंधी. ट्रोलिंग करुन त्यांनी हे वाक्य खऱ्या अर्थाने सत्यात उतरवलं. विरोधी मतांना, विरोधकांना कुठल्याही थराला जात नामोहारम करायचं, एवढंच ध्येय या ट्रोलकरांना असतं. आपण कुठल्या तत्त्वाचे आहोत आणि आपल्याकडच्या ज्ञानाचा काय उपयोग झाला पाहिजे, याचा थांगपत्ता या मोहिमेत त्यांना नसतो. 'ट्रोलिंग'च्या जगताच्या पोटात घुसून सारं शोधलं पाहिजे, हे लेखिकेला वाटण्यामागचं कारण कुणा इतरांचे अनुभव नाहीत किंवा कुणीतरी इतर व्यक्ती त्याचा बळी पडलाय म्हणून त्यामागचा शोध घेतला गेला नाहीय. तर स्वत: लेखिका काय ट्रोलिंगच्या कचाट्यात अडकली. तिला गलिच्छ शिव्यांपासून बलात्काराच्या धमक्यांपर्यंत आणि सोशल मीडियाच्या सार्वजनिक व्यासपीठावर बदनामी करण्यापर्यंत सोसावं लागलं. यातूनच तिने या जगताची भांडाफोड करण्याचं ठरवलं म्हणूया किंवा या जगताची पाळंमुळं शोधण्याचा प्रयत्न केला. भूमिका, प्रस्तावना, पाच प्रकरणं, तात्पर्य आणि परिशिष्टे अशा भागात पुस्तक विभागलं गेलंय. अगदी 140 ते 145 पानी हे पुस्तक आहे. यातील 'भूमिका' ते  लेखिकेची ट्रोलिंगविषयी भूमिका, तर प्रस्तावनेतून लेखिका पुस्तकाचा हेतू स्पष्ट करते. तात्पर्यात पुन्हा काही प्रमाणात लेखिकेची भूमिकाच आढळून येते. मात्र परिशिष्टांमधून ट्रोलिंगबाबत भाजपचा बुरखा पुन्हा एकदा टराटरा फाडला आहे. शिवाय त्यात अस्खलित पुरावे देत, अगदी स्क्रीनशॉटच्या फोटोंसोबत मांडणी केलेली आढळते. प्रस्तावना, भूमिका आणि तात्पर्य, परिशिष्टे यांच्या मधोमध असणारी पाच प्रकरणं हा या पुस्तकाचा गाभा आहे. यातूनच ट्रोलिंग ही विकृत संकल्पना आणि त्यामागची गलिच्छ मानसिकता समजून घ्यायला मदत होते. '' 'कृपावंत पंतप्रधान मोदी आम्हाला फॉलो करतात', 'भाजपशी संबंध', 'मी आहे ट्रोल', 'आणखी काही पायंडे' आणि 'मुळापर्यंत- रा. स्व. संघाची कडी', अशा पाच प्रकरणात हे पुस्तक मुख्यत्वाने विभागलं गेलं आहे. ही पाचही प्रकरणं तुम्ही क्रमा-क्रमाने वाचू लागता, त्यावेळी या शोधात तुम्हाला स्वाती चतुर्वेदी त्यांचा सोबती करुन घेतात. पुढे काय काय झालं असेल, याची कमालीची उत्सुकता ताणून धरायला लावतात. त्यामुळे पुस्तकापासून वेगळं होता येत नाही. अनेकदा तळपायाची आग मस्तकात जाते. मात्र याचा शेवट काय, आणखी काय काय या महाशयांनी केलंय, याची एक्साईटमेंट मनात कुठेतरी असतेच. आणखी एक बाब म्हणजे, या ट्रोलिंगच्या शोधाच्या प्रवासात अनेक नावं अशी सापडतात, ज्यांमुळे धक्का बसतो. मग एका क्षणानंतर अशी काही नावं समोर येतात, ज्यांमुळे आधी ज्या नावांमुळे धक्का बसला होता, ती नावं या नावांपुढे नगण्य वाटू लागतात. ट्रोलिंगसारख्या कृत्यामधून मानसिकतेचं विकृत प्रदर्शन करण्यात अग्रेसर असलेल्या नावांनी एकंदरीत देशाच्याच भविष्याच्या चिंता वाटू लागते. आधी उल्लेख केल्याप्रमाणे ट्रोलिंगचा पर्दाफाश ही मोहीम सुरु होते स्वत: लेखिकेच्या अनुभवापासून. लेखिका स्वत: ट्रोलिंगची बळी पडली होती. त्यामुळे पुढील शोध, मांडणीही लेखिकेने अत्यंत नीट समजावून सांगितल्याचे दिसून येते. आणि स्वाती चतुर्वेदींच्या या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवादही तितक्याच सहजतेने मुग्धा कर्णिक यांनी मराठीत केला आहे. मुग्धा कर्णिक यांनी प्रस्तावनेत ‘ट्रोल’ या शब्दाचे दोन अर्थ सांगितले आहेत. अर्थ म्हणण्यापेक्षा संदर्भ म्हणूया. दोन संदर्भ दिले आहेत. ते दोन्ही संदर्भ इथे मुद्दामहून नमूद करतो. कारण ट्रोल हा शब्द समजून घेण्यास सोपं जाईल. संदर्भ एक – “ट्रोल हे पात्र पाश्चात्य किंवा प्रामुख्याने उत्तर युरोपीय परीकथांमधून आलेले आहे. खादाड, क्रूर, मठ्ठ, राक्षसी ताकदीचे आणि आकाराचे ट्रोल्स रात्री शिकार, लुटालूट वगैरे कारभार करतात आणि सूर्य उगवताच गुहांमधून लपतात. प्रकाशापासून दूर जातात. कारण सूर्यकिरण अंगावर पडले तर त्यांचे दगडात रुपांतर होते." संदर्भ दोन - "महायुद्ध काळात ट्रॉलिंग या मासेमारी तंत्राचे आणि ट्रोलचे एकत्रीकरण झाले आणि शत्रूचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी भलतीच काही कारवाई करणे याला 'ट्रोलिंग' म्हटले जाऊ लागले." वरील दोन्ही संदर्भांमधून निघणारा जो अर्थ आहे, तोच वेगळ्या अर्थाने आजच्या सोशल मीडियावरील 'ट्रोलिंग' शब्दाला लागू पडतो. म्हणजे शत्रूचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हे ट्रोलिंग केलं जातं. शिवाय पहिल्या संदर्भानुसार, कुणी तोडीस तोड उत्तरं देणारा आला की लुटालूट करणाऱ्यांसारखे हे ट्रोलिंग करणारे गायब होतात. एखाद्याच्या प्रश्नाला तोडीस तोड उत्तर देणे, त्याच्यावर टीका करणे इथवर समजून घेण्यासारखे आहे. मात्र एखाद्याला ठरवून टार्गेट करणं, समोरील व्यक्ती महिला असेल तर तिला बलात्काराच्या धमक्या देणं, तिला अश्लिल मेसेज करणं, समोरील व्यक्ती पुरुष असेल तर त्याला त्याच्या आई-बहीण-पत्नीवर बलात्काराच्या धमक्या देणं इथवर निच पातळी ट्रोलिंग गाठतात. भाजपसारख्या पक्षाने असे ट्रोलर पोसले, वाढवले, हे लेखिकेने पुराव्यांसह पुस्तकातून समोर आणले आहेत. खरंतर भाजपची पितृसंघटना असणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कधीच नवे बदल तातडीने स्वीकारत नाही. मग इंटरनेट हा अत्यंत पुढारलेलं माध्यम त्यांनी कसं स्वीकारलं, याचीही चुरस कहाणी त्यांच्याच माणसाकरवी समोर मांडली आहे. मूळचे संघाचे आणि आता भाजपचे राष्ट्रीय सचिव असणाऱ्या राम माधव यांची मुलाखतच लेखिकेने प्रस्तुत पुस्तकात छापली आहे. इंटरनेट आणि त्यानंतर सोशल मीडिया या सर्वच बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी संघाला प्रवृत्त करण्यापासून स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यापर्यंतच्या सर्व गोष्टी राम माधव यांनी स्वत: सांगितल्या आहेत. इंटरनेट किंवा सोशल मीडियाचा वापर आपल्या प्रचार-प्रसिद्धीसाठी करणं, यात खरंतर वाईट काहीच नव्हतं. मात्र यात विकृतपणा सुरु झाला तो निवडणुकांसाठी याचा वापर अत्यंत वाईट पद्धतीने केला गेला. विशेषत: 2014 च्या लोकसभा निवडणुकीसाठी. एखाद्या गुप्तचर यंत्रणेचं काम वाटावं, तसं अत्यंत चोख आणि पद्धतशीरपणे भाजपने ट्रोलिंगचा विकृत प्रकार सुरु ठेवला. दिल्लीतील अशोक रोडवरील भाजपच्या मुख्यालयात खास सोशल मीडिया टीमसाठी कार्यलय स्थापन करुन देण्यात आले आणि तिथूनच देशातील सर्व विरोधकांना 'टार्गेट' करणं सुरु झालं. राहुल गांधींपासून अरविंद केजरीवालांपर्यंत, सोनिया गांधींपासून बरखा दत्त यांच्यापर्यंत. भाजपच्या या विखारी प्रचाराचा मास्टरमाईंड म्हणजे अरविंद गुप्ता नामक व्यक्ती. थेट मोदींशी संपर्क असणाऱ्या या व्यक्तीने देशाला विकास हवाय, या प्रचाराच्या नावाखाली अत्यंत हीन पातळी गाठत अनेकांची बदनामी करण्याची मोहीमच उघडली. धक्कादायक म्हणजे पंतप्रधान मोदींचाही या अरविंद गुप्तांना थेट पाठिंबा असतो, हे वाचल्यावर यातील बाकी मंत्र्यांची नावं क्षुल्लक वाटतात. बरं हे सारं लेखिका स्वत:च्या मनाचं सांगत नाहीत. पंतप्रधानांपासून कित्येक मंत्री-संत्र्यांची नावं त्या बिनदिक्कीतपणे पुस्तकात घेतात. कारण हे कुणी दुसऱ्या-तिसऱ्या व्यक्तीने सांगितलं नाही, तर भाजपच्याच या सोशल मीडियाच्या कॅम्पेनमध्ये काम केलेल्या आणि नंतर पश्चाताप झाल्याने बाहेर पडलेल्या साध्वी खोसला यांनी सांगितलेली कहाणी आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'च्या कार्यक्रमात असहिष्णुतेसंदर्भात वक्तव्य करणाऱ्या अभिनेता आमीर खानला टार्गेट करुन 'पाकिस्तानात जा' इथवर आदेश देणं असो किंवा ट्रोलिंगच्या माध्यमातून दबाव आणून आमीरला ब्रँड अम्बेसिडर म्हणून काढून टाकण्यापर्यंत स्नॅपडीलला हतबल करणं असो, अशा कित्येक भयंकर कारनामे साध्वी खोसला या भाजच्या सोशल मीडिया टीममधील माजी सदस्य राहिलेल्या महिलेने सांगितले आहेत. एक एक घटना हादरे देतात. कारण माध्यमांमधून त्या घटना आपण वाचलेल्या असतात. मात्र त्यामागील हे कुटील डावपेच आपल्याला माहित नसतात आणि जेव्हा ते कळतात, तेव्हा नक्कीच धक्के बसतात. हे पुस्तक वाचताना अनेकदा असं होतं. धक्कादायक म्हणजे या ट्रोलिंग करणाऱ्यांपैकी अनेकांना किंबहुना बहुतेकांना स्वत: पंतप्रधान मोदी फॉलो करतात. अर्थात, ज्यांच्या देखरेखीखाली हे सारं कृत्य सुरु असतं, त्यांनी फॉलो करण्यात आश्चर्यकारक काही नाही. मात्र त्याही पुढे जात एक गोष्ट यात उल्लेख केलीय, ती म्हणजे पंतप्रधानांनी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी या ट्रोलिंग करणाऱ्यांना खास आमंत्रण देऊन बोलावलं होतं. (लेखिकेने परिशिष्ट 'अ'मध्ये पंतप्रधान मोदी फॉलो करत असलेल्या ट्रोलची यादीच दिली आहे.) तिथे प्रत्येकासोबत फोटो सेशनही झाले. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही म्हटल्या जाणाऱ्या देशाचा पंतप्रधान अशाप्रकारे विकृत मानसिकतेला पाठबल देत असेल, तर.....? पंतप्रधान मोदींचे सहकारी तर उघडपणे या ट्रोलना पाठिंबा देताना दिसतात. यामध्ये गिरीराज सिंह, व्ही के सिंह किंवा भाजपशी संबंधित प्रीती गांधी यांची नावं घेता येतील. त्याचवेळी लेखिकेने मोदी सरकारमध्ये सोशल मीडियाचा चांगला वापर करणाऱ्यांचाही उल्लेख टाळला नाही. सुरेश प्रभू, सुषमा स्वराज, मनेका गांधी यांसारख्यांनी सोशल मीडियाचा जनहितासाठी वापर केल्याचंही लेखिका आठवणीने नमूद करते. तर एक ना अनेक धक्कादायक खुलासे यात केले आहेत. अनेक ठिकाणी भाजपला तोंडघशी पाडण्याचं काम लेखिकेने पुराव्यानिशी केलेय. थायलंडमधील ठिकाण दाखवून केलेल्या ट्वीट्सचे फोटो देत लेखिकेने भाजपच्या सोशल मीडिया टीमची बोगसगिरीही उघडी पाडली आहे. एक विशेष आहे, ते म्हणजे लेखिकेने कुठेही एकांगी वाटावं असं लिहिलं नाही. याचं मुख्य कारण म्हणजे राम माधव असो अरुण शौरी असो किंवा माजी निवडणूक आयुक्त वाय. एस. कुरेशी यांच्यासारख्यांशी थेट संवाद साधून सदर लेखन केले आहे. या सर्व लेखनाला वजन मिळतं ते भाजपच्या सोशल मीडिया टीममधील माजी सदस्या साध्वी खोसला यांच्या कथनामुळे. त्यानंततर तीन ट्रोलना स्वत: लेखिका वेगवेगळ्या ठिकाणी भेटली. त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यातूनही भाजपचा हा विखारी प्रचार नक्की कसा चालतो, हे जाणून घेतले आहे. आपच्या सोशल मीडिया टीममधील अंकीत लाल यांचा अनुभव आणि परिशिष्ट 'ब'मधील त्याने ट्रोलिंगच्या ठिकाणांबद्दल दिलेली माहितीही प्रचंड महत्त्वाची ठरते. संपूर्ण पुस्तक भाजपच्या ट्रोलिंगबाबत असलं, तरी आम आदमी पक्षाचाही ओझरता उल्लेख सापडतो. मात्र, लेखिकेने एका ठिकाणी म्हटल्याप्रमाणे, सर्वच पक्ष, संघटना ट्रोलिंगचा वापर काही प्रमाणात करतात. मात्र बलात्काराच्या धमक्यांपर्यंत कुणी जात नाही. भाजपच्या सोशल मीडिया टीमने त्या सर्व पातळ्या गाठल्या आणि अत्यंत गलिच्छ प्रचार चालू ठेवला. खरंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेत 2012 साली राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत सोशल मीडियाचा प्रचंड वापर झालेला दिसला. त्यावेळीही ट्रोलिंग हा प्रकार पाहावयास मिळाला. भारताही आजच्या घडीला काँग्रेसपासून अगदी प्रादेशिक पक्षही ट्रोलची फौज बाळगताना दिसतात. हल्ली हल्ली तर राजकीय नेत्यांनी वैयक्तित पातळीवरही ‘वॉर रुम’ तयार करुन सोशल मीडियाच्या व्यासपीठावरील टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे ट्रोलिंग हा प्रकार येत्या काळात नवीन राहणार नाही, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. असो. एकंदरीत भाजपच्या विकृत 'ट्रोलिंग' जगाची सफर घडवणारं तर हे पुस्तक आहेच. मात्र त्याचवेळी जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशातील सर्वात मोठ्या पक्षाने अशा थराला जाऊन केलेल्या प्रचारामुळे आपल्याला विचार करण्यासही भाग पाडतं हे पुस्तक. आपण आणखी किती तळ गाठणार आहोत, असे नाना प्रश्न आ वासून पुस्तकाच्या शेवटी समोर उभे राहतात. कुठून येते ही विकृत मानसिकता, हा फक्त सत्तेचा हव्यास आहे की बदल्याची भावना? नक्की काय? विचार करण्याची वेळ येऊन ठेपलीय. हे पुस्तक वाचल्यावर त्या वेळेची आणखी आठवण तीव्र होते. मूळ इंग्रजी असलेलं हे पुस्तक अत्यंत सोप्या-साध्या शब्दांचा वापर करत लेखिका मुग्धा कर्णिक यांनी मराठीत अनुवाद केला आहे. हे पुस्तक अनुवादित करण्यामागचा मुग्धा कर्णिक यांचा हेतूही अत्यंत महत्त्वाचा आहे. शेवटी तो हेतू इथे नमूद करणं मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं. मुग्धा कर्णिक लिहितात - "ट्रोलिंगने भाजप-संघाच्या विजयाचा मार्ग खुला केला हे पाहून अन्य कुणीही पक्षांनी याच पातळीवर उतरु नये. ते तर चिखलातूनच उगवलेले आहेत. अन्यांनी चिखल करु नये. हे मराठी जगताला समजावे ही इच्छा हा अनुवाद करण्यामागे होता." 'ट्रोलिंग' हा एक विषय झाला. मात्र 'माणूस' आणि 'मानसिकता' या दोन परिप्रेक्षातून ट्रोलिंग या गोष्टीकडे पाहिल्यास आणखी भयंकर प्रश्न उभे राहतात - जे आपल्याला अनुत्तरीत करतात.   'बुकशेल्फ'मधील याआधीचे ब्लॉग : बुकशेल्फ : माझ्या आईची गोष्ट                                 बुकशेल्फ : लेनिन, यशवंतराव आणि जॉन रीड्सचं पुस्तक बुकशेल्फ : शहर आत्महत्या करायचं म्हणतंय..!
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Chunabhatti Riksha:चुनाभट्टीतील वादानंतर भीमसैनिकांनी रिक्षा सोडल्या,रिक्षानं जाण्यास परवानगी
Chunabhatti : चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
Embed widget