एक्स्प्लोर
Advertisement
बुकशेल्फ : शहर आत्महत्या करायचं म्हणतंय..!
‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय’ हा कवितासंग्रह हाती पडला, त्याचाही एक वेगळा किस्सा आहे. कवी सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकार नवनाथ बन यांच्या माध्यमातून हे पुस्तक माझ्यापर्यंत पोहोचवलं. विशेष म्हणजे सुशीलकुमार आणि माझी तशी कधीच प्रत्यक्ष भेट नाही. पण मी वाचतो, लिहितो म्हणून सदिच्छा भेट पाठवली.
ज्यादिवशी कवितासंग्रह हाती आला, त्यावेळी प्रज्ञा दया पवारांचं ‘अफवा खरी ठरावी म्हणून..’ वाचत होतो. त्यामुळे सहाजिकच कवितासंग्रह तसाच बुकशेल्फमध्ये पडून राहिला. मग मधे पाच-सहा दिवस गेले आणि पहिल्यांदा पुस्तक वाचायला सुरुवात केली. मला आठवतंय, निम्मा कवितासंग्रह एका बैठकीत वाचून काढला. दोन दिवसात पूर्णही झाला. योगायोगाने डबल विक ऑफ होता. त्यानंतर आणखी दोनवेळा कवितासंग्रह वाचला. पुन्हा पुन्हा वाचाव्या वाटतात कविता. प्रत्येकवेळी नवीन काहीतरी गवसतं. जगण्याचं भान आणि जगण्यातील वास्तव प्रत्येकवेळी नव्याने समोर ठाकतं.
महानगरांमध्ये घर-दारापासून लांब राहणाऱ्या संवदेनशील मनांना यातल्या कविता फार डोकं लावून वगैरे वाचाव्या लागत नाहीत. किंवा कविता अत्यंत शांत ठिकाणी वाचल्या, तरच कळतील अशातल्याही नाहीत. आपलंच काहीतरी यात मांडलंय, असं प्रत्येक कवितेगणिक वाटू लागतं. अत्यंत सर्वसामान्यांच्या भाषेत जगण्याला आडकाठी ठरणाऱ्या प्रत्येक गोष्टीला कवीने आपल्या कवितेतून जाब विचारलाय. वाचा फोडलीय.
या झगमगाटी नगरीचे आभासी रंगबेरंगी कपडे टराटर फाडत वास्तवाच्या मध्यभागी उभी करुन, प्रत्येक अंग समजावून सांगणारी ‘शहर’ कविता आपलं या संग्रहात स्वागत करते. स्वागतलाच उभे असतात सुशीलकुमार यांचे भिडणारे अस्सल ठेवणीतले शब्द. ‘शहर’मध्ये कवी लिहितो,
कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली
या शहराने
भाड्याने ठेवलीत स्वप्ने, आशा आणि आकांक्षा.
तीव्र इच्छेलाही अशतो उग्र वास
घाणीसारखाच
सहन न होणारा आणि दडपताही न येणारा...
चकचकीत रस्ते
उंचच उंच इमारती
मोकळे ढाकळे फूटपाथ
आणि शिस्तबद्ध वाहतूक
किती सुंदर असते ना स्वप्नात रमणे...
पण हे शहर असेच राहते भ्रमिष्ट्यासारखे.
एक..एक..करत कविता वाचत जातो, तस..तस.. वाटत जातं की, जे या शहरात अनुभवलंय, तेच अनुभव कवीने आपल्या संवेदनशील मनाने टिपून मोजक्या शब्दात कवितेत उतरवलंय. या शहरात धुसफुसत रडत आसवं गाळणाऱ्या प्रत्येक कोपऱ्याला कवीने आपल्या कवितेतून व्यासपीठाच्या मध्यभागी आणून ठेवलंय. त्यांना बोलतं केलंय. त्याचवेळी खेड्या-पाड्यातून खाच-खळग्यातून इथं आलेल्या प्रत्येकाची घुसमटही व्यक्त केलीय. ही घुसमट 'बॅटरी अबाऊट टू डाय' या कवितेतून व्यक्त केलीय.
माणसाळलेल्या शहरात
गर्दीच्या ठिकाणी
कित्येक वेळा मी
वाचतो
बोलतो
भांडतो
किंवा कुठल्याही संवेदनेची बोच नको
म्हणून शांतपणे फिरवत राहतो फॉरवर्डेड मेसेज
जोमात सुरु राहते चॅटिंग
आणि अनसिव्हिलाईज्ड ह्युमॅनिटी
झिरपत राहते मेंदूतून आरपार.
सुशीलकुमारची कविताही अशीच मेंदूतून झिरपत जाते अंगात. आणि काळजाचा नेमका ठाव घेत आपण संग्रहात एक-एक पान पुढे सरकत जातो. अगदी अलगद आणि थरथरत्या हाताने. कारण पुढल्या पानावर कोणत्या मानवी अवस्थेवर प्रहार असेल याची कल्पना नसते.
संवेदनशील मनाला अस्वस्थ करणारा प्रत्येक प्रश्न सुशीलकुमार शिंदेंनी आपल्या कवितेतून मांडलाय. स्वत: सुशीलकुमार शिंदेंना ही तुलना आवडणार नाही कदाचित. पण मला त्यांच्या काव्याची तुलना बहिणाबाईं चौधरींच्या कवितांशी करावीशी वाटते. बहिणाबाईंनी ज्याप्रकारे आपल्या कवितेतून कृषीसंस्कृती मांडली, त्याचप्रकारे सुशीलकुमारने आपल्या कवितेतून शहराची संस्कृती दाखवलीय. इथे फरक इतकाच की, बहिणाबाईंची कृषीसंस्कृती बहरदार होती, गुणगाण गाण्यासारखीच होती, मात्र आजची शहरसंस्कृती जागतिकीकरणाच्या कचाट्यात अडकून पार मोडकळीस आलीय. त्यामुळे तो एक फरक इथे जाणवतो. शिवाय सुशीलकुमार यांनी तो फरकही नेमका टिपलाय.
कवी : सुशीलकुमार शिंदे
बहिणाबाईंप्रमाणेच सुशीलकुमार यांनीही आपल्या रोजच्या धबाडग्यातील जगण्यातील बारीक-सारीक गोष्टी हेरुन त्यांची मोठ्या कॅनव्हासवर मांडणी केली आणि त्यातून शब्दरुपी प्रातिनिध घटकांवर प्रहार केले. या शहराची ओळख असलेल्या प्रत्येक गोष्टींचा कवितेत समावेश केला आणि त्यावर काव्यरुपी भाष्य केलं.
ग्रामीण भागातून आलेल्यांना हे शहर इथल्या स्थानिकांपेक्षा अधिक प्रकर्षाने जाणवतं. सुशीलकुमार यांचा प्रवासही गाव ते शहर असा झाल्याने त्यांच्या कवितेच्या प्रत्येक शब्दातून ते 'जाणवणं' लक्षात येतं आणि आपल्यालाही भिडतं.
आपल्या संवेदनशील मनाने प्रत्येक गोष्ट टिपलीय, तर कधी अस्वस्थ होत संतापून शब्दातून वार केलेत. माणूस म्हणवून घेण्यासाठीही कलंक आहोत, इतकी भीषण स्थिती या शहराच्या झगमगाटात चेपली गेलीय. ती स्थिती कवीने आपल्या कवितेतून उघडी केली.
‘कूस बदलणारी शहरं’ ही कविता शहराचा बदल मांडते, तर ‘बिनचेहऱ्याची माणसं’ ही कविता या शहराचं वास्तव सांगते. म्हणजे फोकल्यान्ड रोडवर उभी असलेल्या पोरीपासून ते स्वत:चं घाम शिंपून बहुमजल्या इमारती उभ्या करुन स्वत: बेघर राहणाऱ्या कामगारापर्यंत.
सुशीलकुमार यांच्या कविता अशाच आहेत. त्यांनी शहराचं आक्राळ-विक्राळ रुप, इथल्या व्यथा, अस्वस्थ करणारे कोपरे, संताप अनावर करणारी चकाकी इत्यादी सारं मांडताना ते कुठेतरी वर्गसंघर्षही कवितेतून समोर आणतात. मग अगदी मार्क्स, डार्विन, स्मिथ वगैरे मंडळींना एका रांगेत उभं करुन कवी या शहराच्या मनाशी त्यांना जोडू पाहतो.
सुशीलकुमार, वाळूमुळे माणसाचं वाळवंट होणं आणि शहर आणि समुद्रमधून निळ्याशार अथांग पसरलेल्या जन्मजात श्रीमंत समुद्राच्या लाटांमध्येही तू कवितेला गुंफत जातोस. “समुद्राचा आयघालेपणा काठावर बसून समजणार कसा?” असा क्रांतिकारी प्रश्नच तू विचारु पाहतोस. प्रिय सुशीलकुमार, हे तुझ्यासारख्या कविलाच जमू शकतं रे.
सुशीलकुमार तू फक्त शब्दांना जोडून कविता केल्या नाहीस. तू ते अनुभवलंयेस. जगलायेस. हे वाक्या-वाक्यातून जाणवत राहतं. नामदेव ढसाळ, नारायण सुर्वेंनी ज्याप्रकारे या शहरातील कामगार आणि दिनदुबळ्यांचं जगणं रोखठोक शब्दात मांडलं, तसंच तूही मांडत जातोस. तुझ्या कवितांबद्दल तुझ्याच शुब्दात बोलायचं तर,
“कागदावर उतरले ते
निव्वळ शब्द नव्हतेच कधी
ती आदिम वर्षांची घुसमट
सांडत गेली अक्षरातून सहजपणे.”
हो... सुशीलकुमार यांच्या कविता आदिम वर्षांची घुसमट वाटते. सुशीलकुमार यांनी आपल्या संवेदनशील मनाने टिपून शब्दात उतरवलेत. या कवितांमधील शब्द ज्यांच्या नजरेखालून जातील, त्यांना शहराचं खरं रुप कळेल आणि वास्तवाचं भानही येईल.
शहरातल्या आसवांना आणि हुंदक्यांना शब्दरुप दिल्यानंतर कवी थांबत नाही. कवी आपल्यात निगेटिव्हिटी भरुन वाऱ्यावर सोडून देत नाही. तो आशावादीच ठेवू पाहतो. किंवा आपल्याला सकारात्मक राहण्याचं आवाहन करतो. कवीला हे माहित असावं की, हे वास्तव सांगितल्यानंतर हादरुन जातील. मात्र, त्यांना आपल्याला सजग ठेवायचंय. अन्यायाविरोधात लढायलाच हवं, असंही कवी सांगतो. म्हणूनच एका कवितेत लिहितो की, “कुठल्याही काळी मुके राहण्याचा गुन्हा गंभीर असतो”. संग्रहाचा शेवटही तितक्याच ताकदीच्या कवितेने केला आहे,
कागदाला येते खाज,
म्हणून थोडीच लिहितो कोणी?
काळीज चिरताना गप्प बसवत नाही हेच खरं.
सळसळणाऱ्या रक्तातू उमटत जाते रसायन
कधीच गिळता येत नाही माणसांच्या झुंडीना
ते खुडतील स्वप्ने किंवा जाळतील घरे
किंवा एखादा हंगाम त्यांनी बळकावलाही असेल
पण युगावर मालकी असणाऱ्यांनी याची फार तमा बाळगू नये
अंधारुन आल्यात दाही दिशी,
म्हणून तू घाबरु नकोस,
उजेड पेरणाऱ्या मशाली अद्यापही कुणाच्याच गुलाम नाहीत.
शेवटाकडे जाताना.....
केशवसुतांना आपण नवकवितेचे जनक म्हणतो. त्यांच्या कवितांवर टीका झाली. मात्र, मराठी कवितेने तेव्हापासून यू-टर्न घेतला नाही आणि आरशातून मागे डोकावूनही पाहिल नाही. नवकविता फुलत गेली, ती अद्यापही तशीच फुलतेय. बालकवी, भा रा तांबे, विंदा, मर्ढेकर, ढसाळ इत्यादी सर्वांनी केशवसुतांनी बांधलेल्या नवकवितेच्या पायावर इमले उभारले. कविता एका मोठ्या उंचीवर नेली. त्याच नवकवितेच्या इमारतीवर मला सुशीलकुमार शिंदेंसारखा तरुण कवी दिसतो. धडपडत असतो. इमारतीची उंची आणखी वाढवण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी...
शहराची व्यथा आणि कथा मांडणारा सुशीलकुमार नवकवितेच्या वारीतला वारकरी आहे. काळजाला भिडणाऱ्या कविता, प्रत्येक ओळीतून सांगितेली व्यथा, शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्याची कथा...... म्हणजे हा कवितासंग्रह. वाचायलाच पाहिजे असं नाही. पण वाचलंत नाहीत, तर संवेदनशील मनाची जी भूक असते, तिला उपाशी राहाल.
संबंधित ब्लॉग :
बुकशेल्फ : लेनिन, यशवंतराव आणि जॉन रीड्सचं पुस्तक
बुकशेल्फ : माझ्या आईची गोष्ट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement