एक्स्प्लोर
BLOG | 'कोरोना' के आगे जीत है!
आम्हाला जेवण आणून देणारे तिथले कर्मचारीही कोरोना पेशंट आहोत म्हणून कुठेही वेगळी वागणूक न देता त्यांचं काम चोख पार पाडत होते. डॉक्टरांच्या बोलण्यात कधीच कंटाळा नव्हता. प्रत्येक रुग्णाची शंका ते न थकता, न कंटाळता दूर करत होते.

गेले काही दिवस आपण सगळेच एका भीतीच्या छायेत जगतोय. ही भीती आहे अर्थातच कोरानाची. आपल्याला, आपल्या कुटुंबाला त्याचा संसर्ग झाला तर काय होईल याची भीती. तो झालाच तर आपण यातून वाचू ना याची भीती. पण, आता मला यापैकी कशाचीच भीती नाहीये. कारण, याचा अनुभव मी घेतलाय आणि त्यातून सुखरूप बाहेरही आलीये. माझा हाच अनुभव तुमच्याशी शेअर करतीये.
काही दिवसांपूर्वी अचानक माझा घसा दुखायला लागला. दुसऱ्या दिवशी ताप आला. अक्षयलाही दोन दिवसांपूर्वी ताप, खोकला होता. त्यामुळे, मनात थोडी फार शंका आली. दोघंही औषध घेत होतो. अक्षयला तर डॉक्टरांनी सांगितलं की तू एकदम फीट आहेस. हा साधा व्हायरल ताप आहे. त्यानंतर आम्हा दोघांनाही प्रचंड थकवा आला. उठून घरातलं काही कामही करवेना एवढा थकवा. हे काहीतरी वेगळं सिरीयस आहे असं दोघांनाही कळून चुकलं. आम्ही तातडीनं कोविड १९ ची टेस्ट करुन घेतली.
टेस्ट केल्यानंतर रात्रभर झोप आली नाही. काय होईल याची खूप भीती वाटत होती. एवढी भीती आजपर्यंत कुठल्याही परीक्षेच्या निकालाचीही वाटली नव्हती. आमच्यापैकी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर? मग, दुसऱ्याचं काय होईल? मग क्वारंटाईन कुठे करतील? हॉस्पिटलला नेतील का? मग एकट्याला होम क्वारंटाईन राहावं लागलं तर कसं राहणार? अशा अनेक प्रश्नांनी, विचारांनी डोक्याचा भुगा झाला होता. दोघांच्याही घरी टेस्ट केल्याची कल्पना देऊन ठेवली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी जर कुठे क्वारंटाईन व्हावं लागलंच तर लागणाऱ्या वस्तू, कपडे, पुस्तकं सगळं काढून ठेवलं. फोन वाजला तरी धडकी भरत होती. अखेर दुपारी अक्षयला फोन आला. दोघांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचं कळालं. दोन मिनिटं स्तब्ध झालो आणि ठरवलं आता रिझल्ट तर लागलाय. जे होईल त्याला सामोरं जाऊया.
दोघांनीही पटकन आमचे रिपोर्टर मित्र, एचआरला फोन केले. जवळचं चांगलं क्वारंटाईन सेंटर मिळण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न सुरु केले. विलेपार्लेतल्या हॉटेलमध्ये क्वारंटाईन सेंटरला जायचं ठरलं. महापालिकेच्या गाडीनं हॉटेलमध्ये पोहोचलो. गाडीतून उतरताच आम्हाला आवश्यक साबण, टूथपेस्ट अशा वस्तू देण्यात आल्या आणि रुम नंबर सांगण्यात आला. आता ही रुमच पुढचे 10 दिवस आमच्यासाठी घरासारखी होती. हॉटेलमध्ये पोहचल्यावर आम्ही दोघांनी मन घट्ट करुन आईला फोन लावून रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं सांगितलं. माझी आई तर रडायलाच लागली. मुंबईत आम्ही दोघंच राहतोय. आई- बाबा गावाला. आधीच कोरोनामुळे गेले काही महिने तिला आमची जास्तच काळजी वाटत होती. हा तर तिच्यासाठी मोठा धक्काच होता. सासूबाईंनी मात्र मोठ्या खंबीरपणे आणि शांतपणे ही परिस्थिती हाताळली. आईला फोन करून त्यांनीच दिलासा दिला. त्या दिवसापासून वेळेवर जेवण, नाष्टा, डॉक्टरांकडून दिवसातून दोन वेळा तपासणी, औषधं, वाफ घेणे, गरम पाणी, फळं खाणं, भरपूर झोप घेणं असं आमचं रुटीन सुरू झालं. पहिले पाच दिवस आम्हाला हायड्रोक्सिक्लोरोक्विन, व्हिटॅमिन सी आणि झिंक अशी काही औषधं देण्यात आली. पुढचे पाच दिवस कोणतंही औषधं न देता डॉक्टर आमच्या तब्येतीवर लक्ष ठेवून होते.
आम्ही दोघं असल्यानं एकट्यानं दहा दिवसांत काय करायचं असा प्रश्न पडला नाही किंवा कंटाळा आला नाही. सगळ्या मित्र मैत्रिणींचे, घरच्यांचे काळजीपोटी फोन येतच होते. त्याशिवाय पुस्तक वाचणं, वेब सिरीज पाहणं यात वेळ जात होता. कोरोना बाबतच्या बातम्या पाहणं मात्र आम्ही कटाक्षानं टाळलं. या काळात मित्रमंडळी आम्हाला लागणाऱ्या गोष्टी, फळं सगळं नीट आणून देत होते. काहीही लागलं तर सांगा लगेच आणून देतो, असं हक्कानं सांगत होते. त्यामुळे, मुंबईत घरचं कोणीच नाहीये याची अजिबात उणीव भासली नाही.
टेस्टचा रिपोर्ट आल्यावर सगळ्यात जास्त टेन्शन सोसायटीचं होतं. कारण, आमच्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागणार होता. दुसऱ्या दिवशी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी येऊन आमचा मजला सील केला आणि शेजारच्या नागरिकांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारले. पण, असं असूनही शेजाऱ्यांनी पूर्ण सहकार्य केलं. कोणीही कसलीच तक्रार केली नाही. उलट आम्ही डिस्चार्ज मिळून घरी आल्यावर आमचं औक्षण करुन, टाळया वाजवून स्वागत केलं. हे आमच्यासाठी अनपेक्षितच होतं.
या काळात आम्ही सगळ्यात कृतज्ञ आहोत ते आमच्यावर उपचार करणारे डॉक्टर आणि पालिकेच्या सगळ्या कर्मचाऱ्यांचे. एवढ्या उकाड्यात पीपीई कीट घालून, जीव धोक्यात घालून हे सगळेजण आमची काळजी घेत होते. आम्हाला जेवण आणून देणारे तिथले कर्मचारीही कोरोना पेशंट आहोत म्हणून कुठेही वेगळी वागणूक न देता त्यांचं काम चोख पार पाडत होते. हॉटेलमध्ये अनेक पेशंट होते. पण, डॉक्टरांच्या बोलण्यात कधीच कंटाळा नव्हता. प्रत्येक रुग्णाची शंका ते न थकता, न कंटाळता दूर करत होते. इतकंच नाही तर या कालावधीत पालिकेकडून आमची चोकशी करण्यासाठी 3-4 वेळा फोन आले. फोनवरची व्यक्ती आपुलकीनं आमच्या तब्येतीची चौकशी करत होती. या सगळ्यांच्या या अथक सेवेमुळेच आतापर्यंत अनेक रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतलेत.
या काळात काही गोष्टी आवर्जून जाणवल्या. जर ताप, खोकला अशी लक्षणं आढळली तर त्यांना गांभीर्यानं घ्या आणि लगेच उपचार सुरू करा. या परिस्थितीत रडत न बसता डॉक्टरांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टींचं कटाक्षानं पालन करा. मन प्रसन्न, पॉझिटिव्ह राहिल अशा गोष्टी करा. मग अवघ्या जगाला वेठीस धरलेल्या आजारातून कुणालाही बाहेर येणं अशक्य नाहीये.
View More
























