BLOG: श्रीसदस्यांचा बळी, सत्ताधारी - विरोधकांची अळीमिळी गुपचिळी
नवी मुंबई : ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. ना भुतो ना भविष्यती केलेल्या या सोहळ्याला गालबोट लागले ते याठिकाणी झालेल्या दुर्घटनेत 14 जणांचा बळी गेल्यामुळे. खरंतर आत्तापर्यंत झालेले 14 जणांचे मृत्यू नेमके कशामुळे झाले हा संशोधनाचा विषय असला तरी सध्या सरकारच्यावतीने या सर्वांचा मृत्यू हा उष्माघाताने झाला आहे असं सांगण्यात येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पनवेल येथे असलेल्या एमजीएम रुग्णालयाला भेट दिली आणि या घटनेत जखमी झालेल्यांची चौकशी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी अजूनही 71 जण उपचार घेत असल्याचं स्पष्ट केलं. शिवाय मृतांच्या आकड्याबाबत देखील संशय निर्माण केला. खरंतर या कार्यक्रमाची भव्य-दिव्यता पाहता या कार्यक्रमाला करोडो रुपयांचा खर्च करण्यात आल्याचं स्पष्ट आहे. मात्र एबीपी माझाला जी या पुरस्कार सोहळ्यासाठी टेंडर काढण्यात आले होते त्याची कॉपी मिळाली असून तब्बल 14 कोटी रुपयांचा खर्च शासनाच्या वतीने देण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात त्यापेक्षा कित्येक पट अधिक खर्च या सोहळ्यासाठी करण्यात आला. दुर्दैवाची बाब म्हणजे केवळ नियोजनाच्या अभावामुळे आत्तापर्यंत 14 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या कामाठे येथील एमजीएम रुग्णालयात काहीजण तर वाशी येथील खाजगी रुग्णालयात काहीजण उपचार घेत असल्याची माहिती आहे. परंतु आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दावा केलेल्या व्हिडीओमध्ये मृतांची संख्या जास्त दिसत असून सरकार आकडेवारी लपवत आहे की काय अशा प्रकारची शंका निर्माण झाली आहे.
एक मृत्यू उष्माघाताने तर इतर मृतांच्या अंगावर जखमांचे व्रण?
खारघर येथील सेंट्रल पार्क येथे रविवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना प्रदान करण्यात आला आणि त्यानंतर झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. खारघऱ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सेंट्रल पार्क येथील मैदानात अंबराई नावाच्या भागात चेंगराचेंगरीची घटना घडली आणि त्याच ठिकाणी अनेकांचा जीव गेला अशी माहिती एबीपी माझाला खारघर पोलीस ठाण्यातील विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सुत्रांच्या माहितीनुसार एमजीएम रुग्णालय पनवेल येथे मृतपाय लोकांना दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार चेंगराचेंगरीमुळे अनेकांच्या अंगावर जखमा होत्या. परंतु डॉक्टरांना उष्माघातामुळे मृत्यूची नोंद करण्याची जबरदस्ती करण्यात आली आणि त्यामुळेच मृतांची नोंद उष्माघाताने मृत्यू अशी करण्यात आली. प्रत्यक्षात विरारच्या बामनपाडा परिसरात राहणाऱ्या स्वप्नील केणी या 30 वर्षीय युवकाचा उष्माघाताने मृत्यू झाला हा अपवाद सोडला तर इतरांच्या अंगावर जखमांचे व्रण स्पष्ट दिसत होते.
प्रशासनाने जाहीर केलेली मृतांची नावे
दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये राज्यातील विविध भागातील 14जणांचा समावेश आहे. यामध्ये समोर आलेली नावे पुढीलप्रमाणे
महेश नारायण गायकर (42) वडाळा मुंबई, जयश्री जगन्नाथ पाटील (54) म्हसळा रायगड, मंजुषा कृष्णा भोंबंडे (51) गिरगाव मुंबई, स्वप्नील सदाशिव केणी (30) शिरसाट बामन पाडा विरार, तुळशीराम भाऊ वांगड (58) जव्हार पालघर, कलावती सिद्धराम वायचळ (46) सोलापूर, भीमा कृष्णा साळवी (58) कळवा ठाणे, सविता संजय पवार (42) मुंबई, पुष्पा मदन गायकर (64) कळवा ठाणे, वंदना जगन्नाथ पाटील (62) करंजाडे पनवेल, मीनाक्षी मिस्त्री (58) वसई, गुलाब बबन पाटील (56) विरार, विनायक हळदणकर (55) कल्याण
मृत्यूचं कारण सांगण्यास कुटुंबियांचा नकार
एबीपी माझाला विश्वसनीय सुत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार विरारचा रहिवासी असलेला तीस वर्षीय स्वप्नील केणी याचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. याचीच खातरजमा करण्यासाठी एबीपी माझाची टीम स्वप्नील केणी राहत असलेल्या विरारच्या शिरसाटफाटा येथील भामटपाडा गावात पोहोचली असता निदर्शास जी बाब आली ती अशी होती की, स्वप्नील केणीच्या कुटुंबियांनी या सगळ्या घटनेबाबत तसेच स्वप्नीलच्या मृत्यूबाबत बोलण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला तसेच त्याच्या मृत्यूबाबत आम्हाला माध्यमांशी काहीही बोलायचं नसल्याचं स्पष्ट केलं. या संपूर्ण घटनेबाबत बोलताना स्वप्नीलची आत्त्या कमल केणी म्हणाल्या की स्वप्नीलला कसलाही आजार नव्हता. आम्ही रविवारी पहाटे 4 वाजता खारघरला जाण्यासाठी निघालो. त्यादिवशी मैदानात प्रचंड गर्दी होती. आमच्यासाठी आप्पासाहेब स्वारींची आज्ञा खूप महत्त्वाची होती. आम्हाला सांगण्यात आलं होतं की बस, ट्रेन किंवा मिळेल त्या वाहनाने कार्यक्रमस्थळी पोहोचा. त्यानुसार आम्ही सर्वजण कार्यक्रमस्थळी पोहोचलो. स्वप्नील देखील सकाळी ठणठणीत होता. यापेक्षा जास्त माहिती मी देऊ शकत नाही.
सदर दुर्घटनेत कल्याण येथील विनायक हळदणकर या वृद्धाचा मृत्यू झाला. ज्यावेळी हळदणकर कुटुंबियांशी एबीपी माझाच्या प्रतिनिधीने बातचीत करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी सदर कुटुंबाने आपली कोणतीच तक्रार नसल्याचं म्हटलं. आम्हाला आप्पासाहेब धर्माधिकारी यांची माध्यमांशी आपण बोलू नये अशी आज्ञा आली आहे. जर आम्ही आज्ञेचं पालन केलं नाही तर उद्या आम्हाला समर्थांच्या बैठकीसाठी यायला बंदी घालण्यात येईल. त्यामुळे आम्ही यावर बोलणार नाही. किंबहुना आपण याठिकाणी येऊ नये ही आमची नम्र विनंती आहे.
सोलापूर शहरातील तोडकरी वस्ती येथील रहिवासी असलेल्या कलावती सिद्राम वायचळ या 42 वर्षीय महिलेचा याच कार्यक्रमात मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचं नेमकं काय कारण होतं याची माहिती घेण्यासाठी आमच्या टीमने वायचळ कुटुंबियांशी संपर्क साधला असता कुटुंबियांनी मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत आपण बोलणार नसल्याची भूमिक घेतली. मागील 15 वर्षांपासून वायचळ कुटुंबिय आपल्या संपूर्ण कुटुंबियांसह बैठकीला जातात. कलावती वायचळ यांचे पती एका दुकानात सुरक्षारक्षक म्हणून काम करतात तर त्याचा मोठा मुलगा रमेश हा एमआयडीसीत कामाला आहे. लहान मुलगा एका कपड्याच्या दुकानात काम करतो. अचानक ओढवलेल्या दुर्दैवी प्रसंगामुळे वायचळ कुटुंबिय व्यथित असल्याचं पाहायला मिळत आहेत मात्र मृत्यूचं कारण काय याबाबत बोलण्यास मात्र तयार नाहीत.
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा शहरातील सुनीता संजय पवार या 42 वर्षीय गृहिणीचा मृत्यू झाला. सुनीता पवार या लग्नानंतर मुंबईत राहत होत्या. पवार कुटुंबातील सुनीता या केवळ समर्थांच्या बैठकीसाठी जात असल्यामुळे नेमकं त्यांच्याबाबत काय झालं याची माहिती रात्री उशीरापर्यंत पवार कुटुंबियांना मिळाली नव्हती. सुनीता पवार यांच्या पतीचे चार वर्षापूर्वी निधन झालं आहे. आता सुनीता यांचं देखील निधन झाल्यामुळे पवार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पाठीमागे एक मुलगा आणि एक मुलगी आहे. रविवारी सुनीता पवार घरी न आल्यामुळे त्यांचे दीर सत्यवान पवार यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली असता सुनीता यांची बॅग आणि मोबाईल सत्यवान यांना मिळाला. बराचवेळ शोध घेऊन देखील माहिती न मिळाल्याने अखेर सत्यवान यांनी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी धाव घेतली. यावेळी खारघर पोलीस ठाण्याकडून सुनीता यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. याबाबत बोलताना सत्यवान पवार म्हणाले की, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे माझ्या वहिनीचा मृत्यू झाला. आमच्या घरात केवळ सुनीता पवार या बैठकीला जात होत्या. त्यामुळे त्यांचा मृत्यू उष्माघातामुळे झाला की चेंगराचेंगरीमुळे झाला याची माहिती मिळू शकली नाही.
समर्थांच्या बैठकीत आज्ञेला प्रचंड महत्त्व
राज्यभरात किंबहुना देशभरात समर्थांच्या बैठकीला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या बैठकीत आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या आज्ञेला प्रचंड महत्त्व आहे. त्यामुळे एखादा राजकीय पक्ष एकत्र करु शकत नाही एवढी मोठी गर्दी केवळ आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या आज्ञेनुसार महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्या आज्ञेचा परिणाम म्हणा ज्यादिवशी चेंगराचेंगरीची घटना घडली त्याच्या अवघ्या काही तासांत आप्पास्वारी यांची आपल्या श्रीसदस्यांसाठी आज्ञा आली आणि सोशल मीडियात व्हायरल झालेले सर्व व्हिडीओ फोटो तसेच मेसेजेस डिलीट मारण्यासाठी सांगण्यात आले. याबाबत बोलताना सातारा जिल्ह्यातील एका खेड्यातून 300 किलोमीटर दूर खारघरला कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेला श्रीसदस्य सांगत होता की, खारघरमध्ये घडलेल्या दुर्घटनेबाबत सध्या माध्यमांमधून चुकीच्या पद्धतीने वार्तांकन सुरु आहे त्यामुळे यावर कोणीही विश्वास ठेवू नये. तसेच ज्यांच्या घरातील व्यक्ती मृत झाली आहे त्यांनी देखील सध्या माध्यमांशी या विषयावर बोलू नये. सदर घटनेबाबत आप्पासाहेब धर्माधिकारी यांना तीव्र दुःख झालं असून आम्ही देखील सदर कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत.
प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं काय?
ज्या अंबराई भागात चेंगराचेंगरीची घटना घडली अशी चर्चा आहे याची खातरजमा करण्यासाठी ज्यावेळी एबीपी माझाची टीम अंबराई या भागात पोहोचली त्यावेळी याठिकाणी अंबराईची राखण करणाऱ्या दिलीप कातकरी या 40 वर्षीय व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार रविवारी महाराष्ट्रभूषण सोहळ्यासाठी याच अंबराईत कार्यक्रमासाठी आलेल्या श्रीसदस्यांना त्रास झाल्यास त्यांच्यावर उपचार करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यादिवशी याच ठिकाणी चेंगराचेंगरीची घटना घडली अशी मला देखील माहिती मिळाली. याठिकाणी अॅम्ब्युलन्स उपस्थित होत्या इथून थेट समोर असणाऱ्या टाटा कॅन्सर येथे जखमींना नेण्यात आले. किती लोक जखमी झाली याची माहिती नाही परंतु इथेच घटना घडली हे मात्र नक्की आहे.
यानंतर आमची टीम टाटा रुग्णालयात नेमकी कार्यक्रमाच्या दिवशी काय परिस्थिती घडली याची माहिती घेण्यासाठी पोहोचली असता याठिकाणी असणारे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत भट यांनी भेट देणं टाळलं तसेच आपल्या कर्मचाऱ्यामार्फत आपल्याला काहीच माहिती नसल्याचा संदेश आमच्यापर्यंत पोहोचवला. यानंतर याच रुग्णालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार चेंगराचेंगरीची घटना घडली की नाही याबाबत आम्हाला माहिती नाही कारण आपण स्वतः त्यावेळी रिसेप्शनला हजर होतो. अचानक सलग आठ ते दहा अॅम्ब्युलन्स रुग्णालयात दाखल झाल्या आणि त्यांनी अगदी धावपळीत रुग्णांना आमच्या आपत्कालीन कक्षात नेलं. ज्याप्रकारची माहिती मला मिळाली त्यानुसार 10 जणांना आमच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यातील आठ जणांचा रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच मृत्यू झाला असावा. रुग्णालयातून दोघांना उपचार करुन काही कालावधीनंतर सोडून देण्यात आले आहे.
यानंतर एबीपी माझाच्या टीमने सेंट्रल पार्क परिसरात राहणाऱ्या नागरिकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्थानिक रहिवासी पंडित भोईर म्हणाले की, चेंगराचेंगरी झाली ती अंबराई या भागात झाली. त्यादिवशी अनेक अॅम्ब्युलन्स याठिकाणी वेगाने जात होत्या. एकमेकांच्या अंगावर पडल्यामुळे जास्त चेंगराचेंगरी झाली असावी अशी माहिती आमची काही मुलं टाटा रुग्णालयात काम करतात ते सांगत होते. या कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी देखील अंगावर स्क्रीन पडल्यामुळे दोघे जण जखमी झाले होते. त्यांचा मृत्यू झाला आहे अशी देखील माहिती ऐकायला मिळाली. ज्या दिवशी कार्यक्रम होता त्याच्या आदल्या दिवशी 5 जेसीबीच्या माध्यमातून आमची 10 घरं पाडण्यात आली. आम्हाला एका खोलीतून अडीच हजार रुपये भाडं मिळतं होतं. शिवाय आमच्या शेतात वांगी, टोमॅटो, वाल, दुधी भोपळा लावण्यात आला होता यातून आम्हाला दिवसाला 600 ते 700 रुपये मिळत होते. आता मात्र आमचं उत्पन्नाचं साधन बंद झालं आहे. आमची भरपाई कोण करणार याचं उत्तर सरकारने द्यावं असं पंडित भोईर यांच्या पत्नी पार्वती भोईर म्हणाल्या.
शवविच्छेदन अहवालात काय लिहिलं आहे?
खारघर दुर्घटनेतील 14 पैकी 12 जणांच्या पोटात अन्नाचा एक कणही नसल्याचं अहवालात समोर आलं आहे. मृत्यूपूर्वी किमान 6 ते 7 तास त्यांनी काहीही खाल्लेलं नव्हतं. इतर दोघांच्या रिपोर्टनुसार त्यांनी काही खाल्लं होतं किंवा नाही यांसदर्भात स्पष्टता येऊ शकलेली नाही. शिवाय त्यांनी पाणीही अत्यंत कमी किंवा अजिबात न पिल्याचंही अहवालातून स्पष्ट झालं आहे. यातील काही जणांना पूर्वव्याधी होत्या. एकाला हृदयाशी संबंधित आजार होता. अशा व्यक्तीला डिहायड्रेशनचा त्रास अधिक होऊ शकतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. शिवाय मधुमेहाचा त्रास असणाऱ्यांनाही अशा परिस्थितीचा अधिक त्रास होतो. सदर सर्व जण 40 अंश सेल्सियस तापमानात न खाता पिता बसले होते.
पाच दिवस उलटून देखील कारवाई कोणावरच नाही?
खारघर येथे दुर्घटना घडून आता 5 दिवस उलटले तरी अद्याप या प्रकरणी कोणावरही कारवाई झालेली नाही. सध्या केवळ रविवारी निर्माण झालेल्या नैसर्गिक स्थितीमुळे मृत्यू झाल्याची चर्चा समोर येत आहे. परंतु या कार्यक्रमात समोर आलेला प्रशासनाचा ढिसाळ कारभार यावर बोलण्यास मात्र कोणीही तयार नाही. एबीपी माझाने सदर स्थळाची पाहणी केली असता निदर्शनास आलेल्या बाबी
1) भर उन्हात घेतलेल्या कार्यक्रमासाठी मंडप व्यवस्था करण्यात आलेली नव्हती त्यामुळे उन्हाचा त्रास प्रचंड प्रमाणात आलेल्या श्रीसदस्यांना जाणवला
2) कार्यक्रमस्थळापासून गाड्यांसाठी तयार करण्यात आलेलं पार्किंगचं ठिकाणी साडे चार किलोमीटर असल्यामुळे सकाळी 8 पासून मैदानात बसलेल्या श्रीसदस्यांना कार्यक्रम संपल्यानंतर दुपारच्या उन्हात 2 वाजता कार्यक्रमस्थळापासून चालत चार जाण्याची वेळ आली. यामध्ये पोटात अन्न नसणं तसेच पाणी न मिळाल्यामुळे अनेकांना डिहायड्रेशनचा त्रास जाणवला
3) श्रीसदस्यांना पाणी आणि नैसर्गिक विधीसाठी जाण्यासाठी तयार करण्यात आलेली व्यवस्था अडीच किलोमीटर दूर करण्यात आली होती. त्यामुळे उन्हाचा त्रास होत असला तरी याठिकाणी भर उन्हात जाणं आणि पुन्हा याठिकाणी माघारी येणं श्रीसदस्यांसाठी जिकरीचं झालं होतं.
विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या या मागणीला खासदार संजय राऊत, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन समर्थन दिलं आहे तर दुसरीकडे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील संपूर्ण प्रकरणी प्रशासन जबाबदार असून जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्यावतीने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागणी केली असून काँग्रेस राज्यभरात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी या विषयाच्या अनुषंगाने 4 एप्रिलला पत्रकार परिषदा घेऊन मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरणार आहे. यासोबतच नाना पटोले यांनी राज्यपाल रमेश बैस यांना पत्र लिहून 2 दिवसीय विधीमंडळाच्या अधिवेशनाची मागणी केली आहे.
याबाबत बोलताना राजकीय विश्लेषक अभय देशपांडे म्हणाले की, या संपूर्ण प्रकरणी सरकारकडून कारवाई करण्यासाठी उशीर होत आहे. खरंतर नुकतीच जी एक सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे ती आधीच नेमणं गरजेचं होतं परंतु घटना उलटून पाच दिवस झाले तरी सरकारच्यावतीने कोणतीही हालचाल झाली नसल्याचं पाहिला मिळालं. विरोधक देखील धर्माधिकारी कुटुंबियांचा भक्तवर्ग पाहता हळूहळू पाऊले टाकताना पाहिला मिळत आहे. यातील महत्त्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावतीने 20 लाख मतदार आमच्यासोबत असल्याचा दाखवून देण्याचा प्रयत्न झाला मात्र दुर्घटनेमुळे हा प्रयोग फसल्याचं निदर्शनास येत आहे. सध्या ठाकरेंची लाट असून या लाटेचा आम्हाला काहीच फटका बसणार नाही हे दाखवत असताना खारघर दुर्घटनेमुळे हा डाव अंगलट आल्याचं पाहायला मिळत आहे. सरकारच्यावतीने लवकर उपाययोजना करण्यात आल्या असत्या तर नक्कीच सरकारची नाचक्की झाली नसती. परंतु आता हा मुद्दा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या राजीनाम्यापर्यंत येऊन पोहोचला आहे.