एक्स्प्लोर
Advertisement
घुमक्कडी : (१८) : जिवंत होणारी चित्रं
सारसांच्या लोककथा शोधताना काही सुंदर गोष्टी सापडल्या. त्यातली एक सारस आणि पाणमांजर यांची आहे. एकदा स्थलांतराची वेळ झाली तरी सारसाच्या एका पिलाला अजून उडता येत नव्हतं; म्हणून सारसआईने एका पाणमांजराला विनंती केली की, “आम्ही परत येईपर्यंत तू माझ्या पिलाला सांभाळशील का?”
पाणमांजराने होकार दिला. सारे सारस निघून गेले, सारसपिलू एकटेच मागे राहिले. पाणमांजराने पिलाला आपल्या उबदार घरात नेले. पण एकेदिवशी ओस्नी म्हणजे अजस्त्र अशी बर्फाळ चक्रीवादळाची थंडीलाट आली आणि तिने पाणमांजराला ठार मारून पिलाला पळवून नेऊन कोंडून उपाशी ठेवले. तिथल्या आगीने पिलाचे पंख भाजून कोळपले; तेव्हापासून सारसांचे पंख करडे – तपकिरी बनले. काही काळाने दक्षिणेकडचे वातावरण उबदार बनू लागले. तिथं पहिला सूर्यकिरण आला. त्याला पिलाने सारी हकीकत सांगून आपल्या आईला निरोप पाठवला. वसंतऋतू आला तेव्हा पिलूसारस आईला सारख्या हाका मारू लागला. ते पाहून ओस्नी म्हणाली, “मी तर तुझी आजी आहे, माझ्याजवळ ये.” पण पिलाने आता तिच्याकडे लक्ष दिलं नाही, ते अजूनच सैरभैर धावत मोठमोठ्याने रडूओरडू लागलं. ओस्नी त्याला पकडायला धावली, तेवढ्यात आभाळात जोरात वीज कडाडली आणि त्या विजेने ओस्नीचे तुकडेतुकडे करून टाकले. नंतर जेव्हा सारसआई परत आली, तेव्हा आपल्या पिलाची दशा पाहून तिला पाणमांजराचा संताप आला. पण पिलाने आईला सारी हकीकत सांगितली. सारसआईने तेव्हापासून सर्व पाणमांजराना वरदान दिले की, “कितीही मोठी वादळे येवोत, ओस्नी तुम्हाला कधीच मारू शकणार नाही!”
तेव्हापासून पाणमांजरे प्रचंड थंडीतही जिवंत राहू लागली आणि सारसांशी त्यांची मैत्री अबाधित राहिली.
सारसांविषयी सर्वाधिक लोककथा जपानमध्ये आढळतात. त्यातल्या सारसपत्नीची लोककथा लोकप्रिय आहेच. त्याहूनही भुरळ घालते ती हजार कागदी सारस बनवू इच्छिणाऱ्या सदाकोची कथा! दुसऱ्या महायुद्धात हिरोशिमावर अणुबॉम्बहल्ला झाला, त्यानंतर किरणोत्सर्गामुळे रक्ताचा कर्करोग झालेली ही चोवीस वर्षांची तरुणी ओरिगामीचे हजार कागदी सारस बनवायचं ठरवते; पण ६४४ सारस बनवून मृत्यू पावते. तिचा एक पुतळा हिरोशिमामध्ये पाहायला मिळतो.
मला आवडणारी सारसांची अजून एक गोष्ट आहे थिआनची.
थिआन एका निळ्याशार तळ्याकाठी राहायचा. भोवती गर्द हिरवं जंगल. माणसांची दोनचारच घरं होती तिथं. तळ्यावर दरवर्षी मोठ्या संख्येने सारस येत. थिआन त्यांच्यासाठी धान्य राखून ठेवून त्यांच्या पोटापाण्याची काळजी घेई. वर्षानुवर्षे भेटत राहिल्याने मित्रच बनले होते ते. थिआन म्हातारा झाला, तेव्हा त्याला वाटलं की एकदा शहर कसं असतं, तिथली माणसं पाहुणचार कसा करतात, ते पाहून यावं. सारस परत निघाले की त्यांच्यासोबत निघावं असं त्याने ठरवलं. त्याप्रमाणे तो शहरात पोहोचला. मोठाली श्रीमंत घरं, त्यांची बंद दारं, झगमगती हॉटेल्स आणि प्रशस्त रस्ते. रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका भिकाऱ्याला आपले चांगले कपडे देऊन त्याचे फाटके कपडे आपण परिधान केले आणि शहरात एक फाटका माणूस बनून भटकायला सुरुवात केली. तीन दिवस कुणीही त्याची विचारपूस केली नाही, त्याला काही खायला दिलं नाही. चौथ्या दिवशी मात्र जरा आडभागात असलेल्या एका हॉटेलमालकाने त्याला जेवू घातलं आणि त्याला पैसेही मागितले नाही. काही दिवस थिआन रोज त्याच्याकडे जाऊन जेवत राहिला, तेव्हाही त्याने त्याचं स्वागतच केलं. तिथं फारशी गिऱ्हाईकं येत नव्हती आणि धंदा नीट चालत नाही म्हणून मालक काळजीत होता, हे थिआनच्या ध्यानात आलं. मग त्यानं तीन सारसांचं एक सुंदर चित्र काढलं. आपल्या सारसमित्रांना डोळे मिटून आवाहन केलं. मग तो त्या चित्रासमोर उभं राहून गाऊ लागताच सारसांनी नृत्य करण्यास सुरुवात केली. चित्रातले सारस नाचतात ही बातमी शहरात पसरताच त्या हॉटेलमध्ये खूप लोक येऊ लागले. सारसांमुळे तुझी भरभराट होईल, असा त्याला आशीर्वाद देऊन थिआन पुन्हा आपल्या घरी परतला.
या गोष्टीत दोनाच्या जागी तीन सारस का आहेत, याचा मी विचार करत राहिले. कदाचित त्यांच्या नृत्याची परीक्षा पाहून मादी आपल्या नराची निवड करणार असेल!
उज्जयिनीच्या विक्रम राजाने एकदा भर सभेत शनीची टवाळी केली. त्यामुळे त्याच्यावर अनेक संकटं कोसळली, अशी एक कथा आहे. विक्रमाच्या सौंदर्यावर भाळून आपल्या कन्येशी त्याचा परिचय व्हावा, त्याला जावई करून घेता यावे म्हणून त्याला तिच्या दालनात पाठवतो. रात्री निजताना ती आपला रत्नहार खुंटीला अडकवून ठेवते; त्या खुंटीवर हंसाचं चित्र कोरलेलं असतं. तो हंस रत्नहार गिळून टाकतो आणि चोरीचा आळ विक्रमावर येतो. पुढे शनीची अवकृपा संपते तेव्हा रत्नहारदेखील परत मिळतो.
जिवंत होणाऱ्या चित्रांचं काय अप्रुप वाटतं अजूनही... अगदी आता टीव्ही, सिनेमे यांच्यामुळे हालती-बोलती चित्रं रोज दिसत असली आणि थ्रीडीमुळे ती अगदी अंगाखांद्यावर खेळू लागली, तरीही वाटतं.
भारतात राजस्थानात सारसांची संख्या अजून चांगली आहे, तरी मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशात घट होतेय. महाराष्ट्रात मुळातच कमी येणारे सारस जवळपास अदृश्यच झालेत. मध्यप्रदेशाच्या सीमेवरील गोंदियामध्ये ते येत; आता क्वचित इकडे फिरकतात. कीटकनाशकं, विजेच्या तारा, नगदी पिकांमुळे धान्याची कमतरता, दुष्काळ, पाणवठे नष्ट होत जाणं अशी अनेक कारणं आहेत. आपल्याकडचे शेतकरी त्यांना विषात घोळवलेले दाणे खाऊ घालून मारतात. शेतांमधल्या सारसांच्या घरट्यांमधली अंडी पळवून खातात. गोंदियातलं झिलमिली तळं भराव घालून अर्धंअधिक बुजवलंय आणि त्याच्या शेजारच्या विमानतळाने पक्ष्यांचे आवाजही गिळून टाकलेत. केदारनाथ सिंह यांची ‘अकाल में सारस’ नावाची कविता अशी जागोजाग भेटते आहे. तिच्यातल्या म्हातारीने अंगणात वाडग्यात ठेवलेलं पाणी आभाळात फेऱ्या मारून निघून जाणाऱ्या सारसांना दिसत नाही आणि ते शहरापासून दूर निघून जातात... ते वळून पाहतात तेव्हा त्यांच्या नजरेत दया आहे की घृणा माहीत नाही...! कवितेतलं हेच चित्र इथं जिवंत होतं हरसाल.
( चित्रकार आलमेलकर यांनी काढलेले सारसजोडीचे चित्र )
सारसांनी आपल्याइथून निघून जाण्याचं अजून एक कारण आहे; राजस्थानात सारसांच्या जशा लोककथा आहेत, तशा या बाकी ठिकाणी नाहीत; तिथं समाजमानसात दांपत्यप्रेमाचं प्रतीक म्हणून सारसांना स्थान नाही; तिथे सारसांच्या येण्या न येण्याने काही फरक पडत नाही आणि सारसांच्या मृत्यूचाही खेद नाही. लोककथा कितीकाही टिकवतात, वाचवतात आणि जिथं कथा नसतील तिथं पुष्कळ काही नष्ट होत जातं.
‘घुमक्कडी’ ब्लॉग मालिकेतील याआधीचे ब्लॉग :
घुमक्कडी : (१७) : कुरजां ऐ म्हारा भंवर मिला दीजो ऐ
घुमक्कडी (16) : निंदिया सतावे मोहे
घुमक्कडी (15) : बगळ्या बगळ्या कवडी दे
घुमक्कडी : (14) उडणाऱ्या देवदूतांचा महाल!
घुमक्कडी (13) : सांवरे अई जइय्यो जमुना किनारे
घुमक्कडी (12) : आईच्या आधी लेकीला न्हाण आलं हो…!
घुमक्कडी (11) : इज्जत जाईल, पण प्रियकर राहील!
घुमक्कडी (10) : तुमच्या हातात एक फूल दिलं, तर…
घुमक्कडी (9) : सासू-सुनांच्या विहिरी आणि तळी
घुमक्कडी (8) : फूल जंगल मे खिले किन के लिये
घुमक्कडी (7) : हुंकारकुपातले हरिण
घुमक्कडी (6) : वेगळ्या जागेवरून पाहताना
घुमक्कडी (5) : मिठाचा शुभ्र खारट खडा!
घुमक्कडी (4) साता प्रश्नांची कहाणी
घुमक्कडीः (3) न नींद नैना, ना अंग चैना
घुमक्कडी : (2) सीतेची तहान
घुमक्कडी : आभाळाचा कागद, समुद्राची शाई
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement