जिभेचे चोचले : पाणीपुरी – ‘तोंडभर’ आनंद
आवडता पदार्थ कुठला या प्रश्नाची शेकडो उत्तरं असू शकतात, काही गोड, काही आंबट, काही तिखट. पण आंबट, गोड, तिखट, खारट अशा चवींचा एकत्रित स्फोट घ़डवून आणणारा चमचमीत, चटकदार, टेस्टी, माऊथ वॉटरिंग, तोंडाला पाणी सुटणं अशी सगळी विशेषणं लावली तरी कमी पडतात इतका चवदार पदार्थ कुठला??? या प्रश्नाचं मात्र एकच उत्तर आहे..पाणीपुरी..या पाणीपुरीला म्हणायचं काय हे ही गाव, शहर प्रांतानुसार बदलणार, तिखट आंबट पाण्याची चवही बदलणार, पुरीचा आकार, पुरीत भरलं जाणारं सारणही बदलणार, पण त्या चवीची आवड आणि ती पुरी तोंडात गेल्यानंतरचा चवदार आनंद मात्र सगळीकडे आगदी सारखाच..
या पाणीपुरी नावाच्या पदार्थाची प्रत्येक राज्यात, प्रत्येक शहरात आणि प्रत्येक भागात वेगळी खासियत असते आणि गंमत म्हणजे श्रीनगरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक ठिकाणची पाणीपुरी असते मोठी टेस्टी, मग कुठे त्या चटकदार पाण्याला स्थानिक चव जोडली जाते, तर कुठे वेगळ्या प्रकारच्या सारणाने लज्जत वाढवली जाते.. काही ठिकाणी पुऱ्यांचा प्रकारही वेगळा असतो..पाणीपुरीच्या ठिकठिकाणच्या नावातही किती वैविध्य आहे, आपण महाराष्ट्रात पाणीपुरी म्हणतो, पण महाराष्ट्राच्याही काही भागात ‘गुपचुप’ म्हणायची पद्धत आहे..उत्तरेत अनेक ठिकाणी पाणीपुरीला ‘गोलगप्पा’ असं म्हटलं जातं...हरियाणामध्ये ‘पानी के पताशे’, आणि खवय्यांच्या लखनौमध्ये याला ‘पानी के बताशे’ म्हणतात. मध्यप्रदेशात ‘फुलकी’, तर गुजरातच्या काही भागात ‘पकोडी’ असंही पाणीपुरीचं नाव आहे..बंगाल आणि पूर्वैकडल्या राज्यांमधला ‘पुचका’ मात्र जबरदस्तच आणि पुरीचा आकार मोठा असल्याने ही पाणीपुरी नाही असाही बंगाली लोकांचा दावा असतो..गंमत म्हणजे होशंगाबाद हे भारतातलं एकमेव शहर असावं जिथे पाणीपुरीला ‘टिक्की’ असं संबोधलं जातं. जशी पाणीपुरीची नावं अनोखी, तशीच पुरीबरोबरच्या सारणात त्या त्या प्रांताप्रमाणे वैविध्य दिसतं आणि प्रांतच कशाला अगदी शहराशहरातही प्रत्येक पाणीपुरीवाल्याची एक वेगळी रेसिपी असते आणि पुरीत भरण्याचा मसालाही प्रत्येक पाणीपुरीवाल्याचा वेगळा – कुणी उकडलेल्या बटाट्याचं सारण घालतं, कुणी उकडलेले चणे घालतं, काही ठिकाणी कांद्याचीही सारणाला जोड दिली जाते. नागपुरात काही ठिकाणी उकडलेले पांढरे वाटाणे आणि बटाटे टाकले जातात, काही ठिकाणी नुसतीच खारी बुंदी तर मुंबईत वाटाण्याचा गरमागरम रगडा..चटकदार पाण्यातल्या आंबट तिखटाचं प्रमाणही त्या त्या शहरातल्या चवीला साजेसं...तशाच चवीही वेगवेगळ्या..सध्या लोकप्रिय चवींपैकी सर्वात जास्त खाल्ली जाणारी चव आहे ती कोथिंबिर पुदिनाच्या चवीचं पाणी, खजुर इमलीची आंबट गोड चवही पाणीपुरीच्या पाण्याची अगदी युनिव्हर्सल चव, पण या व्यतिरिक्त हाजमोलाच्या चुर्णासारख्या चवीचं, किंवा जलजिराच्या चवीचंही पाणी अनेक ठिकाणी मिळतं. कोथिंबिरीबरोबर लिंबाच्या चवीचं पाणीही लोक चवीनं चाखतात, हिरव्या मिर्चीपेक्षा लाल तिखटाची चव वेगळी त्यामुळे इतर सामुग्रीबरोबर लाल तिखटाच्या चवीचंही पाणी काही ठिकाणची खासियत असते..चाट मसाला म्हणजे खरं तर आमचूर आणि खड्यामिठाचा संगम पण त्या चवीचंही पाणी काही ठिकाणी मिळतं..
अशी तऱ्हेतऱ्हेची पाणीपुरी चाखताना तिचा प्रत्येक चाहता मोठा ‘आ’ वासून पुरी तोंडात घालताना नक्की विचार करतो की असा अफलातून पदार्थ कोणाच्या बरं डोक्यातून आला असेल..ज्या व्यक्तीनं हा पदार्थ शोधला ती व्यक्ती किती कल्पक असली पाहीजे नं..पण खरं सांगायचं तर पाणीपुरी शोधणारी व्यक्ती इतिहासाच्या पानात हरवलीय, कारण थेट मगध साम्राज्याच्या वर्णनामंध्ये त्याकाळच्या प्रवाशांच्या उल्लेखात पाणीपुरी सारखा पदार्थ मिळत असल्याचा उल्लेख आढळतो..मगध देशाची राजधानी पाटलीपुत्रबद्दलची रंजक वर्णनं ग्रीक प्रवासी मॅगेस्थेनिस आणि चिनी अभ्यासकांच्या प्रवासवर्णनांमध्ये आढळतात...त्याच वर्णनांमध्ये ‘फुलकी’ नावाच्या पाणीपुरीसारख्या पदार्थाचाही उल्लेख आहे..त्यामुळे आत्ताच्या बिहारमध्ये आणि तेव्हाच्या मगध देशात पाणीपुरीचा जन्म झाला असं मानलं जातं, अर्थात बंगाल्यांचा दावा आहे की त्यांचा ‘पुचका’ सर्वात जुना आहे आणि बाकी सगळे पाणीपुरीचे प्रकार म्हणजे बंगाली ‘पुचका’ ची कॉपी आहे..पण पाणीपुरीची सगळ्यात भन्नाट जन्मकथा सांगितली जाते ती थेट महाभारतातून..असं सांगितलं जातं की पांडवांशी लग्न झाल्यावर द्रौपदी वनवासात कमीत कमी अन्नधान्यात पाच पांडवांची भूक कशी भागवणार असा प्रश्न कुंतीला पडला..तेव्हा तिने द्रौपदीची परीक्षा घ्यायची ठरवली, उरलेली थोडीशी बटाट्याची भाजी आणि एका पोळीला पुरेल एवढीच कणिक तिने द्रौपदीला दिली..यात पाचही पांडवांचं पोट भर असंही सांगितलं..द्रौपदीने मोठ्या कल्पकतेनी त्या कणकेतून पाच छोट्या छोट्या पुऱ्या केल्या आणि त्यात ती उरलेली बटाट्याची भाजी भरली आणि पाचही पांडवांची भूक भागवली म्हणे.. कुंतीने प्रसन्न होऊन द्रौपदीला आशीर्वाद दिला की तू केलेला हा पदार्थ अजरामर होईल.. खरंच द्रौपदीने पाणीपुरीचा शोध लावला की नाही हे कुणीच सांगु शकत नाही पण पाणीपुरी इतकीच ही कथाही चवदार आणि रंजक आहे एवढं नक्की..
असा हा केवळ भारतातच नाही तर भारतीय उपखंडातही जबरदस्त फेमस असलेला पदार्थ आहे म्हंटल्यावर नामवंत शेफ्सना नवीन प्रयोग करण्यासाठी हा पदार्थ खुणावणारच..म्हणूनच तर पाणीपुरीच्या नवीन चवी आणि पाणीपुरी सर्व्ह करण्याच्या नवनवीन पद्धती आता दिसू लागल्यात..
टेस्टट्यूब पाणीपुरी
मुंबईत स्पाईस क्लबसारख्या मॉलिक्युलर गॅस्ट्रॉनॉमीसाठी प्रसिद्ध असलेल्या रेस्टॉरन्टमध्ये पाणीपुरीचं पाणी येतं ते थेट विज्ञानाच्या प्रयोगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या टेस्टट्युबमधून..तर गोड पाण्यासाठी थेट इंजेक्शनची सिरिंज.इंडिया ब्रिस्ट्रोसारख्या काही ठिकाणी दोन्ही प्रकारच्या पाण्यासाठी मोठी इंजेक्शनची सिरींज वापरली जातात. ते सिरींज थेट पुरीत रिकामं करायचं आणि पुरी तोंडात..
चॉकलेट पाणीपुरी
पुरी फोडून त्यात काहीतरी भरुन खाणं ही संकल्पनाच इतकी भन्नाट आहे की, डेझर्ट शेफ्सनाही त्याची भूरळ पडते..टीव्हीवरील कार्यक्रमांमुळे माहिती असलेलं एक नाव म्हणजे शेफ सारांश गोयला..या शेफचं अंधेरी चार बंगल्याला गोयला बटर चिकन नावाचं रेस्टॉरन्ट आहे, तिथे हा हटके पदार्थ मिळतो.. चॉकलेटपासून तयार केलेली पुरी आणि त्यात आईस्क्रीमचं सारण..आणखी काय हवं डेझर्ट लव्हर्सना.. इतरही काही ठिकाणी हे डेझर्ट मिळतं..त्या त्या शेफच्या कल्पकतेप्रमाणे आतलं सारण बदलतं..
पाणीपुरी मोईतो
मोईतो (याचं स्पेलिंग मात्र मोजितो असं असतं.) हे खरं तर क्युबा नावाच्या देशातलं लोकप्रिय कॉकटेल आहे, रमबरोबर लिंबु आणि पुदिना अशा ताजतवानं करणाऱ्या पाच गोष्टी एकत्र करुन तायर होणारं ड्रिंक.. हे चाखल्यावर एकदम फ्रेश वाटत असल्यानं जगभर हे ड्रिंक चांगलंच लोकप्रिय आहे..हे सगळेच गुणधर्म पाणीपुरीच्या पाण्यात असल्यानं अनेक रेस्टॉरन्टमध्ये मोईतोचं देसी व्हर्जन म्हणून पाणीपुरी मोईतो मिळतं..
चिकन आणि पनीर पाणीपुरी
पाणीपुरीच्या पुरीत आपल्याला हवा तो पदार्थ भरुन भन्नाट डिश तयार होते हे जगभरातल्या शेफ्सना चांगलंच कळलंय..त्यामुळेच कधी पनीरचं सारण भरलं जातं तर कधी चिकनचं..मुंबईतल्या ढिशक्याव नावाच्या एका रेस्टॉरन्टमध्ये अव्हाकॅडो या मेक्सिकन फळाचं सारण आणि चिजबरोबर मेक्सिकन रेड सॉसच्या चवीचं पाणी भरलं जातं..अर्थात चव भन्नाटच..
पाणीपुरी शॉट्स
पंचतारांकीत हॉटेलच्या बुफेपासून अनेक रेस्टॉरन्टमध्ये आजकाल पाणीपुरी शॉट्स ठेवलेले दिसतात..छोट्याछोट्या ग्लासमध्ये आवडीनुसार भरलेलं पाणी आण त्यावर सारण भरलेल्या पुऱ्या..मग ते पाणी व्होडकासारख्या मद्यापासून ते फळांच्या रसांपर्यंत काहीही असू शकतं.. तसंच सारणातही वैविध्य असतं..त्या ग्लासातलं पाणी पुरीत ओतून पुरीचा आस्वाद घ्यायचा असा तो प्रकार..
पाणीपुरी आईस्क्रीम
पाणीपुरी या संकल्पनेतून सर्वात वेगळा पदार्थ तयार झालाय तो म्हणजे पाणीपुरी फ्लेवरचं आईस्क्रीम किंवा सॉर्बै..अप्सरा नावाची आईस्क्रीमची चेन आणि चर्चगेटचं पापाक्रीम या दोनही ठिकाणी अशा चवीचं आईस्क्रीम मिळतं..पाण्याच्या तिखट आंबट चवीचं आईस्क्रीम आणि वर कुस्करलेली कुरकुरीत पुरी.. सोबतीला बटाट्याच्या चवीचं क्रीम..ते ही पुरीच्या आकाराच्या कोनमधून..
मिनरल वॉटर पाणीपुरी
पाणीपुरीच्या चवीला आणि संकल्पनेला मॉडर्न शेफ्सनी त्यांच्या कल्पनाशक्तीच्या जोरावर नवीन रुप दिलं असलं तरी आपली पारंपरिक पाणीपुरीची चवच सर्वांच्या जिभेवर रेंगाळणारी खरी चव आहे यात शंकाच नाही, ती ही रस्त्याच्या कडेच्या गाडीवरची सर्वात चवदार यावरही सगळ्यांचं एकमत असणार..पण पाण्यातून, अस्वच्छतेतून होणाऱ्या आजारांमुळे मनात असतानाही पाणीपुरीच्या चवीकडे पाठ फिरवणाऱ्यांसाठी आजकाल थेट मिनरल वॉटर पाणीपुरी मिळते तीही अनेक गाड्यांवर..
खरं तर प्रसिद्ध पाणीपुरी कोणती म्हंटली की प्रत्येकाची एक वेगळी यादी असते, पण मुंबईत विचार केल्यावर लगेच एल्कोची पाणीपुरी आठवते, तर नागपुरात बजाजनगरची किंवा गुजरात पॉईंटची पाणीपुरी लगेच आठवते..
निखळ आनंद मिळवायला पैसे लागत नाही म्हणतात, तसाच पाणीपुरी हा भारतीय खाद्य संस्कृतीत रुजलेला निखळ आनंदच म्हणायला हवा, फार पैसे लागत नाहीत, अवघड पाककृती नाही, खर्चिक पदार्थांपासून तयार होतं असंही नाही, तरीही तिखट, आंबट, गोड पाणी आणि बटाटे किंवा रगड्याच्या सारणाने भरलेली पुरी तोंडात गेल्यानंतर मिळणारा आनंद मात्र पुरेपूर अगदी शंभर टक्के..