World Cup 2023 : शमीचा 'पंच', कोहलीचा नॉकआऊट पंच, भारताची विजय'पंचमी'
विश्वचषकाचं (World Cup 2023) मैदान. सलग पाचव्यांदा धावांचा यशस्वी पाठलाग. यातले तीन प्रतिस्पर्धी कोण तर ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि आता न्यूझीलंड. गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप. अत्यंत आनंददायी आणि गुदगुल्या करणारा असा हा क्षण रोहितसेनेने आपल्या चाहत्यांना रविवारी दिलाय. पुन्हा एकदा चेसमास्टर कोहलीने नौका तीरावर नेली. स्पर्धेतलं दुसरं आणि वनडेमधलं 49 वं शतक खुणावत होतं. षटकाराने मॅच आणि शतक पूर्ण करण्याचा त्याचा प्रयत्न यावेळी मात्र अधुरा राहिला. याची रुखरुख लागली तरीही एक संघर्षपूर्ण आणि त्याच वेळी यादगार असा विजय आपल्या अकाऊंटवर नोंदवला गेला.
रोहित शर्माने नाणेफेक जिंकून किवींना फलंदाजीला पाचारण केलं. हा जितका त्याचा फलंदाजांवरचा विश्वास होता, तितकाच गोलंदाजांवरचा. पाचच्या पाचही गोलंदाज परफॉर्म करतील, हा त्याचा विश्वास सर्वांनीच सार्थ ठरवला. यावेळी कुलदीप, जडेजांनी थोड्या धावा जास्त दिल्या खऱ्या. पण, त्याचं श्रेय किवी बॅटिंगला द्यायला हवं. त्यांनी फिरकीला खास करुन कुलदीपला सेटल होऊ दिलं नाही. असं असलं तरीही कुलदीपने घेतलेल्या दोन विकेट्स लॅथम आणि फिलिप्सच्या होत्या. भारताच्या वेगवान त्रिकुटाने मात्र इथे कमाल केली. बुमरा धावांच्या बाबतीत नेहमीच कंजूष असतो. आज सिराजनेही त्याच्याकडून हा धडा घेतला. तर, या स्पर्धेत पहिलाच सामना खेळणाऱ्या शमीकडून 50 पार धावा दिल्या गेल्या असल्या तरी त्याने अखेरच्या 10 षटकात जो स्पेल टाकलाय, तो निर्णायक ठरला. म्हणजे 40 षटकांत 219 ला चार अशी स्थिती असताना किवींची एक्स्प्रेस 300 चा स्पीड ओव्हरटेक करेल, असं हे निश्चित वाटत होतं. या स्पर्धेत आतापर्यंतच्या मॅचेसमध्ये मधल्या म्हणजे 10 ते 40 ओव्हर्सदरम्यान आपलं आक्रमण प्रतिस्पर्ध्यांना ब्रेक लावत होतं. यावेळी 10 षटकांत 34 धावा फलकावर असणाऱ्या किवींच्या 40 षटकांत झाल्या होत्या 219 धावा. म्हणजे 10 ते 40 षटकांदरम्यानच्या 30 ओव्हर्समध्ये 185 रन्स त्यांनी चोपून काढलेल्या. याचं मुख्य श्रेय रवींद्र-मिचेल जोडीला जातं. त्यांनी फारशी जोखीम न पत्करता खेळत धावफलक आधी हलता आणि मध्ये मध्ये धावता ठेवत सहाच्या सरासरीकडे धावा नेल्या. डावखुरी-उजवी जोडी असल्याने त्याचाही त्यांना फायदा झाला. हे सगळं घडल्यानेच शमीचं मोल आपल्याला कळतं. कारण, शमीने किवींचे पंख छाटले. त्यामुळे 300 पार जाऊ पाहणाऱ्या मनोऱ्याला वरचे मजले लागलेच नाहीत. आपण 273 वर न्यूझीलंडला रोखलं. शेवटच्या 10 षटकात न्यूझीलंडला केवळ 54 धावाच करता आल्या. त्या शमीच्या तिखट माऱ्यामुळेच.
अराऊंड द विकेट गोलंदाजी करतानाही त्याच्या चेंडूने दिशा, टप्पा सोडला नाही. उलट रचिन रवींद्र आऊट झाल्यावर शमीने लॅथम आणि कंपनीला फार वावच दिला नाही. अर्थात याचा पाया आधी सिराज-बुमरा जोडीने टिच्चून मारा करत उभारून ठेवला. तिथून शमीने बॅटन हाती घेतली आणि विकेट्स घेत काम फत्ते केलं. कसोटीमध्येच नव्हे तर वनडेमध्येही ठराविक अंतराने विकेट्स घेत राहणं किती मौल्यवान असतं, तेच शमीने दाखवून दिलं. एका वेळी 325 किंवा 350 च्या घरात पोहोचण्याचं स्वप्न पाहणाऱ्या किवींनी मग 274 चं आव्हान भारतासमोर ठेवलं. भारताने मॅचवरची निसटू वाटत असलेली पकड शेवटच्या 10 षटकांत परत मिळवली. तरीही भारताच्या फलंदाजीवेळी किवींच्या अत्यंत वेगवान आणि दक्ष क्षेत्ररक्षणामुळे धावा स्वस्तात मिळणार नाहीत, हे नक्की होतं, तसंच झालंही. त्यामुळे 274 चं लक्ष्य तीनशेसारखंच होतं. काही अफलातून टायमिंगचे हमखास चौकाराचे फटके त्यांनी चित्त्यागत सूर मारत रोखले.
भारतीय कर्णधार सलामीवीर रोहित शर्मा या विश्वचषकात आक्रमक गियरमध्येच सुरुवात करतोय, तशीच त्याने इथेही केली. पाहा ना, त्याच्या 40 चेंडूंमधील 46 धावांच्या खेळीत त्याने ठोकले चार चौकार, चार षटकार. म्हणजे 40 धावा अशाच वसूल. त्याने गिलच्या साथीने 70 धावांची किवींना धडकी भरवणारी सलामी दिली. तिथेच किवींच्या हातून मॅच निसटली. पुढे प्रत्येक फलंदाजाने स्टार्ट केला आणि विकेट गेली. गिल, अय्यर आणि राहुल तिघांबद्दलही असंच घडलं. खास करुन श्रेयस अय्यर उतावीळपणा करुन विकेट घालवताना दिसतोय. ऑस्ट्रेलियासोबत तेच, बांगलादेशसोबत तसंच आणि इथेही. आपल्या मागे इशान किशन, जयस्वाल, ऋतुराज गायकवाड किंवा अगदी सूर्यकुमार यादवही अशी तगडी वेटिंग लिस्ट असताना श्रेयसला असे फटके खेळणं परवडणारं नाही. हे त्याने लक्षात ठेवायला हवं. त्यातही त्याच्यासमोर फलंदाजीतला सुपर कम्प्युटर विराट बॅटिंग करत असताना श्रेयस अय्यरची चूक झाली, हे टाळायला हवं. मॅचमध्ये हे घडत असताना दुसरीकडे 'द विराट कोहली' त्याच्या नेहमीच्या शिस्तबद्ध शैलीत होता. म्हणजे कॅलक्युलेटिव्ह इनिंग खेळत. 104 चेंडूंत 95 ही शतकाच्या मोलाचीच इनिंग होती. 49 वं शतक, सचिनच्या वनडे शतकांशी बरोबरी अशा महिरपी या खेळीभोवती लागता लागता राहिल्या. तरीही त्याच्या मैदानातील अखेरपर्यंतच्या प्रेझेन्सने न्यूझीलंडच्या कपाळावरच्या आठ्या कायम राहिलेल्या.
सध्याच्या काळातील फलंदाजांमध्ये कोहली एका वेगळ्याच उंचीवर खेळताना दिसतोय. पाहिजे तेव्हा षटकार, पाहिजे तेव्हा चौकार, पाहिजे तेव्हा गियर स्लो करुन एकेरी-दुहेरी धावा. सध्याची त्याची प्रत्येक इनिंग ही उदयोन्मुख फलंदाजाने अभ्यास म्हणून पाहावी. या स्पर्धेतील पाकचा अपवाद वगळता सर्वच सामन्यात कोहलीनेच हा धावांचा मेरु पर्वत पेललाय. हे एकीकडे सुखावणारं असलं तरी दरवेळी मॅच फिनिशर म्हणून कोहलीवरच अवलंबून न राहता इतरांनीही फिनिशिंग लाईन क्रॉस करण्याची जबाबदारी घ्यायला हवी. खास करुन नॉकआऊट मॅचेसकडे जाताना आपल्याला हे करावं लागेल. या मॅचमध्ये त्याला जडेजाने दिलेली साथही लाखमोलाची. सूर्यकुमार यादव कोहलीसोबत धाव घेताना उडालेल्या गोंधळानंतर रनआऊट झाला. नंतर, किवी टीमला कमबॅकचं दार किलकिलं न होऊ देण्याची जबाबदारी कोहलीच्या साथीने जडेजाकडे होती. त्यानेही पॉझिटिव्ह क्रिकेट खेळत कोहलीसोबत 76 धावांची भागीदारी केली. कोहलीची महानता इथेच दिसते, तो दुसऱ्याच्या रन्स स्वत:च्या रन्स असल्यासारख्या आकांताने धावतो. त्याच्या बॅटिंगमधली सहजता, त्याच्या देहबोलीतला कॉन्फिडन्स दुसऱ्याच्या खेळातला ऑक्सिजन दुप्पट वाढवतो.
जडेजा बिनधास्त आणि डॅशिंग प्लेअर आहेच. इथे कोहलीने त्याच्या आत्मविश्वासाचं मीटर आणखी वाढवलं. या डावखुऱ्या-उजव्या जोडीने पाच बाद 191 वरुन विजयाचा ध्वज हाती धरला. सध्याच्या वर्ल्डकपमधील दोन सर्वात सातत्यपूर्ण खेळ करणाऱ्या टीम्सच्या या संघर्षात रोहितसेनेला विजयाचा टिळा लागला. स्पर्धेतील सर्वोत्तम आक्रमणापैकी एक आणि सर्वोत्तम क्षेत्ररक्षणापैकी एक असलेल्या संघासमोर आपण लक्ष्य गाठून जिंकलोय. त्याचवेळी वनडे वर्ल्डकपमधील न्यूझीलंडविरुद्धचा 2003 पासूनचा 0-5 चा नकोसा विक्रम मोडीत काढला. पराभवाच्या त्या मालिकेलाही आपण ब्रेक लावला. शमीचा पंच, कोहलीचा नॉकआऊट पंच आणि भारताची विजयादशमीआधीच विजयपंचमी साजरी झालीय. आता मिशन इंग्लंडकडे वळूया.