एक्स्प्लोर
Advertisement
दिल्लीदूत : कशी आहे गांधींची अमेठी?
गांधी हा भारतीय राजकारणातला एक ब्रँड आहे. आणि त्याची ताकद, जादू अमेठीवर अजूनही नक्कीच पाहायला मिळते. अमेठीला जे काही मिळालं ते गांधी घराण्यामुळे, अमेठीची ओळखच त्यांनी देशभरात निर्माण केली.
24 नोव्हेंबर 1988 चा दिवस होता. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी अमेठीतल्या जगदीशपूरमधल्या खताच्या कारखान्याचं लोकार्पण करण्यासाठी आले होते. त्यावेळच्या भाषणात त्यांनी सांगितलेल्या दोन गोष्टी 31 वर्षानंतरही अमेठीतल्या बुजुर्गांच्या गप्पांमधे ऐकायला मिळतात. एक म्हणजे दिल्लीहून एक रुपया पाठवल्यावर तुमच्यापर्यंत 15 पैसे पोहचतात, आणि दुसरी म्हणजे, 'कुंटल कुंटल हो गया, किलो-किलो बाकी है.' कुंटल म्हणजे क्विंटल. अमेठीतली मोठी मोठी कामं झालेली आहेत, आता फक्त थोडी किरकोळ कामं उरलेली आहेत हे त्यांना म्हणायचं होतं. ज्या अमेठीच्या विकासाबदद्ल सध्या देशात चर्चा सुरु आहे, त्या अमेठीतल्या कामांबद्दल राजीव गांधींनी इतक्या वर्षांपूर्वी केलेलं हे विधान.
तेव्हाची अमेठी झपाटयानं बदलत होती. जगदीशपूरमध्ये बीएचइएलचं उद्घाटन 1983 ला इंदिराजींनी केलं होतं. पाठोपाठ 86 मध्ये कोरवामध्ये हिंदुस्थान एअरोनॉटिक्सचा प्लांट इथे आला. त्याआधी 1982 मधेच संजय गांधी हॉस्पिटलही आसपासच्या रुग्णांसाठी आधार ठरु लागलं होतं. उत्तर प्रदेशात त्या काळी काँग्रेसचंच सरकार होतं, त्यामुळे अमेठीतल्या पाचही विधानसभा मतदारसंघात औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी जमीन अधिग्रहणाचं काम जोरात चालू होतं. गांधी इथे आले आणि आपलं कल्याण झालं म्हणून अमेठीला जणू पंख लागल्यासारखं झालं होतं.
पण हा प्रगतीचा डंका पिटला जात असतानाच अमेठीमध्ये एक दुसरा खेळही जोरात चालू होता. रस्ते झपाट्यानं बदलत होते, पण नंतर त्यांचं खड्डयात रुपांतर व्हायलाही वेळ लागत नव्हता. ट्रान्सफॉर्मर लागत होते, पण तेही कधीकधी मान टाकायचे. मग परत त्यांच्याकडे बघायला कुणाला वेळ नसायचा. शेतीवाडी, औषधपाणी, शिक्षण ज्या गोष्टीसाठी म्हणून अमेठीसाठी दिल्लीचा निधी यायचा, त्यात मधल्या दलालांनी प्रचंड हात साफ करुन घेतला. यातच कमावून गब्बर बनलेल्या नेत्यांची एक पिढीच अमेठीत तयार झाली.
दिल्लीतून रुपया पाठवला की फक्त पंधरा पैसेच इथे पोहचतात, या राजीव गांधी यांच्या चिंतेला अमेठीही काही अपवाद नव्हती. त्यात 1989 ला काँग्रेसचं सरकार गेलं. राजकारणामुळे जसं अमेठीचं भलं झालं, तसंच याच राजकारणामुळे अमेठीला काही भोगावंही लागलं. अनेक सरकारी वित्तीय संस्था कर्जांकडे डोळेझाक करु लागल्या, कुशल कामगारांचा स्थानिक पातळीवर तुटवडा, मग एवढा महाग माल बाजारात उठेलच याची शाश्वती नाही अशा सगळ्या वातारणात इथले अनेक उद्योग अडकू लागले.
"कौहार में लगी सम्राट बाईसिकल कारखाने ने सबसे पहले दगा दी. मालविका का स्टील कारखाना उत्पादन के शुरूआती चरण में ही ठप हो गया. फिर आरिफ सिमेंट, जगदीशपूर सिमेंट, मारवाह, एग्रो पेपर मिल, दून गैल्वनायजिंग जैसी तमाम इकाईयां एक के बाद बन्द होती गयी." गौरीगंजमधले वयाच्या साठीत पोहचलेले शीतला मिश्रा आजही सगळी नावं अशी एका दमात घेऊन हा इतिहास सांगतात. बरंच काही हरवल्याचे भाव त्यांच्या डोळ्यांमधे असतो. आज जगदीशपूर एमआयडीसी अशी पाटी लिहिलेल्या जागेवरुन जाताना स्मशानातून चालल्याचा भास होतो.
इतकी वर्षे गांधी घराणं ज्या अमेठीचं प्रतिनिधित्व करतं, ती अमेठी नेमकी आहे तरी कशी असं कुतूहल मनात घेऊन इथे पोहचलो होतो. पण अमेठीत राहायला बरं हॉटेल मिळणार नाही, एक तर सुलतानपूरमधे राहा किंवा रायबरेलीत अशी सूचना आधीच मिळालेली होती. खाण्यापिण्याच्या बाबतीतही अशीच स्थिती. लखनौपासून जवळपास 130 किमी अंतरावर अमेठी आहे. रायबरेलीच्याच आसपास ढाब्यावर गाडी थांबवून ड्रायव्हर सांगतो. इथेच खाऊन घ्या, पुढे काही चांगलं मिळेल याची गॅरंटी नाही.
आपण इतक्या भकास ठिकाणी चाललोय का, अशी शंका मनात यायला लागते. पण अमेठीच्या वाटेवर असतानाच जायस जवळ राजीव गांधी इन्स्टिट्युट ऑफ पेट्रोलियम टेक्नॉलॉजीची भव्य इमारत दिसायला लागते. आसपासच्या सगळ्या मोकळ्या वातावरणात ही एकच भव्य, चकचकीत इमारत तुमचं लक्ष वेधून घेते. कॅम्पसच्या बाहेरच असलेल्या एका छोट्या रेस्टॉरंटमध्ये इथले विद्यार्थी होते. त्यांनी सांगितलं, की संस्था-कॅम्पस खूप चांगली आहे. कानपूर आयआयटीअंतर्गत तिला जोडण्यात आलंय. पेट्रोलियम टेक्नॉलॉजीचा अभ्यासक्रम असलेली ही देशातली पहिली संस्था आहे. राहुल गांधी 2004 ला पहिल्यांदा इथले खासदार झाले, त्यानंतर तीन वर्षात म्हणजे 2007 मध्ये केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत याला मंजुरी मिळाली होती. 2016 पर्यंत या वास्तूचं भव्य कॅम्पसमध्ये रुपांतर झालं
आजूबाजूच्या वातावरणात राहताना मात्र आम्हाला काही गैरसोयी जाणवतात. उदाहरणार्थ, काही शॉपिंग करायचं म्हटलं, बाहेर काही चांगलं खायचं म्हटलं, कधी मुव्हीला जावंसं वाटलं तरी लखनौशिवाय पर्याय नाहीय इथे. अमेठीत केंद्रातून आलेल्या अशा अनेक संस्थांचे नमुने पाहायला मिळतात. एचएएलचा प्लांट इथून जवळच असलेल्या कोरवामध्ये सुरु आहे. 1982 पासून सुरु असलेल्या संजय गांधी हॉस्पिटलचा आधार इथल्या लोकांना आहे. पण आता काळानुसार गरजाही वाढलेल्या आहेत. इथल्या परिसरात एम्स हॉस्पिटल आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत, पण अद्याप ते यशस्वी झालेले नाहीयेत. देशाच्या माजी पंतप्रधानांचा मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाची स्थिती सध्या भूषणावह नक्कीच नाही. प्रकल्प इथे आणले गेले, पण ते रुजवताना पोखरलेल्या व्यवस्थेचा फटका गांधींनाही बसत असेल तर नवलच. या व्यवस्थेला सरळ करायची हिंमत दाखवत, थोडीशी दूरदृष्टी ठेवून हे प्रकल्प इथे रुजले असते तर अमेठीचे गोडवे सगळ्यांनी गायले असते. गांधींच्या पुढच्या पिढीनं तरी या चुकांमधून वेळीच धडा घ्यायला हवा.
गांधी घराण्यातल्या चार लोकांनी आजवर अमेठीचं प्रतिनिधीत्व केलंय. सर्वात पहिल्यांदा संजय गांधी, त्यानंतर राजीव गांधी, सोनिया गांधी आणि 2004 पासून राहुल गांधी हे इथले खासदार आहेत. गेल्या पाच वर्षांपासून स्मृती इराणी यांनी इथे राहुल गांधींना आव्हान द्यायला सुरुवात केली, पण त्याआधीही अनेक दिग्गजांनी अमेठीत गांधी घराण्याला टक्कर द्यायचा प्रयत्न केलाय. त्यात शरद यादव, काशीराम यांच्यासह मेनका गांधी यांचाही समावेश आहे.
संजय गांधी यांच्या निधनानंतर आपला दावा नाकारला गेल्यानंतर मेनका गांधींनी 1984 मध्ये राजीव गांधींच्या विरोधात निवडणूक लढवलेली होती. तसं पाहायला गेलं तर संजय गांधी यांनीच इथून पहिल्यांदा निवडणूक लढवली. संजय गांधींचा मतदारसंघ असूनही जर मेनका गांधी इथे जिंकू शकल्या नाहीत, तर स्मृती इराणी राहुल गांधींना हरवून तो चमत्कार करतील का असाही प्रश्न आहे.
गांधी हा भारतीय राजकारणातला एक ब्रँड आहे. आणि त्याची ताकद, जादू अमेठीवर अजूनही नक्कीच पाहायला मिळते. अमेठीला जे काही मिळालं ते गांधी घराण्यामुळे, अमेठीची ओळखच त्यांनी देशभरात निर्माण केली. अशा प्रतिक्रिया इथे पावलापावलावर ऐकायला मिळतात, एक प्रतिक्रिया तर भलतीच…"विकास का क्या हैं, वह तो होता रहता हैं, और अगर नहीं भी हुआ तो चलेगा, लेकिना गांधी फॅमिली का और अमेठी का रिश्ता बना रहना चाहिए."
वायनाडमध्ये उमेदवारी जाहीर केल्यानंतर राहुल गांधी घाबरुन पळाले आहेत असा प्रचार भाजपनं सुरु केला. पण प्रत्यक्षात अमेठीत त्याची उलटी प्रतिक्रिया उमटल्याचं दिसतंय. गांधी आता आपल्याला सोडून जाणार की काय, अमेठीला त्यांनी सोडलं नाही पाहिजे अशी प्रतिक्रिया अमेठीत ऐकायला मिळतेय. लोकशाही व्यवस्थेत अशा पोरकेपणाची भावना निर्माण होणं हे काही चांगलं लक्षण नाहीये. पण अमेठीचं आणि गांधींचं नातं असं बनलंय खरं.
स्मृती इराणी पराभवानंतरही इथून हटल्या नाहीत. त्या इथे येत राहिल्या ही बाब चांगलीच आहे. पण अमेठीतल्या जाणकारांशी बोलताना जाणवलं की खरंतर त्यांनी एक चांगली संधी गमावली. केंद्रात मंत्री असताना त्यांच्या त्यांच्या खात्यातून अमेठीसाठी बरंच काही त्यांना करता आलं असतं. राहुल गांधींनी 15 वर्षात काही केलं नाही असा आरोप करताना 5 वर्षात अमेठीला आम्ही हे दिलं असा प्रचार त्यांना करता आला असता. पण याऐवजी यूपीएच्या काळातले काही नियोजित प्रकल्प कसे इथे रुजू दिले नाहीत याचीच चर्चा ऐकायला मिळते. शिवाय त्यांच्या कार्यशैलीबद्दल भाजपमध्येही नाराजी असल्याचं ऐकायला मिळालं. स्मृती इराणी यांनी अमेठीतल्या भाजपमध्ये गटतट निर्माण केलेत. एका विशिष्ट गटालाच ताकद दिल्यानं पक्षांतर्गत नाराजी आहे. अमेठी लोकसभा मतदारसंघातले भाजपचे दोन आमदार त्यामुळे फार मनापासून काम करत नसल्याचीही चर्चा ऐकायला मिळाली.
अमेठीत मागच्या वेळी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नरेंद्र मोदींनी सभा घेतलेली होती. 2014 पर्यंत साधारण संकेत असा होता की विरोधी पक्ष नेता अमेठी, रायबरेलीत येऊन प्रचार करायचा नाही. पण भाजपनं आपल्या आक्रमकपणाची झलक दाखवत थेट या बालेकिल्यातच आव्हान दिलं. यावेळी शेवटच्या टप्प्यात मोदी फिरकले नसले तरी ती कसर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी भरुन काढली. रोड शोच्या माध्यमातून सगळ्या अमेठी शहराला भगवामय करुन टाकण्याचा प्रयत्न भाजपनं केला. काँग्रेसच्या प्रचाराचा भर छोट्या छोट्या सभांवर होता. लढाई राहुल गांधी यांच्याविरोधात असली तरी प्रचारात स्मृती इराणी विरोधात प्रियंका गांधी यांचेच खटके अनेकदा उडाले. अमेठीमध्ये इतक्या वर्षानंतर पहिल्यांदाच भाजपचं एक सुसज्ज कार्यालयही उभारण्यात आलंय. निवडणूक जाहीर झाल्यापासून स्मृती इराणी यांनी अमेठीतल्या गौरीगंज परिसरात एक बंगला भाड्यानं घेतलाय. या बंगल्याबाहेर भाजप कार्यकर्त्यांची सतत रीघ लागलेली असते.
उत्तर प्रदेशातल्या या दोन्ही मतदारसंघात ज्या पद्धतीनं गांधी घराण्याचा प्रचार होतो, ते पाहून विशेष वाटलं. सभेच्या ठिकाणी अतिशय साधा मंडप घातलेला असतो. कुठलाही भपकेबाजपणा, बॅनरबाजी स्टेजवर नसते. साऊंड सिस्टीमही अगदी साधी. आपल्याकडे कारखान्याच्या निवडणुकांमध्येही यापेक्षा चांगला मंडप पाहायला मिळेल. प्रियंका गांधी येणार म्हणून कार्यकर्ते हार घेऊन ओळीने मंडपाच्या खाली उभे होते. त्यांचं आगमन झाल्यानंतर घोषणाबाजी सुरु होते. हारतुरे स्वीकारत प्रियंका गांधी स्टेजवर येतात. पण अगदी क्षणापुरत्याच. मग माईक हातात घेऊन त्या थेट जनतेत मिसळतात. किती वाजल्यापासून थांबलाय तुम्ही, मला यायला उशीर झाला त्याबद्दल माफी मागते असं करुन संवादाला सुरुवात होते. मग अमेठीत आपल्याला काय काय करायचं आहे, इथे एम्स आणण्यामध्ये हे सरकार असं आडकाठी करतंय हे त्या जनतेला सांगायला सुरुवात करतात. त्यातही एम्स हा शब्द या लोकांना कळेल की नाही हे जाणवून एक बडासा हॉस्पिटल, जहाँ पे सारी सुविधा हो असं सुलभीकरणही करुन टाकतात. शेवटच्या दिवशी भाजपनं रोड शोवर भर दिला तर प्रियंका आणि राहुल यांनी महिला बचत गटांच्या एका मोठया मेळाव्यात संवाद साधला.
अमेठीत मागच्या वेळी राहुल गांधी यांना 4 लाख 8 हजार मतं मिळाली होती. तर स्मृती इराणी यांना 3 लाख मतं मिळाली. पण मागच्या निवडणुकीपेक्षा यावेळची स्थिती आणखी बदललीय. यावेळेस कुमार विश्वास रिंगणात नाहीत. जरी कुमार विश्वास यांना फारशी मतं मिळाली नसली तरी विरोधी वातावरण करण्यात त्यांच्या इमेजचा खूप फायदा झाला होता. सपा-बसपानंही आपला उमेदवार इथे दिलेला नाहीये. अमेठीतली जनता विकासाच्या मुद्द्याला अधिक महत्व देणार की आपली व्हीआयपी मतदारसंघाची ओळख हरवू नये यासाठी भाविनकतेनं मतदान करणार यावर इथली समीकरणं अवलंबून असतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
निवडणूक
कोल्हापूर
Advertisement