एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ब्लॉग : बिष्णोई : पर्यावरणासाठी लढणारे खरे 'दबंग'
जोधपूरपासून 30 किलोमीटर अंतरावर कांकाणी गाव आहे. याच गावातल्या चोगाराम बिष्णोई, पूनमचंद बिष्णोई या दोघांनी त्या दिवशी सलमानचा पाठलाग केला होता.
स्वच्छता, पर्यावरण प्रेमाचं काम करायला निघालात तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या मागे चार माणसं गोळा करणं हे जिकीरीचं काम असतं. असा काही चांगला विचार इतरांच्या गळी उतरवणं हे महाकठीण काम. त्यातूनही काहीजण ‘एकला चलो रे’ चा नारा देत आपलं काम चालूच ठेवतात. जगण्याच्या रोजच्या धावपळीत मग्न असणारे तर अशी काही वेगळी वाट धरणाऱ्यांना वेड्यातच काढत असतात. अशा परिस्थितीत साडे पाचशे वर्षांपूर्वी केवळ पर्यावरणप्रेमाचा संदेश देत एक माणूस हिंदू धर्मात एक नवा पंथ कसा स्थापन करतो, साध्या-साध्या विचारांवर लाखो अनुयायी कसे जमवतो आणि आज इतक्या वर्षानंतरही या समाजातले लोक पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपला जीव द्यायलाही मागे पुढे पाहत नाहीत हे सगळं खरोखरच थक्क करणारं आहे.
या समाजाचं नाव आहे बिष्णोई आणि 1451 साली ज्यांनी या पंथाची स्थापना केली त्यांचं नाव गुरु जंभेश्वर महाराज. सलमान खानचं काळवीट शिकार प्रकरण ज्यांच्यामुळे उजेडात आलं, ज्यांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता हा कायदेशीर लढा 20 वर्षे सातत्याने दिला ते बिष्णोई. सलमान खानच्या स्टारडमपुढे दबून न जाता, जे पर्यावरण रक्षण हा आपला मूळ धर्म विसरले नाहीत ते बिष्णोई. 1 ऑक्टोबर 1998 च्या रात्री याच बिष्णोई समाजातल्या लोकांनी सलमानच्या गाडीचा पाठलाग केला आणि हे काळवीट शिकार प्रकरण संपूर्ण जगाच्या समोर आलं. बिष्णोई आपल्या मागे लागलेत म्हटल्यावर सलमान खानलाही शिकार केलेले काळवीट तिथेच टाकून पळ काढावा लागला होता.
जोधपूरपासून 30 किलोमीटर अंतरावर कांकाणी गाव आहे. याच गावातल्या चोगाराम बिष्णोई, पूनमचंद बिष्णोई या दोघांनी त्या दिवशी सलमानचा पाठलाग केला होता. हा संपूर्ण परिसर बिष्णोई बहुल आहे. जोधपूर, बिकानेर, गंगानगर या तीन जिल्ह्यात हा बिष्णोई समाज वसलाय. राजस्थानात बिष्णोईंची संख्या 2 टक्के इतकी म्हणजे जवळपास 12 ते 13 लाख इतकी आहे. जोधपूर मॅजिस्ट्रेट कोर्टाने सलमानला काळवीट शिकार प्रकरणात 5 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर या गावाने एकच जल्लोष केला. गावात पोहचलो तेव्हा आमचंही स्वागत पारंपरिक पद्धतीने गुळाचा खडा चारुनच करण्यात आलं. गावातल्या जंभेश्वर मंदिरात सगळ्यांनी पूजेचं आयोजन केलं होतं. त्याचवेळी रामपाल बिष्णोई यांनी स्पष्ट केलं, “सलमान हा काही आमचा वैयक्तिक शत्रू नाही, त्याच्या जागी दुसरं कुणी असतं तरी आम्ही हेच केलं असतं.” बरं ही भावना काही केवळ ज्येष्ठ-बुजुर्गांचीच नव्हती. बिष्णोई समाजातले अगदी विशीतले तरुणही सलमानच्या स्टारडममध्ये वाहून गेले नव्हते. कोर्टाच्या बाहेर निकालानंतर त्यांनी फटाके वाजवून आपला आनंद साजरा केला. ‘सलमान खान मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्या, ही आमच्यासाठी नवी दिवाळी आहे अशा प्रतिक्रियाही दिल्या. सिनेमातल्या दिखाऊ गोष्टींपेक्षा पर्यावरण रक्षणासारख्या आपल्या पंथाच्या शिकवणीवर इतका विश्वास ठेवणारी बिश्नोई तरुणाई पाहिल्यावर जगात काहीतरी चांगलं टिकून आहे याच्याबद्दल आशा वाढू लागते.
सलमानच्या या कोर्ट केसच्या निमित्ताने कांकाणी गावात फिरतानाच बिष्णोईंच्याबद्दल थक्क करणारी माहिती मिळत गेली. जगामध्ये पर्यावरणाच्या मुद्द्यावर स्थापन झालेला हा कदाचित पहिलाच पंथ असावा. ग्लोबल वार्मिंगसारखे प्रश्न आज आपल्याला भेडसावतायत, त्यावर जागतिक परिषदाही होत आहेत. पण हे सगळं संकट साडेपाचशे वर्षांपूर्वी ओळखून, पर्यावरण प्रेमाचा संदेश देणारे गुरु जंभेश्वर हे खरंतर आद्य पर्यावरणवादी म्हणायला हवेत. जंभेश्वर हे जन्माने क्षत्रिय होते, पण वयाची काही वर्षे मौनव्रत स्वीकारुन त्यांनी ज्ञानसाधना केल्यानंतर या नव्या पंथाची स्थापना केली. कर्मकांड, धार्मिक रुढी-परंपरा असे काही निकष या पंथाला नव्हते. जो कुणी 29 नियमांचं पालन करेल तो या पंथाचा सदस्य होऊ शकतो. अगदी हिंदूच नव्हे तर मुसलमान, ख्रिश्चन, शीख कुणीही या पंथात सामील होऊन बिष्णोई बनू शकत होतं. बीस अधिक नोई म्हणजे (20+9) बिष्णोई इतकी सहज या नावाची फोड आहे. हे नियम काय काय आहेत त्यावर नजर टाकल्यावर त्याचं साधेपण तुमच्या लक्षात येईल. रोज सकाळी सूर्योदयाच्या आधी स्नान करायचं, लहान बाळाच्या जन्मानंतर 30 दिवस त्याच्यावर विविध जन्मसंस्कार करायचे, या काळात आईला कुठल्याही कष्टापासून दूर ठेवायचं, मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना पाच दिवस घरातल्या कामांपासून विश्रांती द्यायची, सकाळ-संध्याकाळ घरात दिवा लावून नामस्मरण करायचं, सर्व प्राणीमित्रांवर प्रेम करा, झाडं तोडू नका, पर्यावरणावर प्रेम करा, तुमचं स्वतःचं अन्न स्वत:च्या हातांनी बनवा, मद्य, तंबाखू, भांग इत्यादीचे सेवन करु नका, मांसाहार करु नका, नीळ वापरुन रंग दिलेले भडक कपडे वापरु नका. असे हे सगळे साधे-सोपे नियम आहेत. यातल्या अनेक गोष्टींमागे पर्यावरणाचा बारीक विचार आहे. कपडयांना रंग देण्यासाठी नीळ शेती त्याकाळी सुरु झाली होती. पण निळीची शेती केल्यानंतर जमिनीचं जास्त नुकसान होतं, नंतर जमीन पडीक बनते असा एक तर्क आहे. त्यामुळे त्याचा वापर टाळण्याचं आवाहन जंभेश्वर यांनी केलं होतं. शिवाय भडक कपडे जास्त सूर्यकिरण खेचतात, पांढ-याशुभ्र कपड्यांमुळे ती परावर्तित होत असतात हाही एक दृष्टीकोन त्यापाठीमागे आहेच. हिंदू धर्मात एकूण 16 संस्कार सांगितलेले आहेत, गुरु जंभेश्वर यांनी त्याचं सुलभीकरण करुन केवळ चारच संस्कारांमध्ये हा पंथ बसवलाय. जन्म, मृत्यू, विवाह, गुरुदीक्षा बस्स. बिश्नोईच्या घरात जन्माला आला म्हणून मूल लगेच बिश्नोई बनत नाही. 30 दिवसांचे जन्मसंस्कार पूर्ण झाल्यानंतर बिश्नोई बनवण्याचे संस्कार केले जातात. बाळाला स्नान घालून नवे कपडे घातले जातात, बिष्णोईंसाठीचे उपदेश ज्या शब्दवाणीत लिहिले आहेत, त्याचं पठण केलं जातं. मंत्रांचा जाप करताना पाणी त्याच्या डोक्यावर लावलं जातं. हे विधी पूर्ण झाले की बिष्णोई, बिष्णोई असा मोठ्या स्वरात उच्चार करुन पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणखी एक बिष्णोई जन्माला आल्याची ग्वाही दिली जाते.
कांकाणी गावात ज्या दिवशी पोहोचलो, त्या दिवशी एका बिष्णोई कुटुंबातला लग्नाचाच सोहळा सुरु होता. या लग्नमंडपात शिरल्यावर बिष्णोईंशी बोलताना आणखी एक विशेष बाब समजली. लग्न लावण्यासाठी ते कुठल्याही प्रकारचे मुहूर्त, पंचांग पाहत नाहीत. गुरु जंभेश्वरांनी बिष्णोईंना जो उपदेश केलाय, तो शब्दवाणी या नावाने ओळखला जातो. कुठल्याही बिष्णोईच्या घरात जा, तुम्हाला हे शब्दवाणीचं पुस्तक हमखास आढळेल. शिवाय बिष्णोईचं हे पर्यावरणप्रेम केवळ पुस्तकी नाही, अगदी इतिहासापासून ते आत्ता-आत्तापर्यंत झाडांच्या रक्षणासाठी, प्राण्यांना वाचवण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलेलं आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी आधुनिक काळात झालेलं चिपको आंदोलन आपल्याला माहिती आहे. पण या आंदोलनाचं बीज, प्रेरणाही बिष्णोईंच्याच इतिहासात आहे. 1847 साली बिष्णोई समाजातल्या एक दोन नव्हे तर तब्बल 363 लोकांनी आपलं बलिदान झाडं वाचवण्यासाठी दिलं होतं. बिष्णोई समाजातले लोक आजही मोठ्या अभिमानाने या सगळ्या लढ्याची कहाणी सांगतात. खेजरी म्हणजे ज्याला आपण शमीवृक्ष म्हणतो त्याचं जंगल वाचवण्यासाठीचा हा लढा होता. त्यावेळच्या जोधपूरच्या महाराजांना नवीन वाड्याचं बांधकाम सुरु करायचं होतं. चुना पक्का करण्यासाठी त्यांना अनेक लाकडं हवी होती. बिष्णोईंच्या गावात शमीचं जंगल असल्याचं कळल्यावर राजांनी तिथून झाडं आणण्याचा हुकूम सोडला. जंगल तोडण्यासाठी सैन्य पोहचल्यावर बिष्णोईंनी त्याला विरोध केला. अमृतादेवी या बिष्णोई समाजातल्या महिलेने तर झाडाला मिठी मारुन प्रतिकार केला. राजाच्या सैन्यासोबत लढण्याइतकं बळ नसलेल्या बिष्णोईंनीही तिचंच अनुकरण केलं. पण सैन्याला तर राजाज्ञा मिळाली होती. एकेक करत 363 बिष्णोईंचं शिरकाण करण्यात आलं, तोपर्यंत या भयानक घटनेची बातमी राजमहलात पसरली. झाडासाठी सैन्य हत्याकांड करतंय म्हटल्यावर राजाने आपला आदेश मागे घेतला. या ऐतिहासिक घटनेला ‘खेजरीचं हत्याकांड’ म्हणून ओळखलं जातं. पर्यावरण रक्षणासाठी झालेल्या या ऐतिहासिक लढ्याचा उल्लेख दिवंगत पर्यावरणमंत्री अनिल माधव दवे यांनी एकदा लोकसभेत केला होता. दुर्दैवाने राजस्थानच्या बाहेर अनेकांना या लढ्याची फारशी माहिती नाही. ज्या शमी वृक्षासाठी बिष्णोईंनी आपले प्राण दिले, त्याचे अनेक वैज्ञानिक फायदे आहेत. बिष्णोई समाजासाठी तो कल्पवृक्षासारखा आहे, त्याला ‘मारवाड की तुलसी’ असंही म्हटलं जातं. कांकाणी गावात जिथे जिथे फिरलो, त्यावेळी प्रत्येकाच्या घरासमोर एकतरी शमीचं झाड हे दिसतच होतं. शमीचं एक झाड वाचवण्यासाठी एक बिष्णोई शीर कामी आलं तरी बेहत्तर, इतक्या प्राणपणाने त्याची रक्षा करा असा संदेश आमच्या गुरुंनी आम्हाला दिलाय असं ते सांगत होते.
झाडांइतकंच प्रेम प्राण्यांवरतीही. बिश्नोई समाजातल्या महिला लहान काळवीटांना आपलं दूध पाजत असल्याचं इंटरनेटवर वाचलं होतं. कांकाणी गावात जाईपर्यंत हे खरोखरच घडतं यावर विश्वास बसत नव्हता. पण ताताराम बिष्णोईने हे खरं असल्याचं सांगितलं, त्याच्या स्वतःच्या बहिणीने अशा पद्धतीने एक आई गमावलेलं हरीण बालक पोरासारखं सांभाळल्याचं सांगितलं. त्याला स्तनपान करतानाचे फोटोही दाखवले. “आमच्या प्राणीप्रेमाची महती बहुधा सगळ्याच प्राण्यांना झालीये सर, बिष्णोई बहुल गावांत काळवीटं बिनधास्त येऊन फिरतात. बिकानेरमधलं बिष्णोईचं जे मुख्य मंदिर आहे, तिथे तर अनेक जंगली प्राणी, पक्षी मुक्त विहार करताना आढळतील,” ताताराम बिष्णोई पुढे सांगत होते.
वैज्ञानिक तर्क, पर्यावरणप्रेमाच्या आधारावर बनलेल्या या समाजात महिलांनाही योग्य स्थान आहे. स्त्रियांच्या आरोग्यांचा विचार समाजाच्या 29 नियमांमध्ये तर केला आहेच. त्याशिवाय एकदोन पद्धतींचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. राजस्थानातल्या राजपूत, जाट आणि इतर अनेक समाजांमध्ये विधवा पुनर्विवाह होत नाहीत. बिष्णोई समाजात मात्र अशी एखादी घटना घडल्यानंतर त्या मुलीच्या पुढच्या आयुष्याचा विचार करुन तिचं लग्न नात्यातल्याच एखाद्या सुयोग्य वराशी लावून दिलं जातं. हुंडा वगैरे बाब त्यांच्या लग्नात नाही. सामूहिक विवाहाची परंपराही या समाजात अनेक वर्षांपासून सुरु आहे. एकाचवेळी 200 ते 300 विवाह होतात. त्यातून अनेक गरीब कुटुंबांच्या चिंतेचा विचार केला जातो. बिष्णोई समाज हा मूळचा क्षत्रिय असला तरी माणूस मेल्यानंतर त्याचं मातीत दफन करण्याची परंपरा आहे. दहन करण्यासाठी पुन्हा झाडांची कत्तल नको हा त्यामागचा विचार. स्वयंपाक किंवा इतर कुठल्या कामासाठी झाडांचा वापर करायचा म्हटला तरी त्यातला पाण्याचा अंश संपल्यावर, लाकूड वाळल्यानंतरच ते वापरलं जातं.
बिष्णोई समाजाची स्थापना करणारे जंभेश्वर हे मूळचे जाट होते. हिंदू धर्मातल्या जातव्यवस्थेचा त्याग करत त्यांनी हा नवा पंथ स्थापन केला. या पंथात कुठेही जातीपातीला थारा नाही. असं म्हणतात की राजस्थानात त्या काळी 20 वर्षांचा महाभयानक दुष्काळ पडल्यानंतर या पर्यावरणप्रेमी पंथाची स्थापना जंभेश्वर यांनी केली. गेल्या साडेपाचशे वर्षांहून अधिक काळ त्यांची शिकवण जोपासत हा पर्यावरणप्रेमी समाज आपलं काम निष्ठेने करत आलाय. सलमान खानने काळवीटाची शिकार करुन चूक तर केलीच, पण त्याहूनही मोठी घोडचूक ही केली की त्याने ती शिकार बिष्णोईंच्या इलाक्यात येऊन केली. जोधपूर सेशन कोर्टाने जामीन मिळाल्यानंतर सलमान जेलबाहेर आला. त्याच्या चाहत्यांनी अगदी बेधुंद जल्लोष केला. पण तरीही बिष्णोई खचलेले नाहीत. या 20 वर्षांच्या लढाईत अनेक चढ-उतार त्यांनी पाहिले आहेत. गेल्या साडेपाचशे वर्षांपासून ते पर्यावरणासाठी लढतच आलेत. राजस्थानसारख्या मरुभूमीमध्ये राहिल्याने ते पर्यावरणाबद्दल इतके जागरुक झाले असावेत कदाचित. तसं असेल तर जगाचं वाळवंट होऊ नये म्हणून त्यांची धडपड आपण सगळ्यांनीच वेळीच लक्षात घेतलेली बरी.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
राजकारण
निवडणूक
Advertisement