भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार रानी रामपालच्या भावना, मराठीतून... "मी रानी रामपाल बोलतेय..."
भारताच्या महिला हॉकी संघानं बलाढ्य ऑस्ट्रेलियावर विजय मिळवून टोकियो ऑलिम्पिकची उपांत्य फेरी गाठली. त्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाची कर्णधार रानी रामपालला आपल्या भावना मराठीत व्यक्त करता आल्या असत्या, तर ती काय म्हणाली असती? रानी रामपालनं नुकत्याच लिहिलेल्या एका फेसबुक पोस्टचा स्वैर अनुवाद करून केलेला हा प्रयत्न.
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना संपल्याची शिट्टी वाजली आणि माझ्या भावनांचा बांधच फुटला. माझे डोळे अश्रूंनी डबडबले. त्यांना थांबवण्याचा प्रश्नच नव्हता. माझ्या सहकाऱ्यांच्या मिठीत विसावून मी माझं मन मोकळं करून घेतलं.
मला ठाऊक आहे आम्ही जशी या दिवसाची वाट पाहात होतो. त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात तुम्हीही आमच्याकडून सर्वोत्तम कामगिरीची प्रतीक्षा करत होतात. खरं सांगू, आमची कामगिरी पदकांच्या किंवा यशाच्या तराजूत तोलायची तुमची अपेक्षा काही चुकीची नाही. आणि आमच्यासाठीही पदकं किंवा यश मिळवणं तितकंच महत्त्वाचं असतं. पण या एकविसाव्या शतकात आम्ही अजूनही विषमतेचीच लढाई लढतोय, हे तुम्हाला कळावं म्हणून हा प्रपंच.
ही लढाई आहे घरच्या गरीबीची, ही लढाई आहे सामाजिक परिस्थितीची, ही लढाई पोषक आहाराची, ही लढाई संपन्न देशांसमोर तितक्याच ताकदीनं उभं राहण्याची. आणि इतक्या साऱ्या लढाया खेळून, त्या जिंकायच्या आणि मग कामगिरीही सोन्यासारखी करायची... ही सारी आव्हानं आम्ही पेलत आहोत. पण यश अलगद हातून निसटत होतं.
आम्हाला ते अपयश बोचत होतं. अखेर टोकियो ऑलिम्पिकमधल्या उपांत्यपूर्व सामन्याच्या निमित्तानं मनावरच्या दडपणाची आणि यशापयशाची कोंडी फुटली. ऑस्ट्रेलियासारख्या तीन-तीनवेळा ऑलिम्पिक जिंकलेल्या फौजेसमोर आम्ही एक होऊन खेळलो. गोलरक्षक सविता पुनिया आणि बचावफळीनं ऑस्ट्रेलियासमोर जणू भक्कम संरक्षक भिंतच उभी केली. गुरजीत कौरनं पेनल्टी कॉर्नरची संधी वाया दवडली नाही आणि त्याच सांघिक कामगिरीनं साकारला एक असामान्य विजय. माझाही क्षणभर स्वत:वर विश्वास बसत नव्हता. पण आम्ही १-० असा विजय मिळवून टोकियो ऑलिम्पिकची उपांत्य फेरी गाठली, हे वास्तव होतं. पण या रोमांचक विजयाच्या निमित्तानं मागं वळून पाहायचं तर माझा इथवरचा प्रवास हा नक्कीच स्वप्नवत आहे.
मी मूळची हरयाणातल्या कुरुक्षेत्र जिल्ह्यातल्या शाहबादची. हरयाणाचं संसारपूर अशी आमच्या शाहबादची ओळख. पंजाबातल्या संसारपूरची खासियत ही तिथली हॉकीची परंपरा आहे. आणि त्याच नात्यानं आमचं शाहबाद म्हणजे हरयाणाचं संसारपूर. त्यामुळं शाहबादच्या कुशीत जन्माला आल्यावर मला हॉकीची गोडी लागली नसती तरच नवल. पण हॉकीची गोडी लागणं आणि हॉकी खेळायला मिळणं यात जमीनअस्मानाचा फरक होता.
त्या काळात आमच्या घरची परिस्थिती खूपच हलाखीची होती. माझे पापा हातगाडी ओढून आमचं पोट भरायचे, तर आई घरकाम करून संसाराला हातभार लावायची. त्या दोघांनी आमच्यासाठी अपार कष्ट घेतलेत. त्याची कधीच परतफेड करता येणार नाही. पण त्या संघर्षमय परिस्थितीतून वाट कशी काढायची हा लहानपणापासूनच आमच्यासमोरचा प्रश्न होता.
त्या काळात घरातला वीजपुरवठा सतत खंडित व्हायचा. घरात कायम काळोख दाटलेला असायचा. त्या वातावरणात पंखा नाही. त्यामुळं झोप आधीच उडालेली. त्या परिस्थितीत डोळे मिटून पडून राहायचं तरी कठीण होतं. कारण डास एक तर फोडून काढायचे किंवा कानात भुणभूण लावून आमचा डोळा लागणार नाही, याची खात्री करायचे. पावसात तर आमचं घर पाण्यानं भरून जायचं. त्यामुळं जगायचं तर कसं जगायचं हा माझ्या आणि माझ्या कुटुंबियांसमोरचा प्रश्न होता.
त्या परिस्थितीत माझ्या आईवडिलांनी स्वत:च्या पोटाला चिमटा घेऊन आम्हाला सांभाळलं. पण आम्हाला चौरस आहार देता येईल अशी काही त्यांची कमाई नव्हती. सगळ्यांना दोन वेळचं जेवण मिळतंय ना, हाच त्यांचा प्रयत्न असायचा. त्यामुळं माझी अवस्था ही कुपोषित बालकासारखीच होती.
त्या अजाणत्या वयात माझं पहिलं प्रेम हॉकीवर जडलं. माझ्या घरासमोरच एक हॉकी अॅकॅडमी होती. तिथला सराव मी तासनतास पाहात बसायचे. मला मनातून खूप वाटायचं की मीही त्यांच्यासोबत खेळावं. पण माझ्या वडिलांची दिवसाची कमाईच होती जेमतेम ऐंशी रुपये. त्यात हॉकी स्टीक आणि शूज कुठून येणार? मग मी हॉकी अॅकॅडमीतल्या प्रशिक्षकांच्या मागे लागून पाहिलं. पण मी इतकी कुपोषित होते की, त्यांना मला खेळवायची भीती वाटायची. त्यामुळं माझी प्रत्येक विनंती त्यांनी फेटाळून लावली.
त्यामुळं त्या परिस्थितीत माझी अवस्था ही चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यूसारखी होती. पण एक दिवस मला अॅकॅडमीजवळ एक तुटलेली हॉकी स्टिक सापडली आणि माझ्या आयुष्याला अशी काही कलाटणी मिळाली की, त्या स्टिकनं मला अभिमन्यूचं एकलव्य बनवलं. त्या स्टिकनं मी एकटीच हॉकी खेळत बसायची. माझ्याकडे हॉकीचा गणवेश नव्हता. पण तरीही मी सलवार कमीजवर खेळत राहायची. एकटीच. माझी ती मेहनत आणि सततचा पाठपुरावा पाहून अॅकॅडमीतल्या प्रशिक्षकांना माझी दया आली असावी. त्यांनी मला सरावासाठी येण्यासाठी परवानगी दिली.
प्रशिक्षकांनी दिलेल्या होकारानंतरही माझी लढाई संपलेली नव्हती. मला घरून हॉकी खेळण्यासाठी पाठिंबा मिळत नव्हता. मुलींनी घरकाम करायला हवं, तू ते शिकून घे. आम्ही तुला स्कर्टवर खेळायला देणार नाही... अशी पालुपदं घरात सुरु असायची. अखेर मी अयशस्वी ठरली, तर मी तुमचं ऐकेन या अटीवर मला हॉकी खेळण्यासाठी परवानगी मिळाली.
माझी हॉकी सुरु झाली खरी, पण तिथंही माझी लढाई सुरु होती ती पौष्टिक आहारासाठी. आम्हा मुलींना सरावासाठी येताना स्वत:साठी अर्धा लीटर दूध घेऊन येणं अनिवार्य होतं. इथं माझी खरी पंचाईत झाली. आईवडील त्यांच्या पोटाला चिमटा घेऊन आम्हाला जेमतेम दोनवेळचं जेवण देत होते. तिथं अर्धा लीटर दूध म्हणजे माझ्यासाठी चैन होती. मग मीच शक्कल लढवली. घरून मला २०० मिलीलीटर दूध दिलं जायचं. मी त्यात पाणी मिसळून तेच सरावाच्या वेळी पिण्यासाठी घेऊन जायचे. म्हणजे आधी अभिमन्यू, मग एकलव्य आणि आता मी अश्वत्थामा बनले होते. केवळ हॉकीवरच्या प्रेमासाठी.
माझ्या प्रशिक्षकांना हळूहळू माझ्या घरच्या परिस्थितीची कल्पना आली. मग त्यांनीच मला हॉकीचं कीट घेऊन दिलं. माझ्या खुराकाकडेही त्यांनी लक्ष दिलं. इतकंच काय तर माझ्या रोजच्या पौष्टिक आहारावर आणि माझ्या शिक्षणावर लक्ष राहावं म्हणून त्यांनी मला आपल्या कुटुंबाचा भाग बनवलं. मी त्यांच्या लेकीसारखी त्यांच्याच घरी राहायची. रोज सराव करायची आणि अभ्यासही.
अखेर तो दिवस आला. माझा पहिला पगार झाला. पगार म्हणजे आम्ही एक स्पर्धा जिंकलो, तिथं मला ५०० रुपयांचं बक्षीस मिळालं. ते मी माझ्या वडिलांच्या हातात देऊन म्हटलं की, तुम्ही काळजी करु नका. एक दिवस मी आपलं घर बांधेन. मी दिलेला तो शब्द खरा करण्यासाठी कठोर मेहनत घेतली. वयाच्या पंधराव्या वर्षी माझं स्वप्न साकार झालं. माझी भारतीय संघात निवड झाली. अपेक्षांचं ओझं वाढलं, तशी माझी मेहनतही वाढली आणि एक दिवस भारतीय संघाच्या कर्णधारपदी माझी निवड झाली.
एक दिवस माझ्या मैत्रिणीचे वडील त्यांच्या नातीला घेऊन आमच्या घरी आले. आणि म्हणाले की, रानी, तू माझ्या नातीची आदर्श आहेस. तिला तुझ्यासारखं भारतीय संघाचं कर्णधार व्हायचं आहे. त्यांच्या शब्दांनी मला इतका आनंद झाला की, दुसऱ्याच क्षणी मला रडू कोसळलं.
एकामागून एक दिवस जात होता. माझी प्रगती सुरु होती. अखेर 2017 साली माझं पहिलं स्वप्न साकार झालं. मी माझ्या कुटुंबासाठी स्वत:चं घर विकत घेतलं. आता माझं एकच स्वप्न शिल्लक आहे. मला माझ्या कुटुंबासाठी, माझ्या प्रशिक्षकांसाठी आणि माझ्या देशासाठी ऑलिम्पिकचं सुवर्णपदक जिंकायचं आहे.