एक्स्प्लोर
राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जैसलमेर - भाग एक
भटकंतीचा अर्थ कुठलाही विचार न करता बॅग उचलून बाहेर पडणं. जग बघण्याची भूक असलेल्यांना पोटाच्या भुकेची चिंता नसते, त्यामुळे कधी राहण्याचे तर कधी खाण्याचे हाल होऊ शकतात. जाडजूड गादीवर झोपणाऱ्यांनी भटकंती करणं टाळावं. तुम्ही टूरिस्ट होऊ शकता ट्रॅव्हलर नाही. तुम्ही पक्के ट्रॅव्हलर असाल तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच
![राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जैसलमेर - भाग एक blog on rajasthan economy trip Jaisalmer by amol kinholkar राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जैसलमेर - भाग एक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/08/04134818/main-blog-photo1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
स्टेशनवरच्या कलकलाटानं माझी अचानक झोपमोड झाली. डोळे मिचकावत ट्रेनच्या टपाकडे बघताना मला आठवलं, की आपण जैसलमेरला जातोय. अप्पर बर्थवरून खाली डोकावलो तर सगळं चित्र बदलेलं होतं. गाडी मारवाडमध्ये पोहोचली होती. ट्रेनमधल्या लोकांची बोली, पेहराव सगळंच नवीन वाटत होतं. सीटवर वाळूचा हलकासा थर साचायला सुरुवात झालेली. वरच्या सीटवरून खाली अर्धा लोंबकाळत मी भल्या मोठ्या देहाच्या पिळदार मिशा असलेल्या काकांना विचारलं "चाचा कौनसा स्टेशन है?"
त्यांना माझा प्रश्नच कळला नसावा. ते फक्त माझ्याकडे बघत होते.. पण त्यांच्या शेजारचा माणूस म्हणाला "जोधपूर आया है "
सकाळचे साडे सात होत होते. अजून जवळपास पाच तासानंतर जैसलमेर..
झोपावं म्हटलं, तर आता झोप लागेल, असं वाटत नव्हतं. गाडी 15 मिनिटांनी जैसलमेरकडे निघाली. सव्वा नऊच्या दरम्यान मी वरच्या सीटवरुन खाली उतरलो. तेव्हा ट्रेनमध्ये वाळूचा मोठा थर तयार झाला होता. खिडकीतून बाहेर बघतो तर विस्तीर्ण वाळवंट... मध्येच कुठेतरी एखादं झाड किंवा गुडघ्याएवढी काटेरी झुडपं.. वाळवंटातून भरधाव वेगाने ट्रेन धावत होती. इथले लोक आणि बाहेरचं वाळवंट बघून मला राजस्थानला आल्याचा खराखुरा फील आला..
साडेदहाच्या सुमाराला ट्रेन 'रामदेवडा' स्टेशनवर आली. सगळ्यांनी आपापल्या बॅग घेऊन उतरायची तयारी सुरू केली. मला वाटलं, काही लोक उतरतील. पण हळूहळू ट्रेनमधले सगळेच लोक उतरायला लागले. पाहिलं तर, जवळपास अख्खी ट्रेन याच स्टेशनवर रिकामी झाली. खिडकीतूनच एकाला हाक मारत मी विचारलं.. "यह ट्रेन आगे जैसलमेर जायेगी ना?"त्यावर त्याने होकारार्थी मान डोलावली. आता मला जरा भीतीच वाटू लागली. स्टेशनवरची गर्दीही ओसरली आणि इकडे डब्यातही मी एकटाच उरलो. ट्रेन सुरू झाली. अशावेळी तुमच्या मनात जे काही अभद्र विचार येतील ते माझ्याही मनात सुरू झाले. मी ताडकन उठून शेजारच्या डब्यात गेलो. तिथेही कुणीच नव्हतं. अगदी कोपऱ्यावरच्या सीटवर दोन माणसं दिसली. मी पटकन मागे फिरून माझ्या दोन्ही बॅगा घेऊन दुसऱ्या डब्यातल्या त्या लोकांजवळ येऊन बसलो. ते सहा लोकांचं कुटुंब होतं. जैसलमेरपर्यंत ते सोबत असल्यानं माझ्या जीवात जीव आला.
ट्रेन रामदेवडा गावात का रिकामी झाली याचं उत्तर मला त्यांच्या बोलण्यातून मिळालं. रामदेवडा हे इथल्या लोकांचं तीर्थक्षेत्रच आहे.. जसं आपण स्वामी समर्थ किंवा गजानन महाराजांना मानतो अगदी तशीच श्रद्धा या लोकांची रामदेव बाबांप्रती आहे. (हे रामदेव बाबा आपले योगावाले नाहीत.) रामदेव बाबांनी साडे सहाशे वर्षांपूर्वी समाज उद्धाराचं काम केलं. जाती प्रथेविरोधात आवाज उठवला. गोर गरीबांना दलितांना मंदिराची दारं उघडली. रामदेव बाबांचा जन्म बाडमेर जिल्ह्यातला. आणि समाधी पोखरणजवळच्या या रामदेवडा गावात!
इच्छापूर्ती झाल्यास इथे देवाला जीवंत घोडे अर्पण केले जातात.. मंदिर समितीनं या घोड्यांसाठी खास व्यवस्था केलेली आहे. विविध जातीच्या या घोड्यांची इथे काळजी घेतली जाते. मी ते सगळं ऐकून थक्क झालो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जसा शोषितांच्या हक्कासाठी लढले. तसंच रामदेव बाबा साडे सहाशे वर्षांआधी दीन दुबळ्यांचा आवाज बनले.
सौजन्य- फेसबुक
बाहेर जोरात वारं सुटलं... त्यामुळे आम्ही दारं खिडक्या बंद केल्या. तरीही सीटवर आणि अंगावर वाळूच वाळू झाली. सकाळी 11 च्या सुमारास श्री भादरिया लाठी या नावाचं स्टेशन आलं. या स्टेशनवर एक जण आमच्या डब्यात चढला. सगळ्यांमध्ये मी त्याला वेगळा वाटल्यानं माझ्याशेजारी येऊन बसला. माझ्या पेहरावावरून त्याला मी फिरायला आलोय हे कळलं. आमच्यात संवाद सुरू झाला.
"कहां से आये हो"?
मी म्हणालो "मुंबई"
तो क्या देखोगे जैसलमेरमें?
"आज तो तनोट जाना है। कल शहर घूम लूंगा"।
" अच्छा है!" असं उत्तर आलं.
मी मोठ्या उत्सुकतेनं विचारलं, की या वाळवंटात लोक राहतात कसे?
त्यावर तो म्हणाला "देखो, दिखता तो यह बंजर है लेकिन एक महिने बाद यहा आओगे तो यहा बाजरे की खेती होगी!"
मी विचारलं "पानी का क्या हाल है..? तो म्हणाला "पानी तो है, बोअरवेल को अच्छा पानी आता है।"
मला क्षणभर आपला उन्हाळ्यातला दुष्काळ आठवला.
मी सहजच बोलून गेलो.. "राजस्थान बडा ही सुंदर है।"
"हफ्ताभर घुमने आओगे तो अच्छाही लगेगा" गालातला गालात हसत त्याने मला शाब्दिक चिमटा काढला. तो म्हणाला त्यात तथ्यही होतं. दोन तीन तासातच मी वाळुने त्रासून गेलो. तिथे आयुष्य काढणं महत्कठिणच..
बघता बघता साडे बारा वाजले.. गाडी जैसलमेर स्टेशनवर आली होती. सगळ्यांचा निरोप घेऊन मी स्टेशनच्या बाहेर पाय ठेवला.. रामायणातल्या सुवर्ण लंकेसारखं अख्खं सोनेरी शहर माझ्या डोळ्यांसमोर होतं. आपण कोणत्या वेगळ्याच जगात आलोय की काय असा क्षणभर भास व्हावा..
रिक्षावाल्यांच्या कलकलाटाने मी भानावर आलो.. ज्या हॉस्टेलचं बुकिंग केलं होतं, तिथे जाण्यासाठी रिक्षा केली.. रिक्षातून जातानाही जैसलमेर नजरेत भरत होत.. आज हवेमध्ये वाळूच वाळू होती. जसं आपल्याकडे धुकं असतं ना तशीच मार्च ते ऑगस्टपर्यंत या भागात वाळू असते.. रिक्षावाल्याला विचारल्यावर "इसे आँधी कहेते है", एवढंच उत्तर त्याने दिलं. आखीव रेखीव रस्ते, सोनेरी रंगाची नक्षीदार घरं, कुठे रस्त्याच्या दुतर्फा सजलेली रंगीबेरंगी दुकानं तर कुठे चौकाचौकातल्या गाड्यांवरती मोठ्या प्रेमानं खिलवला जाणारा दाल पकवान. कुठे गरमागरम कचोरी तर कुठे पाणीपुरीचे ठेले.. बघता बघता मी सुवर्ण किल्ल्याच्या समोर आलो..
मी याच किल्ल्यात पुढचे दोन दिवस राहणार होतो. तुम्ही म्हणाल किल्ल्यात कसं राहणार? तर ते मी तुम्हाला उद्या जैसलमेर किल्ला आणि या शहराविषयीच्या पुढच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तूर्तास मी याच किल्ल्यात असलेल्या हॉस्टेलवर चेक इन केलं.
"तनोट जाना है। अभी बस मिल जायेगी?" मी रिसेप्शनच्या मुलाला विचारलं.
तो म्हणाला "हां मिल जायेगी! यहा किले के पिछेही बस स्टॉप है, 3 बजे एक बस जाती है और दुसरी 4 बजे.."
मी घड्याळात बघितलं 1 वाजला होता. तीनची बस पकडायची ठरवलं. पटकन सगळं आवरून अर्धा तास आराम केला. बॅगेत फळं होती. ती खाल्ल्यावर बरं वाटलं. दोन वाजता छोट्या बॅगेत कपडे भरून मी स्टेशनला निघालो. आजची रात्र मला तनोट मध्येच घालवायची होती. आता हे तनोट काय आहे?
तर मंडळी, तनोट हे भारत पाकिस्तानच्या सीमेवरचं शेवटचं गाव आहे. जैसलमेर शहरापासून 125 किमी अंतरावर तनोट गावात देवीचं मंदिर आहे. इथल्या तनोट देवीच्या कृपाशीर्वादाचा चमत्कार म्हणावा, असा इतिहास आहे. या मंदिराची देखभाल बीएसएफचे जवान करतात. आणखी बरंच काही तुम्हाला पुढे कळेलच.
तूर्तास मी जैसलमेरच्या बस स्टॉपवर पोहोचलो. दररोज दुपारी 3 आणि 4 वाजता बसेस तनोटला जातात. पण त्या रात्री परत येत नाहीत. देवीच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांची राहण्या खाण्याची व्यवस्था बीएसएफचे जवानच करतात. ते सुद्धा विनाशुल्क... सैन्यतळावर...आणि तेही भारत पाकिस्तानच्या सीमेवर. हा सगळा अनुभव घेण्याची माझी इच्छा आज पूर्ण होणार होती. बरोबर तीन वाजता बस निघाली. मात्र बसमध्ये पाय ठेवायलाही जागा उरली नाही.
खचाखच भरलेल्या बसमध्ये पुढच्याच चौकात एक बीएसएफचा जवान चढला. जवान बघितल्यावर मला खूप भारी वाटलं. बहुधा त्यालाही तनोटलाच जायचं होतं.. पण बसमधले लोक त्याला उभं राहायलाही जागा देत नव्हते. मी पटकन त्याला माझ्या सीटवर बसायचा आग्रह केला. तो हसत हसत नको म्हणाला. पण मी त्याला बसवलंच..
मी विचारलं "कहां जा रहे हो?"
"तनोट" बोलण्यावरून आणि कपड्यांवरच्या नावावरून तो बंगाली आहे हे मला कळलं..
त्यानंही विचारलं "आप कहा जा रहे हो?"
मी म्हटलं "आपके यहां तनोट माता के दर्शन करने!"
त्याला ते ऐकून बरं वाटलं. मोठ्या आपुलकीने तो म्हणाला, "रात आरती होने के बाद मिलना मुझे"
जैसलमेर शहरातून बस बाहेर पडली आणि रामगड रस्त्यावर धावू लागली. शहराच्या जवळच सहा किमीवर बडा बाग बस स्टॉप लागला. खिडकीतून बाहेर बघितल्यावर बडा बागच्या प्रसिद्ध छत्र्या नजरेस पडल्या.
या छत्र्यांबद्दल मी बरंच वाचलं होतं. 'गुलामी' सिनेमात याच बडा बागच्या छत्र्यांच्या समोरचं, अनिता राज आणि मिथुन चक्रवर्तीचं
"जिहाल-ए-मस्ती मकुन-ब-रन्जिश,
बहाल-ए-हिज्रा बेचारा दिल है।
सुनाई देती है जिसकी धड़कन
तुम्हारा दिल या हमारा दिल है।"
हे गाणं आठवलं. बसच्या टपावरुन ते दोघे खाली येऊन फिरस्त्यांच्या तांड्यावर ते गाणं ऐकायला येऊन बसतात. आत्ता इथे मात्र मला बसमधून उतरून तिथे जाता येणार नव्हतं कारण इथे बस फक्त पाच मिनिटंच थांबते.. हे गाणं आपल्या सगळ्यांना आवडतंच. त्या लोकेशनची उत्सुकता होतीच.. ती अशी अनेपेक्षितपणे पूर्ण झाली..
हा थोडा फिल्मी परिचय झाला.. पण ही 'बडी बाग' म्हणजे कधीकाळी राजा महाराजांची स्मशानभूमी होती. राज घराण्यातल्या कोणाचाही मृत्यू झाला, की त्याचे अंत्यसंस्कार करून तिथे एक छत्री उभारली जायची. आज मात्र 'बडी बाग' ही टुरिस्ट प्लेस बनलीय. सिनेमाचं शूटिंग, प्री वेडिंग किंवा साधा सेल्फी घ्यायलाही लोक 'बडा बाग'मध्ये येतात..
'बडा बाग'वरून बस सुसाट निघाली. अजून 120 किमी अंतर पार करायचं होतं. बाहेर वाळवंटात वारं जोरात वाहत होतं. कदाचित वादळाची शक्यता होती. आपला जवान गाढ झोपला. मध्येच उठून त्यानं मला बसायचा आग्रह केला, पण मी बसलो नाही. खिडकीतून मी हा सगळा परिसर न्याहाळत होतो. थारच्या या वाळवंटात राहायचं म्हणजे सोपं काम नाही. उन्हाळ्यात पारा इथे 48 अंशांपर्यंत जातो आणि हिवाळ्यात 5 अंशापर्यंत खाली! वाळवंटात फिरणाऱ्या गायी आणि हरणं बघून मला चर्रर्र झालं. इथल्या लोकांचं जगणं अक्षरशः काटेरी वाळवंटासारखं आहे..
मध्ये रामगड नावाचं गाव येऊन गेलं. तिथे बस थोडी रिकामी झाली. आता आपण तनोटच्या अगदी जवळ आलोय. पण त्याआधी 7 किमीवर घंटियाली मातेचं मंदिर लागतं. इथे बस 10 मिनिटांसाठी थांबली.
तनोट माता आणि घंटियाली माता या बहिणी आहेत अशी इथल्या लोकांची श्रध्दा आहे. या दोन देवींमुळे जैसलमेरची सीमा पाकिस्तानी सैन्य काबिज करू शकलं नाही, अशीही श्रद्धा इथल्या लोकांमध्ये आणि सैनिकांमध्ये आहे.
1965 सालच्या युद्धात पाकिस्तानी सैन्यानं या मंदिराची तोडफोड केली. पण थोड्याच वेळात ते सैनिक एकमेकांमध्ये भांडू लागले आणि गोळ्या झाडून त्यांनी एकमेकांचे जीव घेतले. तोडफोड करणारा एकही पाकिस्तानी सैनिक जीवंत परत गेला नाही. त्यानंतर काही पाकिस्तानी सैनिकांनी घंटियाली मातेचा साजश्रृंगार उतरवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा लगेच त्यांची दृष्टी गेली. हा इतिहास त्या भग्न मूर्तींच्या रुपात मंदिरात आजही अनुभवता येतो.
बसमध्ये उरलेले सगळे जण हे तनोटला जाणारे होते. आम्ही पुन्हा बसमध्ये बसलो तेव्हा तो जवान माझ्या शेजारी बसला. त्याला माझं कौतुक वाटत होतं, की दोन तास उभं राहून त्यानं मला जागा दिली. तो स्वत:बद्दल सांगू लागला.
"दो साल हो गए यहां पोस्टिंग है, यहां ड्युटी करना बहोत मुश्किल है। अभी बस डेढ साल बचा है। उसके बाद बिवी बच्चों के साथ रहूंगा।"
हे सगळं सांगताना त्याचा चेहरा कमालीचा खुलला होता. आपल्या घरापासून... माणसांपासून अशा कठीण परिसरात दिवसरात्र गस्त घालणं, किती मोठी गोष्ट आहे ही... एवढ्यात बस तनोट बीएसएफ चेक पोस्टच्या गेटसमोर येऊन थांबली..
संध्याकाळचे साडेपाच वाजत आले. अरुणाचल प्रदेशात उगवलेला सूर्य जैसलमेरमधल्या या थारच्या वाळवंटात विसावताना पाहण्याचं भाग्य मला लाभलं होतं..
तनोट मातेविषयी काय सांगू आणि किती सांगू असं होतं.. हे सारं भ्रम, अफवा, दंतकथा किंवा अंधश्रद्धा वगैेरे आहेत, असं काही जण म्हणतील. पण हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ सत्य आहे. कारण या प्रसंगाचे साक्षीदार भारताचे जवानच नाहीत तर पाकिस्तानचेही जवान आहेत. मरुभूमीवरचा हा महत्कठीण प्रसंग म्हणजे भारतीय सैनिकांच्या अतुल्य साहसासोबतच तनोट देवीच्या आशीर्वादाचं आणि चमत्काराचंही सोनेरी पान आहे. सीमेवरचं शेवटचं गाव तनोट गाव... या गावातल्या तनोट देवीची ही अविश्वसनीय कथा.
"हथियारोंका जवाब हम हथियारोंसे देंगे।" माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांनी जाहीर भाषणात पाकिस्तानला चेतावनी दिली. 1965 साली भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटलं. अमेरिका आणि चीनची चापलुसी करणाऱ्या पाकिस्तानकडे त्या युद्धात बराच आधुनिक शस्त्रसाठा होता. इकडे तीन वर्षांपूर्वीच भारतानं चीनशी कडवी झुंज दिली होती, त्यात दुष्काळानं जनता हैराण होती. अशावेळी भारताला हे युद्ध लढावं लागलं. या सगळ्या घडामोडीमध्ये राजस्थानच्या सीमेवर असं काही अद्भूत घडत होतं, की पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकली..
1965 च्या युद्धात पाकिस्तानचं लक्ष्य जरी काश्मीर होतं तरी गुजरातच्या भूज पर्यंतची सीमा धगधगत होती. अशातच पाकिस्तानने आपल्या तोफांची तोंडं तनोट गावाकडे वळवली. तोफांचा मारा इतका प्रचंड होता, की मंदीर परिसरातच 450 बॉम्ब टाकण्यात आले. युद्धात पॅटर्न टॅन्क, मीडियम आर्टिलरी, पील्ड आर्टिलरी, लाईट मॉर्टर्स, आणि हॉविट्सरचा वापर केला जात होता. पाकिस्तानी टॅन्कमधून बॉम्ब निघत होते, पण जिथे बॉम्ब पडत ते फुटत मात्र नव्हते. याच फ्रस्ट्रेशनमध्ये पाकिस्तानी सैन्यानं 450 बॉम्ब टाकले, मात्र चमत्कार म्हणावा, तसा एकही बॉम्ब फुटला नाही.
हेच ते न फुटलेले बॉम्ब
त्या दिवशी तनोटमध्ये 8 सैनिक झाडाखाली थांबले होते, ते आठही सैनिक तो अद्भूत प्रसंग आपल्या डोळ्यांनी पाहत होते. सैनिकांच्या शेजारी येऊन पडणारे बॉम्ब काही साधे नव्हते, त्यातला एक जरी फुटला असता तरी सैनिकांचं वाचणं मुश्किल होतं. तिकडे पाक सैनिकांना कळतच नव्हतं, की चार भिंती आणि झाडामध्ये अशी काय शक्ती आहे की एकही बॉम्ब फुटू नये?, भारताने असं कुठलं तंत्र विकसीत केलंय? या प्रश्नाने त्यांची उद्विग्नता वाढत होती. बाजूच्या परिसरातही पाकिस्तानी सैन्यानं बॉम्बचा पाऊस पाडला. पण परिणाम शून्य.. कोणाला साधं खरचटलंही नाही की साधा खड्डाही पडला नाही, तब्बल तीन हजार बॉम्ब तनोट देवीच्या मंदिर आणि आजूबाजूच्या परिसरात डागले गेले होते, हे नंतर मोजल्यावर कळलं. त्यातले काही बॉम्ब आजही मंदिरात ठेवण्यात आले आहेत. अनेक लोक यामध्ये विज्ञान शोधतील. पण ते बॉम्ब किती शक्तीशाली आहेत, हे शत्रूला माहित होतं. म्हणूनच युद्धानंतर पाकिस्तान सैन्याचे जनरल तनोट देवीसमोर नतमस्तक झाले आणि त्यांनी देवीच्या माथ्यावर छत्रीही बसवली.
सन 828 मध्ये देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली. तनोट ही चारन समुदायाच्या लोकांची वस्ती होती. ज्यांची कुलदेवी हिंगलाज देवी! पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात आजही हिंगलाज देवीचं मोठं मंदिर आहे. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लजलाही या देवीचं मोठं मंदिर आहे. गडावर वसलेल्या हिंगलाज देवीमुळेच गावाला गडहिंग्लज नाव पडलंय. तर तनोटच्या चारन समुदायाची कुलदेवता हिंगलाज देवी. तिची पुढे करणी माता झाली आणि मग तिला तनोट माता नावानं ओळखलं जाऊ लागलं.. असं म्हणतात, की तनोट देवी ही हिंगलाज देवीचंच एक रूप आहे.
राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : माऊंट अबू
1965 युद्धानंतर सीमा सुरक्षा बल (BSF) ची स्थापना झाली. देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमेची जबाबदारी बीएसएफकडे सोपवण्यात आली. त्यामुळे तनोट माता मंदिराची जबाबदारीही बीएसएफकडे देण्यात आली. म्हणूनच मंदिरात अगदी पुजाऱ्यापर्यंत सगळे बीएसएफचे जवानच आहेत.
1971 च्या युद्धातही जे घडलं त्याला बीएसएफचे जवान देवीचा आशीर्वादच मानतात. तनोटच्या शेजारी 10 किमीवर लोंगेवाला आऊटपोस्ट आहे. 71 साली पाकिस्ताननं लोंगेवालामार्गे भारतात घुसण्याचा प्रयत्न केला. जवळपास 3 ते 4 दिवस लोंगेवालापासून तनोटवर शेलिंग सुरू होतं. 4 डिसेंबरच्या त्या रात्री लोंगेवाला आऊटपोस्टवर 23 पंजाबच्या एक तुकडीचे फक्त 120 सैनिक तैनात होते. समोरून पाकिस्तानचे 2 हजार सैनिक चाल करून येत होते, त्यांच्याकडे 90च्या आसपास टॅन्क आणि ट्रक होते. आपल्या मुठभर सैनिकांच्या वीरतेसोबत ही श्रद्धा ही कामी आली. सैनिकांच्या म्हणण्यानुसार तनोट मातेच्या आशीर्वादानेच पाकिस्तानकडे चाल करून आलेले टॅन्क वाळवंटात फसायला लागले. भारतीय वायूसेनेच्या हंटर विमानांनी या टॅन्कवर बॉम्ब टाकले. पाकिस्तानचे 90 ट्रक आणि टॅन्क जागेवरच उध्वस्त झाले. यात पाकिस्तानचे 200 सैनिक मारले गेले. अर्थात या सगळ्या गोष्टी मान्य करणं किंवा न मान्य करणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय. पण बीएसएफची देवीवर नितांत श्रद्धा आहे आणि म्हणूनच 1971 च्या युद्धानंतर इथे तनोट विजय स्तंभ उभारण्यात आलाय
जरा आता दुसरी बाजू बघुया. बॉम्ब वाळूमध्ये पडल्यानंतर ते फुटण्याची आणि फुटल्यावर हानी होण्याची शक्यता कमी असते. म्हणूनच अणुचाचणीसाठी पोखरणसारख्या वाळवंटी भागाची निवड करण्यात आली होती. पण हा वरचा तर्क मान्य केला तर गल्फ देशांच्या सीमांना कुठलाच धोका नसता. 3 हजार बॉम्बपैकी एकही बॉम्ब मंदिरावर, शेजारच्या झाडावर, झाडाखालच्या सैनिकावर कसा पडला नाही. हा प्रश्नही आहे.
'बॉर्डर'सिनेमात ज्या विहिरीजवळ बॉम्ब पडतात, ती विहीरही मंदिराच्या समोरच आहे. या सिनेमाचं चित्रिकरणही तनोट आणि लोंगेवाला परिसरातच झालंय. 'बॉर्डर' सिनेमात विहीर आणि तनोट माता मंदिराची दृश्यं आपण पाहिली असतील.
तर्क शोधायचा असेल तर आपण कुठलेही तर्क लावू शकतो. पण या मंदिरात येऊन विसावणं, हा विलक्षण अनुभव आहे. ज्या झाडाखाली सैनिक थांबले होते त्या झाडाला लोक रूमालात नाणं बांधून नवस मागतात. इच्छा पूर्ण झाली, की लोक तो रूमाल सोडायला पुन्हा परत येतात.
तनोट मातेची आरती हा एक विलक्षण अनुभव असतो, एक तासभर चालणारी ही आरती वीर रसानं ओतप्रोत असते. आणखी एक महत्वाचं, मंदिराच्या सभामंडपातच पीर बाबांची समाधी आहे. हिंदू मुस्लिम असं इथे काहीच वेगळं नाही. हे पीर बाबा देवीचे सेवक होते असं म्हणतात.
आता योगायोग म्हणाल तर ते पण ठीक आहे. आपल्या घरापासून रणरणत्या उन्हात वाळवंटात आपण 5 मिनटंही तग धरू शकत नाही. अशा प्रदेशात तनोट माता सैनिकांची आई आहे. शेवटी श्रद्धा अंधश्रद्धेच्या मधली रेषा हीच आस्था असते. हीच आस्था माणसाला जगण्याचं बळ देते.
संध्याकाळी आरती झाल्यावर सगळ्या भाविकांनी मिलिटरी कॅन्टिनमध्ये जेवण केलं. फक्त 80 रुपयात पोटभर जेवण...
जेवल्यानंतर गेस्ट हाऊसमध्ये भाविकांनी गर्दी केली. गेस्ट हाऊसची जबाबदारी असलेल्या जवानाने कुटुंब आणि महिला यांना आधी रुम्स दिल्या. त्यानंतर इतरांना गादी आणि चादर देऊन गेस्ट रुमच्या गच्चीवर झोपायला सांगितलं. अत्यंत हवेशीर गच्चीवर गादी टाकून मी तसाच पडलो. दिवसभराची धावपळ आणि 500 किमीचा प्रवास आणि त्यानंतर तनोटला आल्याचं समाधान.. सगळे विचार मनात चालू असताना मी कधी झोपलो मलाच कळलं नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळीच पाच वाजता पुन्हा देवीची आरती. पुन्हा तोच विलक्षण अनुभव.. खूप सारी उर्जा देणारा..
सकाळी साडेसहा वाजता मी आणि काही भाविक चेक पोस्टच्या बाहेर पडलो. परतीच्या मार्गाला.....
आपणही कधी जैसलमेरला गेलात तर एकदा या परिसरात नक्की जा. चॅटिंग केल्याशिवाय ज्यांना २ मिनटंही राहावत नाही अशांनी शक्यतो या परिसरात जाणं टाळावं. कारण बीएसएनएलशिवाय कुठलंही सिमकार्ड इथे चालत नाही, आणि तुमच्याकडे बीएसएनएल नाही हे मला माहित आहे.
असो, सकाळी ७ वाजता जैसलमेरकडे मी निघालो.. खूप सारी ऊर्जा घेऊन..
आज मला जैसलमेर फिरायचं होतं. त्यामुळे ब्लॉगच्या पुढच्या भागात जैसलमेरची सफर..
आजचा खर्च-
रिक्षा भाडे - 50 रु
जैसलमेर हॉस्टेल रेन्ट - 550 रु
जैसलमेर ते तनोट बस - 120 रु
रात्रीचं जेवण - 80 रु
प्रसाद आणि इतर खर्च - 100 रु
तनोट ते जैसलमेर - 120 रु
---------------------
एकूण खर्च - 1020 रु
---------------------
तळटीप- भटकंतीचा अर्थ कुठलाही विचार न करता बॅग उचलून बाहेर पडणं. जग बघण्याची भूक असलेल्यांना पोटाच्या भुकेची चिंता नसते, त्यामुळे कधी राहण्याचे तर कधी खाण्याचे हाल होऊ शकतात. जाडजूड गादीवर झोपणाऱ्यांनी भटकंती करणं टाळावं. तुम्ही टूरिस्ट होऊ शकता ट्रॅव्हलर नाही. तुम्ही पक्के ट्रॅव्हलर असाल तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच..
हे ही वाचा
राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : माऊंट अबू
![राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जैसलमेर - भाग एक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/08/04135155/photo-1.jpg)
![राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जैसलमेर - भाग एक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/08/04135819/WhatsApp-Image-2019-08-04-at-12.14.00-PM.jpeg)
![राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जैसलमेर - भाग एक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/08/04140255/photo-3.jpg)
![राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जैसलमेर - भाग एक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/08/04134857/photo-4.jpg)
![राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जैसलमेर - भाग एक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/08/04134904/photo-5.jpg)
![राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जैसलमेर - भाग एक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/08/04135357/photo-6.jpg)
![राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जैसलमेर - भाग एक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/08/04134910/photo-7.jpg)
![राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जैसलमेर - भाग एक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/08/04135825/WhatsApp-Image-2019-08-04-at-12.15.25-PM-1024x768.jpg)
![राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जैसलमेर - भाग एक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/08/04135830/WhatsApp-Image-2019-08-04-at-12.17.06-PM.jpeg)
![राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जैसलमेर - भाग एक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/08/04135841/WhatsApp-Image-2019-08-04-at-12.19.22-PM.jpeg)
![राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जैसलमेर - भाग एक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/08/04135847/WhatsApp-Image-2019-08-04-at-12.22.18-PM.jpeg)
![राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जैसलमेर - भाग एक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/08/04135858/WhatsApp-Image-2019-08-04-at-12.25.58-PM.jpeg)
![राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जैसलमेर - भाग एक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/08/04135904/WhatsApp-Image-2019-08-04-at-12.27.20-PM.jpeg)
![राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जैसलमेर - भाग एक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/08/04135927/WhatsApp-Image-2019-08-04-at-12.33.10-PM.jpeg)
![राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जैसलमेर - भाग एक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/08/04135910/WhatsApp-Image-2019-08-04-at-12.29.49-PM-225x300.jpg)
![राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जैसलमेर - भाग एक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/08/04135916/WhatsApp-Image-2019-08-04-at-12.30.28-PM.jpeg)
![राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जैसलमेर - भाग एक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/08/04135922/WhatsApp-Image-2019-08-04-at-12.31.38-PM.jpeg)
![राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जैसलमेर - भाग एक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/08/04135937/WhatsApp-Image-2019-08-04-at-12.35.46-PM.jpeg)
![राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जैसलमेर - भाग एक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/08/04135943/WhatsApp-Image-2019-08-04-at-12.37.39-PM.jpeg)
![राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जैसलमेर - भाग एक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/08/04135948/WhatsApp-Image-2019-08-04-at-12.39.11-PM.jpeg)
![राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जैसलमेर - भाग एक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/08/04135159/photo-24.jpg)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)