Blog : शहीद शरीराच्या अंगावर कधी सरकन शहारे येतील काय?
कळायला लागलं तेव्हापासूनचं त्याचं स्वप्न...फक्त स्वप्न नाही तर तो कष्ट घेऊन तशी प्रचंड तयारीही करतो.मग या बळावर शॉर्ट सर्व्हिस कमिशनची (SSC) कठीण परीक्षा पास होतो, SSB चा अवघड इंटर्व्ह्यूही क्लिअर करतो आणि इंडियन आर्मीत डायरेक्ट "लेफ्टनंट" म्हणून रुजू होतो. आयुष्यातला अत्युच्च आनंदाचा क्षण. पुढे आपल्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर तो प्रमोशन मिळवून भारतीय सैन्यात "मेजर" होतो. हे होत असतानाच देशाच्या अजून कुठल्या एका भागात "ती" MBA करत असते. ते पूर्ण करून पुढं मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये प्रथितयश होते.
पुढं या दोघांची भेट होऊन, प्रेम होऊन, लग्न होऊन 8-10 महिने होत नाहीत तोवर हा ड्युटीला असलेल्या भागात अचानक अतिरेक्यांचा हल्ला होतो, देशातल्या सैनिकांवरचा आजवरचा सर्वात मोठा, जबरदस्त आणि घातकी हल्ला, ज्यात एकाच वेळी पापणी लवण्याआधी एका क्षणात 40 जवान मारले जातात आणि 35 जवान गंभीररित्या जखमी होतात. कारण सैनिकांची संपूर्ण बस अतिरेक्यांकडून 300 किलो RDX आणि अमोनियम नायट्रेटच्या तीक्ष्ण बॉम्बने उडवून दिली जाते.
या बॉम्बच्या स्फोटाने "तुटून लांब फेकले गेलेले हात","नेमके कोणत्या जवानाचे आहेत?" हे अजून दुसरीकडे कुठेतरी पडलेल्या इतर अनेक हात पाय नसलेल्या शरीरांना जोडून पाहून तपासावे लागतात. म्हणजे कोणते हात कोणत्या जवानाचे, कोणते पाय कोणत्या जवानाचे हे कळायलाही मार्ग नसतो" अन् मग ते असे इकडून तिकडून हात, पाय, शरीर-डोकं सगळं विखुरलेलं शोधून, एकमेकांना जोडून 'कसंबसं माणूस वाटेल' असं तयार केलेलं शरीर मग त्या-त्या कुटुंबाला शेवटचा अग्नी देण्यासाठी द्यायचं. लोक म्हणतात डॉक्टर्सचे हात थरथर कापत नसतात, खरंय.
घाबरून नसतील ही कापत कदाचित, पण अतिरेक्यांची ही क्रूरता बघून, असली तुटलेल्या -मृत पोकळ शरीरांची नुसती वरची कातडी दोऱ्याने शिवताना त्यांच्याही गालावरनं नकळत अश्रू ओघळतच नसतील काय? असा जवान अन् जवान म्हणजे देश असेल तर असा - फाटलेला देश शिवताना त्या डॉक्टरचे हात थरथर कापत नसतीलच काय??) इतका अन असला तीव्र अन विचित्र हल्ला. सगळा देश काय, या हल्ल्याने आखं जग हदरलेलं असतं.
भारत सगळे इंटेलिजन्स गोळा करून, सगळी सूत्रं हलवून काही तासात माहिती काढतं की या पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड घटनेच्या भागातच आसपास कुठेतरी आहे. त्याला शोधण्याची जबाबदारी भारतीय सेनेच्या "55 राष्ट्रीय रायफल" मध्ये मेजर असलेल्या "याच्या" टीम वर येते... मोजुन 4 दिवसात हे त्या पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड म्हणजे जैशचा प्रमुख कमांडर "कामरान" जो मौलाना अझरचा काश्मीर मधला उजवा हात मानला जातो... त्याला आणि त्याच्या इतर अतिरेकी साथीदारांना शोधून काढतात.
याच्या सोबत अजून काही सैनिक असतात. अचानक फायरिंग सुरू होते, जोराचं युद्ध होतं, युद्धच कारण दोन्ही बाजूने अनेक सैनिक आणि अतिरेकी एकमेकांवर तुटून पडलेले असतात. हे युद्ध एक-दोन नाही तर तब्बल 20 तास चालतं. पण बदल्याची भावना तीव्र असते. "कामरान पळून जाण्यात यशस्वी होऊ नये!" म्हणून न राहवून हा समोर घुसतो अन आपल्या बंदुकीतून कामरानच्या नेमक्या छाती आणि डोक्याचा वेध घेतो.
पुलवामा हल्ला ज्याने घडवून आणला त्या कामरानला कसाब सारखं मुंबईत 1200 दिवस बिर्याणी खात न ठेवता. हल्ल्याच्या फक्त 96 तासात हा त्याला यमसदनी झाडतो.
पण हे सुरू असताना अन कामरानला टिपताना समोरून अचानक आलेल्या अतिरेक्यांच्या दोन गोळ्या- एक पोटात तर दुसरी डायरेकट याच्या मानेतून मांस घेऊन बाहेर पडते होते... हा दवाखान्यात नेस्तोवर शहीद झालेला असतो. जे काश्मीर आपलं माहेर -तिथंच तिच्या नवऱ्याला संपवलं जातं, सोबत आणखी तीन जवान शहीद होतात.
इकडे 4 दिवस आधी झालेल्या पुलवामा हल्ल्याचं दुःख असलं तरी "आपला नवरा त्या बस मधे नव्हता" याचा झालेला थोडाथोडका आनंद दैवाने तिच्याकडून लगेच हिरावून नेलेला असतो. कारण डेहराडून ते दिल्ली अशा प्रवासातच तिला आपला नवरा अतिरेक्यांशी लढताना शहीद झाल्याचं कळतं. हिचं वय 27, लग्नाला अजून 9-10 महिनेही झालेली नाहीत. संसाराची स्वप्न पाहणं सुरू व्हायच्या आत तर यांचं संपूर्ण जग उध्वस्त झालेलं असतं. नवरा शहीद झाल्याची बातमी हिला सांगितली जाते .एका क्षणात सगळं आयुष्य संपतं, एकाचं शरीरानं मरण, अन मागे राहिलेल्याचं मनाने. घरातल्या भिंतीवर लावलेल्या, मरनोपरांत त्याला मिळालेल्या या "शौर्यचक्रा"कडे रोज बघून तिला अभिमान वाटावा की दुःख?
पण आपल्या नवऱ्याचं देशसेवा करण्याचं वेड तिला माहीत असतं, ती काही दिवसात कशीबशी अर्धवट का होईना स्वतःला सावरते. तिचा जॉब चांगल्या MNCत असतो, पण अजून रडायचे दिवस संपलेले नसतानाही ती सहा महिन्यातच सर्व्हिस कमिशनचा SSC फॉर्म भरते. कळायला लागलं तेंव्हापासनचं "त्याचं स्वप्न..आता हीचं स्वप्न होतं.". फक्त स्वप्न नाही तर ती कष्ट घेऊन तसं प्रचंड तयारीही सुरू करते. मग या बळावर सर्व्हिस कमिशनची कठीण परीक्षा पास होते, SSB चा इंटर्व्ह्यू अवघड असतो पण ही धाडसाने सामोरी जाते, कुठलंही कारण न मागता किंवा पतीच्या शहीद होण्याच्या भावनेचं भांडवल न करता स्वतःच्या ज्ञानावर आणि केलेल्या अभ्यासावर इंटर्व्हिव देते, रिजल्ट अजून आलेला नसतो, याच्या आठवणीत दिवस जात असतात.
नवरा गेल्यापासून कायम दुःख झेलत असलेल्या हिच्या कानावर खूप दिवसातनं मात्र एक आनंदाची बातमी येते. तीचं सलेक्शन झालेलं असतं. आपला कॉर्पोरेटचा जॉब सोडून मग ती "ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी" चेन्नईला मिलिटरी ट्रेनिंग साठी जाते. जिथं नवरा होता तिथंच, त्याच जागी, हे ट्रेनिंग एवढं खडतर असतं की देशसेवा मनात असूनही आणि सर्व गरजेची तयारी केलेली असूनही काहीजण या कष्टाला अन कठीण ट्रेनिंगच्या त्रासाला सोडून मधेच निघून जातात किंवा अपरिपकव म्हणून सेनेकडूनच काढून टाकले जातात. एक दिवस एका वर्षापेक्षा कठीण-- तिथं तब्बल साधारण 1 वर्षाचं हे खडतर ट्रेनिंग. अशा ठिकाणी ही आपल्या हिमतीच्या आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर ते सगळं ट्रेनिंग पूर्ण करते!
तिला SSB च्या इंटर्व्ह्यू वेळी विचारलं जातं की तुला हेच? सैन्यात यायचंच होतं अन त्यातूनही SSBथ्रूच का यायचं होतं? तिचं उत्तर अत्यंत सुंदर असतं. ती म्हणते "माझा नवरा साधा माणूस ते या सर्व परीक्षा देऊन लेफ्टनंट होण्यापर्यंत या सर्व फेज मधून जाताना त्याच्या मनात तेव्हा भूतकाळात नेमके त्या-त्या वेळी कोणते विचार आले असतील? ते मला आणखी जवळून अनुभवायचे होते.. त्याद्वारे मला तो अजूनही जवळच आहे असं वाटून घ्यायचं होतं... देशसेवा करताना, इकडं हजारो किलोमीटर दूर असताना त्याला नेमकं काय वाटत असेल हे सर्व अनुभवायचं होतं.
म्हणूनच मला आता हा सर्व्हिस कमिशनचा पेपर लिहिताना, अभ्यासाची तयारी करताना, इंटर्व्ह्यू देताना त्याला काय वाटलं असेल, हे सगळे विचार एकदम जवळून अनुभवता आले आणि हे सगळं मी केलं तेव्हा मी त्याच्याशी मनाने अजून आणखी घट्ट "कनेक्ट" झाले. हा संपूर्ण काळ, प्रत्येक पायरी पार करताना मला तो माझ्याजवळ आहे असं वाटायला लागलं."
हे सगळं पूर्ण करून, एका वर्षांच्या कठीण काळानंतर, आज तो दिवस आहे ज्या दिवशी तिच्या अंगावर इंडियन आर्मीचा हा प्रतिष्ठित ड्रेस चढलेला आहे, खांद्यावर स्टार्स लागले आहेत. ती आज इंडियन आर्मी मध्ये "लेफ्टनंट" या पदावर अधिकारी झालीय. स्वतःच्या जोरावर स्वतःच्या हिंमतीवर. अन नवरा ज्या संपूर्ण प्रोसेस मधून गेला, परीक्षा, ट्रेनिंग आणि एवढंच काय पण ज्या "पदावर" गेला, ते प्रत्येक पाऊल फॉलो करत ही पण आज exactly त्याच पदावर रुजू होतेय, "लेफ्टनंट इन इंडियन आर्मी"
हा.. शहीद नवरा आहे, " मेजर विभूती शंकर दौंडियाल" आणि ही वीर पत्नी आहे. त्याची अवघ्या 29 वर्षात इंडियन आर्मी मध्ये लेफ्टनंट झालेली "निकिता कौल-दौंडियाल" विशेष हे की स्वतः निकिताच्या कुटुंबालाही काही वर्षांपूर्वी या काश्मीर मधून काश्मिरी पंडीत म्हणून हाकलून देण्यात आलं होतं.
ज्यांनी निकिताच्या खांद्यावर हे स्टार्स चढवले त्या नॉर्दन कमांड प्रमुख YK जोशीं सारख्या व्यक्तीने कोणाला समोर उभं राहून "I am Really Proud of you" म्हणणं याईतक्या मोठ्या आज जगात फार कमी गोष्टी आहेत. टीप: भारतीय सेना जॉईन करताना सैनिकांची विधवा म्हणून एकही लिटरली एकही कन्सेशन मिळत नाही आणि सेनेकडून कसलीही सुट दिली जात नाही. भारतीय सेना जगातली One of the most प्रोफेशनल सेना म्हणून ओळखली जाते.
फक्त भावनेच्या जोरावर इथं जॉईन करता येत नाही. भावना कितीही स्ट्रॉंग असली तरी , तुमचा मुलगा, मुलगी, नवरा, बायको, वडील, आई असं देशासाठी कुटुंबातलं कोणीही शहीद झालं असलं तरी , त्या भावनेच्या एनर्जीचं रूपांतर तुम्हाला शारीरिक ताकदीत आणि मानसिक सहनशक्तीत करता आलं, इंडियन आर्मीचं ठरलेलं खडतर ट्रेनिंग पूर्ण करता आलं तर अन तरच हा इथला दरवाजा उघडतो. हो फक्त एक एक्ससेप्शन मात्र असतं की अशा विधवा पत्नीला वयाची अट गरज असेल तर "कमी" केली जाते, वाढवली नाही कमी केली जाते हे इथं महत्वाचं आहे.
तिला इंटरव्ह्यूमध्ये सुरुवातीचे अभ्यास, आर्मी, ट्रेनिंग वगैरे असे संबंधित प्रश्न विचारून झाल्यावर शेवटचा प्रश्न विचारला गेला होता की तुझं लग्न होऊन किती दिवस झाले? ती म्हणते 2 वर्ष, ते म्हणतात, आम्ही ऐकलं की फक्त 9-10 महिन्यातच मेजर विभूती शहीद झाले होते. मग 2 वर्ष कसे? तेव्हा ती म्हणते "विभू गेला, मृत झाला म्हणजे आमचं लग्न संपलं नाही. तो आहे, सोबत आहे. त्याच्या मृत्यूने फक्त शरीर दूर गेलं, मन इथंच राहिलं. म्हणूनच आमच्या लग्नाला आजवर 10 महिने नाही तर 2 वर्ष झालीत."
"आपला जीव ज्या गोष्टीत गमावला, आपण शहिद झालो, त्याच बंदुकीचा, गोळीचा रोज सामना करण्यासाठी आपल्या पत्नीनं आयुष्यभराची चांगली MNC नौकरी सोडून ट्रेनिंगचे एवढे खडतर प्रयत्न करावेत, आणि आपलं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकदाच मिळणारं हे अमूल्य उर्वरित आयुष्य त्या कार्याला अर्पण करावं,"
आज जेव्हा निकिताच्या खांद्यावर लेफ्टनंट पदाचे हे स्टार्स चढवले जात होते, ते पाहून खरंच विभूतीच्या शहीद अंगावर वरचा विचार करून शहारे आलेच नसतील काय.??? आपल्या पत्नीच्या खांद्यावर ते स्टार्स चढवले जात असताना एक क्षण तरी आज आपण जिवंत असायला हवं होतं असं वाटलंच नसेल काय?
नवरा मेल्यावर सती जाण्यापासून ते आज नवरा मेल्यावर सैन्यात त्याच्याच जागी भरती होण्यापर्यंतचा भारतीय स्त्रीचा हा अद्भुत प्रवास गेल्या 1000 वर्षातली भारतीय समाजातली सर्वात मोठी गोष्ट आहे!