INDIA : इंडिया आघाडी मोदींचा वारु कसा रोखणार? अरिथमेटिक जिंकणार की केमिस्ट्री?
INDIA : देशातील सध्याच्या राजकीय घडामोडी बघितल्या की प्रसिद्ध रशियन लेखक, नाटककार अंतॉन चेकॉव्ह याचं शे-सव्वाशे वर्ष जुनं वाक्य आठवतं...अंतॉन म्हणतो.. Love, friendship and respect do not unite people as much as a common hatred for something. याचा अर्थ आहे, एखाद्याबद्दलचं प्रेम, मैत्री आणि आदर यापेक्षाही जास्त एखाद्या बद्दलचा सामाईक द्वेष लोकांना चटकन एकत्र आणतो. पाटणा, बंगळुरुनंतर मुंबईत दोन दिवस 26 पक्षांना एकत्र आणणारा- जोडणारा असाच समान धागा म्हणजे मोदी विरोध.
2024 सालची लोकसभा निवडणूक अवघ्या सात-आठ महिन्यांवर येऊन ठेपलीय. 2014 आणि 2019 प्रमाणे 24 मध्ये सुद्धा मोदी मॅजिक चालेल का हा यक्ष प्रश्न विरोधकांसमोर आहे. या मोदी मॅजिकला निष्प्रभ करायचं असेल तर सर्वांनी एकत्र येऊन लढायला हवं या विचाराने विरोधक एकवटले आहेत. त्यांची संख्याही वाढते आहे. कर्नाटक विधानसभेत भाजपला हरवल्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढलेला आहे, नेहेमीचा आत्ममगपणा, राष्ट्रीय पक्ष असल्याचा अहंकार बाजुला ठेवत, प्रसंगी कमीपणा घेत सर्व पक्षांची मोट बांधण्याचा चंग काँग्रेसच्या नेत्यांनी बांधला आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला होता, त्याच धर्तीवर अंतर्विरोध विसरुन एकत्र आलो तर देशपातळीवर मोदींचा आणि भाजपचा वारु रोखणं शक्य आहे असा विश्वास विरोधकांना वाटतोय. इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. बुधवारी दुपारी 4 वाजता महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषदही असणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला देशातील 26 पेक्षा जास्त पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीत सहभागी होणार आहेत. ग्रँड हयात इथं होणाऱ्या बैठकीत ईशान्य भारतातील आणखी काही पक्ष इंडिया आघाडीत सहभागी होण्याची शक्यता आहे.
या बैठकीत इंडिया आघाडीचा नवा लोगो, तसंच मोदींविरोधातील नेता सुद्धा ठरणार आहे. संयोजक हा पंतप्रधानपदाचा उमेदवार असेलच असं नाही पण पंतप्रधानपदासाठी अनेक दावेदार असल्यामुळे ही निवड वाटते तितकी सोपी नसेल. मोदींना आणि भाजपला हरवण्यासाठी तडजोड करण्याशिवाय पर्याय नाही हे या नेत्यांच्या लक्षात आलं असल्यानं प्रत्येक जण खळखळ न करता पुढे जात आहे. "पदाच्या अपेक्षेनं नाही तर शक्य तेवढ्या पक्षांना एकत्र आणणं हेच ध्येय असल्याचं नितीश कुमारांनी सांगितलंय. "मोदींची हुकुमशाही मोडून काढायची आहे, आमच्याकडे भाजपसारखा एकच चेहरा नाही तर बरेच चेहरे आहेत" असं खासदार संजय राऊत म्हणालेत.
मोदी विरोधी पक्षांच्या पाटण्यातील पहिल्या बैठकीत 15 पक्ष सामील झाले होते. बंगळुरुतील दुसऱ्या बैठकीत ती संख्या 26 वर पोहोचली. त्या बैठकीतच UPA चे Indian National Developmental Inclusive Alliance म्हणजे इंडिया असं नवं बारसं केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील बैठकीकडून जास्त अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.
शरद पवार, नितीश कुमार, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी असे पंतप्रधान बनण्याची क्षमता असलेले आणि आस असलेले अनेक महत्वाकांक्षी नेते इंडिया आघाडीत आहेत. अशा दिग्गजांमधून मोदींसमोर स्पर्धेत शेवटपर्यंत टिकू शकेल असं एक नाव निवडणं आणि त्याच्यामागे ठामपणे उभं राहणं हे दिव्य काम इंडिया आघाडीला पार पाडावं लागणार आहे.
जुलैमध्ये बंगळुरुत झालेल्या विरोधकांच्या बैठकीवर स्वत: पंतप्रधान मोदींनी खरपूस टीका केली होती. विरोधक विकासविरोधी आहेत, स्वत:चा परिवार वाचवण्यासाठी सगळे भ्रष्टाचारी एकत्र आले आहेत असं मोदी म्हणाले होते. 'एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते है लोग' या गाण्याची आठवणही त्यांनी काढली होती. ही इंडिया नाही तर घमंडिया आघाडी असल्याची टीकाही मोदी आणि भाजपने सुरु केलीय. मोदी विरोधकांनी 2024 ची लढाई INDIA विरुद्ध NDA असेल असं जाहीर केलंय. विरोधकांची एकजूट पाहूनच मोदींना आपला पवित्रा बदलावा लागला असा दावाही मल्लिकार्जुन खर्गेंनी केलाय.
एनडीएच्या विखुरलेल्या 38 छोट्यामोठ्या पक्षांना एकत्र आणावं लागलं हे विरोधी पक्षांचं यश असल्याचं मोदी विरोधकांना वाटतंय. मोदींच्या विरोधात कोणता चेहरा घेऊन उतरतात हे दोन दिवसात स्पष्ट होईलच. मुंबईतल्या इंडिया आघाडीच्या बैठकीनंतरच लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होईल. राजकीय गणितात कधीच दोन अधिक दोन चार होत नसतात हे आपण ऐकून आहोत..त्यामुळे 2024 ला अरिथमेटिक जिंकेल की केमिस्ट्री हे बघणं रंजक ठरणार आहे.
याच लेखकाचा हा ब्लॉग वाचा: