Maharashtra Politics NCP : हा खेळ समजेल का कुणाला?
गल्ली ते दिल्ली चर्चा सुरु आहे ती महाराष्ट्राच्या राजकीय पटावर सध्या सुरू असलेल्या सर्वात मोठ्या बुद्धीबळाच्या डावाची... एकीकडे आहे या खेळाचा ग्रँड मास्टर, या खेळाचा अनभिषिक्त सम्राट...समोरच्या पटावर जे दिसतंय त्यापेक्षा कितीतरी वेगळ्या, कितीतरी पुढच्या चाली ज्यांच्या डोक्यात सुरु असतात असे शरदचंद्र गोविंद पवार. तर दुसरीकडे आहेत त्यांच्याच पक्षातले, त्यांच्याच घरातले, त्यांच्याच तालिमीत अनेक वर्ष तयार झालेले नेते. 2019 च्या पहाटेच्या शपथविधीनंतर शरद पवारांनी पक्षात आणि राज्यात नवे डाव नव्या चालींना सुरुवात केली. अजितदादांभोवती भक्कम तटबंदी करणं सुरु केलं. मात्र फक्त ती तटबंदीच नाही तर पक्षही फोडण्यात अजितदादांना यश आलं. पण सहजासहजी हार मानतील ते शरद पवार कसले. त्यातूनच रोज नवा डाव,नवी चाल, शह, काटशह, रोज नवी विधानं, रोज नवे संकेत देणं, संभ्रम वाढवणं सुरु आहे.
सुप्रिया सुळे,शरद पवार यांची सगळी वक्तव्य ऐकून तुमचं डोकं गरगरत असेल तर यात तुमचा काहीही दोष नाही. हा गुंता कायम राहावा अशीच कदाचित राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि पवार परिवाराचे कुटुंबप्रमुख शरद पवार यांची इच्छा असू शकते. साध्या साध्या गोष्टींमध्ये पवार साहेबांना नक्की काय म्हणायचंय याचा अर्थ भल्या भल्यांना लागत नाही, इथे तर प्रश्न पक्ष आणि परिवारातील फुटीचा आहे.
फक्त राष्ट्रवादीतील नेते कार्यकर्तेच नाही तर भाजप सुद्धा आणि फक्त भाजपच नाही तर मोदी विरोधी आघाडीतील पक्ष सुद्धा शरद पवारांच्या शब्दजालात अडकून जातात. त्यातून ते सावरे पर्यंत शरद पवारांचं दुसरं वक्तव्य पुन्हा जाळ्यात ओढून घ्यायला तयार असतं.
अशी परस्पर विरोधी वक्तव्य करुन शरद पवार एकाच वेळी अनेकांना कामाला लावतात. सध्या त्यांच्या रोख अजित पवारांसोबत गेलेले आणि जाऊ इच्छिणारे लोक आहेत असं दिसतंय. मात्र समोर पवारांच्याच मुशीत तयार झालेले लोक असल्याने ते आपल्या भूमिकेवर ठाम दिसतायत.
शरद पवार कितीही नाही म्हणत असले तरी पक्षात फुट तर आहे. आणि आता तर मित्र पक्ष सुद्धा हे उघडपणे बोलू लागले आहेत.
अजित पवार गटाने तसं पत्र निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांकडे दिलं आहे. त्याला शरद पवार गटाने उत्तरही दिलं आहे. त्यामुळे सध्याच्या शरद पवारांच्या वक्तव्यांना आगामी कायदेशीर लढाईचा भाग म्हणूनही बघायला हवं.
'नरो वा कुंजरो वा' पद्धतीचं बोलण्यात सुद्धा शरद पवार भीष्म पितामह आहेत. ते आज काय बोलले यावरुन तुम्ही ते उद्या काय करणार याचा अंदाज लावायला गेलात तर कपाळमोक्ष, अपेक्षाभंग आणि कात्रजचा घाट ठरलेला. आपले नेते कार्यकर्ते आणि मतदारांना या शब्दजालात सापडू नयेत यासाठी अजित पवारांना सगळं कसब वापरावं लागणार हे नक्की.
पक्ष फुटला कशाला म्हणायचं याची नवी व्याख्या शरद पवार सध्या करत आहेत. ती व्याख्या समोर बसलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींना पटो न पटो, राष्ट्रवादीच्या मतदाराला पटणं जास्त गरजेचं आहे.
सुप्रिया सुळे यांनी सुद्धा आज फक्त नऊ लोक पक्षातून बाहेर पडले आणि सरकारमध्ये मंत्री झाले अशी नवी लाईन घेणं सुरु केलं आहे. या मांडणीला अजित पवार गट कसं तोंड देतो त्यावर फक्त राष्ट्रवादीचंच नाही तर महाराष्ट्राचं पुढचं राजकारण अवलंबून असेल.
कधी डावीकडचं इंडिकेटर देऊन गाडी उजवीकडे वळवायची, कधी डावीकडचं इंडिकेटर देऊन गाडी तशीच सुसाट सरळ जाऊ द्यायची, तर कधी डावीकडचं इंडिकेटर देत गाडी डावीकडेच वळवत; फॉलो करणारांना, बघणारांना, गाडीत बसलेल्यांना सगळ्यांनाच धक्का द्यायचा, असं चित्र आपण गेली 4-5 दशकं बघत आलो आहोत. या मुरलेल्या योद्ध्याच्या भात्यामध्ये आणखी काही नवीन अस्त्र उरले आहेत का हे 2024 च्या निवडणुकीआधी कळेलंच. तोवर फक्त अर्थ शोधत राहाणं एवढंच आपल्या सारख्यांच्या हाती..