Baramati : भावनिकतेला बळी पडू नका असं म्हणत अजित पवारांनीच केलं भावनिक
Baramati Lok Sabha Election : भाजपसोबत सत्तेत गेल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवणार असल्याचं अजित पवारांनी कर्जतच्या मेळाव्यात जाहीर केलं. त्यानंतर उमेदवार कोण असणार याची चर्चा रंगू लागली असतानाच अचानक भावनिक राजकारणाचा मुद्दा समोर आला. अजित पवारांनी शुक्रवारी बारामतीमध्ये बूथ कमिटी मेळावा घेतला होता. या मेळाव्यात भाषण करताना ‘समोरच्याकडून (शरद पवार गटाकडून) तुम्हाला भावनिक केलं जाईल’, ‘काही जण रडतील, पण तुम्ही भावनिकतेला बळी पडू नका’ असे अजित पवारांनी ठणकावून सांगितले. तर पुढे जाऊन अजित पवार म्हणाले, ‘भावनिकतेच्या पाठीमागे जायचं की विकासाला साथ द्यायची हे बारामतीकरांनी ठरवावे.’
भावनिकतेला बळी पडू नका म्हणणारे अजित पवारांचीच भावनिक साद
मागच्या आठवड्यात व्यापारी मेळाव्यात बोलताना अजित पवार म्हणाले होते की, काहीजण तुम्हाला भावनिक करतील, ही शेवटची निवडणूक आहे असं सांगतील पण तुम्ही भावनिक होऊ नका. त्याचाच सूर शुक्रवारी अजित पवारांनी बूथ कमिटीच्या मेळाव्यामध्ये ओढला. पुढे जाऊन अजित पवार म्हणाले, पवार कुटुंबात एकच वरिष्ठ आहेत. त्यांच्यामागे सर्व कुटूंबीय आहेत. माझं कुटुंब सोडून एकही व्यक्ती माझा प्रचार करणार नाही. मला एकटे पाडले आहे. त्यामुळे तुम्ही समस्त बारामतीकर हेच माझं कुटुंब असं अजित पवार म्हणतातच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला.
असं असताना एकीकडे अजित पवार भावनिक होऊ नका, भावनिकतेला बळी पडू नका असं म्हणत असतानाच एक प्रकारे अजित पवार कार्यकर्त्यांना भावनिक साथ घालीत आहेत. बारामती तालुक्यातील पणदरे येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना अजित पवार म्हणाले, जर तुम्ही लोकसभेला माझा उमेदवार निवडून नाही दिला तर मी विधानसभा निवडणूक लढणार नाही. म्हणजे एकप्रकारे अजित पवार एकीकडे भावनिक राजकारण करत आहेत आणि दुसरीकडे निर्वाणीचा इशारा देत आहेत.
शरद पवारांसोबत सुप्रिया सुळेंवर टीका
अजित पवारांनी काकांची साथ सोडल्यानंतर सातत्याने काकांवर टीका केली आहे. परंतु दोन दिवसांपूर्वी झालेल्या मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर देखील नाव न घेता त्यांनी टीका करायला सुरुवात केली. याआधी अजित पवार फक्त शरद पवारांवर टीका करत होते. आता अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्यावर देखील टीका करण्यास सुरुवात केली आहे.
बारामतीत विकासाची कामे फक्त मीच करू शकतो दुसरे कुणीही करू शकत नाही असं अजित पवार सातत्याने सांगत आहेत. त्यामुळे मला बारामतीत अजून काही गोष्टी करायच्या आहेत. पण त्याला केंद्राची मंजुरी पाहिजे. जर तुम्ही मोदींच्या विचाराचा खासदार निवडून दिला तर मला हक्काने मोदींना म्हणता येईल की एवढं माझं काम करा. फक्त संसदेत भाषण करून कामे होत नाहीत अशी बोचरी टीका विद्यमान खासदारांवर केली.
बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार लढणार असल्याची चर्चा जोर धरते आहे. सुनेत्रा पवार गेल्या काही दिवसापासून मतदारसंघात गाठीभेटी घेत आहेत. तसेच विविध सामाजिक कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांचा वावर वाढला आहे. काही दिवसापूर्वी त्यांनी दौंडमध्ये आमदार राहुल कुल कुटुंबीयांची भेट घेतली. त्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर आले.
बारामतीत चर्चा सुरू आहे ती भावनिक राजकारणाची
सुनेत्रा पवार यांनी केलेल्या विकास कामांच्या विकासाचा रथ बारामती मतदारसंघात फिरवला जातोय. सुप्रिया सुळे यांचा विकास रथ देखील फिरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कुणी विकास कामे केली यावरून चढाओढ सुरू झाली आहे.पण बारामतीमध्ये सध्या चर्चा सुरू आहे भावनिक राजकारणाची
अजित पवारांच्या भावनिकतेच्या वक्तव्यावरून शरद पवारांनी त्यावर पलटवार केलाय. बारामतीकर सुज्ञ आहेत, बारामतीकरांना सगळं माहिती आहे. त्यामुळे भावनिक करण्याचा प्रश्न येतच नाही असं म्हणत शरद पवारांनी अजित पवारांच्या वक्तव्यावर टोला लगावलाय. जे भावनिकतेचं राजकारण करतील, त्यांना बळी पडू नका असं सांगत तेच स्वतः लोकांना भावनिक करीत आहेत असं शरद पवार म्हणाले.
बारामतीचा विकास केला कुणी?
एकीकडे अजित पवार सातत्याने म्हणतात किंबहुना ठणकावून सांगतात की बारामतीचा विकास करायचा असेल तर माझ्याशिवाय पर्याय नाही. मीच तुमचं काम करू शकतो. काम करायचे असेल तर माझ्या शिवाय पर्याय नाही. बारामती शिक्षणाचे आणि मेडिकल हब बनवण्याची अजित पवारांची मनीषा दडून राहिली नाही. पण विकासाच्या मुद्यावरून अजित पवारांवर शरद पवारांनी निशाणा साधला आहे. विद्या प्रतिष्ठान आणि कृषी विकास प्रतिष्ठानची स्थापना करून 54 वर्ष पूर्ण झाली आहेत. ज्यावेळी या संस्थांची स्थापना केली गेली त्यावेळी जे आता आरोप करीत आहेत त्यांची वय काय असू शकतं हे तुम्ही ठरवा, असा टोला शरद पवारांनी लगावला आहे.
बारामतीकर सुज्ञ आहेत हुशार आहेत असं अजित पवार म्हणाले. ते पुढे म्हणाले, ‘काहीजण तुम्हाला भावनिक करतील-रडतील-शेवटची निवडणूक आहे असे सांगतील तुम्ही भावनिक होऊ नका; तुम्ही भावनिकतेला साथ द्यायची आहे की विकासाला तुम्ही ठरवा. मला कुटुंबीयांनी एकटे पाडलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत माझं कुटुंब सोडलं तर माझा कुणी प्रचार करणार नाही. मला कुटुंबाने एकटे पाडले, तुम्ही एकटे पाडू नका.’ यातून प्रश्न निर्माण होतो की नेमकं भावनिकतेचे राजकारण कोण करते आहे?
शरद पवारांच्या गाठीभेटी वाढल्या
शनिवारी शरद पवारांनी बारामतीत असताना पृथ्वीराज जाचक यांची भेट घेतली. तर शुक्रवारी खासदार सुप्रिया सुळे काटेवाडी येथे झालेल्या कार्यक्रमात चंद्रराव तावरे यांच्यासोबत एकाच मंचावरती दिसल्या. चंद्रराव तावरे आणि शरद पवारांनी 40 वर्ष एकत्र काम केलं. पण 1995 च्या दरम्यान चंद्रराव तावरे यांनी शरद पवारांची साथ सोडली. सध्या चंद्रराव तावरे भाजपमध्ये आहेत. चंद्रराव तावरे आणि अजित पवारांचे संबंध सर्वश्रुत आहेत. पुन्हा एकदा सुप्रिया सुळे आणि चंद्रराव तावरे हे एकच मंचावर आल्याने पुन्हा एकदा चर्चा रंगू लागल्या आहेत. तर दुसरीकडे अजित पवारांच्या भूमिकेवरून हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये गेले. त्यावरून 2009, 2014 आणि 2019 साली अजित पवारांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला असे अंकिता पाटील म्हणाल्या आहेत. तर दुसरीकडे हर्षवर्धन पाटील यांचे खासदार सुप्रिया सुळे यांनी कौतुक केलं आहे.
अजित पवारांचा इशारा
अजित पवार हे शरद पवारांसोबत असलेल्या कार्यकर्त्यांवर बोचरी टीका करीत आहेत. ‘जे लोक शरद पवारांसोबत आहेत त्यांच्यासाठी मी काय केलं नव्हतं’ असा सवाल अजित पवार विचारत आहेत. ‘लोकांनी कोणत्याही एका बाजूला जावे, पण दोन्ही दरडीवर पाय ठेवू नये’ असे अजित पवार म्हणत आहेत.
‘बारामतीत लोकसभेला सुप्रिया सुळे यांना आणि विधानसभेला मतदान करणार असाल, तर लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही ठिकाणी त्यांनाच मतदान करा. जर माझ्यासोबत राहायचं असेल तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मी सांगेल त्यालाच मतदान करा’ असे सांगत आहेत. पण जे कार्यकर्ते फुटीनंतर शरद पवार गटात गेले आहेत. त्यांच्यावर अजित पवार निशाणा साधत आहेत. आता तिकडे गेले आहेत, पण जेव्हा गरज लागेल तेव्हा मी पण दाखवून देईन असे अजित पवार म्हणत आहेत. त्यामुळे अजित पवार एकीकडे एकच भूमिका घ्या असे म्हणत आहेत आणि ज्यांनी विरोधी भूमिका घेतली त्यांचा समाचार घेत आहेत.
अनेकांना राजकीय बेरोजगार करण्याची ताकद बारामतीकरांमध्ये
त्यानंतर आताबारामती लोकसभा मतदारसंघात दमदाटीचे राजकारण सुरू आहे असे प्रतिपादन शरद पवारांनी केले आहे. आमदार रोहित पवारांनी त्यांच्या ‘एक्स’ हँडलवर टीका केली. ‘अनेक वर्षांपासून पवार कुटुंबावर असलेल्या बारामतीकरांच्या प्रेमाच्या कर्जातून कधीही उतराई होता येणार नाही. पण याची जाणीव ठेवण्याऐवजी आज आदरणीय पवार साहेबांच्या बाजूने कुणी बोललं किंवा सोशल मिडियात व्यक्त झालं तर त्याला नोकरीवरून काढण्याचा आणि त्याच्यावर दादागिरी करण्याचा उद्योग मलिदा गँग करतेय. आजवर कधी असं घडलं नाही, पण विचारांच्या आणि निष्ठेच्या बाजूने असलेल्या लोकांचे रोजगार घालवले जात असतील तर अनेकांना राजकीय बेरोजगार करण्याची ताकदही याच बारामतीकरांमध्ये आहे, हे कुणाच्यातरी तालावर नाचणाऱ्या मलिदा गँगने लक्षात ठेवावं’ असे रोहित पवारांनी म्हटले आहे.
अजूनही बारामती लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार ठरलेला नाही, परंतु सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार लढणार असल्याची चर्चा जोर धरते आहे. पण दुसऱ्या बाजूला अजित पवार भावनिक होऊ नका असे म्हणत असताना तेच भावनिक करीत आहेत. त्यामुळे बारामतीची लोकं भावनिक होऊन मतदान करतात की भावनिक विकासाला मतदान करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. याआधी फूट झाल्यापासून अजित पवारांकडून सातत्याने शरद पवारांवर टीका केली होतं आलेली आहे. परंतु त्या टीकेला शरद पवारांनी किंवा सुप्रिया सुळे यांनी अगदी मोजक्याच शब्दात प्रतिउत्तर दिले आहे. पण आता सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आरोपावर बोलू लागल्या आहेत. असं असलं तरी अजून उमेदवार आणि निवडणूक जाहीर होणं बाकी आहे. आगामी काळात हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.