BLOG : काँग्रेस भाकरी फिरवणार?
BLOG : पाच राज्यांत काँग्रेसला प्रचंड मोठ्या पराभवाला सामोरो जावे लागल्यानंतर काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा फेरबदलाचे वारे वाहणार, नेतृत्वबदलाची मागणी होणार, संघटनात्मक निवडणुकांची मागणी केली जाणार असे वाटत होते. अपेक्षेनुसार अगदी तसेच होऊ लागले आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रविवारी संध्याकाळी दिल्लीत काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत गांधी कुटुंब काँग्रेसमधील पदांचा राजीनामा देणार अशी चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सुरू झालीय. मात्र एकूणच काँग्रेसचा प्रवास पाहाता असे काही होईल असे वाटत नाही.
नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. उत्तर प्रदेशमध्ये फक्त 2 जागा मिळाल्या आणि 97 टक्के उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झाले. यावरून जनतेत काँग्रेसबाबत असलेली नाराजी दिसून येते. पंजाबमध्येही सुंदोपसुंदीमुळे काँग्रेसला सत्ता गमवावी लागली. गेल्या वर्षी झालेल्या पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पाँडेचरीतील निवडणुकांमध्येही काँग्रेसला अपयश आले होते. तेव्हा काँग्रेसच्या 23 ज्येष्ठ नेत्यांनी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक घेऊन काँग्रेसमध्ये फेरबदल करण्याची मागणी केली होती. एवढंच नव्हे तर विधानसभा निवडणुकीपूर्वी पंजाबमध्ये सुरु असलेल्या सुंदोपसुंदीबाबत, काँग्रेस कोण चालवतंय तेच समजत नाही असा प्रश्न काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी सोनिया गांधींना उद्देशून केला होता. याचं कारण म्हणजे सर्व निर्णय राहुल गांधी स्वतःच घेत होते. नवजोत सिद्धूंना पूर्ण मोकळीक दिल्याचा अनेक काँग्रेस नेत्यांना राग आला होता आणि त्यांनी सिद्धूंना मदत न करण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेसच्या नेत्यांना याची जाणीव होती, स्वतः सिद्धूंनाही हे जाणवले होते. पण त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही आणि पंजाबमधून काँग्रेस हद्दपार झाली.
जानेवारी 2021 मध्ये झालेल्या बैठकीनंतर एकही बैठक झाली नव्हती. त्यामुळे गेल्या वर्षीच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी नव्या अध्यक्षाची निवड केली जावी अशी मागणी पत्र लिहून केली होती. गेल्या वर्षी झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकात काँग्रेसचे पानीपत झाले. तेव्हा 23 ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिले आणि काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक घेण्याची मागणी केली. काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक झाली. या बैठकीत अध्यक्षपदाबाबत काहीही चर्चा न करता काँग्रेसला संघटनात्मक मजबूती देण्यासाठी पावलं उचलावी असं ठरलं. त्यानंतर यावर्षी होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकांची रणनीती तयार करू असेही ठरले. काहीही होत असल्याचे दिसत नसल्यानेच राहुल ब्रिगेडच्या जितिन प्रसाद, ज्योतिरादित्य शिंदे, कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी काँग्रेसला रामराम केला. अजूनही अनेक नेते पक्ष सोडण्याच्या मार्गावर आहेत. तरीही काँग्रेस सुधारली नाही आणि त्याचाच परिणाम पाच राज्यांच्या ताज्या निकालावरून दिसून आला आहे.
या बैठकीला हजर असलेले काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनीही एबीपी माझाशी बोलताना बैठकीत काही निर्णय झाले पण त्याची अंमलबजावणी झाली नाही असे सांगितले होते. त्या निर्णयाची अंमलबजावणी आता करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी म्हटले होते. पाच राज्यांच्या निकालाच्या दुसऱ्याच दिवशी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी म्हणजेच जी-23 समूहातील नेत्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये फेरबदलाची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. यासाठी शुक्रवारी या नाराज नेत्यांची दिल्लीत गुलाम नबी आझाद यांच्या घरी एक बैठकही झाली. या बैठकीला आनंद शर्मा, मनीष तिवारी, अखिलेश प्रसाद सिंह, हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. याच नेत्यांनी सोनिया गांधींच्या अध्यक्षपदावर प्रश्न उपस्थित केला होता. मात्र हे नाराज नेते बाहेर गांधी कुटुंबाविरोधात बोलतात पण काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत सोनिया गांधी, राहुल गांधी किंवा प्रियांका गांधी यांच्याविरोधात बोलत नाहीत असा आरोप केला जातो. रविवारी संध्याकाळी काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत हे नेते बोलण्याचे धाडस दाखवणार का असा प्रश्न दिल्लीतील वर्तुळात चर्चिला जाऊ लागला आहे.
काँग्रेसला नवे नेतृत्व मिळावे अशी या ज्येष्ठ नेत्यांची अपेक्षा असली तरी तो नेता कोण असावा याबाबत कोणीही बोलण्यास तयार नाही. राहुल गांधींच्या जागी प्रियांकाची निवड करण्याची योजना होती पण आता उत्तर प्रदेशमध्ये प्रियांकानी मेहनत करूनही काँग्रेस तळाला गेली. त्यामुळे आता प्रियांकाच्या नावावरही कोणी शिक्कामोर्तब करणार नाही. गेल्या वर्षी चार-पाच नेत्यांची नावे चर्चेत होती पण त्यांना दुसऱ्या नेत्यांनी समर्थन न दिल्यानेच ज्याप्रमाणे सोनिया गांधींक़डेच हंगामी अध्यक्षपद राहिले.
डीके शिवकुमार यांनी मात्र काँग्रेसचे अध्यक्षपद गांधी कुटुंबाकडेच असावे आणि राहुल गांधी अध्यक्ष व्हावे असे वक्तव्य केले आहे. त्यामुळेच रविवारी होणाऱ्या बैठकीत प्रचंड घमासान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र नेहमीप्रमाणेच ही बैठकसुद्धा गांधी कुटुंबाविरोधात ठराव न मांडता, कोणताही ठोस निर्णय न होताच आणि पुन्हा बैठकीचे सूतोवाच करून संपेल असेही म्हटले जात आहे. जर खरोखर असे झाले आणि काँग्रेसने भाकरी फिरवली नाही तर मात्र काँग्रेसचे काही खरे नाही असेच नाईलाजाने म्हणावे लागेल.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha