(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BLOG : प्रोजेक्ट धरित्री; हे पालखीचे 'भोई', यांना कसलीच ओळख नाई!
BLOG : आजपासून 62 वर्षांपूर्वी पानशेत धरण फुटलं आणि अनेकांची वाताहात झाली.आयुष्यांची उलथापालथ झाली. कित्येकांची स्वप्नं त्या गढूळ पाण्यात ढेकळाप्रमाणं विरघळून गेली. या पुरानं फक्त त्यावेळच्या पिढीचाच नव्हे तर पुढच्या पिढीचाही कणा मोडला. ही पिढी आहे भोई समाजाची. घरं बुडाली, पारंपरिक मासेमारीचा व्यवसाय बुडाला आणि आता मासेमारीचा व्यवसाय करायचां म्हटला तर प्रदूषित नद्यांमुळे तोही करता येत नाही… ‘बाईमाणूस मीडिया रिसर्च फाऊंडेशन’चा हा एक विशेष ग्राऊंड रिपोर्ट.
तो दिवस होता 12 जुलै 1961… पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात हाहाकार माजला होता, जो तो ओरडत पळत होता. पाणी आलं, पाणी आलं, घटनाच तशी होती. कारण पानशेत धरणाला मोठी भेग पडली होती. भारतीय जवानांनी अथक परिश्रम करुन वाळूची हजारो पोती रात्रभर रचली होती व रात्रीच फुटणारे धरण सकाळ पर्यंत थोपवून धरलं. होते.
पुणेकर झोपेत असताना रात्री पाणी आले असते तर पुण्यात प्रचंड जिवितहानी झाली असती. पण शेवटी व्हायचे तेच झाले. पहाटे पहाटे पानशेत धरण शेवटी फु़टले व त्याच्यामुळे थोड्या वेळाने पुढचे छोटे खडकवासला धरण फुटले होते. या घटनेत एक हजारहून अधिक लोक मुत्यूमुखी पडले होते. पुण्यात पाणीच पाणी झालं, हाहाकार माजला, जो तो आपला जीव वाचवण्याच्या प्रयत्नात होता. यात अनेकांची वाताहात झाली. आयुष्यांची उलथापालथ झाली. कित्येकांची स्वप्नं त्या गढूळ पाण्यात ढेकळाप्रमाणं विरघळून गेली. या पुरानं फक्त त्यावेळच्या पिढीचाच नव्हे तर पुढच्या पिढीचाही कणा मोडला.
ही पिढी आहे भोई समाजाची. मुळा-मुठा नदीकाठी भोई समाज त्यावेळी मोठ्या संख्येने वस्ती करून राहात होता. 1961 साली पानशेतला पूर आला होता, त्यावेळी या वस्त्यांमध्ये पाणी शिरून वस्त्या भुईसपाट झाल्या, घरे वाहून गेली होती. या दुर्घटनेला आज 62 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानंतरच्या कालावधीत शहराचा विस्तार 400 चौरस किलोमीटरपर्यंत झाला. परंतु या दुर्घटनेत बेघर झालेल्यांचे प्रश्न अद्यापही मार्गी लागले नाहीत. महानगरपालिकेने त्यावेळी कसबा मंडई या ठिकाणी भोई समाजाचे विस्थापन केले. काही विस्थापित झालेले लोकं कसब्यातच राहिले तर काही लोकं स्वतःच्या जागेवर येऊन राहिले.
पुण्यातील पाटील इस्टेटच्या बाजूने संगमवाडी रस्ता जातो तो संगमवाडी गावात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली सध्याची भोई समाजाची हीच ती वस्ती. पूर्वी पालखीचे भोई आता झिंगा भोई. भोई मुळात आदिवासी व भटकंती करणारी जमात आहे. जंगल, पाणी आणि नैसर्गिक साधनाच्या मदतीने भोई समाजातील लोक जगत आले आहेत. पूर्वी भोई समाजातील लोकांचे मुख्य काम म्हणजे प्रवाशांना नदीपलीकडे नेणे व आणणे. तसेच राजदरबारी पालख्या, मेणे व डोल्या खांद्यावर वाहाणे हे होते.
इतिहासकारांनीही भोई समाजाची नोंद इतिहासात केलेली आहे. मुघल सल्तनत, शिवशाही तसेच पेशवाईच्या काळात राज्यकर्त्यांच्या पदरी भोयांसाठी राखीव स्थान असे. त्याकाळी होडीतून, डोलीतून किंवा मेण्यांतून अत्यंत काळजीपूर्वक, प्रामाणिकपणे व निष्ठेने श्रीमंतांच्या मुली, सुना व आया-बहिणींची ने-आण करणे, नेकीने मालाची ने-आण करणे हे भोयांचे काम असे. स्त्रियांना पालखी किंवा मेण्यांतून दूर-दूरपर्यंत नेताना भोयांनी कधी अनैतिक वर्तन किंवा अनैतिक कृत्य केल्याचे इतिहासात उदाहरण नाही. सेवाभाव हा भोई समाजातील लोकांचा स्वभाव आहे.
पुढे राजा-महाजांच्या काळानंतर पालखी उचलण्याचे काम संपुष्टात आले. राजाश्रय गेला. अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हे लोक इतर राज्यांमध्येही भटकंती करू लागले. त्यामुळे भोई लोक मासेमारीकडे वळले आणि ते समुद्रात, खाडीत, नदी, तलाव, खोरे इत्यादी ठिकाणी मासेमारी करू लागले. मासे पकडून त्यांना बाजारात विकून भोई लोक आपला उदरनिर्वाह करत. म्हणून त्यांना झिंगाभोई म्हणून ओळखले जाऊ लागले.आज मासेमारी हा भोई समाजाचा मुख्य व्यवसाय आहे. महाराष्ट्रात भोई समाज प्रामुख्याने मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, धुळे, जळगाव, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, अहमदनगर, रत्नागिरी, नागपूर, भंडारा, वर्धा, नांदेड इत्यादी जिल्ह्यात वास्तव्यास असून इतरत्रही
विखुरलेला आढळतो.
पानशेत पुरामुळे भोई समाजाचा रोजगारच हिरावला. पानशेतच धरण फुटलं आणि पुराचे पाणी पुणे शहरात शिरल्यामुळे शहरातील बंडगार्डन पूल सोडून सर्व पूल पाण्याखाली गेले होते. शनिवार पेठ, नारायण पेठ, कसबा, असा पुण्याचा अर्धा भाग वाहून गेला होता. पुराच्या पाण्याने नदीकाठी राहणाऱ्या लोकांचा संसार उध्वस्त झाला. पुरामुळे पुण्याचा नकाशाच बदलला. पुरामुळे उध्वस्त झालेल्या कुटुबांचं पुनर्वसन करण्यात आलं. सहकार नगर, पद्मावती, एरंडवण, दत्तवाडी, पार्वती अशा नवीन वस्त्या तयार झाल्या. पुण्यातील वेगवेगळ्या भागात स्थलांतरित करण्यात आलं. पुण्यातील पाटील इस्टेटच्या बाजूने संगमवाडी रस्ता जातो तो संगमवाडी गावात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला भोई समाजाची वस्ती आहे.
महानगरपालिकेने त्यावेळी कसबा मंडई या ठिकाणी लोकांना विस्थापित केलं. काही विस्थापित झालेले लोकं कसब्यातच राहिले तर काही लोक स्वतःच्या जागेवर येऊन राहिले. पानशेतच्या पुरामुळे मुळा- मुठा नदीकाठी असलेल्या भोई समाजाचं खूप नुकसान झालं होतं. राहायला घर नव्हतं, घालायला कपडे नव्हते. अशा परिस्थितीत काही लोकांनी त्यांच्या जमिनी विकल्या. त्या जमिनी म्हणजे त्यांची शेतीच होती. भोई समाजाचा प्रमुख व्यवसाय होता शेती आणि मासेमारी. पानशेतच्या पुरामुळे शेती गेली. सध्याच्या परिस्थितीत मासेमारी हा व्यवसाय कमी झाला आणि भोई समाजाचं उदरनिर्वाहाचं साधनच गेलं.
वस्तीत राहणाऱ्या भोई समाजाच्या ऐंशी वर्षाच्या आज्जी मोनाबाई सांगतात, "आमचे दिवस तर निराळेच होते. आम्हाला तीन एकर शेती होती. शेतीमध्ये भाजीपाला, गहू, मका पिकत होता. टरबूजची शेती करत होतो. म्हशी, गाय, बैल होती. मोठं-मोठे कॅन भरून दुध विकत होतो. आम्ही कधीच काही बाहेरून विकत आणलं नाही. नदीचा उपयोग आम्ही पुणे शहरात येण्याजाण्यासाठी करत होतो, होडी होती आमची. होडीतून ये जा करत होतो. नदी खोल होती, पाणीसाठा भरपूर होता. त्यामुळे होडीचा वापर करता येत होता. नदीचं पाणी स्वच्छ होत, नदीचं पाणी पित होतो. होडीतून आम्ही पोती भरून टरबूज, कलिगड, रताळे बाजारात जाऊन विकत होतो. टरबूज ,कलिंगड इतकी रसाळ आणि गोड असायची ते खाऊनच आमचं पोट भरायचं. तुला सांगते बाय, तुम्ही आता जे काय खाताय त्याला चव ना चोथा. कलिंगड, टरबूज कापला तर त्यात रस पण नाही अन् गोडवा पण नाही. जनावरांना घालतो तसा तो चोथा लागतो. शेतात तांदळी, चिलगूळाची भाजी अशा लै प्रकारच्या भाज्या करत होतो. आता बाजारातून आणलेल्या भाज्यांना कितीवेळा पण धुवा गटारीचा वास येतो. आता भलतंच होऊन बसलंय. आमचा काळच बरा होता. घरातल्या सर्व बायका शेती करत होत्या. पुरुष सगळे मासेमारी करायचे. मासेमारी हा धंदा खूप चालत होता. नदीत वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर मासे मिळत होते. दुसऱ्यांच्या रोजगाराला कधी गेलो नाही. मासेमारी आणि शेती यावर आमचं घर चालत होत. पानशेतच्या पुरामुळे सगळंच गेलं आमचं.’’
संगमवाडी पूल हा आमच्या शेताच्या मधून गेला, त्यामुळे शेती करताच येणार नव्हती. संगमवाडी पूलाखाली आमची जमीन गेली. सरकारी भावानुसार मोबदला मिळाला. सध्या तीन भावांमध्ये आठ गुंठे जमीन आहे. शेती गेल्यामुळे सगळं बाहेरून आणून खावं लागतंय, अशी माहिती मोनाबाई आज्जी देतात. ‘नदीमध्ये दिवसभर जाळी टाकून ठेवली तर मासे मिळत नाहीत’’
याच वस्तीतले 56 वर्षांचे रामचंद्र काची सांगतात, आमची ही भोई समाजाची सहावी पिढी. आजपर्यंत आम्ही मासेमारी हाच व्यवसाय केला. पोत्याने मासे विकत होतो. नदीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे मिळत होते. आता परिस्थिती बदलली. आता पुण्यातील नद्या या नद्या राहिल्या नाहीत, आता नद्यांना गटारीचं स्वरूप आलं आहे. नदी खोल होती. माशांची उत्पत्ती होत होती. आता नदीमध्ये पाहिजे तसे मासे मिळत नाहीत. माशाच्या वेगवेगळ्या जाती नष्ट झाल्या. नद्यांमध्ये कारखान्याचे रासायनिक पाणी सोडलं जातं. उजनी धरणात पेपर कंपनीचं पाणी सोडलं जातं. पुण्यातील सांडपाण्याचं नियोजन नाही, ते सांडपाणी नदीमध्ये सोडतात. नदीच्या प्रदूषित पाण्यात मासे कसे जिवंत राहणार. नदीमध्ये दिवसभर जाळी टाकून ठेवली तर साधे एक दोन किलो मासे मिळत नाहीत.
पानशेतच्या पुरामुळे घर वाहून गेली होती. त्यावेळी महानगरपालिकेने फक्त घरावरची पत्रे दिली होती. त्यावेळी आमच्या वडिलांनी कच्ची घर बांधली, अजून आम्ही त्याच घरामध्ये राहतोय, मध्यंतरी संगमवाडीचा पूल होताना वस्ती उठविण्याचा प्रयत्न केला होता. आम्ही त्याला विरोध केला. झोपडपट्टी ठेवायची नाही तर आम्हाला घरकुल द्या. घरकुल मिळालंच नाही, आम्ही ती जागा सोडली नाही, अशी खंत रामचंद्र व्यक्त करतात. पुढे ते सांगतात , नदीमध्ये काही दिवसापासून सकर मासा आढळून आला आहे. सकर मासा हा माशांची अंडी, मासे खातो त्यामुळे इतर माशापेक्षा या माशाची संख्या वाढते. सकर मासा जाळ्यात अडकल्यानंतर तो सहजासहजी जाळ्यातून निघत नाही त्यासाठी जाळी फाडवी लागते. त्यामुळे जाळ्यांचे मोठे नुकसान होते. उजनी धरणात मांगूर मासा देखील मोठ्या प्रमाणात सापडत आहे .सकर, मांगूर मासा नष्ट करण्यासाठी महानगरपालिकेने काहीतरी उपाययोजना करावी यासाठी आम्ही अर्ज केलेत पण महानगरपालिकेने अजून तरी काही तोडगा काढला नाही.
भोई समाजाच्या नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे 35 वर्षाचे तरुण अजित काची सांगतात की, संगमवाडी पुलाच्या दोन्ही बाजूच्या वस्तीमध्ये मिळून सत्तर -ऐंशी लोक राहतात. वस्तीत जायला कच्चा रस्ता आहे. पाऊस आला की लगेच चिखल होतो. ये-जा करायला अडचणी येतात. पावसाळ्यात मुलांना शाळेत जायला त्रास होतो. रस्त्यासाठी खूप वेळा अर्ज केले, पण अजूनपर्यत रस्ता झाला नाही. वस्तीत ड्रेनेज लाईन नाही.अर्ज करूनही दखल घेत नाहीत. शिक्षण कमी असल्यामुळे आम्हाला नोकरी मिळत नाही. नदीत मासे मिळत नाही. दुसरीकडे कुठे मासेमारी करायला गेलं तर तिथले लोक मासेमारी करायला देत नाही. नदीत दिवसभर जाळी टाकून ठेवावी लागते. संध्याकाळी मिळेल तेवढे मासे विकायचे. बाकी कुठे काम मिळाल तर कामाला जातात. नाहीतर घरीच असतात. जलबिरादरी ही संघटना भोई समाजासाठी कार्य करते.
या संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते सुनील जोशी सांगतात की, भोई समाज हा अल्पशिक्षित आणि अल्पसंख्याक समाज. हा समाज असंघटित आहे. निसर्गाशी निगडित काम करणारा समाज. मासेमारी त्यांचा मुख्य व्यवसाय. नदीकाठी या समाजाची शक्यतो वस्त्या असतात. 1947 सालानंतर उद्योग,तंत्रज्ञानाशी निगडित व्यवसायाला भरभराटी आली. जिथे मुबलक पाणी आहे त्याठिकाणी हे उद्योग वाढले. पुणे शहरात पाण्याच्या ठिकाणीच उद्योग उभे राहिले आहेत. याचा परिणाम नदीकाठी राहणाऱ्या लोकांवर झाला. शिक्षण नसल्यामुळे उद्योगांमध्ये काम करू शकला नाही. समाज या वातावरणाशी जुळवून घेऊ शकला नाही. समाजाला आर्थिक स्थैर्य नसल्यामुळे प्रगती करू शकला नाही. समाजाच्या प्रगतीसाठी सरकारने काही पाऊले उचलली नाहीत. त्यामुळे हा समाज मागासच राहिला. राजकीय पक्ष यांना एक मतदार म्हणूनच बघतात. यांच्या प्रगतीसाठी पाहिजे तसे ठोस पाऊले उचलत नाहीत. पारंपारिक व्यवसाय गेल्यामुळे आणि अल्पशिक्षण असल्यामुळे पाहिजे ते काम करतात. दुसरीकडे रोजंदारी करतात. सरकारने आता त्यांच्यात असणाऱ्या कलागुणांना वाव द्यायला पाहिजे. शिक्षणावर काम करायला पाहिजे. समाजाने संघटित होणे गरजेचं आहे.
‘मुळा-मुठा नदी वाचवा’ यासाठी काम करणाऱ्या पुणे नदी पुनरुज्जीवन (Pune River Revival) संस्थेच्या कार्यकर्त्या रेखा जोशी माहिती देतात की, अतिवृष्टी आणि ढगफुटीचे प्रमाण वाढत आहे. अतिवृष्टीच्या वेळी पाटबंधारे विभागाकडून पाणी सोडले जाते. जागतिक हवामान बदलाच्या वाढत्या प्रभावामुळे तीव्र पाऊस, ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत. नदीपात्रातील वाढती अनधिकृत बांधकामे यामुळे नदीपात्राची रुंदी कमी होत असल्यामुळे पाणी साठवण्याची क्षमता कमी होत आहे. शहराला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच शहरात वाढत चाललेलं औद्योगिकरण, शहरीकरण हे नदी प्रदुषणाच मुख्य कारण आहे. नदीपात्रात कारखान्यातून मोठ्या प्रमाणात सोडलं जाणार प्रदूषित पाणी, वाढत चालेल जलपर्णीच साम्राज्य यामुळे नद्या प्रदूषित झाल्या आहेत. या परिस्थितीचा मोठा फटका नदीकाठी राहणाऱ्या लोकांना बसतो. अनेक कुटूंब उध्वस्त होतात, गावच्या गाव उध्वस्त झाली आहेत. सतत पूर कशामुळे येतात हे बघणे महत्वाचे आहे.
नद्यातील प्रदुषण आणि त्याचा भोई समाजाच्या पारंपरिक व्यवसायावर झालेला परिणाम यावर इंडियन नेटवर्क ऑन एथिक्स अँड क्लायमेट चेंजच्या राष्ट्रीय संयोजक डॉ. प्रियदर्शनी कर्वे प्रकाश टाकतात. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाच चक्र बिघडलं आहे, त्यामुळे अनपेक्षितरित्या एकदम पाणी वाढतं. हा वातावरण बदलाचा परिणाम झालेला आहे. पावसाचं चक्र बिघडलं आहे. पावसाचे दिवस कमी झालेत पण पावसाचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे कमी वेळात जास्त पाऊस पडतो. नदीकाठी जी जागा पुराच्या पाण्यासाठी सोडायला पाहिजे ती सोडली जात नाही. शहरांमध्ये व्यवस्थित नियोजन नसतं, नदीच्या पूर क्षेत्रामध्ये अतिक्रमण वाढली आहेत. पण अधिकृतरीत्या जिथे बांधायला नको तिथे इमारती उभ्या राहतात. रस्ते बांधले जातात.
पुण्याचा विचार केला तर नदीच पाणी पसरतं. त्याठिकाणी मेट्रोचे खांब उभे राहिले आहेत. खांबामुळे पाणी पसरण्याची तेवढी जागा कमी होते. सध्या महानगरपालिकेने जो नदी सुधार प्रकल्प आणला आहे. त्याच्यामुळे आणखी नदी पात्र कमी होणार आहे. कठडे बांधणार आहेत. या सर्वांमुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहामुळे अडथळा निर्माण झाल्यामुळे पाणी साठून राहत. त्यामुळे पाणी नदीच्या आसपास असणाऱ्या वस्त्यांमध्ये पाणी पसरत जातं. यासर्व प्रकल्पांमुळे पाणी वस्त्यांमध्ये शिरण्याचे प्रमाण वाढत जाणार आहे. त्यावर उपाय हाच पावसाचं जे बदललेलं चक्र आहे ते समजून घेऊन त्यानुसार धरणाचं व्यवस्थापन करायला पाहिजे. नदी काठी असणाऱ्या अधिकृत वस्तीला कायद्याचं संरक्षण असतं. ज्या अनाधिकृत वस्त्या आहेत त्यांना कायद्याचं संरक्षण नसतं. सध्याचा विचार केला तर नदी पात्रात जी घरे आणि वस्त्या आहेत त्यांना सर्वांना तिथून हलवत असताना त्यांना अधिकृत वस्ती तयार करून देणे, हा देखील पर्याय विचारात घ्यायला हावा.
(असर आणि बाईमाणूस यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘प्रोजेक्ट धरित्री’ उपक्रमांतर्गत ‘पर्यावरण बदल आणि लिंगभाव’ (Climate & Gender) या विषयावरची ही एक विशेष मालिका आहे).