Blog : एक प्रवास गुलजारसोबत
Blog : सॉरी! आधीच बोलून टाकतो... या नश्वर जीवनाच्या निरर्थक कामाच्या व्यापात तुला म्हणावा तेवढा वेळ आज देता आला नाही... पण माझ्यासारख्या तुझ्या भक्ताला वाढदिवसाचं काय मोठं विशेष? इथे प्रत्येक दिवस तुझ्या गझलेच्या, कवितेच्या, नज्मच्याच लिबास मध्ये लपेटून आम्ही जगतोय... 'लीबास'... किती सुंदर शब्द दिलायस तू मला... असे किती शब्द आहेत रे तुझ्या पोतडीत? एक एक सांगत बसलो तरी तुझा वाढदिवस संपेल आणि ज्या गप्पा तुझ्याशी मारायच्या आहेत त्याच राहून जातील...
तर, एक ट्रेन हवीये मला... रुळांच्या बाजूला उभा राहून, प्रवासात खोडा घालणाऱ्या सिग्नल शिवाय... अंतहीन भटकंती करता यावी यासाठी... त्या ट्रेनच्या शेवटच्या डब्यात, शेवटच्या सीटवर बसून प्रवासाला सुरुवात करेन... सोबतीला तू असशील... तुझी गाणी असतील... तुझ्या नज्म असतील... पंचम दा, किशोर, भूपेंदर, लता दीदी सोबतचे तुझे किस्से असतील... ते गेल्यानंतर भेटलेल्या विशाल भारद्वाज, रेहमान, अरिजित आणि मेघनाच्या पीढीचे गुणगान पण तुझ्याकडून ऐकायला मिळेल... या दोन्ही पिढीवर केलेली एखादी तुझी नज्म पण ऐकवशिल का? की माझ्याच समोर एखाद्या गझलेला प्रसूत करशील... नको तू बुध्द हो... डोळे मिटून शांत बसून रहा माझ्यासमोर... मी गाणी ऐकेन तुझी... आणि तुला पण ऐकवेन... बघ तू काय काय आणि किती काही लिहिलंयस... मग हा प्रवास असाच सुरू राहील... तुझी प्ले लिस्ट असंख्य वेळेसाठी रिपीट मोड वर टाकून... आपण पुढे जाऊ... एक एक गाणं संपलं की एक एक स्टेशन येईल... त्यावर उतरून तू मला, त्या गाण्यामागचा तुझा लिहिण्याचा अर्थ समजावून सांग... मातीच्या कुल्हड मध्ये चहाचा एक एक घोट घेत... कधी मध्येच सिगारेटचा धूर हवेत काढत... तू माझ्याशी बोल... तुझ्या त्या निरुपणात मी बुडत जाईन... एखाद्या तळ नसलेल्या डोहात उडी घ्यावी तसा....
खर्ज्यातला तुझा आवाज... आपणच तयार केलेल्या त्या निर्मनुष्य निरव स्टेशनवर बसलेले आपण दोघं प्रवासी.... समोर आपलीच वाट बघत उभी असलेली ट्रेन.... आणि ज्यांना तू तुझ्या कवितेत, तुला हवं ते करायला भाग पाडतोस असे ओले दिवस, सुन्या राती, रिकाम्या ताटात परोसलेला चंद्र, दाहकता विसरलेला सूर्य, काही ओंसो की बुंदे.... सतलज, रावी, त्यांच्या किनाऱ्यावर निपचित पडलेले दगड... सुकून सुरकुत्या पडलेली चार पाच पानं... दिसायला मोठा पण हळवं मन असणारा निसर्ग आणि त्याच्या बाजूला काळ्या ढगांना मांडीवर घेऊन, सावरत बसलेला पाऊस असे सगळे येतील बघ... तुला ऐकायला... आज पर्यंत खूप संमेलनं केलीस... मोठ्या मोठ्या मैफिली गाजवल्यास... पण गुलजार, ही मैफिल कशी वाटली?
ये कधी तरी... भेट कधीतरी... आज पर्यंत आपण भेटलो नाही रे... एकदा तुझी भेट व्हावी ही मनापासून इच्छा आहे... कधी तरी वक्त के दरवाजे उघडून, तुझ्या आवडत्या चिनाबच्या काठावर आपण भेटू असा विश्वास आहे!
वाढदिवसाच्या शुभेच्छा, गुलजार!