विश्वचषकाचं तिकीट कुणाला मिळणार, कुणाचं तिकीट कापलं जाणार?
आगामी वर्ल्ड कपमध्ये कोण्यात खेळाडूला संघात स्थान मिळेल, याची घोषणी उद्या (15 एप्रिल) होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर पाहूयात आमचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांनी संभाव्य संघनिवडीविषयी केलेलं विश्लेषण.
बीसीसीआयच्या सीनियर निवड समितीची बैठक सोमवारी मुंबईत होत असून, इंग्लंडमधल्या आगामी वन डे विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड याच बैठकीत करण्यात येईल.
रिषभ पंत की, दिनेश कार्तिक...
लोकेश राहुल की, श्रेयस अय्यर...
अंबाती रायुडू की, विजय शंकर
आणि राहता राहिल्या डावखुऱ्या अष्टपैलू रवींद्र जाडेजाला टीम इंडियात घ्यायचं का, याच चार मुद्यांवर मतदान करण्यासाठी बीसीसीआयच्या सीनियर निवड समितीची बैठक सोमवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत आहे.
साऱ्या देशात खरं तर सध्या लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. पण करोडो भारतीय क्रिकेटरसिकांचं लक्ष बीसीसीआयच्या निवड समितीच्या बैठकीकडे लागलंय. कारण याच बैठकीत भारताच्या पंधरासदस्यीय विश्वचषक संघावर पसंतीची मोहोर उमटणार आहे.
इंग्लंडमध्ये 30 मे ते 14 जुलै या कालावधीत वन डे विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहे. विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड करताना साहजिकच गेल्या सव्वा वर्षातल्या कामगिरीचा प्रामुख्यानं विचार करण्यात येईल. विराट कोहली आणि त्याच्या शिलेदारांची गेल्या सव्वा वर्षातली कामगिरी लक्षात घेता त्यापैकी अकराजणांच्या नावासमोरचं बटण निवड समितीच्या पाचही सदस्यांनी मतदानाआधीच दाबल्यात जमा आहे. त्यामुळं निवड समितीच्या बैठकीत खल होईल तो प्रामुख्यानं चार जागांसाठी.
VIDEO | पाकिस्तानला क्रिकेटच्याही मैदानात पराभूत करा : सचिन तेंडुलकर | एबीपी माझाआधी पाहूयात भारताच्या संभाव्य विश्वचषक संघात कुणाकणाची निवड ही नक्की मानली जातेय.
नंबर एक... कर्णधार विराट कोहली...
वन डे सामने – 25, धावा – 1813, सरासरी – 90.65, शतकं – 9, अर्धशतकं - 4
नंबर दोन... उपकर्णधार रोहित शर्मा...
वन डे सामने – 32, धावा – 1586, सरासरी – 58.74, शतकं – 6, अर्धशतकं - 7
नंबर तीन... शिखर धवन...
वन डे सामने – 32, धावा – 1317, सरासरी – 43.90, शतकं – 4, अर्धशतकं - 4
नंबर चार... केदार जाधव...
वन डे सामने – 22, धावा – 377, सरासरी – 62.83, शतकं – 0, अर्धशतकं - 2
नंबर पाच... महेंद्रसिंग धोनी...
वन डे सामने – 29, धावा – 602, सरासरी – 2617, शतकं – 0, अर्धशतकं - 4
नंबर सहा... हार्दिक पंड्या...
वन डे सामने – 13, धावा – 129, सरासरी – 18.42, दिलेल्या धावा – 506, विकेट्स - 9
नंबर सात... कुलदीप यादव...
वन डे सामने – 30, विकेट्स – 65, सरासरी – 20.72
नंबर आठ... यजुवेंद्र चहल...
वन डे सामने – 24, विकेट्स – 45, सरासरी – 24.33
नंबर नऊ... जसप्रीत बुमरा...
वन डे सामने – 13, विकेट्स – 9, सरासरी – 56.22
नंबर दहा... भुवनेश्वर कुमार...
वन डे सामने – 10, विकेट्स – 30, सरासरी – 32.06
आणि नंबर अकरा... मोहम्मद शमी...
वन डे सामने – 13, विकेट्स – 22, सरासरी – 29.18
आता उरल्या चार जागा. त्यापैकी डावखुरा अष्टपैलू म्हणून रवींद्र जाडेजाच्या नावाला दुसरा पर्याय नाही. डावखुरा फलंदाज, डावखुरा स्पिनर आणि सीमारेषेवरचा चपळ क्षेत्ररक्षक म्हणून जाडेजाची उपयुक्तता वारंवार सिद्ध झाली आहे. त्यामुळं रवींद्र जाडेजाचं विश्वचषकाचं तिकीट कापणं सध्या तरी कुणाला शक्य दिसत नाही.
दुसऱ्या यष्टिरक्षकाच्या जागेसाठी युवा रिषभ पंत आणि अनुभवी दिनेश कार्तिक यांच्यात मोठी चुरस आहे. रिषभ पंतच्या पाठीशी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचं वजन आहे, तर निवड समितीचा भर हा अनुभवावर आहे. त्यामुळं पंत आणि कार्तिक यांच्यापैकी विश्वचषकाच्या संघात स्थान कोण मिळवतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
लोकेश राहुल हा सलामीचा आणि चौथ्या क्रमांकाचाही पर्याय आहे. पण गेल्या सव्वा वर्षात राहुलला फार काही मैदान गाजवता आलेलं नाही. त्यानं चार सामन्यांमध्ये मिळून केवळ 86 धावाच काढल्या आहेत. त्यामुळं पुन्हा फिट झालेला आणि फॉर्ममध्येही आलेला मुंबईचा श्रेयस अय्यर लोकेश राहुलच्या नावाला पर्याय ठरू शकतो.
अंबाती रायुडू आणि अष्टपैलू विजय शंकर यांच्यामध्ये चौथ्या क्रमांकाच्या जागेसाठी नव्यानं चुरस निर्माण झाली आहे. अंबाती रायुडूच्या ऑफ स्पिन गोलंदाजीची शैली वादग्रस्त ठरणं ही बाब विजय शंकरच्या पथ्यावर पडू शकते. तो मोठे फटके खेळतो आणि मध्यमगती गोलंदाज म्हणून पाच-सहा षटकं सहज टाकू शकतो.
आयसीसीच्या आगामी वन डे विश्वचषकासाठी यजमान इंग्लंडसह विराट कोहलीच्या टीम इंडियाला सर्वाधिक पसंती देण्यात येतेय. पण इंग्रजीत म्हणतात ना, वेल बिगन इज हाफ डन. त्यामुळं वन डे विश्वचषकाच्या युद्धासाठी बीसीसीआयची निवड समिती आपला सर्वोत्तम निवडेल, हीच अपेक्षा आहे.
VIDEO | विश्वचषक सामन्यावर बहिष्कार घालून पाकला विजयाचे आयते गुण का द्यायचे? : सचिन तेंडुलकर | एबीपी माझा