(Source: Poll of Polls)
BLOG | मॅराडोना...नायक आणि खलनायकही
मॅराडोना एक फुटबॉलवीर म्हणून किती मोठा आहे याची प्रचीती पहिल्यांदा क्लब फुटबॉलच्या मैदानात आली. अर्जेंटिनातला लॉस सेबोलिटास हा क्लब त्याच्यासाठी फुटबॉलचा जणू पाळणा होता.
महान... दिग्गज... असामान्य... ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम... आदी एकापेक्षा एक अशी विशेषणंही खुजी ठरावीत असा तो होता. त्याचं नाव दिएगो मॅराडोना. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधल्या त्या प्रतिभावान कलाकाराचं हृदयविकारानं निधन झालं. त्यामुळं अवघं फुटबॉलविश्व शोकसागरात बुडालं आहे. एक फुटबॉलवीर म्हणून मॅराडोनाची थोरवी जितकी सांगावी तितकी थोडीच आहे, पण तितकंच त्याचं व्यक्तिमत्त्व प्रात:स्मरणीय होतं का?
पायात जणू वीज खेळावी अशी लखलखती फुटबॉल प्रतिभा...
साक्षात पेले यांच्या पंक्तीत नेऊन बसवणारं अलौकिक कर्तृत्व...
एक फुटबॉलवीर म्हणून मॅराडोना खरोखरच असामान्य होता...
किंबहुना, मॅराडोनाला लाभलेलं फुटबॉल गुणवत्तेचं वरदान इतकं मोठं होतं की, आपल्या सचिन तेंडुलकरसारखा तोही जन्मजात जीनियस होता. मॅराडोनानं 1982, 1986, 19990 आणि 1994 अशा चार फिफा विश्वचषकांत अर्जेंटिनाचं प्रतिनिधित्व केलं. त्यानं अर्जेंटिनाला एकदा नाही, तर सलग दोनवेळा फिफा विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारून दिली होती. मॅराडोनाच्या नेतृत्त्वाखाली अर्जेंटिनानं 1986 साली फिफा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. याच विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत मॅराडोनानं इंग्लंडवर नोंदवलेला वादग्रस्त गोल 'हॅण्ड ऑफ गॉड' म्हणून फुटबॉलच्या इतिहासात अजरामर आहे. मग 1990 सालीही मॅराडोनाच्या अर्जेंटिनानं फिफा विश्वचषकाची फायनल गाठली होती. पण अर्जेंटिनाला पश्चिम जर्मनीकडून फायनलच्या रणांगणात हार स्वीकारावी लागली.
मॅराडोना एक फुटबॉलवीर म्हणून किती मोठा आहे याची प्रचीती पहिल्यांदा क्लब फुटबॉलच्या मैदानात आली. अर्जेंटिनातला लॉस सेबोलिटास हा क्लब त्याच्यासाठी फुटबॉलचा जणू पाळणा होता. तरण्याबांड मॅराडोनाला अर्जेंटिनातल्या बोका ज्युनियर्सनं आपल्या ताफ्यात सामावून घेतलं आणि त्याचं अद्भुत कौशल्य फुटबॉलच्या जगाला पाहायला मिळालं.
मॅराडोना 1982 साली फिफा विश्वचषकात पहिल्यांदा खेळला आणि त्याच वर्षी स्पेनच्या बार्सिलोनानं त्याच्या फुटबॉल कौशल्याला 30 लाख पौंडांची विक्रमी किंमत मोजली. त्यानंतर इटलीच्या नापोलीनं तर 50 लाख पौंडाची विक्रमी बोली लावून मॅराडोनाला करारबद्ध केलं. त्यानं नापोलीला 1987 आणि 1990 साली फर्स्ट डिव्हिजनचं आणि 1989 साली युएफाचं विजेतेपद पटकावून दिलं. मॅराडोनानं अर्जेंटिनाकडून 91 आंतरराष्ट्रीय सामन्यांत खेळताना 34 गोल्सची नोंद केली होती. त्याच्या खात्यात कारकीर्दीतल्या 491 सामन्यांत मिळून तब्ब्ल 259 गोल्स आहेत. मॅराडोनाची ही कामगिरी त्याच्या चाहत्यांना आणि जगभरच्या फुटबॉल रसिकांना थक्क करणारी आहे.
फुटबॉलच्या मैदानातल्या या मॅराडोनानं जगभरच्या फुटबॉल रसिकांवर जणू गारुड केलं होतं. त्यामुळं विसाव्या शतकातल्या सर्वोत्तम फुटबॉलवीराच्या शर्यतीत फुटबॉलरसिकांनी पेले यांच्या तुलनेत मॅराडोनाच्या नावावर पसंतीची अधिक मोहोर उमटवली होती. अखेर फिफानं मतदानाचे नियम बदलून पेले आणि मॅराडोना यांना विसाव्या शतकातल्या सर्वोत्तम फुटबॉलवीराचा संयुक्त मान बहाल केला.
मॅराडोनाची ही झळाळती कारकीर्द नव्वदच्या दशकात डागाळायला सुरुवात झाली. कॅमोरा या इटालियन माफियांच्या संघटित गुन्हेगारीत त्याचं नाव येऊ लागलं. तिथूनच त्याच्या कारकीर्दीला उत्तेजक सेवनाचं ग्रहण लागलं. 1991 साली मॅराडोना उत्तेजक चाचणीत पहिल्यांदा दोषी असल्याचं आढळून आलं. त्यामुळं त्याच्यावर पंधरा महिन्यांची बंदी लादण्यात आली. पण त्यानंतरही मॅराडोनाच्या वागणुकीत सुधारणा झाली नाही. बुडत्याचा पाय खोलात असं म्हणतात ना, तसं मॅराडोनाचं झालं. 1994 सालच्या फिफा विश्वचषकादरम्यान तो उत्तेजक चाचणीत पुन्हा दोषी आढळला. त्यात पत्रकारांवर केलेल्या गोळीबाराप्रकरणी त्याला शिक्षा सुनावण्यात आली. या साऱ्या घटनांमुळं मॅराडोनाचं फुटबॉलमधलं वजन कमी झालं नसलं तरी त्याचं शारीरिक वजन तब्बल 128 किलोंवर पोहोचलं.
वाढलेलं वजन, बेफिकीर वृत्ती आणि उत्तेजकांची व्यसनं या साऱ्यांचा वाईट परिणाम मॅराडोनाच्या आरोग्यावर झाला. त्याचं शरीर एक ना अनेक व्याधींनी पोखरलं. 2004 साली मॅराडोनाला पहिल्यांदा हृदयविकाराचा झटका आला. त्यातून तो सावरला, पण सुधारला कधीच नाही. त्यामुळं मॅराडोनाचा कधी वाद, कधी गंभीर आजारपण आणि मग दीर्घकाळ चालणारे वैद्यकीय उपचार हा सिलसिला अगदी कालपरवापर्यंत कायम होता. जित्याची खोड म्हणतात ना ती मॅराडोनानं कधीच बदलली नाही. त्यामुळंच फुटबॉलरसिकांच्या मनातला हा देव प्रात:स्मरणीय राहिला नाही.