BlOG | निर्बंध शिथिल .... येरे माझ्या मागल्या नको!
लॉकडाऊनमधील निर्बंधांवरील शिथिलता मिळणार का ? हा प्रश्न सध्या काही जणांना छळत असला तरी ही शिथिलता अर्थचक्र हळू हळू रुळावर येण्यासाठी देण्यात आली आहे त्याचा कुणीही गैरफायदा घेऊ नये. विनाकारण बाहेर जाणे टाळणे ही काळाची गरज आहे. जितकी गर्दी कमी तितका आजाराच्या संसर्गाचा फैलाव कमी होणार आहे. कोरोनाचा धोका टळलेला नाही, फक्त रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. राज्यात रोज रुग्ण बरे होऊन जाण्याचे प्रमाण चांगले असले तरी हजारोच्या संख्येने नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहे. मृत्यूचे प्रमाणही कमी होत असले तरी मृत्यूच्या प्रमाणाचा आकडा अजूनही लक्षणीय आहे. शहरातील कोरोनाचा संसर्ग कमी होत असला तरी ग्रामीण भागात अजूनही त्याचे प्रमाण आहे अनेक गावं आजही ओस पडली आहेत. गावातले घर सोडून नागरिकांनी शेताकडे धाव घेतली आहे. एकंदरच कोरोनाची परिस्थिती भयावह आहे आणि ती आणखी कठीण होऊन द्यायची नसेल तर ती काळजी नागरिकांनाच घ्यावी लागेल. पहिली लाट, दुसरी लाट किंवा येऊ घातलेली तिसरी लाट मोजत बसण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीत सुरक्षित कसे राहता येईल नागरिकांनी केला पाहिजे. जानेवारी महिन्यात परिस्थिती चांगली होती हळू हळू सगळ्या गोष्टी खुल्या करण्यात आल्या त्याचा परिणाम गेल्या तीन महिन्यापासून आपण सर्वच पाहत आहोत. यावेळी मात्र तशी चूक न करता भलेही शासनाने काही ठिकाणी निर्बंधांमध्ये शिथिलता दिली असेल मात्र ती हलक्यात घ्यायची नाही. आज पर्यंत जगण्याच्या या लढाईत स्वतःला सुरक्षित ठेवले त्याचप्रमाणे अजून काही काळ ठेवावे लागणार आहे. हा कोरोनाचा व्हायरस आहे हा असा अचानक नाहीसा होणार नाही. वैद्यकीय शास्त्राच्या आधारावरच त्याचा समूळ नायनाट करावा लागणार आहे. त्यामुळे वैद्यक शास्त्रातील तज्ञ ज्याप्रमाणे सांगत आहे तसे वागा, जीव पेक्षा कुठलीही गोष्ट मोठी नाही, लक्षात ठेवून सुरक्षित वावर ठेवला पाहिजे.
कुणी घाबरविण्यासाठी लिहीत नाही मात्र नेमकी परिस्थिती काय आहे याची माहिती असणे गरजेची आहे त्यासाठी केलेला हा उहापोह. सध्याच्या दुसऱ्या लाटेमधे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे विशेष म्हणजे मृत्यूचा आकडा मोठा आहे तसेच नागरिकांचे संसर्ग होण्याचे प्रमाण खूप आहे. राज्यात आजच्या घडीला 2 लाख 71 हजार 801 सक्रिय रुग्ण असून ते विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. आधीच्या तुलनेने ऑक्सिजन बेड्स मिळविण्याची मारामारी कमी झाली असली तरी रुग्ण संख्या दिवसागणिक वाढतच आहे. एक रुग्ण पूर्ण बरा होण्यासाठी किमान कमीत कमी 14 दिवस घेतो. जे असे रोज नवीन रुग्ण निर्माण होत आहे त्या प्रत्येकाच्या आयुष्यातील 14 दिवस आजारपणात जाणे हा प्रचंड मोठा तोटा आहे. हा तोटा भरून काढणे फार जिकिरीचे असते. त्यामुळे हा संसर्गच होणार नाही या दृष्टीने प्रत्येक नागरिकांचे काम असले पाहिजे. इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत असताना काही नागरिक आजही मास्क न वापरता फिरत असतात. अनेक नागरिकांनी त्यासाठी मोठा दंडही भरला आहे. मास्क हा सुरक्षितेसाठी आहे, तो प्रशासनाने दंड गोळा करण्यासाठी काढलेला नियम नाही. मास्क घातल्यामुळे तुम्ही आणि तुमच्या आजूबाजूची लोकं सुरक्षित राहतात. संपूर्ण जगात मास्क घालायचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. रुग्णसंख्या कमी झाली की आपल्या वाटते सगळं काही आल बेल झालं आहे प्रत्येक जण पूर्वीसारखे जगायचं प्रयत्न करायला जातो आणि तिकडेच फसगत होते. नियमांची पायमल्ली होते आणि संसर्ग पसरायला काही काळ लागतो, मला काही होणार नाही म्हणणारे कधी कोरोनाग्रस्त होऊन जातात कळत नाही.
याप्रकरणी, मुंबई शहराच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे अध्यक्ष डॉ अविनाश सुपे सांगतात की, " कोरोनाची दुसरी लाट जाईल आणि तिसरी येईल अशी शक्यता वर्तविली असली तरी सध्या आपण ज्या वेगाने प्रतिबंधात्मक तयारी करत त्याच वेगाने तयारी चालूच ठेवावी लागणार आहे. लसीकरणावर भर देण्याची गरज आहे. कुठल्याही ठिकाणी साथीच्या आजारांवर मात करण्यासाठी 75 टक्के लोकांचा सहभाग असणे गरजेचे आहे साथीच्या आजाराच्या वेळीही कळलेलं आहे. सध्याची दिलेली शिथिलता म्हणजे मोकळीक नव्हे हे अगोदर नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे. पावसाळ्या अगोदरची अनेक लोकांची घरची, शेतीची कामे करून घेणे अपेक्षित असते. ह्या शिथिलतेचा वापर त्या कामे करण्याकरिता आहे असे समजून लोकांनी आपली कामे सुरक्षित राहून पूर्ण करून घेणे अपेक्षित आहे. ज्यांना ह्यापैकी कोणती कामे नसतील तर त्यांनी घरीच राहून आपली कामे करावी. विनाकारण गर्दी टाळावीत लागणार आहे. अजून पुढचे काही महिने सावध पवित्रा ठेऊनच जगावे लागणार आहे. शासनाने सरसकट बंदी याकरिताच उठवली नाही कारण अजूनही कोरोनाचे संकट घोंगावत आहे. उदाहरण द्यायचे झाले तर अजूनही मुंबईत 2200 रुग्ण अतिदक्षता विभागात असून उपचार घेत आहेत. हजारोच्या संख्येने आजही नवीन रुग्ण मुंबईत दाखल होत आहे. राज्यात काही ठिकाणी म्युकरमायकोसिसचे रुग्ण उपचार घेत आहेत. लहान मुलांमध्ये काही आजाराचे प्रमाण दिसून आले आहे. आरोग्य यंत्रणा पूर्ण ताकतीने या आजाराच्या विरोधात लढा देत आहेत. त्यांच्यावर या दुसऱ्या लाटेत विशेष ताण आला आहे. त्याचा हा ताण कमी करण्याची जबाबदारी नागरिकांची आहे. गेल्या वेळी ज्या चुका किंवा आपले जे भय मुक्त जगण्याचं वागणं होत यावेळी मात्र ते टाळायला हवे. कोरोनाचा आजार आहे तो पर्यंत सगळ्यांनी काळजी घेऊनच जगलं पाहिजे.
लसीकरण करण्यासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. लस मिळविण्यासाठी जागतिक निविदा काढण्यापासून ते उपलब्ध असणाऱ्या लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांशी त्यांचे बोलणे सुरु आहे. मात्र लसीची एकंदरच असणारी कमतरता लक्षात घेऊन लसीकरण सुरु आहे. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी बराच वाव आहे कारण देशात लसीकरणाच्या मोहिमेत महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर असले तरी अजून अपेक्षित असे लसीकरण राज्यात झालेले नाही. अजून खूप मोठा लसीकरणाचा पल्ला गाठायचा आहे. सध्या राज्यात 2 कोटी 23 लाख 6 हजार 998 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. सध्या दिवसाला जवळपास लाखाच्या संख्येने लसीकरण होत आहे, हे प्रमाण महाराष्ट्रासाठी अत्यल्प आहे. दिवसाला राज्य शासनाची 8 ते 10 लाख लसीकरण एवढी यंत्रणा सज्ज आहे. मात्र लस उपलब्ध नसल्यामुळे अनेक लसीकरण केंद्र बंद आहेत. काही नागरिकांची दुसरा डोस मिळविण्यासाठी वणवण सुरु आहे तर अनेक तरुणांना अजून पहिला डोस मिळण्याच्या प्रतीक्षेत थांबावं लागलं आहे. लसीकरण वेगात करण्यासाठी शासन सज्ज असून चालणार नाही त्याकरिता लस मिळवावी लागणार आहे. लस पुरवठा हवा त्यापद्धतीने अजूनही होत नाही. जून महिन्यात काही मोठ्या संख्यने लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे, मात्र आजच्या घडीला किती लस उपलब्ध होतील हे कुणीच सांगू शकणार नाही. लस निर्मिती करणाऱ्या काही नवीन कंपन्या बाजारात येतात का याची वाट पाहावी लागणार आहे. सध्या ज्या कंपनी देशाला लस पुरवीत आहेत. त्या कंपन्यांनी त्यांची उत्पादन क्षमता वाढविली आहे. त्यामुळे येत्या काळात लसीकरण मोहिमेत सकारात्मक बदल दिसण्याची शक्यता आहे.
दिवसागणिक राज्यात कोरोना बाधितांचे आकडे कमी होत असले तरी नव्या रुग्णाचे आकडे निर्माण होतच आहे. मृत्यूचा आकडा थांबविण्यासाठी सगळ्याच पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. नवीन उपचार पद्धती बाजारात आणली गेली आहे त्याचा वापर करण्यात येत आहे. रुग्णांनी मात्र कोणतेही लक्षण दिसल्यास घरी न थांबता डॉक्टरांचा सल्ला तात्काळ घेतला पाहिजे. अनेक वेळा वेळेत उपचार घेणारे रुग्ण बरे होऊन गेले आहेत. काही रुग्ण आजही लक्षणे असल्यास घरीच स्वतःच्या मनाने उपचार करतात आणि मग लक्षणे वाढल्यावर रुग्णालयात दाखल होतात. त्यामुळे नागरिकांनी आता असे करता शक्यतो लवकर डॉक्टरांकडे गेले पाहिजे. रुग्णसंख्येच्या आलेखाचे सपाटीकरण कसे होईल यासाठी डॉक्टर प्रयत्न करत असले तरी नागरिकांनी या काळात डॉक्टरांना सहकार्य केले पाहिजे. डॉक्टर ज्या सूचना देत आहे त्याचे पालन केले तर एके दिवशी नक्कीच कोरोनाबाधितांची संख्या एक आकडी आल्याशिवाय राहणार नाही.
राज्यात कोरोनाचा प्रसार कसा होणार नाही याचा प्रत्येक नागरिकांनी विचार करणे गरजेचे आहे. दुसऱ्या लाटेवरच कोरोनाला कसे थोपवता येईल याबाबत नियोजन करणे गरजेचे आहे. गर्दी होणाऱ्या सर्व कार्यक्रमांवर राज्य आणि केंद्र सरकारने पुढील एक वर्षासाठी बंदी घालण्याची गरज आहे. कोरोनाला निमंत्रण द्यायचे नसेल तर काही कडक उपाययोजना ह्या सरकारला कराव्याच लागतील. कारण कोरोनाबाधित झालेल्या नागरिकांनाच काय त्रास असतो ह्याची त्यांना चांगलीच कल्पना आली असेलच. त्यामुळे यापुढे जी काही निर्बंधांमधून शिथिलता मिळाली आहे त्याचा योग्य कारणासाठी वापर करा. कोरोनाचा संसर्ग राज्यात अनेक ठिकाणी आहे. विशेष करून ग्रामीण ठिकाणी जास्तच आहे, तुलनेने त्या ठिकाणी आरोग्याच्या व्यवस्था कमी आहेत. मात्र आरोग्य यंत्रणा सर्व स्तरावरील रुग्णांकडे पोहचण्याचा प्रयत्न करत असली तरी नागरिकांनी सुद्धा आरोग्य यंत्रणकेकडे उपचार घेण्यासाठी कसं पोहचता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे.