>> संतोष आंधळे


भारतातील कोरोना प्रसारास सुरुवात झाल्यापासून कोरोनाचा विषाणू मुंबईतील घनदाट लोकवस्ती असलेल्या धारावीमध्ये शिरला तर काय होईल? या प्रश्नाने 'त्यावेळी' प्रशासन चिंतेत होतं. मात्र कोरोनाच तो, त्याचा शिरकाव जगभरात प्रत्येक ठिकाणी झाला त्याला धारावी तर कशी अपवाद ठरणार होती. एप्रिलमध्ये कोरोनाने धारावीत 'एंट्री' घेतली आणि महापालिका प्रशासनासोबत आरोग्य यंत्रणा सज्ज झाली. जे काही कोरोनाला रोखण्याकरिता आजपर्यंत नवीन प्रयोग झाले त्याची सुरुवातच या परिसरातून झाली. भीतीदायक आणि रोगट वातावरणात आरोग्य कर्मचारी अक्षरशः प्राणाची बाजी लावून धारावीतल्या गल्ल्यामध्ये फिरत कोरोनाच्या आजाराबाबत जनजागृती आणि तपासणी मोहीम करत होते. त्यांना खरी साथ लाभली तेथील स्थानिक डॉक्टरांची. हजारोने निर्माण झालेल्या रुग्णांना उपचार, काहींना विलगीकरण आणि अलगीकरण कक्षात ठेवून धारावीवर आलेलं कोरोनाचं संकट रोखण्यात महापालिका प्रशासन अखेर यशस्वी झाले, असं सध्या तरी म्हणता येईल असेच चित्र आहे .एप्रिलपासून दररोज रुग्ण सापडणाऱ्या धारावीत शुक्रवारी एकही नवीन रुग्ण सापडला नाही. याकरिता धारावीत नागरिकांच्या आरोग्यासाठी राबणाऱ्या हाताचे 'कौतुक' होणे क्रमप्राप्त आहे.


धारावीमध्ये एका दिवसात एकही रुग्ण न सापडणे हा चर्चेचाच विषय आहे, कारण त्या वस्तीला तशी पार्श्वभूमी आहे. ज्यावेळी कोरोनाची व्याप्ती मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर होती त्यावेळी 7 जुलैला दिवसभरात या भागात एकच नवीन रुग्ण सापडला होता. त्यावेळी या भागातील कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी ज्या उपाय योजना केल्या गेल्या होत्या. त्याची दखल जागतिक स्तरावर म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने घेत पालिकेने केलेल्या उपाय योजनांचे कौतुक केले होते. आशिया खंडात धारावी ही घनदाट वस्ती असलेली एक मोठी वसाहत आहे. अनेक देशांना धारावीची ओळख विविध कारणांवरून आहे. आज रुग्ण संख्या आटोक्यात येण्याचे श्रेय महापालिका प्रशासन यांच्यासोबत येथील स्वयंसेवी संस्था, सहकारी गृहनिर्माण संस्था, चाळ कमिट्या, छोटी-मोठी मंडळे यांना खऱ्या अर्थाने जाते. या सगळ्यांनी मिळूनच एकत्रितपणे येऊन कोरोनाला आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे.


धारावीचा एकूण परिसर 2.5 चौरस किलोमीटरचा असून या परिसरात नऊ लाखांपेक्षा जास्त लोकवस्ती आहे. या भागातील कोरोनाला पायबंद करण्याकरिता महापालिकेतर्फे 'मिशन धारावी' ही हाती घेतले होते. या अंतर्गत त्यांनी विविध उपाययोजना हाती घेतल्या. तसेच पाच हजारापेक्षा जास्त व्यवसाय या भागात असून ते रितसर जीएसटी नोंदणीकृत आहेत. धारावीतील बहुतांश कारखाने 15 हजार सिंगल रूममध्ये आहेत. तसेच अनेक वस्तूंची निर्यात या भागातून होत असून वार्षिक कोट्यवधींची उलाढाल या भागातून होत असते.


महापालिकेने 'मिशन धारावी' अंतर्गत सुरवातीपासून 4T या ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट तत्वावर काम करण्यास सुरुवात केली गेली. तसेच प्रशासनाने 'चेस-द-व्हायरस' ही मोहीम राबविण्यास सुरुवात केली. या मध्ये 'डॉक्टर रुग्णाच्या घरी' या गोष्टीचा अवलंब केला गेला. डॉक्टर रुग्णाच्या घरी जाऊन तपासणी करून त्याला कोणत्याही पद्धतीचा आजार आहे की नाही हे तपासात होते. 10 बाय 10 च्या लहान घरात 8-10 लोक येथे दाटीवाटीने राहत असतात. लहान-लहान गल्लीतील येथील घराची रचना ही इमारतीसारखी आहे, ग्राउंड अधिक 1, अधिक 2 आणि अधिक 3 प्रमाणे आहेत. या सगळ्या प्रकारात सामाजिक अंतराचा अवलंब करणे अत्यंत जिकिरीचे होते, त्यामुळे या आजाराचा प्रसार रोखण्याकरिता जास्तीत जास्त लोकांना संस्थामक विलगीकरणात ठेवण्याच्या निर्णय घेण्यात आला होता.


धारावी हा परिसर महापालिकेच्या जी-उत्तर विभागात येतो. या विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर गेली वर्षभर या विभागात काम करत असून त्यांच्या करिता या परिसरातील रुग्ण संख्या कमी करणे हे मोठे आव्हानात्मक काम होते. धारावी सोबत या परिसरात दादर आणि माहीम परिसर सुद्धा याच विभागात येतात. सध्याच्या काळात 12 रुग्णांवर धारावीमध्ये उपचार सुरु आहेत. तर दादरमध्ये 106 तर माहीम मध्ये 212 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दिघावकर यांनी प्रशासनासोबत स्थानिक नागरिकांच्या आणि खासगी डॉक्टरांच्या मदतीने येथे खूप मोठे कोरोनाच्या अनुषंगाने सकारात्मक काम उभे केले त्याचेच हे एकत्रित यश आहे.


30 वर्षापेक्षा जास्त काळ रुग्णांना सेवा देणारे आणि या परिसराची खडा-न-खडा माहिती असणारे, नेहमी येथील नागरिकांच्या संर्पकात असणारे आणि इंडियन मेडिकल असोशिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ अनिल पाचनेकर सांगतात की, " कोरोनाकाळात धारावी हा परिसर अनेकांसाठी चेष्टेचा आणि तिरस्काराचा विषय ठरली होता. धारावीमध्ये जर या संसर्गजन्य आजाराचा उद्रेक झाला असता तर संपूर्ण मुंबईसह महाराष्ट्र अडचणीत आला असता. मात्र महापालिकेचे अधिकारी, आरोग्य यंत्रणा, स्थानिक पोलीस, राजकारणी, स्थानिक खासगी डॉक्टर यांनी एकत्र येऊन या आजाराविरोधात लढा दिला आहे. हे कुणा एका व्यक्तीचे काम नाही. त्यामुळे याचे श्रेय या सर्व लोकांना जाते. या आजच्या सकारात्मक वातावरणामुळे धारावीचे नाव जगाच्या पाठीवर गेले आहे. त्यामुळे सर्वच जण एकत्र येऊन कशा पद्धतीने या आजाराविरोधात लढा देऊन यांचे उदाहरण जगासमोर ठेवले आहे."

8 जुलै रोजी, 'जय धारावी !' या शीर्षकाखाली सविस्तर लिखाण करण्यात आले होते. त्यादिवशी केवळ एकच रुग्ण धारावीत सापडला होता. त्यामध्ये, आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी येथे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाचा रुग्ण आढळला. घनदाट लोकवस्ती असलेल्या या अशा परिसरात रुग्ण सापडणे म्हणजे तशी धोक्याची घंटाच होती आणि शेवटी जे घडायचं तेच घडलं. त्यानंतर या परिसरात रुग्ण संख्या इतकी झपाट्याने वाढली की संपूर्ण देशाचे लक्ष या कोरोना 'हॉटस्पॉट'ने आकर्षित केलं. त्या दरम्यान आरोग्य यंत्रणेतील सगळ्यांनीच म्हणजे राज्याचे आरोग्य मंत्री, केंद्रीय पथक आणि महापालिकेचे उच्चपदस्थ अधिकारी या सगळ्यांनीच या भागाला भेट देऊन युद्धपातळीवर कोणत्या उपाययोजना करता येतील यासाठी विविध प्रयत्न केले. 1 एप्रिल ते 8 जुलै या दरम्यान सुरु असलेल्या (अजूनही सुरूच आहे) या कोरोनाच्या युद्धात सगळ्याच यंत्रणांना यश संपादन झाले असे म्हणता येईल असा दिवस अखेर उजाडलाच. दिवसागणिक नव्याने शेकडोने सापडणाऱ्या रुग्णसंख्येत हळू-हळू वाढ कमी झाली आणि मंगळवारी केवळ एकाच नवीन रुग्णांची नोंद धारावी परिसरात करण्यात आली. साथीच्या आजारांवर मिळविलेला हा ऐतिहासिक विजय असून यापुढेही पावसाच्या काळातही नागरिकांनी सुरक्षित राहणे आणि प्रशासनाने सतर्क राहणे गरजेचे आहे.


धारावीची ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर लवकरच या आजारावर नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे. कारण धारावीमध्ये गर्दी नका करू असे म्हटले तर तेथील नागरिकच इतक्या दाटीवाटीने राहतात की सोशल डिस्टंसिंग पाळणे जवळपास अशक्य आहे. अशा परिस्थितीही धारावीकरांनी या रोगांवर नियंत्रण मिळवलं आहे यासाठी धारावी मॉडेल कौतुकास पात्र आहे. त्याकरिता त्यांची पाठ थोपटलीच पाहीजे. कोरोनाचा जर एकत्रिपणे मुकाबला केल्यास या आजाराला आटोक्यात ठेवणे शक्य आहे. हे धारावी मॉडेलने सर्वांनाच शिकवून दिले आहे. यामुळे कोरोनाचा विषाणू कोणताही असो नवा किंवा जुना नागरिकांनी सुरक्षिततेचे नियम पाळले तर या आजारावर मात करणे जास्त अवघड नाही. त्यामुळे काही काळ विनाकारण गर्दीच्या ठिकाणी न जाणे आणि शासनाने आखून दिलेल्याला सर्व सूचनांचे पालन करण्यात सगळ्यांचेच भले आहे.


संतोष आंधळे यांचे आणखी काही महत्वाचे ब्लॉग