एक्स्प्लोर

'सिंहासन' - त्रिकालाबाधित राजकारणाचा मानबिंदू...

'सिंहासन' एका ठराविक कालखंडाचा प्रतिनिधी नसून त्यातील पात्रे आजही सजीव वाटतात हे याच्या कथेचे आणि विजय तेंडुलकरांच्या अद्वितीय पटकथेचे यश आहे.

खांद्याला शबनमची झोळी, डोळ्यावर जाड काळ्या फ्रेमचा चष्मा ,किंचित वाढलेले दाढीचे खुंट अन मळकट सैल सदरा अशा वेशात संपूर्ण चित्रपटात आपला मुक्त वावर असणारा पत्रकार दिगू टिपणीस(निळू फुले) भल्या सकाळी घरातल्या लाकडी खुर्चीत अंगाचे मुटकुळे करून बसलेला आहे, काही वेळापूर्वी त्याला सीएमचा फोन येऊन गेलेला आहे. तो अजूनही त्या फोनच्याच विचारात आहे. इतक्यात डोअरबेल वाजते. सिगारेट शिलगावत रेडीओ सुरु करून तो दरवाजा उघडतो, बाहेर त्याची तरुण कामवाली बाई छातीवरच्या पदराचे नेहमीप्रमाणे भान नसल्यागत उभी असते. तिच्याकडे एक विलक्षण जहरी कटाक्ष टाकत दिगू बाजूला होतो. ती आत येते, रेडीओवर गाणे सुरु आहे, 'झुळझुळतो अंगणात तोच गार वारा ग हुळहुळतो तुळशीचा अजुन देह सारा ग अजुन तुझे हळदीचे अंगअंग पिवळे… ' दिगू परत खुर्चीवर येऊन बसतो, बाई आत जाते अन फरशी पुसण्यासाठी पाण्याची बादली घेऊन बाहेर येते. दिगूची सिगारेट पेटलेली आहे अन डोक्यात विचारांचे मोहोळ उठलेले आहे. त्याचं सारं ध्यान तिच्याकडे आहे अन इतक्यात टेबलावरच्या फोनची घंटी वाजते. पलीकडून संवाद सुरु होतात, "श्रीमंतांचा फोन आला होता वाटतं ? काय म्हणत होते श्रीमंत ?" दिगू उत्तरतो, "काही नाही, त्यांची तब्येत नरम आहे म्हणत होते, दुष्काळाचे विचारत होते …" पलीकडून प्रतिप्रश्न येतो "पण असं झालं काय अचानक, मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडायला?" बोलत बोलत आलखनपालखन मांडी घालून खुर्चीवर बसलेला दिगू तीक्ष्ण नजरेने फरशी पुसणाऱ्या पाठमोरया असलेल्या कामवाल्या बाईच्या पुठ्ठयाला निर्लज्जपणे न्याहळत खवचटपणे छद्मीपणे हसत उत्तरतो, "काही नाही, खाऊ नये ते खाल्लं असेल !"........ ~~~~~~~ विधानसभेचं सत्र चालू आहे, दुष्काळाच्या अन गावाकडच्या माणसांच्या व्यथा मांडणारा एक सच्चा माणूस म्हणून ख्याती असलेले श्रीपतराव शिंदे अगदी पोटतिडकीने बोलताहेत, "गाठा, उच्चांक गाठा. आम्ही दुष्काळी भागातली माणसं,उपाशी पोटांचे नगारे बडवीत तुमचे उच्चांक बघतो."...... सदनात प्रश्नोत्तरे सुरु आहेत पण सीएम जिवाजीराव शिंदेंचे (अरुण सरनाईक) कशातच लक्ष नाहीये कारण एका निनावी फोनद्वारे अज्ञाताने त्यांना सांगितले आहे की त्यांच्या जवळचे, पक्षाचे लोक त्यांच्याविरुद्ध कट करताहेत. त्यांच्या डोक्यात त्याचा 'खोडकिडा' वळवळतो आहे, त्यामुळे सदनातील कामकाज टाकून बाहेर पडतात. पण तत्पूर्वी सभागृहात त्यांच्या शेजारी बसलेले अर्थमंत्री विश्वासराव दाभाडे (श्रीराम लागू) त्यांना विचारतात की, "तब्येत बरी आहे ना ? मी सोडायला येऊ का ? काही अडचण ?" हे प्रश्न विचारतानाचे त्यांच्या चेहऱ्यावरचे बेरकी भाव अन डोळ्यातले आव्हान खूप काही बोलून जातं....... ~~~~~~~~~~~ सीएमच्या निवासस्थानी फोन करून दिगू तिथले सहायक मोगरे यांना विचारतो, "काय झालेय साहेबांना ?अहो मोगरे, प्रेसवाल्यांना सांगता ती माहिती मला सांगू नका !" हा दिगू सीएम अन विश्वासराव दोघांच्याही जवळचा आहे पण त्याची पत्रकारितेची काही अस्सल तत्वे आहेत तो भाडोत्रीही नाही अन आजच्यासारखा विकाऊ तर मुळीच नाही. त्याला पत्रकारितेइतकाच राज्याच्या भल्यासाठीच्या राजकारणातही रस आहे…... ~~~~~~~~~~~~~ 'नव्या मुख्यमंत्र्याला सचिवालयाच्या बाहेर जोड्याने मारीन' असं आत्मविश्वासपूर्ण देहबोलीत ठासून सांगणारा कामगार नेता डिकास्टा (सतीश दुभाषी) आणि त्याचवेळेस पडद्यावर टोलेजंग इमारतीवरून दिसणारी अस्ताव्यस्त पसरलेली मुंबई एका प्रसंगामध्ये दिसते. जणू ही लढाई मुंबईच्या साम्राज्याचीच असावी असा विचार त्या वेळी मनात तरळतो. ~~~~~~~ यात अर्थमंत्री विश्वासराव दाभाडेंचा आत्मविश्वास गमावलेला तरुण मुलगा आहे आणि त्याची उठवळ पत्नी (रीमा लागू) आहे, जिची आपल्या पतीपेक्षा सासऱ्याशी जास्त जवळीक आहे. पती तिच्यादृष्टीने हरकाम्या आहे तर विश्वासरावांच्या लेखी ती एक हत्यार आहे. काहीही करून राजकारणात येऊन काही तरी घबाड हस्तगत करण्याच्या लालसेने आलेली त्यासाठी पदर पाडून काहीतरी पदरात पडावे म्हणून जीवाचा आटापिटा करणारी अधाशी नजरेची लालन सारंग आहे. धूर्त खेळी करून आपलं आसन बळकट करून घेणारे चलाख बुधाजीराव (मोहन आगाशे) आहेत. ~~~~~~~~ 'सिंहासन' एका ठराविक कालखंडाचा प्रतिनिधी नसून त्यातील पात्रे आजही सजीव वाटतात हे याच्या कथेचे आणि विजय तेंडुलकरांच्या अद्वितीय पटकथेचे यश आहे... 'सिंहासन'चे कथासूत्र तसे बघितले छोटेसेच आहे पण त्याला चिरंतन चैतन्याचा वसा मिळाला असावा. राजकारणाच्या बुद्धिबळाची ही कालातीत गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांनी(सीएमनी) आपले स्थान कसे राखले हे पत्रकार दिगू टिपणीस सारे पाहत असतो. मुख्यमंत्र्यांचे पहिले प्रतिस्पर्धी अर्थमंत्री विश्वासराव दाभाडे सीएमना अडचणीत आणण्यासाठी कामगार पुढारी डिकास्टाला हाताशी धरून ‘मुंबई बंद’चा कार्यक्रम आखवतात.त्याच्या बदल्यात अर्थमंत्र्यांनी कामगारांवरील खटले काढून घ्यायचे असतात. सीएमच्या अडचणीत वाढ होत असताना नेतृत्वात बदल हवा म्हणून अर्थमंत्री राजीनामा देतात. मराठ्वाड्याचे माणिकराव पाटील मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पाहत असतात. महसूल, अर्थ व शेतकी मंत्री सीएमना खाली खेचण्याचा संयुक्त प्रयोग करतात. सीएमना हृदयविकाराचा 'फेक' झटका येतो (!) त्यातून मिळालेल्या सहानुभूतीच्या लाटेवर आरूढ होऊन मंत्रीमंडळाचा विस्तार करून असंतुष्टांना आपल्या तंबूत घेऊन ते आपले शासन स्थिर करतात. महाराष्ट्राच्या खऱ्याखुऱ्या विधानसभा सदनातील कामकाज वाटावे असं उत्तुंग आणि उत्कट चित्रीकरण झालेला हा सिनेमा काळजाच्या पडद्यावर असा कोरलेला आहे की त्यातलं एकही दृश्य पुसलं जात नाही... 'ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार' असं गाणारी तरुण स्मगलरची (जयराम हर्डीकर) कोवळी पोर असो वा त्याच्याशी दगाफटका करणारा नाना पाटेकरचा स्मगलर असो वा जिवाजीराव मुख्यमंत्री पद शाबूत ठेवतात तेंव्हा विषमतेवर आसूड ओढत परिस्थितीची हतबलता दर्शवणारे अप्रतिम काव्य'उषःकाल होता होता काळरात्र झाली..' असों. हे सर्व विभिन्न छोटे घटक आहेत पण कथेच्या बळकटीत यांचा मोलाचा वाटा आहे. सुरेश भटांच्या गाण्यावर जब्बारनी जो क्लायमॅक्स केला आहे तो प्रेक्षकाला समूळ हादरवून टाकतो आणि आपण किती लाचार होऊन हताश विमनस्कतेचे बळी होतो आहोत हे दाखवून देतो. हे सगळं अजूनही जसंच्या तस्सं माझ्या डोक्यात भिनलेलं आहे.... 'मुंबई दिनांक' ही अप्रतिम पण काहीशी अस्ताव्यस्त तर 'सिंहासन' ही खिळवून ठेवणारी कादंबरी ! अरुण साधूंच्या या दोन्ही कादंबरीतील निवडक प्रसंगावर बेतला होता जब्बार पटेलांचा 'सिंहासन' ! विजय तेंडुलकरांनी या सिनेमाची पटकथा अन संवाद असे भन्नाट लिहिले आहेत की पडद्याच्या कॅन्व्हास वरून प्रेक्षकाचे डोळे हटत नाहीत. 'सिंहासन'चा प्रत्येक संवाद बोलका आहे, प्रत्येक फ्रेम देखणी आहे, सर्व अभिनेत्यांचे काम दमदार आहे. प्रकाशयोजना आणि नेपथ्य अत्यंत प्रभावशाली आहे. पार्श्वसंगीत प्रसंगी काळजाचा ठोका चुकवते तर कधी डोळ्याच्या कडा ओल्या करून सोडते. राजकीय विषयावरील चित्रपट असूनही याला अफाट लोकप्रियता मिळाली होती. यातील गाणीही रसिकप्रिय झाली. समीक्षकांनीही अगदी मुक्तकंठाने त्याची स्तुती केली होती. 'सिंहासन'च्या तोडीचा सिनेमा मराठी चित्रपटसृष्टीत पुन्हा झाला नाही. 'सिंहासन'मध्ये जे राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि वैकल्पिक मुद्दे केंद्रस्थानी ठेवले गेले आहेत ते मुद्दे आजही महाराष्ट्राच्या राजकारणात जसेच्या तसे आहेत. 'सिंहासन' १९७९मध्ये येऊन गेला. त्याला आता ४० वर्षे पूर्ण झालीत. पण महाराष्ट्राच्या राजकारणात, सत्ताकारणात, अर्थकारणात आणि समाजकारणात तसूभरही फरक पडलेला नाही. ही महाराष्ट्राची शोकांतिका म्हणायची की'सिंहासन'कर्त्या अरुण साधू आणि जब्बार पटेलांची दूरदृष्टीपूर्ण सापेक्षता समजायची याचे उत्तर मला अजूनही मिळालेले नाही. २०१९ च्या निवडणुकीच्या अनुषंगाने घडणाऱ्या घटना पाहून मन विषण्ण होत नाहीये कारण आता हे विखारी राजकारण असेच चालत राहणार आहे याची खुणगाठ मनाशी पक्की बांधली आहे. पक्ष आणि चिन्हे बदलली जातात पण वृत्तीची तीच असते, काहीही करून सत्तेत राहण्याची. मग त्यासाठी कोणत्याही स्तराला जाण्याची तयारी असते. बाकी तत्वे लॉजिक वगैरे सगळं झूठ असतं. सत्तेचे सिंहासन मिळवण्यासाठी हे कुणाच्याही गळ्यात पडू शकतात आणि कुणाचेही गळे कापू शकतात. तरीदेखील सामान्य माणूस यांच्यातल्या कंपूगिरीला भुलत राहतो आणि यांच्या त्यांच्या बाजूने आपली ताकद वाया घालवत राहतो. इतकं होऊनही सिंहासन त्याच्याच छाताडावर करकचून पाय देत भक्कम उभं असतं... - समीर गायकवाड छत्रपती शिवाजीराजे - न्यायदक्ष प्रजाहितवादी शासक जातीधर्माच्या कळपातले प्रतिबिंब.. राजसत्तेवरचा अंकुश ! इंदिराजी .... काही आठवणी ...
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ कार्ड अंगलट, अमेरिकेत अनेक कंपन्या दिवाळखोरीत,  15 वर्षांचं रेकॉर्ड मोडलं
डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ कार्ड अंगलट,अमेरिकेत अनेक कंपन्या दिवाळखोरीत, 15 वर्षांचं रेकॉर्ड मोडलं
INDW vs SLW : वनडे वर्ल्ड कपनंतर स्मृती मानधनाचं पहिलं अर्धशतक, शफाली वर्माची वादळी खेळी, भारताचा श्रीलंकेवर आणखी एक विजय
INDW vs SLW : स्मृती मानधना- शफाली वर्माचा टी 20 नवा विक्रम, भारताचा श्रीलंकेवर सलग चौथा विजय
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांना नागपूरला सोडून परत निघाले, समृद्धीवर भीषण अपघात, घटनेत तिघे जखमी, कारचं मोठं नुकसान
मंत्री प्रतापराव जाधवांना नागपूरला सोडून परत निघाले, वाशिम जिल्ह्यात समृद्धीवर रात्री भीषण अपघात, तिघे जखमी
मोठी बातमी! भाजपकडून पहिला अर्ज तेजस्वी घोसाळकरांचा; उच्चभ्रू मलबार हिलमधूनही 4 उमेदवारांची नावं जाहीर
मोठी बातमी! भाजपकडून पहिला अर्ज तेजस्वी घोसाळकरांचा; उच्चभ्रू मलबार हिलमधूनही 4 उमेदवारांची नावं जाहीर
ABP Premium

व्हिडीओ

Baba Vanga : 2026 साली जगावर कोणतं मोठं संकट? Special Report
2025 Rewind : 2025 या सरत्या वर्षातल्या खास घडामोडींचा आढावा Special Report
Baramati Adani Group and Pawar Family : अदानींचं कारण, पवाराचं मनोमिलन, बारामतीत काय घडलं?
Sharad Pawar - Ajit Pawar शरद पवारांशी बोलण्यासाठी अजितदादा अदानींच्या खुर्चीवर बसले, पुढे काय झालं?
Solapur Congress : सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ कार्ड अंगलट, अमेरिकेत अनेक कंपन्या दिवाळखोरीत,  15 वर्षांचं रेकॉर्ड मोडलं
डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ कार्ड अंगलट,अमेरिकेत अनेक कंपन्या दिवाळखोरीत, 15 वर्षांचं रेकॉर्ड मोडलं
INDW vs SLW : वनडे वर्ल्ड कपनंतर स्मृती मानधनाचं पहिलं अर्धशतक, शफाली वर्माची वादळी खेळी, भारताचा श्रीलंकेवर आणखी एक विजय
INDW vs SLW : स्मृती मानधना- शफाली वर्माचा टी 20 नवा विक्रम, भारताचा श्रीलंकेवर सलग चौथा विजय
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांना नागपूरला सोडून परत निघाले, समृद्धीवर भीषण अपघात, घटनेत तिघे जखमी, कारचं मोठं नुकसान
मंत्री प्रतापराव जाधवांना नागपूरला सोडून परत निघाले, वाशिम जिल्ह्यात समृद्धीवर रात्री भीषण अपघात, तिघे जखमी
मोठी बातमी! भाजपकडून पहिला अर्ज तेजस्वी घोसाळकरांचा; उच्चभ्रू मलबार हिलमधूनही 4 उमेदवारांची नावं जाहीर
मोठी बातमी! भाजपकडून पहिला अर्ज तेजस्वी घोसाळकरांचा; उच्चभ्रू मलबार हिलमधूनही 4 उमेदवारांची नावं जाहीर
मोठी बातमी! अखेर दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र; अजित पवारांकडूनच घोषणा,  'एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब' पिंपरीत भाजपला आव्हान
मोठी बातमी! अखेर दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र; अजित पवारांकडूनच घोषणा, पिंपरीत भाजपला आव्हान, 'माझाच्या' बातमीवर शिक्कामोर्तब
मोठी बातमी! मुंबईसाठी अजित पवारांच्या 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नवाब मलिकांचे भाऊ-बहीण मैदानात
मोठी बातमी! मुंबईसाठी अजित पवारांच्या 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नवाब मलिकांचे भाऊ-बहीण मैदानात
Gold Rate : सोनं एका वर्षात 75913 रुपयांनी महागलं, चांदीची वर्षभरात मोठी झेप, चांदी यंदा किती रुपयांनी महागली?
सोनं एका वर्षात 75913 रुपयांनी महागलं, चांदीची वर्षभरात मोठी झेप, चांदी यंदा किती रुपयांनी महागली?
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गळती, पदाधिकारीच अजित पवारांसोबत; धनंजय पिसाळ संजय राऊतांच्या भावाविरुद्ध मैदानात
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गळती, पदाधिकारीच अजित पवारांसोबत; धनंजय पिसाळ संजय राऊतांच्या भावाविरुद्ध मैदानात
Embed widget