BlOG | जो दिखता है वो बिकता है!

मला दररोज सकाळी फोन हातात घेतल्यापासून ते रात्री झोपताना फोन बाजूला ठेवेपर्यंत एक गोष्ट सतत खटकते ती म्हणजे जाहिरात. आजकाल मोबाईलमध्ये दिसणाऱ्या जाहिरातींत झपाट्याने वाढ होत आहे. पूर्वी दोन मिनिटांचा एक अख्खा व्हिडिओ सलग पाहता यायचा. पण, आता मात्र दोन मिनिटांच्या व्हिडिओच्या कालावधीत काही सेकंदांच्या किमान चार जाहिराती दिसतातच. मग त्यात नोटिफिकेशन्सच्या असोत वा पॉपअपच्या.
भारतात 1991 साली जागतिकीकरण, बाजारीकरण, खासगीकरण, उदारीकरण सुरू झाले. त्यामुळे भारतीय समाजात अनेक बदल घडून आले. म्हणूनच 1991 साल 'गेम चेंजर' बनलं. याच दरम्यान जाहिरात क्षेत्रानेदेखील नवीन रूप धारण केलं. मला एकदा माझा बाबा सांगत होता, जागतिकीकरण होण्याआधी लोक वर्षातून एकदा दिवाळीसारख्या सणालाच नवीन कपडे विकत घेत असायचे. पण आज मी फेसबूकवर स्क्रोल करत असताना एखादी मिंत्राची जाहिरात दिसते आणि मला तो टॉप आवडला की लगेचच मी ऑर्डर करते. ग्राहकाला आपल्या प्रॉडक्टकडे आकर्षित करण्यासाठी जाहिरातदार करत असलेल्या अभ्यासाला मानलं बुआ...
स्वादभरे शक्तिभरे बरसोंसे पारलेजी, विक्स की गोली लो खिचखिच दूर करो, डी. एस. कुलकर्णी उद्योग समूहाची घराला घरपण देणारी माणसं, नवनीत हाती आले हो, असली स्वाद जिंदगी का... अशा काही जुन्या जाहिरातींचे जिंगल्स कायमस्वरूपी लक्षात राहतात. पूर्वीच्या काळी अशा जिंगल्समुळे तो ब्रँड आणि ते प्रोडक्ट लक्षात राहायचं. पण आता मात्र एकाच ब्रँडच्या अनेक जाहिराती दिसून येतात. त्यामुळे त्याचे जिंगल्सदेखील लक्षात राहत नाहीत. 'उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली.' ही मोहक जाहिरात ऐकली की मला कळतं आता दिवाळी जवळ आली आहे. कॅडबरी कंपनीने कूछ मीठा हो जाये म्हणत केलेल्या कॅम्पेनने तर नवीनच क्रांती निर्माण केली. पूर्वीच्या काळी जेवणानंतर गोड खाल्लेलं मला तरी आठवत नाही. पण आता मात्र जेवणानंतर आपल्याला काहीतरी स्वीट डिश हवीच असते.
जाहिरातींसोबत ब्रँड्सनंदेखील त्यांचं एक वेगळं वलय निर्माण केलं. ज्या पद्धतीने एखाद्या ब्रँडची ओळख ही त्याच्यातील गुणांमुळे होत असते; अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक ब्रँड त्याची एक स्वतंत्र ओळख निर्माण करीत आहे. आपण बाजारातून कोणतीही वस्तू विकत घेताना आपल्याला त्या वस्तूचा आलेला अनुभव आणि तिची पर्सनॅलिटी पाहतो. म्हणजेच कोणता ब्रँड प्रोडक्ट आहे, त्या वस्तूच्या वापराबद्दल इतरांना आलेले अनुभव अशा अनेक गोष्टी त्या ब्रँडची ओळख निर्माण करत असतात.
एखाद्या प्रोडक्टची ज्या पद्धतीने जाहिरात केली जाते अगदी त्याच पद्धतीने एखाद्या माणसाची जाहिरात व कॅम्पेन केलं जातं व ते यशस्वी होऊ शकतं हे 2014 ने दाखवून दिलं. त्यादरम्यान मी शाळेत होते. मला आठवतंय.. "देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो" हे वाक्य अगदी शाळकरी मुलांपासून ते वयोवृद्ध मंडळींपर्यंत सर्वांनाच तोंडपाठ होतं.
भारतात विविध जातीधर्मीयांचे सण आणि उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. हिंदू धर्मीयांमध्ये सणावारांचं, उत्सवांचं प्रमाण जरा जास्तच आहे. यात 33 कोटी देवांची संख्या असल्याचं मानलं जात असल्यानं या सणावारांची, उत्सवांची, जत्रा-यात्रांची खूप रेलचेल आहे. याचाच फायदा जाहिरातदार मोठ्या प्रमाणात घेताना दिसून येतात. वेगवेगळ्या सणांच्या अनुषंगाने सेल्स, ऑफर्स, स्किम्स, बाय वन गेट वन फ्री अशा पद्धतीच्या अनेक जाहिराती या सणावारांच्या निमित्ताने दिसून येतात.
पूर्वी मालिकेदरम्यान असणाऱ्या जाहिरातींचं प्रमाण जास्त होतं. म्हणजे मालिका कमी आणि जाहिरातीच जास्त असं काहिसं चित्र असायचं. पण, आता मात्र मालिकेतल्या सिन्समध्येच चक्क एखाद्या प्रोडक्टची जाहिरात होताना सर्रास दिसून येते. आजकाल इंटरनेट जाहिरातीमध्ये जीमेल ॲड्सच्या प्रमाणातदेखील वाढ झाली आहे. मोठा कन्टेंट असलेल्या सविस्तर जाहिराती काहीच खर्च न करता ग्राहकांना पाठविण्यासाठी जीमेल ॲड्स सोईस्कर ठरतात.
जाहिरातींमुळे ग्राहकांना विविध उत्पादनांची व सेवांची माहिती मिळते. त्यांच्या विशिष्ट दर्जाबाबत पूर्वकल्पना येते. जाहिरातींमुळे ग्राहकाला हव्या त्या वस्तूची निवड करणे सोईचे ठरते. शिवाय खरेदी-विक्रीच्या व्यवहारात जाहिरातींमुळे सुलभता येते. अशा प्रकारे ग्राहकांना मार्गदर्शन करण्याचे काम जाहिरातींमुळे शक्य होते.
जाहिरातींचे एक वेगळे सामर्थ्य आहे. सध्याचं जग हे जाहिरातींनी झपाटलेलं आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. वर्तमानपत्र, टीव्ही, रस्त्यांत जाहिरात, बातम्यांत जाहिरात अशा विविध ठिकाणी आपल्या कानांवर आणि डोळ्यांवर जाहिराती आदळत असतात. अशी एकही जागा नाही जिथे जाहिरातीने शिरकाव केलेला नाही. मानसशास्त्राच्या आधारे या जाहिराती ग्राहकांपर्यंत पोहोचवल्या जातात. दिवसेंदिवस जाहिरात क्षेत्र अधिक प्रगल्भ होणार आहे. त्यामुळे नवनवीन पद्धतीच्या जाहिराती आपल्याला यापुढेही पाहता येणार आहेत.
























