(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BLOG : रक्षाबंधन फिल्मी स्टाईल
केवळ हिंदीच नव्हे तर भारतातील जवळ जवळ सर्वच भाषांमधील चित्रपटांमध्ये नाच गाण्यांना खूप महत्व आहे. नाच-गाण्याशिवाय हिंदी चित्रपट पूर्णच होत नाहीत. नाच-गाण्यांना जसं कोणतंही कारण लागतं तसेच सगळे सणही चित्रपटातील नाच-गाण्यांसाठी एक उत्कृष्ट ‘सीन’ असतो. जवळ-जवळ सगळ्या भारतीय सणांवर चित्रपटांमध्ये गाणी आहेत. यात स्वातंत्र्यदिनासोबत होळी आणि रक्षाबंधन हे चित्रपट निर्मात्यांचे अत्यंत आवडते सण. भावा-बहिणीच्या प्रेमाची गाथा सांगणारा रक्षाबंधन सण आपल्याला अनेक चित्रपटांमध्ये साजरा होताना दिसला आहे. उद्या असलेल्या रक्षाबंधनानिमित्त चित्रपटातील रक्षाबंधनवर एक नजर.
चित्रपटांमध्ये खलनायक नेहमी नायकाच्या बहिणीवर अत्याचार करतो आणि नंतर नायक त्या खलनायकाला यमसदनी धाडतो. अशी दृश्ये आपण अनेक वेळा पाहिली आहेत. भावाने आपले रक्षण करावे म्हणून बहिण भावा राखी बांधते. मग कधी भाऊ तुरुंगात असलेला दाखवला जातो तर कधी हॉस्पिटमध्ये दाखल झालेला. रक्षाबंधन हा संपूर्ण देशातील सगळ्यांचा आवडता सण. हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. बहिण भावाच्या घरी जाऊन त्याला राखी बांधते. अनेक घरांमध्ये यानिमित्ताने एक कौटुंबिक सोहळा पार पाडला जातो. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधनाच्या उत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने बहिणींना भावाच्या घरी जाणे कठिणच झाले आहे. त्यामुळे काही ठिकाणी तर चक्क ऑनलाईन रक्षाबंधन साजरे केले जात आहे. चित्रपट निर्मात्यांचा हा आवडता सण त्यामुळेच काही चित्रपट बहिण-भावाच्या प्रेमावर आधारित होते तर काही चित्रपटांमध्ये भावा-बहिणीच्या प्रेमावर आधारित गाणीही होती.
रक्षाबंधनाचे पहिले गाणे 1959 मध्ये प्रदर्शित निर्माते एल. व्ही. प्रसाद यांच्या ‘छोटी बहन’ चित्रपटात दाखवण्यात आले होते. मोठा भाऊ बलराज साहनी आणि छोटी बहिण नंदा यांच्यावर चित्रित ‘भैया मेरे राखी के बंधन को निभाना’ गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते आणि आजही लोकप्रिय आहे. गीतकार शैलेंद्र यांनी लिहिलेल्या या गाण्याला लता मंगशेकर यांनी आवाज दिला होता.
निर्माता दिग्दर्शक ए. भीम सिंह यांनी 1962 मध्ये अशोक कुमार आणि वहिदा रहमान यांना घेऊन ‘राखी’ चित्रपटाची निर्मिती केली होती तर 1968 मध्ये त्यांनी सुनील दत्त आणि नूतनला घेऊन ‘भाई बहन’ चित्रपटाची निर्मिती केली होती. हे दोन्ही चित्रपट चांगले चालले होते.
‘अनपढ’ चित्रपटात ‘रंग बिरंगी राखी लेकर आई बहना’ हे लता मंगेशकर यांनी गायलेले गाणे माला सिन्हावर चित्रित करण्यात आले आहे तर ‘काजल’ चित्रपटात मीना कुमारी यांच्यावर चित्रित केलेले, आशा भोसले यांनी गायलेले ‘मेरे भैया, मेरे चंदा, मेरे अनमोल रतन’ गाणे बहिण भावाच्या प्रेमाची महती सांगणारे आहे. या चित्रपटाला संगीत रवी यांनी दिले आहे.
बिमल रॉय यांच्या ‘बंदिनी’ चित्रपटात 'अब के बरस भेज भैया को बाबुल, सावन में दीजो बुलाय रे’ हे अत्यंत उत्कृष्ट गाणे आहे. हे गाणेही आशा भोसले यांनीच गायलेले आहे. तुरुंगात असलेली बहीण आपल्या भावाची आठवण काढतानाच्या या गीताचे बोल शैलेंद्र यांचे असून एस. डी. बर्मन यांनी संगीत दिलेले आहे.
देव आनंदने ,हरे रामा हरे कृष्णा, चित्रपटात भावा-बहिणीच्या प्रेमाची गाथा दाखवली होती. झीनत अमानने देव आनंदच्या बहिणीची भूमिका केली होती. चित्रपटातील ‘फूलों का तारों का सबका कहना है एक हजारों में मेरी बहना है’ गाणे आज सर्रास ऐकायला मिळते.
‘रेशम की डोरी’ चित्रपटातही शंकर जयकिशन यांनी एक अत्यंत मधुर असे गीत सुमन कल्याणपुर यांच्या आवाजात दिलेले आहे. ‘बहना ने भाई की कलाई से प्यार बांधा है’ हे गाणे लोकप्रियतेत पहिल्या क्रमांकावर आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
या गाणी आणि चित्रपटांसोबतच ‘चंबल की कसमट चित्रपटातील टचंदा रे मेरे भइया से कहना’, ‘तिरंगा’ चित्रपटातील ‘इसे समझो न रेशम का तार’, ‘बेईमान’ चित्रपटातील ‘ये राखी बंधन है ऐसा’, ‘प्यारी बहना’ चित्रपटातील ‘राखी के दिन’, ‘हम साथ साथ हैं’ चित्रपटातील ‘छोटे-छोटे भाइयों के’, ‘सच्चा झूठा’ चित्रपटातील ‘मेरी प्यारी बहनियां बनेगी दुल्हनियां’, ‘रिश्ता कागज का’ चित्रपटातील ‘ये राखी की लाज तेरा भैया निभायेगा’ ही भावा-बहिणीच्या प्रेमावरील गाणीही अत्यंत लोकप्रिय झालेली आहेत. भावा-बहिणीच्या प्रेमाची महती सांगणारी ही चित्रपटातील गाणी ऐकून आपला रक्षाबंधनाचा आनंद घरातच द्विगुणित करा.