एक्स्प्लोर
Advertisement
असंच सातत्य कायम राहो....
एकूणात सध्या तरी उत्तम चाललंय, आता हेच टीमवर्कचं सातत्य कायम राहावं आणि दुखापतींचं कोणतंही ग्रहण आपल्याल लागलं नाही, तर टीम इंडियाचा सूर्य असाच तळपत राहील हे निश्चित.
इंग्लंड भूमीवर सुरु असलेल्या वर्ल्डकपमध्ये विराट सेनेने तिसरा विजय नोंदवला आणि चाहत्यांची कॉलर पुन्हा टाईट झाली. न्यूझीलंडकडून पहिल्या सराव सामन्यात १७९ लाच गाशा गुंडाळावा लागलेल्या टीम इंडियाने नंतर मात्र ही मरगळ झटकली. आधी दक्षिण आफ्रिका, मग ऑस्ट्रेलिया आणि नंतर पाकिस्तान अशा तीन दादा संघांना लोळवलं आहे. खऱ्य़ा अर्थाने सांघिक कामगिरी करत भारतीय संघ या तीन पायऱ्या चढला आहे.
विशेष म्हणजे टॉप थ्रीमधील एक फलंदाज मोठी इनिंग करतोय, त्यामुळे धावसंख्या लिलया ३०० पार पोहोचतेय. म्हणजे दोन वेळा रोहित आणि एकदा धवनने शतकी शिखर गाठत उत्तम पाया रचला आहे. त्यावर कळस चढवायला कोहलीसारखा चॅम्पियन फलंदाज आपल्याकडे तिसऱ्या नंबरवर खेळतोय, हे आपलं भाग्य. रोहितचं खास कौतुक अशासाठी की, पूर्वी तो आल्यापासून दे दणादण स्टाईलच खेळायचा. आता तो एकतर सुरुवात सावध करतो किंवा मध्येच गियर शिफ्ट करतो. फलंदाज मॅच्युअर होण्याची ही साईन आहे. सचिनचा सलामीला जेव्हा जम बसला तोही असाच गियर चेंज करत खेळायचा. ज्यामुळे त्याने वनडेतला शतकाधीश आणि धावाधीश होण्याचा मान मिळवला.
रोहितच्या फलंदाजीतील एलिगन्स पाहून अंगावर शहारे येतात. त्याचे ड्राईव्हज गुदगुल्या करतात, तर त्याचे षटकार अंगावर रोमांच आणतात. त्यामुळे सुरुवातीला काही डॉट बॉल खेळूनही त्याचा स्ट्राईक रेट इनिंगच्या शेवटी शंभर प्लस असतो. रोहितने चांगल्या फलंदाजाकडून महान फलंदाज होण्याकडे टाकलेलं हे पाऊल आहे. त्याचं धावांचं सातत्य असंच कायम राहिलं, तर विश्वचषक उंचावण्यापासून कोहलीला कोणीही रोखू शकत नाही. त्याच्या याच धावांच्या सातत्यामुळे धवनच्या दुखापतीचा ओरखडा बॅटिंगवर उमटला नाही. त्यात लोकेश राहुलचीही पाकच्या मॅचसाठी खास पाठ थोपटायला हवी. इन फॉर्म प्लेअरच्या जागी पाकिस्तानसारख्या प्रेशर मॅचला आयत्या वेळी ओपनिंग करायला लागणं हे तितकंसं सोपं नाही. त्यासाठी तुमच्याकडे टेम्परामेंट आणि क्लास दोन्ही हवं. राहुलच्या फलंदाजीत दोन्ही ओतप्रोत आहे. त्याने ते रविवारी दाखवून दिलं.
हार्दिक पंड्या नावाचा कत्तलखाना आपल्याकडे मधल्या फळीत आहे आणि तोही नुसती बॅटिंग करत नाहीये, तर बॅट चालवतोय. फलंदाजी ही आपली पूर्वीही बलस्थान होती आणि आताही. पण, आता आपली गोलंदाजी अधिक परिपूर्ण आणि प्रभावी झालीय. म्हणजे आपले जे मॅच खेळतात ते चार किंवा पाचही गोलंदाज विकेट टेकिंग आहेत. पाकच्या मॅचसाठी मी खास उल्लेख कुलदीपचा करेन. या सामन्याआधी ढगाळ हवा बघून शमी की, कुलदीप असा टॉस कोहलीने मनात केला आणि कौल कुलदीपच्या बाजूने दिला. कुलदीपनेही या मानसिक दबावाच्या सामन्यात आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. बाबर आजमचा अभेद्य बचाव त्याच्या अप्रतिम चेंडूने भेदला. सेट बॅट्समनला थ्रू द गेट बोल्ड घ्यायला तुमच्याकडे त्या दर्जाची गोलंदाजी हवी. कुलदीपने ते दाखवून दिलं. बाबर आऊट झाल्यावर पाकिस्तानची फलंदाजी धरण फुटल्यावर पाणी कोसळून बाहेर पडतं तशी कोसळली. फखर, हफीझ आणि मलिक काही चेंडूंच्या अंतरात परतले आणि त्यांच्यासोबत पाकच्या जिंकण्याच्या आशाही पॅव्हेलियनमध्ये गेल्या.
आपण सध्या जिंकतोय, म्हणून ऑल इज वेल. मात्र आधी धवनची दुखापत आणि पाकच्या सामन्यात दोन षटकांनंतर हॅमस्ट्रिंग एन्ज्युरी घेऊन पॅव्हेलियनमध्ये परतलेला भुवनेश्वर दोन-तीन सामन्यांमध्ये खेळणार नाही, असा रिपोर्ट आलाय. यामुळे कोहलीच्या कपाळाला थोड्या आठ्या पडल्या असतील. सुदैवाने आपल्याला इंग्लंडविरुद्धच्या मोठ्या मॅचआधी बरेच दिवस हाताशी आहेत. त्यामुळे आपण भुवनेश्वरला विश्रांती देऊन त्याला नॉकआऊट स्टेजला आत आणू शकतो. तितकी श्रीमंती आज आपल्या गोलंदाजीत आहे, कारण बॅकअपला शमी आहे. विजय शंकर चांगली बॉलिंग करतोय. पंड्याही विकेट्स काढतोय.
यात आणखी एका बाबतीत अलर्ट राहणं गरजेचं आहे ते म्हणजे मिडल ऑर्डरचा कस या वर्ल्डकपमध्ये अजून लागलेला नाही. म्हणजे केदार, धोनी आणि कंपनीला पुरेशी बॅटिंग मिळालेली नाही. कारण, आतापर्यंतच्या तिन्ही सामन्यात रोहित, कोहली, धवनने सातत्याने रन्स केल्यात. त्यामुळे त्या धावांच्या मजबूत पायावर ही मंडळी टेरेस बांधतायत. पण, जेव्हा पायापासून कळसापर्यंत त्यांना धावांची इमारत बांधावी लागेल, तेव्हा त्यांचा खरा कस लागेल. अर्थात अशी परिस्थिती कधीच न येवो. पण, त्यांना मॅच प्रॅक्टिस व्हावी, यासाठी पुढच्या काही सामन्यात बॅटिंग ऑर्डरमध्ये चेंजेस अपेक्षित आहेत. तसंही धोनीसारख्या अनुभवाच्या आणि धावांच्याही राशी घेऊन फिरणाऱ्या ग्रेट प्लेअरला त्याची फार गरज नाही म्हणा. तरीही बॅटची धार एकदा चाचपून घेतलेली बरी. एकूणात सध्या तरी उत्तम चाललंय, आता हेच टीमवर्कचं सातत्य कायम राहावं आणि दुखापतींचं कोणतंही ग्रहण आपल्याल लागलं नाही, तर टीम इंडियाचा सूर्य असाच तळपत राहील हे निश्चित.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
निवडणूक
Advertisement