BLOG | कारगिल माझी कहाणी... श्री आप्पासो नामदेव पाटील
मला सैनिक सेवेतील पहिली पोस्टिंग पंजाब येथे मिळाली. माझी रेजिमेंट मराठा, जाट व राजपूत अशा कट्टर लढवैया कॉमची होती. माझी उंची व शरीरसंपदा पाहून रेजिमेंटमधील वरिष्ठ अधिकारी यांनी लागलेच. मला बास्केटबॉल व हॅन्डबॉल खेळाच्या ट्रेनिंगसाठी रेजिमेंट टीममध्ये सामील करून घेतलं.
>> श्री आप्पासो नामदेव पाटील Ex-HAV (OPR) 1521/152 वायु रक्षा रेजिमेंट
एका वारकरी कुटुंबात आणि संस्कारात वाढलेला एक सामान्य मुलगा. वडील वारकरी संप्रदायातील पांडुरंगाचे निस्सीम भक्त गावातील जमीन दांडग्या शेतकऱ्यांच्या शेतात विहिरी खोदणे आणि पांडुरंगाची जीवापाड भक्ती करणे, येवढीच त्यांची दिनचर्या. आईचा संसार म्हणजे दोन म्हैसी,दोन शेळ्या ,पन्नास कोंबडया आणि तीन मुलं. तीन मुलापैकी एक मुलं दुर्धर आजाराने लहान पणातच गेलं. राहिलेल्या दोन मुलांना फाटक्या प्रपंचातून कसंतरी प्राथामिक शिक्षण देणं चालू असायचं. माझ्या वयाच्या दोन वर्षापासूनच वडिलांसोबत दररोज मास्तीच्या देवळात भजनासाठी जाणे व तेथेच भजन ऐकत ऐकत वडिलांच्या मांडीवर झोपणे आणि भजन संपल्यानंतर आलगद आबांच्या पाटकुळीवरून घरी हातरुनात. सकाळी आईचे आबांना मला देवळात नेल्याबद्दल नित्याचे बोल कानावर आले की, आपसूक झोप उडायची, अनं मी उठून टंबरेल हातात घेवून पळायचो. अशाप्रकारे वयाच्या पाचव्या वर्षापासूनच मी भजनात तरबेज होऊ लागलो. पुढे भजनात इतका तरबेज झालो की माझ्या कोवळ्या आवाजापुढे सुरपेटीचे सुर अपुरे पडु लागले. यामुळे मी आमच्या हनुमान भजनी मंडळाच्या गळ्यातील ताईत होऊन गेलो. पंचक्रोषीत आणि पै-पाहुणे यांच्या आनंदाच्या आणि दुख:द कार्यक्रमांना अजनाची सुपारी असली की माझं जाणं नक्की. यामुळे पंचक्रोषीत आणि माझ्या शाळेत माझ्या भजनाचे चांगलेच कौतुक होऊ लागले.
या कौतुकामुळे मी शिक्षणापेक्षा अजनात आणि गायन स्पर्धामध्येच जास्त रमू लागलो. याची चिंता माझ्या भावाला व आईला सतावू लागल्याने त्यांनी माझ्या भजनावर बंधन आणायला सुरुवात केली. त्यातुनच कसंतरी दहावीपर्यंतच शिक्षण शेजारच्या गावी कधी पायी तर मोडक्या साईकल वरून पूर्ण केलं. वडिलांची इच्छा होती की, मी खुप शिक्षण घेवून मोठं व्हावं. पण फक्त इच्छा असून शिक्षण पूर्ण करणं कठीणच. तरीही माझ्या आई-वडिलांनी मला अशा फाटक्या संसारातुनही तासगांवात कॉलेजात घातलं. पण माझंही मन कॉलेजात रमेना. कसंतरी अकरावी केली. सन 1987 च्या ऑगस्टपासून कॉलेजवरील प्राध्यापकांनी संप पुकारला. त्यामुळे आम्ही मोकळेच त्यातच दिनांक 1 ऑगस्ट रोजी तासगावला मिलिटरी भरती येणार आहे, याची बातमी मिळाली. अन् तो दिवस उजाडला. घरातून कॉलेजला चाललोय म्हणून वह्या-पुस्तके हातात घेवून भरतीस उभा राहिलो. कॉलेजचा संप असल्याने पूर्ण कॉलेज भरतीला. त्यामुळे भरतीच्या गेटवरच 5.7 इंचावर दांडक लावलेलं. तो पार करेल त्याची निम्मी भरती झाली. भरती करण्यासाठी उभ्या असलेल्या साहेबानं हातातील पुस्तकं बघून हिंदीमध्ये काहीतरी स्तुतीसुमनं उधळली. त्याचवेळी हातातील सर्व पुस्तक कंपाउंड तारेच्या बाहेर आणि मी तारेच्या आत. लागलचं दुसऱ्या दिवशी रनिंग आणि लेखी परीक्षा झाली आणि लगेचं हातात रेल्वेचं वारंट. अशा प्रकारे 14 ऑगस्ट 1987 रोजी शाळेच्या जीवनातून स्वतंत्र झालो आणि 15 ऑगस्ट 1987 रोजी भारतमातेच्या सेवेत रुजू होण्यासाठी ट्रेनिंग सेंटर नाशिक येथे पोहचलो.
ट्रेनिंग सुरु होण्यापूर्वीचे मेडिकल चेकअपमध्ये मी कधी बघितले नव्हते. एवढे डॉक्टर व नर्स बघितले आणि त्यांनी माझ्या शरीरावर इतके चिमटे आणि मशीन लावले की, माझं शरीर घाबरून हासू लागलं. त्यांनी लागलचं मला मिलीटरी हॉस्पिटला पाठवलं. मिलिटरी हॉस्पिटलच्या सर्व टेस्ट नॉरमल आल्या, पण त्यांना काही रोग सापडेना. त्यांनीही पुढील टेस्टसाठी नेव्हीचे अश्विन हॉस्पिटल मुंबई येथे पाठवले. तिथंही सर्व टेस्ट नॉरमल आल्या. डॉक्टरांनी नर्सिग असिस्टंटला सांगितले की, याला रात्री झोपेत असताना पल्स रेट व बीपी तपासा, त्यानुसार त्यांनेही तपासणी पूर्ण केली, रिझल्ट पुन्हा तोच. यानंतर मात्र डॉक्टरांनी मला त्यांच्या केबिनमध्ये बोलवलं व झाप-झाप हिंदीमध्ये झापलं. त्यातलं निम्म कळालं व निम्म वरूनच गेलं. डॉक्टरांनी घरची परिस्थिती, वडील काय करतात वगैरे विचारलं. एकंदरित माझं ओखळत बोलण्याचा सूर पाहून त्यांनी मला प्रश्न केला. नोकरीची आवश्यकता आहे का? या प्रश्नांने मात्र मला रडू कोसळलं. कारण गेल्या महिन्याभरात रंगवलेली भारतमातेची मूर्ती एका क्षणात हिमालयासारखी सफेद होणार होती. माझ्या तोडून अपसूकच शब्द गेला "मला मिलट्रीत जायचं आहे." डॉक्टरांनी मला सांगितलं जा तू फिट आहेस. ट्रेनिंग सेंटरमध्ये रिपोर्ट कर. सर्व प्रकारचे ट्रेनिंग पूर्ण करून कसम परेड झाली आणि एकादाचा भारतमातेचा सैनिक झालो आणि माझ्या 56 इंचाच्या छातीतून भारत मातेच्या अभिमानाची हवा श्वासोश्वासात वाहु लागली.
मला सैनिक सेवेतील पहिली पोस्टिंग पंजाब येथे मिळाली. माझी रेजिमेंट मराठा, जाट व राजपूत अशा कट्टर लढवैया कॉमची होती. माझी उंची व शरीरसंपदा पाहून रेजिमेंटमधील वरिष्ठ अधिकारी यांनी लागलेच. मला बास्केटबॉल व हॅन्डबॉल खेळाच्या ट्रेनिंगसाठी रेजिमेंट टीममध्ये सामील करून घेतलं. तसं पाहिलं तर बास्केटबॉल व हॅन्डबॉल खेळावर जाट व राजपूत यांचेच वर्चस्व होते. पण रेजिमेंट टीममध्ये मराठा बॅटरीतील (बॅटरी म्हणजे एक कंपनी) बास्केटबॉल व हॅन्डबॉल या खेळामध्ये रेजिमेंटचा प्रमुख खेळाडू अशी बहादुरी मिळवणारा मी पहिला सैनिक होतो. त्यानंतर मी रजिमेंट, बिगेड, कोर व कमांड अशा अनेक आघाड्यावर माझ्या टीमचं नेतृत्व केलं आणि काही टीमचं सदस्य राहिलो. त्यानंतर सन 1992 हे वर्ष माझ्यासाठी लकी ठरलं ते म्हणजे आर्मी स्पोर्ट फिजिकल ट्रेनिंग स्कूल पुणे येथून बास्केटबॉल या खेळाचा कोच म्हणून प्राविण्य मिळवलं. आणि दुसरं म्हणजे माझं लग्न झालं आणि माझ्या आयुष्यात सहचारिणी आली. अशा प्रकारे सैनिकी जीवन व खेळाडू अशा दोन्ही आघाड्यावर माझी यशश्वी वाटचाल सुरु होती.
सैनिकी जीवन आणि या जीवनाचा अविभाज्य घटक असणारा लढवैय्या सैनिक लढाईसाठी सदैव तत्पर तयार. दिवस होता 20 जुलै 1999 माझ्या कमांडिंग ऑफिसरकडून आदेश मिळाला की पाकिस्तानने कारगिल सेक्टरमधील काही पोस्ट ताब्यात घेतल्या असून अरपली रेजिमेंट आजच आपणास नेमून दिलेल्या टास्कवर लढाईसाठी तैनात होण्यासाठी प्रस्तान करत आहे. पुढील 48 तासात आम्हाला आमची कमांड पोस्ट, गण रडारसाठी आणि राहण्याचे बंकर खोदून तयार करायचे होते ते आम्ही पूर्ण केले आणि लढाईसाठी तयार झालो. एक दिवस रात्री 12 वाजता आमच्या वायरलेस सेटवरून मेसेज मिळाला की आमची टेलिफोन लाईन मधेच कोणीतरी तोडली आहे. ती दुरुस्त करणेसाठी मी ओपीआर आप्पासो पाटील माझा परममित्र ओपीआर नारायण पाटील व आमचे सिनियर ओपीआर हवलदार रमेश गोरे असे तिघेजण आपआपल्या रायफली फायर करणेसाठी रेडी पोजिशनवर ठेवून रात्रीच्या काळोखात बाहेर पडलो. पुढे एका शेतात आमची लाईन कोणीतरी दगडाने तोडलेली आढळून आली. ती योग्य प्रकारे दुरुस्त करून आम्ही रात्री दोन ते तीनच्या सुमारास कमांड पोस्टवरती पोहचलो. ही आमच्या लढाईची पहिली रात्र होती. आमच्या कमांड पोस्टच्या जवळच आमचे दुसरे मित्र नायक अशोक झेंडे यांची वायूरक्षा गन लागलेली होती. त्या गनवरती माझे मित्र नारायण पाटील हेही होते. त्यामुळे आम्ही रात्री ड्यूटी व बायनाकुलर सह एअर सर्च करत जमिनीवर झोपलो होतो. वेळ होती रात्री 8 ते 9 ची तेवढ्यात मला उत्तर-पश्चिम दिशेने आमच्या दिशेने येणाऱ्या फायटर प्लेन किंवा रेकी प्लेनची फोकस लाईट दिसली. आम्ही लगेच कमांड पोस्टला सूचित केले व पुढच्या काही सेकंदात एअर टार्गेट (यंगेज) लॉक झाले आणि 1521 एडी बॅटरी (कंपनी) त्या टार्गेटवर अक्षरश: तुटून पडली. आकाशामध्ये 12 एअर डिफेंस गणचे गोळे एकाच ठिकाणी येत होते. हा नजारा अदभुत व अविस्मरणीय असा होता. त्याचवेळी लगेच पूर्ण जम्मु शहर व परिसरातील लाईट आऊट झाले. आता खऱ्या अर्थाने लढाई सुरु झाली होती.
ती रात्र आम्ही पूर्ण सतर्कतेमध्येच काढली. या कारवाईनंतर माझी रडार असलेल्या सेक्शन-3 वर बदली झाली. तो सेक्शनही अत्यंत मोक्याच्या ठिकाणी होता. तिथे गेल्यानंतर माझे सेक्शन कमांडर व इतर सहकारी यांनी मला फारच चांगले मार्गदर्शन व सहकार्य केले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाली. यावेळी मात्र आम्ही ठरवले होते की दुष्मनाला परत जाऊ दयायचे नाही. त्यानुसार योजना बनवली होती. योजनेनुसार आमाच्या सेक्शन- 3 ने टार्गेट (यंगेज) लॉक केले आणि फायरिंग सुरु केले. पुढील काही क्षणातच पाकिस्तानचे रेक्की प्लेन जवळच्याच नाल्यामध्ये जमीन दोस्त झाले होते. टार्गेट पडले हे आम्हाला माहित होते. पण ते कुठे पडले याची माहीती त्यादिवशी मिळाली नव्हती. दुसऱ्या दिवशी आम्हाला ही आनंदाची बातमी मिळाली व त्यादिवशी खऱ्या अर्थाने आर्मीमध्ये गेल्याचा आणि फौजी जीवनाचा सार्थ अभिमान वाटू लागला.अशा प्रकारे त्यानंतर अनेक दिवस आम्ही लढाई लढलो व शेवटी 26 जुलै 1999 हा "कारगिल विजय" दिवस उजडला आणि भारत मातेच्या वीर सुपुत्रांनी दिलेल्या बलिदान आणि शौर्याने पुन्हा एकदा भारत मातेवर आलेलं संकट नेस्तनाबुत केलं होतं. अशा प्रकारे माझ्या या छोट्याशा जीवनातील काही वर्षे भारत मातेची सेवा बजावण्याचा व जीवन सार्थकी लागलेचा अभिमान मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यत स्मरणापर्यंत राहो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना...
जयहिंद भारत, माता की जय