(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BLOG | कोकणला नजर लागली 'निसर्गा'ची
सध्याची स्थिती पाहता माझं कोकण 20 ते 25 वर्षे मागे आलंय. साऱ्या बागा जमीनदोस्त झाल्यात. गावात रोजगार नसल्यानं मुंबईत अनेक जण मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये स्थायिक होतात. पण, गाव आणि तिथल्या माणसांशी नाळ मात्र काय जोडलेली असते.
टुमदार कौलारू घरं, नारळी-फोपळीच्या बागा, आंबा, काजू आणि समुद्राची गाज म्हणजे 'माझं कोकण'. निसर्गानं मुक्त हस्तानं उधळण केलेले ठिकाण म्हणजे 'माझं कोकण'. 'येवा कोकण आपलंच असा' असं म्हणत इथल्या माणसांनी कायमच सर्वाचं स्वागत केलं. पण, आज मात्र कोकणातल्या किनारपट्टी भागातील चित्र वेगळं आहे. निसर्ग चक्रीवादळ आलं आणि सारं घेऊन गेलं. नारळ, फोपळी, आंबा, काजूच्या बागा जमिनदोस्त झाल्या. घरांची कौलं उडून गेली. चक्रीवादळानं सारं चित्र बदललं आणि माझं कोकण बोडकं झालं. माझं गाव कोकणातलं हे सांगताना ऊर भरून येतो. त्याचा काळजाचं आज पाणी पाणी झालं. कायम हसतं-खेळतं असलेल्या कोकणावर आता दु:खाची छटा जाणवते. उद्याची चिंता जाणवते. कारण सध्या झालेली हानी ही अपरिमित अशीच. न जाणो किती पिढ्या या बागांवर जगल्या. पण त्यांची झालेली अवस्था पाहून काळजात धस्स होतं. उंचच उंच डोंगर दऱ्यांमधल्या दुर्गम भागात जन्मलेल्या आणि वावरलेल्या कोकणी माणसात कणकणखरपणा देखील ठासून भरलेला. पण, चक्रीवादळ आलं सारं घेऊन गेले. लाल मातीच्या कौलारू घरात कित्येक पिढ्या वाढल्या. पण, आज जमीनदोस्त झालेलं घर पाहताना अश्रू आवरणं कठिणच. वाडवडिलांपासून चालत असलेल्या वारशाचा, वैभवाचा कोकणी माणसाला अभिमान देखील भारीच. पण, हे सारं एका क्षणात नाहीसं झालंय.
सध्याची स्थिती पाहता माझं कोकण 20 ते 25 वर्षे मागे आलंय. साऱ्या बागा जमीनदोस्त झाल्यात. गावात रोजगार नसल्यानं मुंबईत अनेक जण मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये स्थायिक होतात. पण, गाव आणि तिथल्या माणसांशी नाळ मात्र काय जोडलेली असते. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात दोन कोकणी माणसं एकत्र आल्यावर, कुणी आपल्या कोकणातलं भेटल्यावर काय मग काय म्हणतेय वाडी? यंदा नाम्या, बावा, शिंदे, कदम, जाधव, गोखल्यांची कलमं लागलीत काय रे? अशी आपुलकीनं चौकशी केली जाते.
संध्याकाळ झाल्यावर पारावर गजाली गात दिवसाचा शेवट सुखद करण्यास आम्हाला वेगळीच धन्यता. पण, यापुढे मात्र चित्र नक्कीच वेगळं असेल. आज निसर्ग चक्रीवादळानं कोकणचं सौदर्य हिरावून घेतलंय. किनारपट्टी भागात झालेली हानी प्रचंड आहे. 'बाबा आम्ही काय असली परिस्थिती याच्या अगोदर कधीच बघितलेली नाय' असं सांगताना जुन्या जाणत्यांच्या आवाजातला कातरपणा मनाला खोल जखम करून जातो. सध्याचा काळ तसा कठिणच ना विज, ना पाणी ना संपर्काचं साधन अशा परिस्थितीत इथला माणूस सध्या सावरण्यासाठी धडपड करतोय. नोकरी-धंद्यानिमित्त शहरांमध्ये असलेल्या लोकांची पावलं गावी आल्यानंतर मात्र सारी परिस्थिती पाहून जाग्यावरच थरथर कापू लागतात. डोळ्यांच्या पापण्या अश्रू ओले करून जातात.
निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यातून सावरण्यासाठी आता सर्वच जण प्रयत्न करत आहेत. सरकारी मदतीची अपेक्षा न करता प्रत्येक जण आपल्यापरिनं सारं काही उभं करण्याचा प्रयत्न करतोय. सध्याच्या स्थितीत आता रात्र देखील वैऱ्याची वाटू लागलीय. कोकण उद्धवस्त झालंय. निसर्ग चक्रीवादळानं निसर्गानं दिलेलं सौदर्याचं देणं ओरबडून नेलंय. पण, त्यानंतर देखील त्यांचा संघर्ष सुरू झालाय तो सारं काही उभारण्यासाठी, डोळ्या देखत पडलेलं, जमीनदोस्त झालेलं घर बांधण्यासाठी आता गावातील आता शेकडो हात पुढे येतायत. उन्मळून पडलेल्या बागा पुन्हा नव्यानं सावरण्याची धडपड सध्या दिसून येतेय. समुद्राची गाज उठ गड्या सावर म्हणत मनाला पुन्हा एक नवी उभारी देतेय. हे सारं उभारताही येईल. त्यासाठी कष्ट देखील घेता येतील. पण, पिढ्यान पिढ्यांच्या जपलेल्या आठवणींचं काय? याच आठवणींनी मन हुंदका देतंय.