Blog : दीर्घकाळ तेजी, अल्पकाळ मंदी
BLOG : तीन वर्षांपूर्वी, 22 मार्च 2020 च्या दिवशी भारतीय शेअर बाजारात (Share Market) हाहाकार माजला होता. कारण सर्व प्रमुख निर्देशांक धडाधड कोसळत होते. निफ्टी निर्देशांकला lower circuit लागलं होतं. पडझडीचं निमित्त होतं अर्थातच कोरोनाचा भारतातील शिरकाव अन सरकारने लागू केलेली टाळेबंदी! जिथे माणसाच्या जीवनाचीच शाश्वती नाही तिथे शेअर बाजार वगैरेचं काय होणार हा प्रश्न दूरचा होता. शेअर बाजारात पैसे गुंतवलेले असणाऱ्यांनी तर कपाळाला हात लावला होता. कारण आपले पैसे बुडाले अशीच अनेकांची धारणा झाली होती. रक्तबंबाळ झालेले जागतिक शेअर बाजार पाहून ही परिस्थिती दीर्घकाळ राहील असंच वाटत होतं. कुठल्याही बाजार तज्ञाने अथवा अर्थतज्ञाने बाजारात तात्काळ रिकव्हरी येईल अशी शक्यता वर्तवली नव्हती. पण काही महिन्यांचा अवकाश की बाजारात परत रौनक परतली! बघता बघता बाजाराने आधीचा All Time High सुद्धा गाठला. तिथून भारतीय शेअर बाजाराची वेगळी सुरुवात झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 23 मार्च 2020 ला ज्या निफ्टीने 7500 चा लो बनवला होता तो आज 17000 आहे. जेमतेम तीन वर्षात दुपटीपेक्षा अधिक तो वाढला.
पण आज शेअर बाजारात गुंतवणूक करणारा गुंतवणूकदार चिंतित आहे, त्रस्त आहे. कारण गेल्या वर्षभरात फार काही हातात लागलेलं नाही. शिवाय युद्ध, व्याजदर वाढ, महागाई आणि रिसेशन या सर्व घटनांमुळे गुंतवणूक क्षेत्रात निराशा पसरली आहे. ती अगदीच अनाठायी आहे असं नाही. पण, त्यातून मार्ग काढणे हाच एकमेव पर्याय आपल्यासमोर आहे हेही तितकंच खरं आहे.
डिसेंबर 2022 महिन्यात निफ्टीने एक High बनवला आणि त्यानंतर बाजारात पडझडीला सुरुवात झाली. 18800 चा निफ्टी 16800 पर्यंत घसरला आहे. केवळ small cap, midcap या high risk समजल्या जाणाऱ्या शेअर्समध्येच नाही तर large cap शेअर्समध्येही बऱ्यापैकी correction झालेलं आहे. कोविड काळात बाजारात Pricewise मोठं correction होतं पण आताचं correction Timewise अधिक आहे. अशा बाजारात नवगुंतवणूकदार टिकत नाही. बाजारातील विविध फेजपैकी हीसुद्धा एक फेज आहे. हीसुद्धा लवकरच संपेल अशी आशा बाळगायला हरकत नाही.
आज गुढीपाडवा आहे आणि आजच कोविड पडझडीला तीन वर्षे पूर्ण होतात. जागतिक संकटानंतरही बाजार परत वधारले हेच अधोरेखित होतं. संकटात संधी हा कोविडने गुंतवणूकदारांना शिकवलेला धडा आहे. आजही काही कारणांमुळे शेअर बाजारात अस्थिरता आहे. पण याकडे संधी म्हणून पाहिलं पाहिजे. अजून तीन वर्षांनी लेख लिहीत असताना बाजार निश्चितच आजच्या परिस्थितीत नसेल. तेच खरं वैशिष्ट्य आहे. पहाट होण्यापूर्वीचा काळोख अधिक गडद असतो, पण त्यातच सूर्योदयाची बीजे असतात! या निसर्गदत्त नियमाप्रमाणे, मंदीतच नव्या तेजीचा उगम होणार हे निश्चित असतं. आर्थिक संकटांचा सामना करण्यासाठी स्वतःचं अर्थकारण अधिक बळकट करावं लागतं. त्यामुळे संधीचा लाभ घ्या, गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर गुंतवणूकीची सुरुवात करा! केवळ व्हाट्सएपवर 'हे वर्ष आपणास आर्थिक समृद्धीचे व भरभराटीचे जावो...' असं औपचारिक मेसेज पाठवण्यापेक्षा त्या मार्गावरून वाटचाल सुरू करा!
(या लेखात व्यक्त झालेली मते लेखकाची स्वतःची आहेत. त्याच्याशी एबीपी माझा, abpmajha.com किंवा एबीपी नेटवर्क सहमत असतील असं नाही).